स्त्री-पुरुष समतेचा बुलंद आवाज - विद्या बाळ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक08-Feb-2020
|

***डॉ. नीलिमा गुंडी***

मासिकाचे संपादन करताना विद्याताई स्वत:चे अनुभवविश्व व्यापक करत राहिल्या. वाचन, प्रवासदौरे, परिषदा, शिबिरे, परिसंवाद यामार्गाने त्यांनी स्वत: आपल्या जाणिवेचे क्षितिज उंचावत ठेवले आणि त्याच वेळी निदर्शने, मोर्चे इत्यादी माध्यमांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही चालू ठेवले. त्यांच्यातला डोळस वाचक, सर्जनशील संपादक आणि कृतिशील कार्यकर्ता यांच्या त्रिवेणी संगमामुळे त्यांचा जीवनप्रवास अनेक पीडित स्त्रियांना संजीवन देत गेला. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा त्यांनी चालू ठेवली.
 
vidya bal passed away_1&n

परंपरागत चाकोरीत स्थिरावलेल्या समाजमनाला नव्या विचाराची जाग आणणे, ही गोष्ट सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नेहमीच आव्हान बनून राहिली आहे. भारतीय समाजमनात स्त्री-पुरुष समतेचा विचार रुजवणे हेही असेच आव्हान होते. विद्या बाळ यांच्या आयुष्यभराच्या विचारमंथनाने आणि अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात तरी आज हा विचार समाजाने स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. कसा होता विद्याताईंचा जीवनप्रवास?

12 जानेवारी 1937ला जन्मलेल्या सुधा केळकर नावाच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलीने आयुष्यात वेगळया वळणवाटा जाणीवपूर्वक चोखाळून स्वत:ला घडवत नेले. अर्थशास्त्रात पदवीधर असलेली आणि लवकर विवाह करून विद्या बाळ नावाने संसारात रमलेली ही गृहिणी पुढे अनेक स्त्रियांसाठी आधारवड ठरली. 'शोध स्वत:चा' या पुस्तकात विद्याताईंनी स्वत:च स्वत:तल्या बदलांचा खोलवर धांडोळा घेतला आहे. त्यांनी लिहिले आहे - 'पेन्स ऑफ ग्रोथ असतात. मला माहीत आहे शारीरिक पातळीवर वाढताना एकदा मी त्या अनुभवल्या होत्या. विचारांनी वाढताना मी त्या पुन्हा अनुभवल्या.' स्त्री मासिकांचे अनेक वर्षे संपादन करताना त्यांच्यातला सर्जनशील पत्रकार तसा जागा झालाच होताच. मात्र 1975मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षामुळे त्यांच्या मनाला जणू शंभर डोळे फुटले. स्त्री मासिकात विद्याताईंनी संपादक या नात्याने स्त्रियांना स्वत:ची मानसिक स्पंदने कागदावर उतरवायला प्रवृत्त केले होते आणि लेखनासाठी मासिकाचे समृध्द अवकाश उपलब्धही करून दिले होते. 'शिक्षणाने मला काय दिले?' या विषयावर मनोगते लिहायच्या विद्याताईंच्या आवाहनाला मी तेव्हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. वाचकांना स्वत:शी संवाद करायला लावण्याचा त्यांचा संपादकीय कानमंत्र मला महत्त्वाचा वाटला होता. 1986मधून त्या 'स्त्री'मधून बाहेर पडल्या. यापूर्वीच त्यांनी 'नारी समता मंच' स्थापन केला होता. या मंचाच्या माध्यमातून त्यांनी ग्राामीण महिलांमध्ये आत्मभान जागे करण्यासाठी 'ग्रोइंग टुगेदर' या प्रकल्पाचे काम केले होते. 1982मध्ये दोन विवाहित महिलांच्या क्रूर हत्येमुळे समाजमन ढवळून निघाले होते. त्या वेळी 'मी एक मंजुश्री' नावाचे पोस्टर प्रदर्शन महाराष्ट्रभर भरवून त्यांनी स्त्रियांवरच्या अन्यायाबाबत मोठया प्रमाणावर जनजागृती केली. स्त्रीप्रश्नाचा वाढता अवाका लक्षात घेऊन 1989मध्ये त्यांनी 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाचे प्रकाशन सुरू केले.

