त्वचारोगाच्या व्यथा - पंचकर्मांच्या कथा

05 Feb 2020 14:44:39

 त्वचारोगांच्या व पंचकर्माच्या यशस्वी उपचारपध्दतीत ही पंचकर्मे अत्यंत शास्त्रीय स्वरूपाची असतात. काटेकोर तपासण्या व जबाबदारीने लक्ष ठेवून करायची असतात. म्हणूनच ती नेहमी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करवून घेणे आवश्यक ठरते.

 
panchkarm_1  H
सुहास फारच वैतागलेला होता. त्याचे काम फिरतीचे. महिन्यातले 20 दिवस तो घराबाहेर असे. मार्केटिंग हेड, त्यामुळे गुरुगाव ते मंगलोरपर्यंत सारखी भ्रमंती आणि त्यातच अंगावर उठणारे पित्त, त्याची प्रचंड खाज, हे शमवण्याकरता दर दोन दिवसांनी घ्यावी लागणारी ऍंटीऍलर्जिक गोळी, या चक्रात तो 4 वर्षे अडकलेला होता. ऍंटीऍलर्जिक गोळी घेतली की येणारे पेंगुळलेपण, त्यावर कष्टाने मात करत क्लायंट्सच्याप्रश्नांना हुशारीने तोंड देणे, फील्ड स्टाफच्या घ्याव्या लागणाऱ्या मीटिंग्ज, त्यासाठीची अचूकता, मेल्स लिहिताना ठेवावी लागणारी एकाग्रता या सगळयात तो कुठेतरी कमी पडत होता. औषधांच्या दुष्परिणामांमुळे त्याच्या प्रगतीला खीळ बसत होती. या दुष्टचक्रातून सुटण्याचा मार्ग आयुर्वेदाच्या औषधांतून मिळेल या विश्वासापोटी तो माझ्यासमोर बसला होता. ''अरे, औषधे काय आहेत यापेक्षासुध्दा उपचारपध्दती काय ते आधी समजून घे.'' मी म्हणालो. ''यात दोन स्तरांवर काम करण्याची गरज आहे. एकतर आजाराला मदत करणाऱ्या खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून निक्षून लांब राहणे - ज्याला पथ्यपालन असे म्हणतात व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरशुध्दीची प्रक्रिया, ज्याला पंचकर्म या नावाने ओळखले जाते. कोणताही आजार मुळात तीन दोषांनी होतो, असा आयुर्वेदाचा सिध्दान्त आहे व हे बिघडलेले दोष रोग निर्माण करत राहतात. त्यांच्यावर औषधे वापरली की ते तात्पुरते काबूत येतात, पण पुन्हा संधी मिळाली की डोके वर काढतात. पिकत घातलेल्या आंब्याच्या अढीतला नासका आंबा जसा वेळीच बाहेर काढून टाकायचा असतो, तसे शरीरात साठलेले बिघडलेले दोष शरीराबाहेर काढून टाकायचे असतात, म्हणजे आजाराला कायमचा पायबंद बसतो. सुहास, तुला जो आजार आहे, त्याला शीतपित्त असे म्हणतात. शरीरात पोटात साठलेले पित्त रक्तात ठाण मांडून बसले आहे व ते त्वचेवर येऊन त्रास देते आहे. त्यामुळे गांधी उठतात, प्रचंड खाज येते, डोळा, ओठ, हाताची बोटे यांना लालसर सूज येते. यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर जागा चुकलेल्या पित्ताला परत पोटात पाठवून उलटीद्वारे बाहेर काढून टाकायला पाहिजे. यालाच वमन असे म्हणतात.''
 

