अफ - पाक वांशिकता आणि संस्कृती

विवेक मराठी    17-Mar-2020
Total Views |

अफ-पाकमधील रहिवासी मुख्यत्वेकरून इराणी व भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या भाषा, शब्द, गाणी, संगीत, साहित्य भारतीय वा पर्शियन आहेत. त्यांची खाद्यसंस्कृती, पोशाख, कला व स्थापत्य भारतीय वा पर्शियन आहे. परंतु हे दोन्ही देश आपले मूळ, आपली ओळख विसरले आहेत.

pak_1  H x W: 0

पर्शिया (इराण) व भारत (इंडिया) या दोन प्राचीन, वैभवशाली व समृध्द देशांची सीमा अरिया व गांधार दरम्यान होती. या प्रांतावर कधी पर्शियाने, तर कधी भारताने राज्य केले. कधी मध्य आशियाई, कधी तुर्की व कधी अरबांनीसुध्दा राज्य केले. इ.स.पू. चौथ्या शतकातील चंद्रगुप्त मौर्यपासून 19व्या शतकातील राजा रणजितसिंगपर्यंत पूर्व अफगाणिस्तानचा भाग कैक शतके भारतीय राजांच्या अखत्यारीत होता. 18व्या शतकात अहमदशाह अब्दालीपासून अफगाणिस्तान राष्ट्र म्हणून उभे राहू लागले. अब्दालीला अफगाणिस्तानचा पिता मानले जाते. 1893मध्ये इंग्रजांनी डयूरंड रेखा आखल्यावर अफगाणिस्तान हा वेगळा देश म्हणून प्रस्थापित झाला आणि 1947मध्ये इंग्रजांनी रॅडक्लिफ रेखा आखल्यावर पाकिस्तान नावाच्या देशाचा जन्म झाला.

तर अफगाणिस्तान व पाकिस्तान या अगदी 'नवीन' देशांना स्वत:ची म्हणावी अशी संस्कृती व वांशिकता (ethinicity) नाही. अगदी देशाच्या नावापासून! जसे हिंदू लोकांचा हिंदुस्तान. पारसी लोकांचा पर्शिया आहे. येथील हिंदूंची भाषा हिंदुस्तानी / हिंदी (हा भाषा समूह आहे) आहे, तर पारसींची भाषा पारसी / फार्सी आहे. हे logic पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानला लागू होत नाही. 'अफगाणी' नावाचे लोक किंवा 'अफगाणी' नावाची भाषा अस्तित्वात नाही. तसेच 'पाक' नावाचे लोक किंवा 'पाक' नावाची भाषा पण अस्तित्वात नाही. पाकिस्तान हे नाव तर चक्क एक acronym आहे. पंजाब, अफगाण, काश्मीर व सिंध या प्रांतांची आद्याक्षरे एकत्र करून त्याला 'स्थान' हा संस्कृत (Indic) प्रत्यय जोडून Pakistan हे नाव तयार झाले आहे.

अफ-पाकमध्ये मुख्यतः राहणारे लोक आहेत - बलोची, पश्तुनी (यांना पख्तुनी / पठाणीसुध्दा म्हणतात), सिंधी, पंजाबी, हिंदकोवी, हजारा, उझबेक व ताजिक. पश्तुनी, सिंधी, पंजाबी यांच्यामध्ये मुस्लीम, हिंदू व शीख धर्माचे अनुयायी आहेत.

हिंदकोवी हे आता मुस्लीम असले, तरी पूर्वी ते 'हिंदू' असताना त्यांना दिलेले उपहासात्मक नाव आहे आणि हजारा, उझबेक व ताजिक हे अफगाणिस्तानच्या पश्चिम भागातील रहिवासी. या लोकांच्या भाषा आहेत - बलोची, पाश्तो, सिंधी, पंजाबी, मुलतानी (सैराकी), हिंदकी, दारी, हाजरा इत्यादी. साधारणपणे सिंधूच्या पूर्वेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषा इंडो-आर्यन (उत्तर भारतीय) असून, पश्चिमेकडे बोलल्या जाणाऱ्या इंडो-इराणी आहेत. बलोचमधील एक भाषा बुहुई तर चक्क द्राविडी भाषा आहे. हजार एक वर्षांपूर्वी द्रविड भाषिक जमातींनी मध्य भारतातून तिथे स्थलांतर केले होते, त्याची ही खूण. 1947मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर, आपले 'वेगळे'पण दाखवण्यासाठी तिथे 'उर्दू' ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली. उर्दू ही दिल्ली भागात बोलली जाणारी एक हिंदी बोली व फार्सीचे मिश्रण असल्याने तीसुध्दा 'इंडिक' (म्हणजे संस्कृतोत्भव) भाषा आहे.