पत्रकार या नात्याने समाजमनाशी एकीकडे संवाद साधत नव्या मूल्यकल्पनांना पोषक अशा रूपात समाजमनाची नांगरणीही करण्याचे काम त्यांच्या लेखणीने सातत्याने केले. मिळून साऱ्याजणींच्या ऑगस्ट 1989च्या पहिल्या अंकातली ही जाहिरात लक्षात घेण्याजोगी आहे - 'हे मासिक मुख्यत: स्त्रियांसाठी हे तर खरंच, तरीपण ते 'त्या' अर्थानं बायकी नसेल. सुजाण आणि संवेदनशील पुरुषांनाही वाचायला ते नक्की आवडेल. या साऱ्याजणी कोण माहीत आहे? वयानुसार होणाऱ्या नैसर्गिक वाढीबरोबर स्वत:च्या विकासासाठी जाणीवपूर्वक जगणाऱ्या साऱ्याजणी, बाईपण स्वीकारून त्यात अडकून न पडता, त्याचा बाऊ न करता, बाईपणाला सहज ओलांडू बघणाऱ्या साऱ्याजणी.' विद्याताईंच्या मनातला स्त्रीप्रश्नाचा आवाका इतका व्यापक होता की, त्यांनी त्याच 'मैतरणी गं मैतरणी' अशी साद घालत ग्राामीण स्त्रियांनाही जोडून घेतले होते. त्यांच्या करुणेला कुंपण नव्हते!

'मिळून साऱ्याजणी'मधून समकालीन स्त्रीप्रश्न वाचकांच्या समोर येत गेले. संशोधनातून समोर आलेली सर्वेक्षणे आणि परिषदांचे वृत्तांत सहज उपलब्ध होत गेले. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले ते मेधा पाटकर अशा अनेक कर्तृत्ववान, संघर्षशील स्त्रियांच्या जीवनगाथा वाचकांना ज्ञात होत गेल्या. उत्तम अनुवादित साहित्य, तसेच कलात्मकतेची बूज राखणारे ललित साहित्य वाचकांना जाणिवेची श्रीमंती देत गेले. प्रबोधन आणि कलात्मकता यांचा तोल राखत या मासिकाने वाटचाल केली आहे. वाचकाला लिहिते करण्यासाठी अनेक चर्चाविषय त्यात दिले गेले आहेत. 'बापलेकीच्या नात्या तुझा रंग कसा आहे?' 'आम्ही मुलींकडे राहतो.' 'पुरुषांचे माहेर', 'लग्न : काही प्रश्न काही उत्तरं' असे अनेक विषय म्हणजे वाचकांना स्वत:चे संवेदनविश्व तल्लख आणि व्यापक करण्यासाठीचे निमंत्रणच होते.

मासिकाचे संपादन करताना विद्याताई स्वत:चे अनुभवविश्व व्यापक करत राहिल्या. वाचन, प्रवासदौरे, परिषदा, शिबिरे, परिसंवाद यामार्गाने त्यांनी स्वत: आपल्या जाणिवेचे क्षितिज उंचावत ठेवले आणि त्याच वेळी निदर्शने, मोर्चे इत्यादी माध्यमांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही चालू ठेवले. त्यांच्यातला डोळस वाचक, सर्जनशील संपादक आणि कृतिशील कार्यकर्ता यांच्या त्रिवेणी संगमामुळे त्यांचा जीवनप्रवास अनेक पीडित स्त्रियांना संजीवन देत गेला. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा त्यांनी चालू ठेवली.

