एका दुर्लक्षित समाजाच्या स्थित्यंतराचा प्रवास

विवेक मराठी    16-Mar-2020
Total Views |

***मधुरा गजानन डांगे****

डॉ
. प्रभाकर मांडे यांचेवाल्मिकी समाज (उत्पत्ती, स्थिती आणि परिवर्तन) हे पुस्तक वाचनात आले. या पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील एक अज्ञात पैलू वाचकांसमोर येत आहे, असे प्रकर्षाने जाणवले.


book_1  H x W:

मध्ययुगात इस्लामी आक्रमण काळात भंगी/चूहडा/मेहतर अशा विविध नावांनी ओळखला जाणारा एक समाज उदयास आला. पुढे समाजव्यवस्थेच्या प्रवाहात तो अस्पृश्य आणि दुर्लक्षित मानला गेला. या समाजाचे आजच्या वाल्मिकी समाजात झालेले स्थित्यंतर प्रस्तुत पुस्तकातून सविस्तर स्पष्ट केले आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तत्त्वज्ञ, विचारवंत आणि विविध सामाजिक शास्त्रे यांच्या मतांच्या संदर्भाची सोबत घेत लेखक आपले मत स्पष्ट करतात.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

पुस्तकाची सुरुवात वाल्मिकी समाजाच्या इतिहासाने होते. भारतीय सामाजिक-राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजाची झालेली वाटचाल या पुस्तकात संक्षेपाने नोंदवली आहे. प्रस्तुत समाजनिर्मितीच्या कारणपरंपरा परकीय आक्रमणाच्या संदर्भात आहेत. आपले हिंदुत्व सोडण्यास नकार दिल्याने इस्लामी राज्यकर्त्यांनी दास केलेल्या समाजाची ही कथा आहे. त्यांच्यावर लादल्या गेलेल्या अत्यंत हीन कामामुळे पुढे समाजात यांचे स्थान अस्पृश्य आणि दुर्लक्षित मानले गेले. स्वाभाविकपणे या समाजाचे धर्मांतर वाढले, परंतु तेथेही यांना दुय्यम दर्जा मिळाल्याचे दिसते. धर्मांतराच्या काळात या समाजाच्या अनेक जाती-उपजाती निर्माण झाल्या, उपासना पद्धती बदलल्या. अशा विखुरलेल्या समाजाला वाल्मिकी समाजाच्या एका सूत्रात बांधण्याचे काम प्रामुख्याने आर्य समाज तत्सम संस्थांनी केले. या सगळ्या घडामोडींचा आढावा या पुस्तकात विस्तृतपणे घेतला आहे. विविध कथा, लोककथा, लोकगीते, काही प्रकाशित-अप्रकाशित शास्त्रीय अभ्यासग्रंथ प्रत्यक्ष क्षेत्रीय अध्ययन यांच्या आधारे ही माहिती अधिक उलगडून सांगितली आहे. प्रस्तुत पुस्तकात उपलब्ध असणारी वाल्मिकी समाजातील जातींची यादी, प्रदेशानुसार बदलणारी जातिनामे, गोत्र . माहिती तर वाचकांच्या ज्ञानात अमूल्य भर घालणारी आहे.

वाल्मिकी समाजाला स्वतःचा असा एक गौरवशाली इतिहास आहे. हा समाज लढवय्या आहे, त्यामुळे स्वातंत्र्यसंग्रमात या समाजाने आपले शौर्य वेळोवेळी सिद्ध केले आहे. तत्कालीन ब्रिटिश सैन्यातदेखील वाल्मिकी समाजाचे लोक असल्याचे दाखले या पुस्तकातून मिळतात. वाल्मिकी समाजातील प्रसिद्ध गोगाराणा/गोगादेव, झलकारीबाई .चे परंपरागत चालत आलेले गौरवास्पद स्थान ऐतिहासिक दृष्टीने सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न या पुस्तकातून झालेला दिसतो. या सामाजिक आदर्शांच्या संदर्भात असणारी गाणी, कथा यांचे संकलन यानिमित्ताने वाचकांसमोर येते.

वाल्मिकी समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा पैलू या पुस्तकाने समोर आणला आहे. सातत्याने झालेली धर्मांतरे, विविध प्रदेशांचा आसपास दिसणार्या परंपरांचा प्रभाव, स्वतःला मुख्य प्रवाहात जोडून घेण्याची धडपड यामुळे वाल्मिकी समाजात उपासना पद्धतींचे वैविध्य दिसते. त्यांच्या मान्यता, श्रद्धा यातही काही प्रमाणात वैविध्य दिसते. त्यांच्या अशा विविध पद्धती, सण-उत्सव, परंपरा, मान्यता यांचा आढावा पुस्तकात घेतला आहे.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच वाल्मिकी समाजाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्याचे काम अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी सुरू केले होते. त्यात शुद्धीकरण चळवळी आहेत, समाजाचा मुख्य पुरुष म्हणूनवाल्मिकीची प्रस्थापना आहे, त्यासाठी आखून दिलेली नवी विधी-विधाने, नव्या उपासना पद्धती, नव्या पोथ्यांची निर्मिती असे सगळे प्रयत्न या पुस्तकातून वाचकांसमोर येतात. त्याचबरोबर विविध सरकारी प्रयत्न - उदा., जनगणनेच्या नोंदणी प्रक्रियेत करण्यात आलेले बदल, वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी करण्यात आलेले विविध कायदे, नव्या योजना यांचीही माहिती या पुस्तकातून मिळते.

प्रस्तुत पुस्तकाचा आवाका केवळ वाल्मिकी समाजाच्या इतिहासापुरता मर्यादित नाही. आधुनिक काळात सुरू असणारे प्रयत्नदेखील या पुस्तकात नोंदवले आहेत. अलीकडे सफाई कर्मचारी वर्गाच्या सुरक्षिततेसाठी सुरू असणारे प्रयत्न, त्यांच्या कामाला सन्मान मिळवून देण्यासाठी सुरू असणारे प्रयत्न या सगळ्याचा ऊहापोह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. तसेच वाल्मिकी समाजात होणारे परिवर्तन, जनजागृती, शिक्षणाचा प्रसार यांचाही उल्लेख आवर्जून केला आहे. त्यामुळे नवोदित अभ्यासकांना माहितीबरोबरच भविष्यकालीन कार्याची दिशा देणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाची शैली सरळ, सुबोध आहे. सर्वसामान्य वाचकाला कंटाळा येऊ देता विषयाची समर्थपणे ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. जागोजागी असणारे सुयोग्य संदर्भ, सोपी आणि अर्थपूर्ण उपशीर्षके, स्पष्टीकरण करणारी चपखल अवतरणे वाचकाला खिळवून ठेवणारी आहेत.

 
 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
 

संपूर्ण पुस्तकात मांडे सरांचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन सातत्याने दिसतो. सर्वसामान्य वाचकाला वाल्मिकी समाजाची ओळख करून देणे अधिक अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे हा पुस्तकाचा हेतू यामुळे सफल होईल, असे पुस्तक वाचताना जाणवते. लेखनात कुठेही स्वमताचा आग्रह नाही आणि परमताचे अकारण खंडन आढळत नाही. भरपूर स्पष्टीकरणे देत असताना काही ठिकाणी पुनरुक्तीचा धोका पत्करून पुस्तकाच्या हेतुसिद्धीसाठी केलेले प्रयत्न दिसतात.

 

थोडक्यात, डॉ. मांडे यांचे माहितीपूर्ण लेखन असणारे इतिहासातील एक दुर्लक्षित पर्व उलगडून दाखवणारे हे पुस्तक प्रत्येक सुजाण वाचकाच्या संग्रही असावे यात शंका नाही.

 

 

पुस्तकाचे नाव - वाल्मिकी समाज (उत्पत्ती, स्थिती आणि परिवर्तन)

लेखक - डॉ. प्रभाकर मांडे

पृष्ठसंख्या - 208 किंमत - 280 रु.

प्रकाशक - गोदावरी प्रकाशन, अहमदनगर