रुग्णाची प्रकृती, कोठा, नाडी, रक्तदाब अशा सर्व आवश्यक त्या तपासण्या करून वमनासाठी रुग्णाला सज्ज केले जाते. औषधी किंवा घरगुती तूप, 3, 5 किंवा 7 दिवस ठरवलेल्या प्रमाणात पिण्यासाठी दिले जाते. पथ्यकर आहार दिला जातो. यालाच स्नेहन म्हणतात. हा टप्पा पूर्ण झाल्याची लक्षणे दिसली की संपूर्ण अंगाला तेलाने मसाज व वाफेचा शेक दिला जातो. या प्रक्रियेला पूर्वकर्म म्हणतात. त्यामुळे शरीरात साठून चिकटून बसलेले दोष सूक्तमार्गाने पोटामध्ये येतात. त्या दिवशी रुग्णाला पोटभर दहीभात, गोड पदार्थ खायला सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी वमनासाठी बोलावले जाते. शरीराला मसाज शेक झाल्यावर उलटीसाठीचे औषध चाखल्यावर दूध, ज्येष्ठमधाचा काढा यापैकी आवश्यक तो द्रव पदार्थ आकंठ पिण्यास सांगितले जाते. यामुळे काही वेळाने उलटीवाटे काढा कफ, पित्त पडून जाते. त्या दिवशी विश्रांती व पुढे काही दिवस पथ्यकर आहारविहार पाळायचा असतो. यात क्रमाने हलक्या आहाराकडून पूर्ण आहाराकडे रुग्णाचा प्रवास होतो. शरीराला हलकेपणा प्राप्त होतो. भूक सुधारते, उत्साह वाढतो व रोगापासून कायमची मुक्ती मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. बरेचदा लोक गरम पाणी, मिठाचे पाणी पिऊन सकाळी उलटी करून टाकतात. त्यापेक्षा वेगळा, तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचा हा भाग आहे. कफ व पित्त यामुळे होणाऱ्या त्वचेच्या आजारांवर याचा अप्रतिम उपयोग होतो.''

 

सुहासने शास्त्रोक्त वमन करून घेतले व त्यानंतरच्या 3 महिन्यांच्या औषधांनी त्याची 4 वर्षांच्या त्रासातून कायमची सुटका झाली. अर्थातच पथ्याचे महत्त्व त्याला उमगलेले आहेच.

 

''मनाली, तुला रक्तमोक्षण करून घ्यावे लागेल.'' मनालीच्या चेहऱ्यावर हे वाक्य ऐकल्यावर असतो तसा भीतीचा लवलेशही नव्हता. ट्रेकिंगची आवड असलेली, दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकणारी, वाचनवेड जपणारी ही मुलगी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षाला शिकते आहे. तिला अंगावर गळवे उठण्याचा त्रास. तोंडावर येणारी मुरमेही पिच्छा सोडत नव्हती. मांडीवर, पाठीवर गळवे येतात. एकदा गळू आले की पिकून फुटेपर्यंत 15 दिवस जातात. असह्य दुखणे, मग 2-3 आठवडे गेले की पहिले पाढे पंचावन्न. दुसऱ्या जागी गळू यायला सुरुवात.. याने ती कंटाळली होती.

''म्हणजे डॉक्टर तुम्ही रक्त काढणार?'' मनालीने विचारले. मी म्हटले, ''रक्तदान करताना काढतात तसेच, फक्त इथे प्रमाण कमी असते. निर्जंतुक सुई व सिरिंज वापरून हाताच्या किंवा पायाच्या शिरेमधून रक्त काढून घेतात व नंतर फेकून देतात. त्याआधी तीन दिवस औषधी तूप प्यायला दिले जाते. शिरेमधून रक्त काढण्याच्या या पध्दतीला सिरावेध असे म्हणतात. या पध्दतीने रक्तातील उष्णता लगेच कमी होते. तिखट, खारट, आंबट पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने रक्त बिघडते. रक्तशुध्दीकरता औषधे घेऊनही कित्येकदा रोगाचे आवर्तन सुरूच राहते. म्हणूनच ही उष्णता बाहेर काढून टाकण्याचा उपाय म्हणजे रक्तमोक्षण.''

 
panchkarm_1  H

''आणि मग जळवा लावतात त्य?'' मनालीचा प्रतिप्रश्न. ''आम्ही एकदा पन्हाळा गड ते विशाळगड ट्रेक केला होता. तान्हाजी पिक्चर बघताना मजा येते! पण आम्ही ट्रेक केला, तेव्हा अनुभवले - महाराजांना थोडक्या वेळात पोहोचणे किती कठीण झाले असेल ते! तर आम्ही जात होतो, तेव्हा आमच्या मित्राला पायाला मोठी जळू लागली होती. काही वेळाने त्याच्या लक्षात आले. मग आमच्या ग्रूपमधल्या एका काकांकडे तंबाखू होती, त्याचे पाणी टाकल्यावर ती जळू लगेच सुटली.'' मनालीने प्रसंग डोळयांसमोर उभा केला. ''पंचकर्म करणाऱ्या जवळपास सर्व वैद्यांकडे जळवा असतातच.'' मी बाटलीतल्या जळवा दाखवल्या. यांचे नीट संगोपन करून सांभाळावे लागते. तिची उत्सुकता पूर्ण करत मी म्हणालो, ''त्वचेच्या ज्या भागावर इसब, खाज, चट्टा, पांढरे कोड, गळू, न भरून येणारे व्रण, नागिणीमध्ये येणारे फोड, गजकर्ण, बरे न होणारे फंगल इन्फेक्शन अशा जागी आम्ही जळवा लावतो. हासुध्दा रक्तमोक्षणाचाच प्रकार आहे. त्वचेवर ज्या जागी जळू लावायची आहे, तो भाग आधी स्वच्छ करून त्यावर जळू ठेवली जाते. जळू दंश करते, तेव्हा सुरुवातीला फक्त सुई टोचल्यासारखी वेदना होते. त्यानंतर जळू संथपणे रक्त शोषत राहते. 10 मिनिटे ते पाऊण तास जळू त्या जागी राहते. नंतर ती आपोआप सुटते किंवा हळदीचे चिमूटभर चूर्ण टाकल्यास ती लगेच सुटते. त्यानंतर बँडेज बांधले जाते.'' मनालीने ऐकता ऐकला गूगल सुरू करून मला काही फोटोही दाखवले. तिला टम्म फुगलेल्या गळवांवर जळू लावून घ्यायची होतीच. त्यानंतर 2 आठवडयांनी तिला सिरावेधाने रक्तमोक्षणही केले व खारट, आंबट पदार्थांची लिस्ट लिहून देऊन हे पदार्थ कायमचे बंद करण्याचे तिच्याकडून कबूल करून घेतले. या घटनेला आता तीन वर्षे झाली. आता तिला कसलाही त्रास नाही.

सोरायसिसच्या रुग्णांचे प्रमाणही सध्या मोठया प्रमाणावर वाढले आहे. दीक्षितकाकाही यापैकी एक. सचिवालयात नोकरीला. 55व्या वर्षी हा त्रास सुरू झाला. नको त्या डिपार्टमेंटला दोन वर्षांपूर्वी बदली झाली आणि हळूहळू प्रथम केसांमध्ये, नंतर पायावर, पाठीवर, पोटावर डाग येऊ लागले व त्यातून सारखा कोंडा पडत असे. रागीट स्वभाव, तडजोड, अन्याय सहन न करण्याची वृत्ती व भ्रष्टाचाराचा तिटकारा असलेल्या व्यक्तीवर कामाचा भाग म्हणून नको त्या गोष्टीचा दबाव येत गेला. मनातले द्वंद्व, भीती यातून निद्रानाश व पुढे सोरायसिस अशी एकंदर रोगाची जडणघडण होती. त्यातच मायग्रेनचीही जुनाट डोकेदुखी मध्ये मध्ये सतावत असे. त्यांनीही जवळपास 1 वर्ष काढे, गोळया, विविध औषधोपचार घेतले होते. मी त्यांना विरेचन व शिरोधारा हे पंचकर्मातले उपचार सुचवले. वमन घेतात त्याप्रमाणेच शरीराला मसाज शेक व औषधी तूप प्यायला देऊन जुलाब होण्यासाठी औषध दिले जाते. जुलाब होतात त्या दिवशी विश्रांती व नंतर पुढील काही दिवस पथ्यकर आहार दिला जातो. या विरेचन प्रक्रियेत शरीरातील पित्तदोष बाहेर काढला जातो व त्यामुळे कोंडा पडणे कमी होऊ लागले. विरेचन घेतल्यामुळे दीक्षितकाकांना फ्रेश वाटू लागले. डोकेदुखी कमी झाली.परंतु रोगाचे मूळ कारण अंतर्मनात होते. अस्वस्थता, निद्रानाश कमी होण्याकरता मनाला एक प्रकारची शांतता येण्याकरता सलग 15 दिवस शिरोधारा देण्याचे ठरवले. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात त्याप्रमाणे रुग्णाला बेडवर झोपवून कपाळावर तेलाची किंवा औषधी काढयाची, दुधाची धार धरली जाते. यासाठी अभिषेक पात्र वापरले जाते.

साधारणत: 40 मिनिटे अशी संततधार मस्तकावर धरल्यावर 10 मिनिटे हेडमसाज केला जातो. अशा शिरोधारेमुळे दीक्षितकाकांना शांत झोप येऊ लागली. जोडीला काउन्सेलिंगही करावे लागले. हळूहळू सोरायसिस मावळू लागला व सहा महिन्यांत ते रोगमुक्त झाले.

अशा या सगळया त्वचारोगांच्या व पंचकर्माच्या यशस्वी उपचारपध्दतीत ही पंचकर्मे अत्यंत शास्त्रीय स्वरूपाची असतात. काटेकोर तपासण्या व जबाबदारीने लक्ष ठेवून करायची असतात. म्हणूनच ती नेहमी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करवून घेणे आवश्यक ठरते.

 

डॉ. महेश ठाकूर

 

9930304495

आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

डोंबिवली (पू.)

Powered By Sangraha 9.0