***डॉ. धनश्री दाते***
कॉर्पोरेट ग्रंथालयासारख्या वेगळ्या क्षेत्रात गेली तीन दशके काम करणार्या डॉ. धनश्री दाते यांनी तंत्रज्ञान क्रांतीचा माहिती जगतावर होणारा परिणाम जवळून अनुभवला. या क्रांतीचे आव्हान आणि त्याची कामातील गरज या दोन्ही गोष्टी त्यांनी ओळखल्या. विशेष म्हणजे या आव्हानाला त्या सकारात्मकतेने सामोर्या गेल्या आणि कारकिर्दीच्या ऐन मध्यावर वेब कन्टेंट मॅनेजमेंट या विषयावर संशोधन करून पीएच.डी. मिळवली.
प्रदीर्घ काळापासून ग्रंथालये ही माहितीचे प्रचंड स्रोत आणि त्यांच्या आदान-प्रदानाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून कार्य करत आहेत. सर्वसामान्यपणे ग्रंथालयांकडे शास्त्र म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही आपल्याकडे पूर्णपणे तयार झालेला नाही. त्यामुळे या विषयात संशोधनात्मक काम करण्याचे प्रमाणही कमी दिसते. मात्र गेल्या दोन दशकात झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे या क्षेत्राकडे नव्याने पाहण्याची आणि त्याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. ही गरज ज्या थोडक्या लोकांना जाणवली, त्यांपैकी एक नाव म्हणजे डॉ. धनश्री दाते.
साधारण ग्रंथालयांचे जे प्रकार आपल्याला परिचित असतात, त्यांपैकी एक म्हणजे शाळा-महाविद्यालयांतील शैक्षणिक ग्रंथालये. त्यानंतर सार्वजनिक ग्रंथालयांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. ही ग्रंथालये वेगवेगळ्या स्तरांतील आणि वयोगटांतील लोकांसाठी खुली असतात. काही ग्रंथालये रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित असतात. डीआरडीओ, विक्रम साराभाई सेंटर, आयुका यांसारख्या संशोधन क्षेत्रातील संस्थांची ग्रंथालये या प्रकारात मोडतात. त्याशिवाय फार माहितीत नसलेला ग्रंथालयाचा एक प्रकार म्हणजे कॉर्पोरेट ग्रंथालय. मोठमोठ्या कंपन्या, संस्था यांमधील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित माहिती पुरवणारे हे ग्रंथालय असते. डॉ. धनश्री दातेंचे काम आणि अभ्यास या शेवटच्या प्रकारातील ग्रंथालयांच्या संदर्भात आहे. टाटासारख्या मोठ्या उद्योग समूहाच्या कॉर्पोरेट ग्रंथालयाचा त्या महत्त्वाचा भाग आहेत. याच कामाची गरज म्हणून ‘वेब कन्टेन्ट मॅनेजमेंट’ या विषयात त्यांनी संशोधन करून पीएच.डी. मिळवली.
कॉर्पोरेट ग्रंथालयाचे किंवा कॉर्पोरेट लायब्ररीचे काम कशा प्रकारे चालते? याविषयी धनश्री दाते सांगतात, “कंपनीच्या व्यवसायाच्या द़ृष्टीने काम करणारी मंडळी म्हणजे बिझनेस डेव्हलपर्स, ज्यात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, मॅनेजमेंट, बिझनेस रिलेशनशिप मॅनेजमेंट्स, अकाउंंट्स आदी विभागातील मंडळींचा समावेश असतो. या लोकांना कंपनीच्या व्यावसायिक स्पर्धकांविषयीची मााहिती उपलब्ध करून देणे हे कॉर्पोरेट लायब्ररीचे काम असते. स्पर्धक कंपनीची सध्याची व्यावसायिक, आर्थिक स्थिती काय आहे? गेल्या तीन वर्षांतील त्याच्या कंपनीची उलाढाल कशी आहे? त्याच्या व्यवसायाचा आलेख कशा प्रकारचा आहे? अशा स्वरूपाची तुलनात्मक माहिती आम्ही उपलब्ध करून देतो, जेणेकरून व्यवसाय वाढवताना स्पर्धक कंपन्यांंच्या ताकदीचा अंदाज घेऊन योजना ठरवायला मदत होते.”
