जॉर्ज इव्हानोविच गुर्जीएफ - चौथ्या गूढ रस्त्याचा प्रवासी भाग 2

विवेक मराठी    16-Mar-2020   
Total Views |

 *** रमा गर्गे***

 मानवी बुद्धीचा सगळा तर्क हा यांत्रिक आणि पुनरुक्तीपूर्ण असतो. तो स्वचालित असतो आणि त्याच त्या प्रकारच्या गोष्टी पुन:पुन्हा करीत असतो. अस्वस्थता, दुःख, क्रोध, अहंकार, काम, लोभ या चक्रात माणूस गुंतून पडतो. गुर्जीएफ म्हणतो, शांती, प्रसन्नता, ताजेपणा, सातत्य ही मानवाची लक्षणे आहेत आणि ती तुम्हाला आतल्या रस्त्यावरच मिळतात. ही फुले बाहेर फुलत नाहीत. म्हणूनच चौथ्या रस्त्यावर उतरून चालायला लागा...

rama_1  H x W:

मागच्या भागात आपण पाहिले की गुर्जीएफ आपल्या शिष्यांना खूपच वेगळ्या पद्धतीने वागवत असत. लिहिणार्याला दगड फोडायला सांगायचे आणि वाचण्याचा कंटाळा असलेल्याला पाठांतरासाठी बसवायचे. एखाद्या महिला शिष्येकडून दागिने घ्यायचे, ते दुसर्या दिवशी परत करायचे. परत मिळतात म्हणून दुसरी एखादी स्त्री दागिने सहज काढून देते, तर तिचे परत करायचेच नाहीत. त्याची पोटली एका खुंटीला टांगून ठेवायची. सगळे वागणे चमत्कारिक म्हणता येईल अशा प्रकारचे.

या वागण्यामागे नेमका काय विचार होता, हे आपण समजून घेऊ. गुर्जीएफच्या मते सृष्टीला, मानवाने विकसित व्हावे असे वाटत नाही. मानवाचा विकास हा अनेकदा सृष्टीच्या विरोधात असतो. सृष्टीला पृथ्वी आणि मनुष्य यांनी एकत्रित नांदावे, निसर्गाची साथ घ्यावी असे वाटत असते. मात्र मानवाने सृष्टीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू नये असे वाटत असते. त्याने ऐहिक-भौतिकात रमावे, उपभोग घ्यावा आणि जीवसृष्टीचा घटक म्हणून वीण वाढवावी ही सृष्टीची मूळ इच्छा असते.

 

त्याचे कारण असे आहे की, मनुष्य जेवढा बाह्य प्रतलावर राहील, निसर्गामध्ये गुंतलेला राहील, स्वतःच्या भावभावना-त्यांची अभिव्यक्ती, ऐहिक सुखदुःख यामध्ये राहील, तेवढा तो आत वळणार नाही. कारण एकदा जर तो आत वळला तर तो आणि सृष्टी यामध्ये भेदच राहत नाही. मग त्याला स्वतःच्याच आत असलेले सृष्टीचे बीज गवसते. त्याला समजते की तोच सृष्टी म्हणजे पूर्ण प्रकृती आहे. हे सगळे पूर्णपणे जाणणाराही तोच आहे, मग अशा वेळी माणूस सृष्टीहून वरचढ होऊन बसतो आणि हेच नेमके विकासक्रमाला नको असते.

 

मानवाने सारे काही बाहेर शोधावे, परंतु अस्तित्वगत प्रश्नाची उकल करू नये, यासाठी सृष्टी सर्व खेळ करते. (आपल्याकडे वेदान्तात असलेली मायावादाची मांडणी येथे आठवते. तसेच सांख्य शास्त्रामधील प्रकृती पुरुष या संकल्पना आठवतात.)

 

गुर्जीएफ म्हणतो - मानवाची विभागणी दोन भागात आहे. एक भाग म्हणजे व्यक्तित्व आणि दुसरा भाग म्हणजे आत्मा किंवा सत्त्व-सार! व्यक्तित्व हे आजूबाजूच्या वातावरणातील शिक्षण, उधार मिळालेली-घडवलेली बाह्य वस्त्रासमान बदलणारी अशी नीतिमूल्ये, स्मृतीच्या आधारे आणलेला पांडित्याचा आव आणि स्वतःविषयी, शरीर निसर्गाविषयी सतत काहीतरी शिकत असणे होय.