1996मध्ये ब्रायटन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या सहभागी झाल्या होत्या. तिथे 120 देशांमधून सुमारे 3000 स्त्रिया आल्या होत्या. स्त्रियांवरील हिंसाचार, स्त्रीचा गैरवापर आणि स्त्रियांच्या नागरिकत्वाची प्रतिष्ठा याविषयीची ती परिषद होती. या परिषदेचा वृत्तान्त मासिकात देताना त्यांनी लिहिले आहे - 'या परिषदेतलं मला जाणवलेलं सगळयात महत्त्वाचं वैशिष्टय हे की Personal is political या जुन्या नाऱ्याचा मला नव्याने प्रत्यय आला. पुरुषप्रधान समाजरचनेत जे एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडतं, तेव्हा ते तिच्या एकटीपुरतं मर्यादित वास्तव नसतं. त्याचे धागेदोरे अवतीभवतीच्या व्यवस्थेत असतात.' विद्याताईंच्या मते स्त्रीच्या आत्मसन्मानाला आणि आंतरिक शांततेच्या भावनेला धक्का पोहोचवणारी कोणतीही कृती म्हणजे हिंसाचार. त्यांच्यासाठी ती परिषद म्हणजे जगभरातल्या स्त्रियांनी एकत्र येऊन उचललेलं एक पाऊल होतं.

 

वेगवेगळया सामाजिक स्तरांमधल्या स्त्रीच्या ओठांच्या उंबऱ्यात अडखळून थांबलेले शब्द नि विचार विद्याताईंनी हळुवारपणे 'सुईणपण' करून प्रकट होऊ दिले. त्यांचे एकटया स्त्रियांच्या मनोगताचे 'अपराजितांचे नि:श्वास' हे संपादित पुस्तक त्याची साक्ष देते. विद्याताईंनी लिहिलेल्या संपादकीय संवादातून साकारलेले त्यांचे 'साकव' हे पुस्तकही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू समोर आणते. विद्याताईंची संवादशैली जितकी मृदू, तितकीच ठामही राहिली आहे. स्त्री-पुरुष विषमता, स्त्रियांचे लैंगिक शोषण या नि अशा प्रश्नांइतकाच त्यांना वाटणारा गंभीर प्रश्न होता, तो म्हणजे मध्यमवर्गीय स्त्रियांची उदासीनता. अशा वेळी त्या फुले-आगरकरांच्या विचारांची आठवण करून देत. 'काठावर बसणं आता सोडू या' असं आवाहन त्या करत राहिल्या. विद्याताईंची लेखणी आक्रमक बनते तो विषय म्हणजे धर्माची-कर्मकांडाची-समाजमनावर असणारी जबरदस्त मोहिनी हा होय. विद्याताईंचे असे विचार वाचकांना एकाच वेळी अंतर्मुख आणि समाजाभिमुख करत राहतात.

विद्याताई जशा संघर्षशील आणि कृतिशील होत्या, तशाच विकसनशीलही होत्या. त्या स्वत:चे विचारही तपासत राहिल्या. 'मिळून साऱ्याजणी'च्या घोषवाक्यात एकांगीपणा येत आहे, असे वाटतच घोषवाक्यात कालानुरूप बदल करत गेल्या. केवळ स्त्रीप्रश्नावर लक्ष केंद्रित करताना पुरुष दुखावले जात आहेत हे ओळखून त्यांनी 'पुरुष संवाद केंद्र' सुरू केले होते. मतभेद असणाराच 'माणूस बदलू शकतो' यावर विश्वास ठेवत त्यांनी विविध विचारसरणीच्या मंडळींनाही जोडून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या मासिकात स्त्रीवादी दृष्टीकोन मांडणाऱ्या पुरुष वाचकांचीही उपस्थिती दिसत राहिली. विद्याताईंना त्यांच्या कार्यात अनेकांनी भक्कम साथ मिळाली. त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन, ऋजू, संवेदनशील, रसिक व्यक्तिमत्त्व आणि समाजविषयीची आस्था यामुळे त्यांच्या नेतृत्वावर अनेकांनी विश्वास ठेवला. त्यांच्या जबाबदार नेतृत्वांमुळे एकेकाळी कुचेष्टेचा विषय झालेली स्त्री-चळवळ पुढे प्रतिष्ठेचा विषय बनला. त्या स्वत: नवनवीन विचारांनी प्रभावित होणाऱ्या होत्या नि त्यांच्यामुळे अनेक पिढया प्रभावित होत होत्या. खरे तर स्वत:चे मध्यमवर्गीय जाणीवविश्व व्यापक करण्यासाठी त्यांनी आंतरिक आणि बाह्य असा अनेकपदरी संघर्ष केला होता. स्वत:च्या वृत्ती-प्रवृत्तींशी संघर्ष, आप्तस्वकीयांशी संघर्ष, सनातनी मूल्यव्यवस्थेशी संघर्ष अशा अनेकांगी संघर्षातून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावूनसुलाखून निघाले होते आणि समाजातले अंधारे कोपरे उजळूनही काढत होते. अक्षरस्पर्श ग्रंथालय, सखी साऱ्याजणी, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच इत्यादी संस्थांच्या निर्मितीमधून त्यांनी आपल्या कार्याचा पैस वाढवत नेला होता. महिलांना मंदिरप्रवेश मिळावा, यासाठीही त्यांनी काही वर्षांपूर्वी याचिका सादर केली होती. त्यांनी इतरही अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला होता.

विद्याताईंच्या जिव्हाळयाचा आणखी एक विषय होता, तो म्हणजे 'स्वेच्छामरण'. ज्यो रोमन यांच्या 'एक्झिट हाउस' या पुस्तकामुळे त्यांच्या मनात ही कल्पना रुजली होती. मिळून साऱ्याजणींमध्ये त्यांनी या पुस्तकावर एक लेख लिहिला आहे. (दिवाळी 1993). मरण हा जगण्याचाच एक अटळ भाग आहे, तर मग जगण्याइतकाच मरणाच्याही गुणवत्तेचा विचार व्हायला हवा, हा त्यांचा आग्रह होता. विद्याताईंनी नेमका 30 जानेवारी रोजी म. गांधींच्या पुण्यतिथीला अतिशय शांत मनाने या जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांच्या इच्छाशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

मिळून साऱ्याजणींच्या वीस वर्षांतील निवडक लेखांचे संपादन करण्याचे काम विद्याताईंनी माझ्यावर सोपवले होते. त्या निमित्ताने विद्याताई, गीताली, पुष्पा भावे, मिलिंद बोकील, वंदना बोकील असे आम्ही खूपदा चर्चेसाठी एकत्र जमत असू. विद्याताईंनी मला निवडीचे स्वातंत्र दिले आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यातून 'स्त्रीमिती' (2010) हे पुस्तक आकाराला आले. त्यांच्या संपादकीय कारकिर्दीचा मागोवा घेण्याची संधी त्या निमित्ताने मला मिळाली. माझ्या अनेक कवितांना आणि लेखांना, तसेच तीन लेखमालांनाही त्यांच्या मासिकातून स्थान मिळाले. 'गतकाळाची गाज' या माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनालाही त्या आवर्जून उपस्थित राहिल्या आणि छान बोलल्या! त्यांच्याविषयीच्या अशा वैयक्तिक आठवणीही मला एकीकडे काहीशा अस्वस्थ करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रदीर्घ आणि व्यापक स्त्री-चळवळीच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलीला ताठ मानेने जगण्याचे सामर्थ्य मिळत राहील, हा विश्वास मला त्याच वेळी आश्वस्तही करीत आहे.

020-24486015


[email protected]