अफ-पाकमध्ये निर्माण झालेली कला गांधारी अर्थात इंडो-ग्रीक आहे. येथील प्राचीन मंदिरांचे स्थापत्य नागरी (उत्तर भारतीय) शैलीची आहेत. येथील स्तूप व विहार बौध्द (इंडिक) पध्दतीचे आहेत. पाकिस्तानमध्ये फाळणीपर्यंत निर्माण झालेल्या वास्तूंचे स्थापत्य राजस्थानी (इंडिक) शैलीचे होते. पाकिस्तानमधील संगीत हे भारतीय रागदारी संगीत आहे. येथील पोशाख - सिंधी, पंजाबी, पठाणीसुध्दा इंडिक व इराणी आहे. अफ-पाकमधील खाद्य संस्कृतीसुध्दा इंडिक आहे. तेल तापवून फोडणी, हळद, जिरे, कोथिंबीर, गरम मसाला, तूप, वेलदोडा वगैरे स्वयंपाकात वापरले जातात.

 

अफ-पाक मधील प्राचीन साहित्य पाहू गेल्यास पाणिनीची अष्टाध्यायी, कौटिल्याचे अर्थशास्त्र व चरकची चरकसंहिता हे पाकिस्तानमध्ये लिहिलेले होते. कैक वैदिक सूक्ते व पुराणातील आख्याने पाकिस्तानमध्ये लिहिलेली असू शकतात. 1947पर्यंत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेले बहुतांश साहित्य भारतीय होते. पश्चिम अफगाणिस्तानमधील बाल्ख ही तर झरतुष्ट्रची जन्मभूमी मानली जाते. अवेस्तामधील काही गाथा कदाचित अफगाणिस्तानमध्ये लिहिल्या असणे शक्य आहे. रुस्तम-ए-सोहराबसारखे पारसी महाकाव्य अफगाणिस्तानच्या भूमीत लिहिले गेले होते. अलीकडच्या काळात अगदी 19व्या शतकापर्यंत संस्कृत साहित्य पर्शियन भाषेत अनुवादित करणारा प्रदेश अशी अफगाणिस्तानची ओळख होती. गणिताच्या पुस्तकांपासून गोष्टीच्या पुस्तकांपर्यंत शेकडो पुस्तकांची अरबी व फार्सी भाषांतरे या भूमीत केली गेली.

 

आज हे दोन्ही देश इस्लामी संघराज्य असले, तरी तो धर्म पाकिस्तानच्या किंवा अफगाणिस्तानच्या पूर्वजाने स्थापन केलेला नाहीये. तेच भारतातील धर्म - हिंदू, जैन, बौध्द व शीख हे भारतीय माणसांनी स्थापन केलेले आहेत. या धर्मांचे सुधारकसुध्दा याच मातीत जन्मले. तसेच पर्शियाचा पारसी धर्म झरतुष्ट्र या पर्शियन माणसाने स्थापन केला होता. पण अफ-पाक ही दोन्ही राष्ट्रे अरबस्तानमध्ये जन्मलेल्या धर्माचे अनुयायी झाले आहेत. तो धर्म अफ-पाकमधील ॠतू, हवामान, माती, पिके, पाणी, पाऊस, थंडी, वारा, ऊन, नद्या, डोंगर, प्राणी, लोकजीवन, लोककथा, बोलीभाषा, पेहराव, खाद्यसंस्कृती असे काहीच जाणत नसल्याने त्यापासून अलिप्त आहे. नुसताच अलिप्त नाही, तर तेथील जीवनमानाशी सुसंगत नसलेल्या गोष्टी तो थोपवतो.

 

तात्पर्य, पूर्व अफगाणिस्तानात व पाकिस्तानमध्ये अरबी, तुर्की किंवा मुघल राहत नाहीत. अफ-पाकमधील रहिवासी मुख्यत्वेकरून इराणी व भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या भाषा, शब्द, गाणी, संगीत, साहित्य भारतीय वा पर्शियन आहेत. त्यांची खाद्यसंस्कृती, पोशाख, कला व स्थापत्य भारतीय वा पर्शियन आहे. परंतु हे दोन्ही देश आपले मूळ, आपली ओळख विसरले आहेत. तेथील तालिबानी वृत्ती 7व्या शतकातील अरबांची नक्कल करण्यात व्यग्र आहे. पण नक्कल कितीही उत्तम वठवली, तरी शेवटी ती 'नक्कल'च असते. जोपर्यंत हे देश आपले मुळ स्वरूप जाणून घेत नाहीत, आपल्या मुळांना खतपाणी घालत नाहीत तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या बरोबर शेजारच्या देशांना त्यांच्या Identity Crisisच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार.