ग्लोबल मदर मनामनात... !

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Mar-2020
|

***संगीता धारूरकर***

आपल्यासारख्याच चार सामान्य माता इतर देशांतील मातृशक्तीचा शोध घेत चक्क चारचाकी वाहनाने लंडनपर्यंत प्रवास करतात, हीच एक अलौकिक गोष्ट होती. त्यांना जगात काय अनुभव आले? तेथील मातांची, कुटुंबाची स्थिती कशी आहे? अशा अनेक गोष्टी महिलांना जाणून घ्यायच्या होत्या. विशेष म्हणजे माधुरीताई यांनी संवादी शैलीत अनुभवकथन केलं. आपल्या देशाची जगाला देणगी ठरावी अशी कुटुंबव्यवस्था, देशाची उच्च विचारसरणी सगळीकडे पोहोचवायला हवी. मातृत्वात मोठी शक्ती आहे. या धाग्याने आलेले अनुभव विणत त्यांनी संवाद साधला.

womens day_1  H 

चार बायकांनी स्वतःच चारचाकी गाडी चालवत भारत ते इंग्लंड असा बावीस देशांत, साठ दिवसांत, 23657 किलोमीटर प्रवास केला. हा प्रवास चार बायकांचा नव्हता, तर तो चार संवेदनशील आयांचा होता. मी जशी आई आहे तशी दुसऱ्या देशातील आई आहे, तिचं मुलाचं नातं आपल्यासारखंच आहे काय? असे अनेक प्रश्न या चौघींपैकी माधुरी सहस्रबुध्दे यांना पडले. त्यांच्या सहविचारी मैत्रिणी भेटल्या, तिथूनच मग एक धाडसाचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यातील अनुभव माधुरीताई उलगडून सांगत होत्या आणि तुडुंब भरलेल्या सभागृहामधील महिला एकचित्ताने ऐकत होत्या. सभागृहच काय, सभागृहाबाहेचा परिसर, गॅलरी असा सारा भागही खचाखच भरला होता. औरंगाबादकरांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात दोन्ही अर्थाने असं मातृशक्तीचं अभूतपूर्व दर्शन झालं होतं.


नारी शक्ती मंच. राष्ट्रीय दृष्टीकोन घेऊन विविध क्षेत्रांत महिलांचं संघटन करून काम करणाऱ्या संघटनांनी महिलांच्या सामायिक प्रश्नांवर विचारविनिमय, प्रसंगी आंदोलन करण्याच्या हेतूने संभाजीनगरमध्ये या मंचाची स्थापना केली आहे. ही संघटना प्रत्यक्षात यंदा स्थापन झाली असली, तरी गेल्या काही वर्षांपासून अशी समविचारी महिलांची संघटना असावी असा विचार अनेक जणींच्या मनात होता. हैदराबाद येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी विदर्भात एकतर्फी प्रेमातून एका मुलीला एका नराधमाने जाळून ठार मारलं. यामुळे सगळया समाजासारखंच आम्ही मैत्रिणी अस्वस्थ झालो. या अस्वस्थतेतून पहिली प्रतिक्रिया म्हणून महिला समन्वयाचं काम करणाऱ्या साधना सुरडकर यांच्या नेतृत्वखाली एक बैठक घेण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांना निषेधाचं निवेदन देण्यात आलं. केवळ निवेदनं देऊन प्रश्न सुटत नसतात, तर आपणही पुढाकार घेऊन प्रबोधन, जागृती करावी, महिलांच्या जाणिवांचा परीघ वाढवावा, वेळ पडली तर एखाद्या विषयावर रणरागिणीचा अवतार घ्यावा लागेल, ते चारचौघींनी न करता एक मोठं संघटन करून केलं तर अधिक प्रभावी आणि परिणामकारक होईल असं वाटलं. महिला दिनाचा कार्यक्रम हा अनेक संघटनांचा सहभाग घेऊन करण्याचा विचार व्यक्त होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जनकल्याण समितीच्या सीमा कुलकर्णी, रेखा सोनुने यांनी संपर्क केला, तेव्हा एक नाही, दोन नाही तर तब्बल एकवीस संघटना या उपक्रमात सहभागी होण्यास तयार झाल्या. नारी शक्ती मंच ही संघटना महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आली. भगवान बाबा चिल्ड्रन्स होम, सामाजिक समन्वय समिती, मराठा बिझनेस नेटवर्क, संवाद सेत्रू प्रतिष्ठान, संगिनी फोरम, अखिल भारतीय विदयार्थी परिषद, अधिवक्ता परिषद, अखिल भारतीय ग्रााहक पंचायत, जनकल्याण समिती, उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समिती, नागरिक समन्वय समिती महिला आघाडी, क्रीडा भारती, ओंजळ महिला मंडळ, विद्याभारती, संस्कार भारती, भाजपा, संस्कार भारती, सावित्रीबाई फुले एकात्म महिला मंडळ, दुर्गा वाहिनी, ब्राह्मण महिला मंच, बहुभाषिक संघटना सातारा परिसर या संघटना सहभागी होत्या. अनेक काठया मिळून एक मजबूत मोळी तयार होते, तसंच स्वरूप आलं.

