उद्वर्तनाने उजळवू त्वचा!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Feb-2020
|

 

***वैद्य अनुजा बस्वराज वळसंगे***

आचार्यांनी दिनचर्येत उटण्याचा समावेश केला आहे. दिनचर्येत सांगितलेल्या गोष्टी ह्या नित्य करायच्या असतात. परंतु दुर्दैवाने आपण तेलाभ्यंग, उटणे ह्या गोष्टी दिवाळीपुरत्या मर्यादित करून ठेवल्या आहेत. नित्य अभ्यंग, उद्वर्तन केले गेले तर त्याचे अनेक लाभ शरीरास मिळतील. आयुर्वेदात बाह्य चिकित्सेअंतर्गत उद्वर्तनाचा समावेश होतो. स्वस्थ व्यक्तीसाठी तसेच त्वचेच्या विविध आजारावरही उद्वर्तनाचा उपयोग केला जातो.

 
Sugandhi Utane _1 &n

उद्वर्तनं कफहरं मेदस: प्रविलायनम्।

स्थिरीकरणं अंगानां त्वक्प्रसादकरं परम्॥ (अष्टांग हृदय) उद्वर्तनाच्या संदर्भात वरील सूत्र आयुर्वेदिय ग्रंथात आलेले आहे. उद्वर्तन - उद् + वर्तन उद् म्हणजे वरच्या दिशेने आणि 'वर्तन' म्हणजे लावणे. ज्या क्रियेमध्ये वरच्या - म्हणजेच प्रतिलोम दिशेने औषधी चूर्ण लावले जातात, त्या क्रियेला 'उद्वर्तन' असे म्हणतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 

आपण बोलीभाषेत 'उटणे' असे म्हणतो.

'उद्वर्तन इति गात्रमर्दनम् ।' असाही एक संदर्भ आहे.

शरीरावर विविध औषधींनी मर्दन करणे म्हणजे उद्वर्तन होय. स्नानाच्या पूर्वी त्वचा घर्षणार्थ जी औषधी वापरली जातात, त्यालाच 'उटणे' असे संबोधतात.उटणे त्वचेवर लावले जाते. त्वचेद्वाराच त्याचे पाचन, शोषण होत असते. त्वचेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ या.

'क्षीरस्येव संतानिका: सप्त त्वचो भवति।'

- ज्याप्रमाणे क्षीर म्हणजे दुधावर साय उत्पन्न होते, तशी गर्भावस्थेत गर्भाच्या शरीरावर त्वचेची उत्पत्ती होते.

'त्वक् संवरणे' या धातूपासून त्वचा शब्द बनला आहे.

जी संपूर्ण शरीराला आवरण करून आच्छादित करते ती म्हणजे त्वचा. त्वचेच्या ठिकाणी 'स्पर्शनेंद्रिय' नावाचे ज्ञानेंद्रिय स्थित असते व 'स्पर्श' या गुणाचे ग्रहण त्वचेद्वाराच होते.

'भ्राजक पित्त' हे त्वचेच्या आश्रयाने असते. त्वचेवर केलेले अभ्यंग, उद्वर्तन, लेप इ. गोष्टींचे पाचन व शोषण करून त्वचेला कांती देण्याचे कार्य भ्राजक पित्ताद्वाराच होते.

 

दर 28 दिवसांनी त्वचेवरील मृत पेशींचा स्तर निघून जाऊन त्या ठिकाणी नवीन पेशींचा स्तर येते असतो. या मृत पेशींचा स्तर वेळेत न निघण्यास अनेक कारणे आहेत. हा स्तर वेळेतच शेड ऑफ झाला नाही की त्वचेवर 'डेड स्किन लेअर' साचायला लागतो. मृत पेशींचा स्तर साचणे ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नक्कीच नाही. 28 दिवसांच्या चक्रामध्ये रोज हळूहळू ही क्रिया होत असते. हा स्तर काढला गेला नाही, तर त्वचेची छिद्रे बंद व्हायला लागतात व तिथून त्वचेच्या अनेक त्रासांना सुरुवात होते. यावर उपाय काय? तर आयुर्वेद शास्त्राने त्या काळी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यंग, उद्वर्तन लेप इ. गोष्टींचा दिनचर्येत समावेश केला आहे.