दुसरा भाग असतो आत्म्याचा! शिकता स्वाभाविकपणे आलेली समज, जन्मतः प्राप्त झालेली जीवनाची सखोलता जाणण्याची क्षमता, आंतरिक शहाणपण असे सगळे या सत्त्वामध्ये सामावलेले असते. गुर्जीएफ म्हणतो, हा हिस्सा मनुष्याला फारसा ज्ञात नसतो. म्हणूनच हजारो वर्षांपासून निद्रेमध्ये, निरुद्देश संघर्षांमध्ये आणि ज्यातून काही साध्य होत नाही अशा जगण्यामध्ये मानवजात गुंतून पडलेली आहे. त्याच त्या प्रकारची दुःखे सहन करीत पुन्हा पुन्हा त्याच पायवाटेने चालण्याचा आग्रह यात असतो. सर्जनात्मक बौद्धिक शक्ती आणि आंतरिक प्रतिभा अशी या लहानशा गोष्टीमध्ये अडकून पडलेली असते, जेव्हा आतला रस्ता अमर्याद आणि संपूर्ण असतो.

 

त्या वाटेवर जाण्यासाठी माणसाचे वरचे आवरण तोडणे आवश्यक असते. हे व्यक्तित्वाचे आवरण तोडण्यासाठी गुर्जीएफ आपले चमत्कारिक उपाय वापरत असे. ज्यांचे हे आवरण तुटले अशा त्याच्या शिष्यांच्या अनुभवांची गाथा जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा गुर्जीएफच्या या सांगण्यामागचे तथ्य आपल्या लक्षात येते. बुद्धीच्या जाळ्याने तुम्ही लहान लहान मासे पकडता, तर हृदयाचे एकच जाळे संपूर्ण विराटाला कवेत घेते, असे तो म्हणत असे.

 

गुर्जीएफ सूफी संत, भारतीय योगी, तिबेटी लामा, झेन साधू या सगळ्यांना भेटला. तिबेटला जाऊन राहिला, मध्यपूर्वेत गेला, भारतामध्ये येऊन राहिला, एवढेच नव्हे, तर कुराणातील आयता पाठ करून आणि वेषांतर करून हज यात्रेलादेखील जाऊन आला!! ‘मीटिंग विथ रिमार्केबल मेनया त्यांच्या ग्रंथात त्याचे वडील डीन बोर्ष यांच्यासह काही अद्भुत लोकांच्या कथा आहेत. या कथांची शैलीदेखील एक संपून दुसरी त्यातून सुरू होते अशी आहे, जशा अरेबियन नाइट्सच्या कथा किंवा पंचतंत्राच्या कथा असतात. संवाद साधणार्या आणि आंतरिक समजेची संयमित अभिव्यक्ती करणार्या, आजूबाजूला असलेल्या लोकांच्या कमतरतांविषयी सहिष्णू असणार्या, परंतु त्यांच्याशी जोडलेल्या! तथ्य आणि भ्रम यांचे सुस्पष्ट दर्शन घडवणार्या कहाण्या!!

आपल्या सगळ्या अनुभवावरून गुर्जीएफ म्हणतो की, हजारो वर्षांची ती आतमध्ये असलेली वाट तीन प्रकारच्या लोकांना परिचित झालेली असते. हे तीन लोक म्हणजे फकीर, योगी आणि संन्यासी होत. फकीर हे शरीर आणि मृत्यू यावर चिंतन करतात, योगी हे बौद्धिक सवयी आणि त्यासाठी आवश्यक त्या शारीरिक कृती यावर लक्ष केंद्रित करतात, तर संन्यासी हे भावभावना आणि मानसिक शारीरिक अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करतात. या तीन मार्गांची व्याख्या खालीलप्रमाणे केली जातेे.

1. योगी - जो युक्त आहे, तो योगी. युक्त म्हणजे जोडला गेलेला. कशाशी जोडलेले आहे? तर परमसत्याशी. त्यासाठी त्याने बाह्य उपाधींचा आणि वृत्तींचा निरोध केला आहे.

योग - चित्तवृत्ती निरोध।

2. फकीर - फकी म्हणजे राख. ज्याने आपल्या सर्व वासनांची राख केली आहे, परमात्मा मिळावा म्हणून तो दरिद्री भिकारी झाला आहे. ज्याला परमसत्याची चव कळली आहे, तोच विषय-वासनांची राख करू शकतो.

जो आत्मलाभासारखे। गोमटे काहीच देखे।

म्हणौनि भोग विशेखे। हरिखेजेना॥

3. संन्यासी (र्लीववहळीीं ोपज्ञ) - ज्याने सर्व संकल्पांचा त्याग केला आहे, ज्याला यश-धन-प्रतिष्ठा-पद काही नको. कोणतीही प्रतिमा नाही, मनोव्यापार नाही.

सर्व संकल्प संन्यासी योगारुढस्तदुच्यते।

सारांश - तिन्ही मार्ग एकसमान आहेत. मात्र हे तीन मार्ग संपूर्ण नाहीत, असे गुर्जीएफ म्हणतो. त्याच्या मते एका चौथ्या मार्गाची गरज आहे, जी या तीन मार्गांना एकत्रित आणू शकेल. मग हजारो वर्षे जुन्या अशा त्या आतल्या वाटेवर चालताना काहीही अपरिचित वाटणार नाही. या जागृतीच्या परिवर्तनवादी प्रणालीला फोर्थ वेअसे नाव आहे.

या प्रणालीमध्ये आपण जे काही बाह्य परिवेषातून शिकलेलो आहोत, ते सर्व नाहीसे करावे लागते. अहंकाराशी केंद्रित असलेले आपले व्यक्तिमत्त्व पुसून टाकावे लागते. त्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णपणे विसरून जाणे, धुऊन काढणे म्हणजे चौथ्या रस्त्यावर चालणे होय.

गुर्जीएफ म्हणतो, माणसाचे मन कोणत्याही गोष्टीला सरळपणे थेट बघत नाही. सतत तुलनेमध्ये बघते. लहान-मोठा, सुरूप-कुरूप, उंच-बुटका असे भेद अस्तित्वामध्ये नसतात. हे भेद मानवाच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे मानवाला बाहेरच लहानशा जीवनामध्ये घुटमळत राहावे लागते. तो आतल्या असीम अशा विश्वाला मुकतो.

मानवी बुद्धीचा सगळा तर्क हा यांत्रिक आणि पुनरुक्तीपूर्ण असतो. तो स्वचालित असतो आणि त्याच त्या प्रकारच्या गोष्टी पुन:पुन्हा करीत असतो. अस्वस्थता, दुःख, क्रोध, अहंकार, काम, लोभ या चक्रात माणूस गुंतून पडतो. गुर्जीएफ म्हणतो, शांती, प्रसन्नता, ताजेपणा, सातत्य ही मानवाची लक्षणे आहेत आणि ती तुम्हाला आतल्या रस्त्यावरच मिळतात. ही फुले बाहेर फुलत नाहीत. म्हणूनच चौथ्या रस्त्यावर उतरून चालायला लागा... आणि आपल्यासारखे लोक कसे ओळखायचे तेदेखील जॉर्ज इव्हनोविच गुर्जीएफ सांगतात. केवळ बुद्धीने चालणारे आणि बुद्धीबरोबर हृदयाने चालणारे यांतला भेद सहज ओळखता येतो. काय लक्षणे असतात बुद्धीने आणि हृदयाने चालणार्यांची? तर ज्यांच्या संगतीत शांत, प्रसन्न वाटते, सन्मानित वाटते आणि आनंद मिळतो ते आपले खरे साथी. आणि ज्यांच्या संगतीत अस्वस्थता येते, उद्विग्न वाटते, अशांत आणि अपमानित वाटते ते घडीचे प्रवासी. त्यांच्यापासून स्वतःचा आत्मा वाचवा.

बच के रहेना ऐसे लोगों सें

जो बात रुहानी ना जाने.

बगीयां के संग खुद के भीतर

फूल खिलाना ना जाने...