महिला दिनाचा कार्यक्रम म्हणजे घशाला कोरड पडेपर्यंत पुरुषांविरुध्द ओरडायचं किंवा त्या निमित्ताने ज्या वाईट रूढी आज अस्तित्वातही नाहीत त्यांच्या नावाने भारतीय संस्कृती विरोधात दर वर्षी तीच ती धुणी धुवायची, असेच कार्यक्रम होतात. ते टाळून आपण नवीन वेगळी स्त्रीशक्तीची जागृती करणारं काय देऊ शकतो, या विचारातून माधुरी सहस्रबुध्दे यांचा 'मदर्स ऑन व्हील' कार्यक्रम ठेवण्याचं ठरलं. येथील तापडिया नाटयमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएमच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख रेखा शेळके अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाआधी काही बैठका झाल्या. प्रत्येक संघटनेने आपली जबाबदारी उचलून काम केलं. मदर्स ऑन व्हील्स हा कार्यक्रम होण्याआधी सगळया कार्यकर्त्या अगदी जणू 'ऑन व्हील्स'च पळत होत्या. आणि याचाच परिणाम म्हणून या कार्यक्रमाला अभूतपूर्व अशी गर्दी झाली.

heading_1  H x

आपल्यासारख्याच चार सामान्य माता इतर देशांतील मातृशक्तीचा शोध घेत चक्क चारचाकी वाहनाने लंडनपर्यंत प्रवास करतात, हीच एक अलौकिक गोष्ट होती. त्यांना जगात काय अनुभव आले? तेथील मातांची, कुटुंबाची स्थिती कशी आहे? अशा अनेक गोष्टी महिलांना जाणून घ्यायच्या होत्या. विशेष म्हणजे माधुरीताई यांनी संवादी शैलीत अनुभवकथन केलं. आपल्या देशाची जगाला देणगी ठरावी अशी कुटुंबव्यवस्था, देशाची उच्च विचारसरणी सगळीकडे पोहोचवायला हवी. मातृत्वात मोठी शक्ती आहे. या धाग्याने आलेले अनुभव विणत त्यांनी संवाद साधला. आपण इतर देशातील मातांशी भावनिक, वैचारिक संवाद केला. हाच संवाद पुढे वैश्विक मातृत्वाकडे, पर्यायाने वसुधैव कुटुंबकम् या आपल्या मूळ कल्पनेकडे नेणारा ठरणारा आहे, असं त्या म्हणाल्या. चीनमध्ये होणारं मानवी अधिकारांचं उल्लंघन असो, कझाकिस्तानसारख्या देशात मुलींचे होणारे हाल अशा गोष्टी त्यांना थक्क करणाऱ्या होत्या. चांगल्या गोष्टीही बघायला मिळाल्या. अनेक देशात दिसणाऱ्या हिंदू संस्कृतीच्या खुणा या आपलं त्यांच्याशी असणारं नातं सांगत होत्या. जिथे माता आणि मुलं यांचा संवाद सशक्त, तिथे सामाजिक स्वास्थ्यही निरोगी असतं, असं या सर्व प्रवासात दिसून आलं. भारतातच माता म्हणून महिलांचं आदराचं स्थान अधिक उच्च आहे. बदलत्या काळात हे नातं टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हा संदेश सोबत घेऊनच नारी शक्ती सभागृहाबाहेर पडली. कुटुंबव्यवस्थेचा, समाजस्वास्थ्याचा कणा असलेली भारतीय माता ही संकल्पना आता देशाच्या सीमा ओलांडून ग्लोबल मदर अशी करण्याची गरज आहे, ते करण्यातच जगाचं कल्याण आहे असा संदेश या कार्यक्रमामुळे महिलांच्या मनात कोरला गेला. भारतीय मातृत्वाचं श्रेष्ठत्व अभिमानास्पद वाटत असतानाच या भारतीय मातेचं, भारतीय कुटुंबाचं आदर्श रूप जगाला दाखवण्याची जबाबदारीही आपली आहे, ही जाणीव मनामनात निर्माण होणं हे कार्यक्रमाचं यश होतं.

परभणीत 'जागृत मी, समर्थ मी' कार्यक्रम

संभाजीनगरपाठोपाठ परभणी येथेही प्रभावती नारी मंच यांनी 'जागृत मी, समर्थ मी' हा कार्यक्रम आयोजित केला. परभणीतील वैष्णवी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळाच्या सविता कुलकर्णी व डॉ. प्रतिभा फाटक यांच्या आजवरच्या कामाचे अनुभव व चिंतन यावर आधारित प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सेवा वस्तीमधील कष्टकरी महिलांचं खडतर जीवन, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, मंडळाचं व गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राचं कार्य यावर आधारित मुलाखत खूप उद्बोधक व रंजक झाली.

माजी महापौर मीनाताई वरपुडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून शशी अय्यर उपस्थित होत्या. या वेळी 34 महिला संघटनांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात चंद्रपूरच्या चैताली खटी यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर केला.