खरे तर धनश्री दातेंनी करिअर म्हणून या क्षेत्राचा तसा विचार केला नव्हता. 80 टक्के ग्रंथपाल (लायब्ररियन) हे अपघातानेच या क्षेत्रात आलेले असतात. त्यांपैकीच आपण असल्याचे त्या सांगतात. होम सायन्ससारख्या गृहिणी कौशल्यांवर भर देणार्या विषयात त्यांनी पदवी शिक्षण घेतले होते. त्यांच्या वडिलांचे एक स्नेही उद्योजक होते. बाँबे हाऊस आणि इतर मोठ्या संस्थांमध्ये त्यांचे येणे-जाणे असे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सतत महत्त्वाची माहिती लागत असे. त्यांना त्या माहितीसाठी कॉर्पोरेट ग्रंथालयात जावे लागायचे. त्या वेळी सहज त्यांनी धनश्री दातेंच्या करिअरविषयी त्यांच्या वडिलांकडे चौकशी केली आणि ग्रंथालयशास्त्राचा पर्यायही सुचवला. त्यानंतर धनश्री दातेंनी त्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दिली. त्यात पास झाल्या आणि या क्षेत्रात आल्या. त्या वेळी सहज घेतलेला तो निर्णय अतिशय योग्य असल्याची जाणीव त्यांना नंतरच्या काळात झाली. गेली तीस वर्षे त्या या क्षेत्रात आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी कार्पोरेट क्षेत्रातच लायब्ररिअनशीप केली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमीमध्ये, काही परदेशी इंजीनिअरिंग कंपन्यांमध्ये अनुभव घेतला. 1994पासून त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये आहेत. त्या सांगतात, “या क्षेत्रात तुमचा ज्ञानाशी थेट संबंध असतो. पुस्तके, ग्रंथ, नियतकालिके आणि अलीकडे वेगवेगळे डेटाबेस यांच्या रूपाने चोहोबाजूंना सतत माहितीचे स्रोत असतात. ज्यांना माहितीची अतिशय निकड आहे, तेच लोक तुमच्या संपर्कात असतात. त्यांच्यासह काम करताना आपण अधिकाधिक माहितीसंपन्न होऊ लागतो.”
माहिती तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमे यांमध्ये गेल्या दोन दशकांत वेगाने झालेल्या क्रांतीने सर्वच प्रकारच्या माहिती क्षेत्रांवर परिणाम झाला. कॉर्पोरेट ग्रंथालयेही त्याला अपवाद नाहीत. ई-रिसोर्सेस आल्यामुळे या क्षेत्राचा संपूर्ण ढाचाच बदलला आहे. कामाची पद्धत बदलली आहे. डॉ. दाते या संपूर्ण बदलाच्या साक्षीदार होत्या. त्या सांगतात, “पूर्वी पुस्तके, नियतकालिके अशा मुद्रित स्वरूपात सर्व माहिती असायची. आम्ही विक्रेत्यांकडून तशा प्रकारचे साहित्य विकत घेऊन ग्रंथालयात त्याचा संग्रह करत असू. लोक ग्रंथालयात येऊन ती माहिती वाचायचे. इंटरनेट आल्यानंतर मात्र माध्यमे झपाट्याने बदलली. माहिती मिळवण्याचे इतके दरवाजे खुले झाले. अधिकाधिक लोकांकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती मिळवण्याची सोय झाली. इंटरनेट लोक मोठ्या प्रमाणात वापरू लागले. आम्हीही इंटरनेटचे स्रोत विकत घ्यायला लागलो. मग त्यातली आव्हाने काय आहेत हे आमच्या लक्षात यायला लागले. या वेब जगतातील माहितीचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजून घेण्याची गरज मला वाटू लागली. माझ्या वाचकांसाठी उपयुक्त माहिती देण्याच्या अनुषंगाने मी कायमच नियतकालिके वाचत असते. वेब कन्टेट मॅनेजमेंट हा विषय सातत्याने वाचनात येऊ लागला. त्या वेळी मला वाटले की ग्रंथालयांच्या दृष्टीनेही हा विषय महत्त्वाचा आहे आणि मी जेव्हा त्या अनुषंगाने विचार करू लागले, तेव्हा मला त्याचा अधिकच घनिष्ठ संबंध असल्याचे जाणवले. म्हणून मी त्या विषयाची पीएच.डी.साठी निवड केली. अर्थात पीएच.डी.चा विषय माझ्या दैनंदिन कामाशी निगडित असल्याने त्याचा अभ्यास करताना खूप मदत झाली. अर्थात कामाव्यतिरिक्त या संशोधनासाठीही अतिरिक्त वेळ द्यावा लागत असे. टाटा संस्थेनेही संशोधनासाठी प्रोत्साहन दिले. तसेच हा संशोधनाचा प्रवास सुकर करण्यासाठी घरच्यांचा पाठिंबाही महत्त्वाचा होता.”
आपल्या संशोधनाविषयी त्या पुढे सांगतात, “इंटरनेटच्या माध्यमातून वेगाने येणार्या माहितीचे व्यवस्थापन कसे करायचे? वेबचे रिसोर्सेस विकत घ्यायचे म्हणजे काय? ते कसे शोधून काढायचे? त्याची विश्वासार्हता काय? त्याचे संदर्भ बरोबर आहेत की नाहीत किंवा माहिती अपडेटेड आहे का? आपल्याला माहिती देणारा कोणता स्रोत चांगला आहे, अपडेटेड आहे, खात्रीशीर आहे या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. हे सर्व विकत घेण्याच्या माहितीविषयीचे. मात्र ती विकत घेतल्यानंतर पुस्तकासारखी शेल्फमध्ये ठेवता येत नाही. ती माहिती कुठेतरी सुरक्षित स्टोअर करून ठेवावी लागते. त्याला काही पासवर्ड द्यावा लागतो, त्याचे अॅक्सेस देणे हा एक प्रकार वाढला. कारण ठरावीक लोकांनाच त्याचे अॅक्सेस द्यायचे असतात. या माहिती विक्रेत्यांशी एक कायदेशीर करार करावा लागतो. तो करताना त्या विषयीची पूर्ण माहिती घ्यावी लागते. तुम्हाला अपेक्षित असलेले सर्व नियम त्यात आहेत की नाहीत हे पाहावे लागते. यात कन्टेन्ट आपल्याला काही कालावधीसाठी भाड्याने मिळत असतो. त्याचे रिन्युअल करावे लागते. जितक्या माहितीची आवश्यकता आहे तितक्याच माहितीचे अॅक्सेस मिळवावे लागतात. हा सगळा अॅक्सेस मॅनेजमेंटचा भागसुद्धा वेब कन्टेन्ट मॅनेजमेंटमध्ये येतो.”
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
संगणकीकरणामुळे ग्रंथालयांच्या रचनेत आणि कार्यपद्धतीतही बदल झाले असल्याकडे डॉ. दाते लक्ष वेधतात. “संगणकीकरणामुळे ग्रंथपालांकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या आहेत. निदान कॉर्पोरेटमध्ये तरी मी नक्कीच सांगू शकते. केवळ मी सांगतोय ते द्या असे राहिलेले नाही. त्यांना हे सगळे वाचण्यात वेळ घालवून व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. त्यामुळे अपेक्षा अशी असते की ग्रंथपालांनी सगळे वाचून त्यांना हवा असलेला मजकूर अचूक शोधून, तो वाचून आम्हाला व्यवसायासाठी लागेल तेवढाच मजकूर सारांशरूपात द्यावा, जेणेकरून आमचा वेळ वाचेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे सहयोगी कार्यपद्धती (कोलॅबरेटिव्ह वर्क स्टाइल). अलीकडे एकाच संस्थेचे रिटेल, बँकिंग, आरोग्य सेवा (हेल्थकेअर) असे अनेक आयाम असतात. त्यात वेगवेगळे लोक काम करत असतात. प्रत्येकाला कस्टमाइज्ड पॅकेजेस हवी असतात. उदा. एखाद्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या आरोग्य सेवा विभागात काम करणार्याला या क्षेत्रात त्याचे कोण कोण स्पर्धक आहेत, त्याचे ग्राहक कोण आहेत या बाबतच्या घडामोडी वेळोवेळी पुरवण्याचे काम आम्ही करतो. या माहितीच्या अनुषंगाने आपल्याला कुठे संधी मिळू शकेल याचा अंदाज संबंधितांना घेता येतो. तसेच ग्राहकांबरोबरच्या मीटिंग्जच्या, चर्चेच्या वेळीही या माहितीची मदत होते. व्यवसाय वाढवण्यासाठी अशी जी महत्त्वाची माहिती लागते, ती ग्रंथपालाने स्वत:होऊन पुढाकार घेऊन संकलित करून द्यावी अशी अपेक्षा वाढली आहे आणि संगणकीकरणामुळे हे सगळे सोपे झाले आहे.
पूर्वी ग्रंथालयात ग्रंथपाल ही व्यक्ती महत्त्वाची असे. आता त्यात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढल्याने ग्रंथालयशास्त्राच्या जोडीला ऑटोमेशन, आयटी, वेब डिझायनिंग, कन्टेट रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, डेटा अॅनालिस्ट आदी विषयातील माहितगारांचाही समावेश असतो. या सगळ्यांची एक टीमच तयार होते.”
इतक्या वर्षांत डॉ. धनश्री दातेंच्या जबाबदारीत सातत्याने वाढ होत राहिली. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत. त्यामुळे नवीन संस्थेच्या ग्रंथालयात काम करताना तेथील कामाचे स्वरूप, व्यावसायिक गरजा हे समजून घ्यावे लागायचे. प्रत्येक संधीतून नवीन काही तरी शिकण्याची जिज्ञासा हा डॉ. धनश्री दातेंचा स्वभाव. टाटामध्ये तर नव्या गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल असे वातावरण असल्याने त्याचाही फायदा त्यांना झाला. उदा. कंपनीत अनेक ऑनलाइन लर्निंग मोड्यूल्स उपलब्ध केलेले असतात आणि कर्मचारी त्यांच्या सोयीने कधीही जाऊन ते शिकू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने संस्था आयोजित करते. संस्थेच्या ग्रंथालयात काम करणार्यांसाठीही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. संस्था मोठी असल्याने संस्थेच्या वेगवेगळ्या आयामांवर काम करण्याची संधी डॉ. दातेंना मिळाली. संगणकीकृत कामासाठी लागणार्या कौशल्यांचा विचार करून त्या त्यांच्या ग्रंथालय टीमचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेतात. त्याशिवाय ई-रिसोर्सेस मॅनेजमेंटचे कामही त्यांनी केले आहे.
दोन वर्षांपूर्वी इन्फरमॅटिक्स बंगळुरू यांच्याद्वारे तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणार्या ग्रंथालयांसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला होता, तो टाटाच्या ग्रंथालयाला मिळाला. “केवळ छान ऑटोमेशन किंवा तंत्रज्ञान आहे म्हणून ते ग्रंथालय उत्तम असा निकष नव्हता, तर त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो, त्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता कशा प्रकारे सुधारली आहे याचेही निरीक्षण या पुरस्कारासाठी करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी आयआयटी, आयआयएम अशा मोठमोठ्या संस्थांच्या लायब्ररींचेही नामांकन होते. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे आमच्या कामाचे खरे कौतुकच होते,” अशा शब्दांत त्या आपला अनुभव मांडतात.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिकांचे जाळे देशभर पसरलेले आहे. या क्षेत्राशी निगडित अनेक परिसंवादांमध्ये, चर्चासत्रांमध्ये डॉ. धनश्री दाते यांना निमंत्रित केले जाते. ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने ही संधी असल्याचे डॉ. दाते मानतात. त्या सांगतात, “एखादा विषय व्याख्यानासाठी मिळाला की माझ्या डोक्यातील विचारचक्र सुरू होते. त्या विषयाचा अधिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने माझे वाचन सुरू होते. त्यात मी अधिक समृद्ध होते. त्यामुळे अशा संधी मी सहसा चुकवत नाही. अशा परिषदांमध्ये देशातीलच नव्हे, तर परदेशातीलही या विषयातील तज्ज्ञांशी भेट होते. विचारांची, माहितीची देवाणघेवाण होते. तुलनात्मक अभ्यासही करता येतो. हे नेटवर्किंग खूप गरजेचे आहे आणि आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात ते खूप सोपे झाले आहे.”
डॉ. दातेंचे काम कॉर्पोरेट ग्रंथालयांशी जोडलेले असले, तरी एकूणच ग्रंथालय क्षेत्राचा विचार त्यांच्या आपुलकीचा आहे. सार्वजनिक वाचनालयांना अलीकडे अनास्थेचा सामना करावा लागत आहे. अनेक जुनी ग्रंथालये बंद पडत असल्याचे ऐकायला, वाचायला मिळते. तंत्रज्ञानाच्या फेर्यात वाचनसंस्कृती हरवत चालली आहे, अशी तक्रार ऐकायला मिळते. यावर “ग्रंथालयांनीही बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अपडेट राहायला हवे” हा डॉ. दातेंचा अनुभवी सल्ला मनोमन पटतो.
डॉ. दाते परदेशवारीला जातात, तेव्हा तेथील ग्रंथालये आणि वाचनसंस्कृती यांचे निरीक्षण करत असतात. त्या दृष्टीने आपल्याकडे काय त्रुटी आहेत, त्यावर कशा प्रकारे मात करता येऊ शकते असा विचार त्या करतात. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी लोकांना ग्रंथालयांकडे आकर्षित करायला हवे असे त्यांना वाटते. हे त्यांना स्वत:लाही कृतीत उतरवायचे आहे. छोट्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने भविष्यात काम करण्याचा त्यांचा मानस आहे. या क्षेत्राविषयीचा त्यांचा अभ्यास आणि त्याविषयीची आपुलकी पाहिली, तर हे त्यांचे स्वप्न त्या नक्की पूर्ण करतील याविषयी विश्वास वाटतो. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
-----------------------------