 

या आधुनिकीकरणाच्या जगात आपण अनेक गोष्टी मागे सोडून आलो आहोत. त्यातच आपण तेल, उटणे ह्या गोष्टी सोडून साबणाचा स्वीकार केला आहे. सकाळच्या गडबडीत कमी वेळात भरपूर फेस, शिवाय हवा तो सुगंध देणारी वस्तू म्हणून साबण अधिकच लोकप्रिय झाले. आपल्या त्वचेवर सतत स्नेहांश स्रवित होत असतो, जो त्वचेला आवश्यक असतो. साबणाने हा आवश्यक स्नेहांशही काढून टाकला जातो आणि त्वचा अधिकच रूक्ष होते व त्या रूक्ष झालेल्या त्वचेवर पुन्हा काय लावावे असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. पूर्वी आई किंवा आजी बाळाला तेलाने मालिश करून बेसन-हळदीच्या पिठाने अंग चोळून गरम पाण्याने स्नान घालायची. थंडीच्या दिवसात, दिवाळीत सकाळी लवकर उठून अंगाला तेल लावून घेणे, कानात कोमट तेलाचे 4 थेंब टाकणे आणि मग सुगंधी उटण्याने घासून गरमगरम पाण्याने स्नान करणे ह्यात जी मजा होती, ती साबणात नक्कीच नाही. अलीकडच्या काही वर्षांतल्या दिवाळीत तेल-उटण्याऐवजी विविध कृत्रिम सुगंधी साबणांचा अंतर्भाव झाला व त्याच्या फेसामध्ये उटण्याचा नैसर्गिक सुगंध विरून गेला.

आयुर्वेदाने दिनचर्येचे वर्णन करताना दंतधावनादी क्रियेनंतर 'अभ्यंग' विधी सांगितला आहे. अभ्यंग म्हणजे सर्वांगास तेल लावून स्नान करणे. नित्य अभ्यंग केल्याने जरा (वार्धक्य), थकवा, वात यांचा नाश होतो, त्वचेचा पोत सुधारतो, शरीराला स्थिरता मिळते. निद्रा उत्तम येते. त्यातही विशेषत: शिर, श्रवण (कान) व पादतल प्रदेशी नित्य अभ्यंग करावा, असे आयुर्वेद शास्त्र सांगते. अभ्यंगानंतर येतो तो 'उटण्याचा' क्रम. विविध त्वच्य म्हणजेच त्वचेला हितकारक अशी औषधी चूर्णे किंवा डाळींचे पीठ यांचे मिश्रण दुधात, पाण्यात कालवून सर्वांगास वरच्या (हृदयाच्या) दिशेने मर्दन करून लावणे म्हणजे उद्वर्तन होय. या उद्वर्तनानंतर सुखोष्ण जलाने करावयास सांगितले आहे. 'स्नान' विधी हे आजच्या घाईगडबडीच्या दिवसात आपल्यासाठी एक कामच आहे, जे सकाळी शक्य तितक्या घाईत आपण 'उरकत' असतो. स्नान हे ऊर्जा देणारे, जाठराग्नीला प्रदीप्त करणारे, कण्डू (खाज), मल, स्वेद, थकवा, तन्द्रा, दाह (आग) यांना दूर करणारे आहे.

आता उद्वर्तनाबद्दल अधिक सविस्तर माहिती घेऊ या.

आचार्यांनी दिनचर्येत उटण्याचा समावेश केला आहे. दिनचर्येत सांगितलेल्या गोष्टी ह्या नित्य करायच्या असतात. परंतु दुर्दैवाने आपण तेलाभ्यंग, उटणे ह्या गोष्टी दिवाळीपुरत्या मर्यादित करून ठेवल्या आहेत. नित्य अभ्यंग, उद्वर्तन केले गेले तर त्याचे अनेक लाभ शरीरास मिळतील. आयुर्वेदात बाह्य चिकित्सेअंतर्गत उद्वर्तनाचा समावेश होतो. स्वस्थ व्यक्तीसाठी तसेच त्वचेच्या विविध आजारावरही उद्वर्तनाचा उपयोग केला जातो.

उद्वर्तनासाठी उपयुक्त औषधी द्रव्ये : त्वच्य म्हणजे त्वचेला हितकर अशी सगळी द्रव्ये उद्वर्तनासाठी निरोगी व्यक्तीला वापरू शकतो.

उदाहरणार्थ : चंदन चूर्ण, वाळा चूर्ण, मंजिष्ठाचूर्ण, त्रिफळा चूर्ण, मसूर डाळ चूर्ण इ.

आजकाल स्किन एक्सफोलिएशन हा शब्द फार प्रचलित होतो आहे. पार्लरमध्ये, टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये आपण सतत हा शब्द ऐकत-वाचत असतो. त्वचेवरील मृत पेशींचा स्तर काढण्याचे काम उटण्याद्वारा उत्तमरीत्या होते. किंचितशा खरबरीत अशा उटण्याच्या नित्य वापराने त्वचेला आवश्यक ते पोषण मिळते, स्नेहांश टिकून राहतो, उटण्यामध्ये वापरलेल्या औषधीचेही लाभ त्वचेला मिळतात. त्यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होऊन त्वचेचा पोत सुधारतो. त्वचेवर असणारे डाग, पुरळ जाण्यास मदत होत चेहऱ्याच्या त्वचेलाही उद्वर्तनाचा फायदा होतो. चेहऱ्याच्या त्वचेवर - विशेषत: नाकावर, हनुवटीवर ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स (Pomedons) मोठया प्रमाणात तयार होत असतात व त्यामुळे त्वचेची रंध्रे बंद होऊन त्वचा खराब होते. उटण्याच्या नित्य वापराने या सर्व त्रासांपासून कायमची सुटका होऊ शकते.

उद्वर्तन वातहरं कफमेदोविलापनम्।

स्थिरीकरणमड्गनां त्वक्प्रसादकरं परम्॥

सिरामुखविवि'त्वं त्व'स्थस्याग्नेश्च तेजनम् ॥

सुश्रुत संहिता

उद्वर्तनाचे लाभ सांगताना शास्त्रकार सांगतात की याच्या नित्य वापराने वाताचे व कफाचे शमन होते, त्वचेखाली असणाऱ्या मेदाचे विलयन होते, त्वचेखालच्या सिरांचे मुख उघडतात व त्वचेखालच्या अग्नीचे दीपन होते. या लाभासहितच इतरही अनेक लाभ उद्वर्तनाने मिळतात. विशेषत: स्त्रियांनी उत्सादनाचा वापर केला, तर त्यांना कांतिमान त्वचा मिळते, असाही उल्लेख शास्त्रात आलेला आहे. उटण्याच्या नित्य वापराने घामाची दुर्गंधी, कंडू (खाज) कमी होण्यास मदत होते. नित्य वापराने त्वचा खरोखर मऊ मऊ होते, उन्हाने टॅन झालेली काळवंडलेली त्वचा उजळून निघते. एकंदरच उटण्याच्या वापराने त्वचेचे आरोग्य सुधारते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

उद्वर्तनाचा वापर कोण करू शकतो? उद्वर्तन हे जन्मलेल्या बाळापासून वृध्दांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. जन्मलेल्या बाळासाठी तेल लावल्यानंतर वेखंड, मसूर डाळ, चंदन इ. द्रव्यांनी युक्त मऊ उटण्याचा नक्की वापर करावा. तारुण्यावस्थेत तारुण्यपिटिका इ. अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी उद्वर्तनाच्या वापराने खूप फायदा होतो. वृध्दावस्थेत किंवा तारुण्यातून वृध्दावस्थेकडे जात असताना जेव्हा त्वचेवर हळूहळू सुरकुत्यांची सुरुवात होते, त्याही अवस्थेत स्निग्ध उद्वर्तनाचा लाभ होतो. वयाच्या सर्वच अवस्थांमध्ये त्वचेला उटण्याचा छान फायदा होतो, फक्त वैद्याच्या सल्ल्याने आपण उटणे भिजवण्यातील द्रव्ये बदलू शकतो. उद्वर्तनादी क्रिया विशिष्ट सणापुरत्या मर्यादित नक्कीच नाहीत. या गोष्टी नित्य आणि सर्व ऋतूंत करायच्या असतात. ऋतुमानाप्रमाणे किंवा त्वचेच्या प्रकारानुसार आपण उद्वर्तन भिजवण्यासाठी दूध/पाणी/तेल असे बदल करू शकतो.

 
Sugandhi Utane _1 &n

उटणे लावण्याचा विधी

वेळ असल्यास सुरुवातीला सर्वांगास तेल लावून मग उटण्याने मर्दन करून स्नान करावे. अन्यथा इतर दिवशी उटणे वाटीत काढून गाईचे दूध (तापवलेले किंवा न तापवलेले)/ नारळाचे दूध, पाणी किंवा तेल यामध्ये 15 मिनिटे उटणे भिजवावे. ते चांगले भिजले की थोडया वेळानंतर सर्वांगास घासून उटणे लावावे. या मर्दनाने त्वचेची रंध्रे मोकळी होतात. सर्वांगाचे मर्दन होईपर्यंत त्वचेच्या बाकी भागांवर असलेले उटणे त्वचेवर राहिल्यामुळे त्याचे चांगले शोषण होऊन त्वचेला लाभ मिळतो. मर्दनानंतर शरीरास सहन होईल इतक्या गरम पाण्याने स्नान करावे. अशा पध्दतीने शुध्द सुगंधी औषधींनी निर्मित उटण्यासह शाही स्नानाचा अनुभव घ्यावा. आपल्या गडबडीत स्वत:साठी विशेष वेळ काढून त्वचेची काळजी घेणे आपण केव्हाच बंद केले आहे. जुन्या, लहानपणीच्या तेलापाण्याच्या अंघोळी, सुगंधी उटण्याने पाठ रगडून घेणे हे सगळे अगदीच कालबाह्य होण्याआधी पुन्हा त्या आठवणींचे जतन करू या.

उटणे हे फक्त स्त्रियांनीच लावावे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. उद्वर्तन विधी फक्त स्त्रियांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीही आहे. आयुर्वेद शास्त्र जेव्हा लिहिले गेले, तेव्हा कोणतीही आधुनिक उपकरणे/यंत्रे नसतानाही मानवी शरीराचा व चिकित्सेचा अत्यंत सूक्ष्म विचार केला गेला आहे. आपण आज आधुनिक विज्ञानाने सांगितलेली Skin rejuvenation cycle बघतो, त्यातल्या मृत पेशींच्या स्तराच्या एक्सपोलिएशनचाचा विचार आयुर्वेदाने लेप, उद्वर्तन या क्रियेतून आधीच मांडला आहे. आपण इतर अधुनिक प्रक्रियांद्वारा त्वचेचा पोत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अभ्यंग-उद्वर्तनाचा दिनचर्येत समावेश केला, तर अशा कोणत्याच प्रक्रियांची त्वचेला गरज पडणार नाही.

त्वचेच्या प्रकारानुसार उटणे

1) कोरडी त्वचा (Dry Skin) : कोरडया त्वचेला स्निग्धतेची अधिक आवश्यकता असते. या प्रकाराच्या त्वचेवर सुरकुत्या लवकर पडू शकतात. अत्याधिक कोरडया त्वचेसाठी उटणे दुधात किंवा तेलात भिजवून वापरावे.

2) मध्यम त्वचा (Combination Skin) : ह्या प्रकारची त्वचा खूप कोरडीही नसते किंवा खूप तेलकटही नसते. टी झोनमध्ये (T - Zone : Nose, Forehead and Chin) त्वचा तेलकट व गालावर कोरडी असू शकते. या त्वचेला उटणे दुधात किंवा पाण्यात भिजवून वापरू शकतो.

3) तेलकट त्वचा (Oily Skin) : या प्रकारच्या त्वचेमध्ये तैलग्रंाथीद्वारा अत्याधिक तैल (Sebum) स्रवित होते. या त्वचेवर पुरळ, तारुण्यपिटिका येण्याची शक्यता अधिक असते. या त्वचेकरिता उटणे पाण्यात किंवा गुलाबपाण्यात भिजवून वापरू शकतो.

4) अतिनाजूक त्वचा (Sensitive Skin) : अत्यंत कोमल त्वचा असेल, कोणत्याही प्रकारचे क्रीम, पावडर यांच्या वापराने पुरळ येत असेल, तर वैद्याच्या सल्ल्याने उद्वर्तनाचा वापर करावा.

उटणे वापरताना आपण काय वापरतो आहोत यालाही महत्त्व आहे. सध्या बाजारामध्ये 'हर्बल'चा ट्रेंड सुरू आहे. परंतु 'हर्बल'च्या नावाखाली आपण काय विकत घेतो आहोत, त्या उत्पादनात नक्की कोणत्या आयुर्वेदिक औषधींचा समावेश केला आहे व तो किती प्रमाणात केला आहे हेही तपासणे गरजेचे आहे. अन्यथा कृत्रिम औषधींनी त्वचेला अपाय होऊ शकतात. म्हणून उटणे घेताना वैद्याने बनवलेले किंवा त्यांच्या सल्ल्याने घ्यावे.

चला तर मग, आपल्या दिनचर्येत एका चांगल्या आयुर्वेदिक उपक्रमाचा समावेश करू या आणि उत्तम निरोगी आयुष्याकडे वाटचाल करू या.

सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:।

सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही धन्वंतरीचरणी प्रार्थना.

जय आयुर्वेद!

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

(एम.डी. आयुर्वेद)

8379999716

[email protected]