वस्तीत आग विझवायला धावली माणुसकी

स्रोत: विवेक मराठी    दिनांक23-Mar-2020
|

पुणे -
शहरात सध्या 'कोरोना'चा वाढता धोका लोकांच्या मनात चिंतेचं सावट होऊन बसला असतानाच गुरुवार, दि. १९ मार्चला मध्यरात्री अचानक दीप बंगला चौकातील वडारवाडी वस्तीवर आणखी एक भीषण संकट कोसळलं.


अपरात्री गाढ झोपेत असलेल्या वस्तीला आग लागली. अनेक घरं जळून कोळसा झाली. हजारोंची वित्तहानी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, कारण या भयंकर आगीच्या ज्वाळांत होरपळून काही घडण्याआधीच तिथे धावले वस्तीत आणि आजूबाजूला राहणारे निःस्वार्थी तरुण कार्यकर्ते. जणू काही त्यांच्या हृदयातल्या माणुसकीच्या
झऱ्यांनीच ही आग शांत झाली.


या तरुणांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिशय सावधपणे
वेगात हालचाली करून प्रथम प्रत्येक माणूस घराबाहेर काढला. आग झपाट्याने पसरते आहे, हे बघून घराघरातले गॅस सिलेंडर त्वरित बाहेर काढले, त्यामुळे भयंकर जीवितहानी रोखता आली.


रात्री दीडचा सुमार होता. ज्वाळा
पेटल्या, धग जाणवली, काय घडलंय हे कळायच्या आतच आग विझवायचे प्रयत्न सुरू झाले. काही जागृत नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन लावले, पण बंब येईपर्यंत तातडीचे प्रयत्न म्हणून कार्यकर्त्यांनी घरांत उपलब्ध होतं ते पाणी बादल्यांनी ओतत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

बंब आला तरी दाट वस्ती, लागून घरं, अरुंद रस्ते यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने मदत करून १०० मीटर पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा करून मोठ्या प्रयासाने आग आटोक्यात आणली.

आगीचं कारण जाणून घेतलं असता हकीकत समजली, ती अशी - एक आजीबाई मेणबत्ती लावून झोपी गेल्या. ती मेणबत्ती पडून गॅस सिलेंडरजवळ गेली. सिलेंडरने पेट घेताच आग भडकली आणि शेजारच्या तीन घरांत क्षणार्धात सिलेंडरचे दणादण स्फोट होऊन आग जास्त वाढली. पण वेळीच माणसं मदतीला धावली आणि मोठा अनर्थ टळला. आगीत घरं होरपळून गेल्यामुळे बेघर झालेल्या या लोकांची तातडीने निवास व्यवस्था करणं आवश्यक होतं. जवळच असलेल्या संत रामदास प्राथमिक शाळेत तशी व्यवस्था करण्यात आली.


प्रथमतः वस्तीत जळलेलं प्रत्येक घर न् घर स्वच्छ करण्यात आलं. महापालिकेच्या ट्रक-टेम्पोतून कचरा योग्य जागी पोहोचवण्यात आला. प्रत्येक घराची सीमारेषा घर क्रमांकानुसार आखण्यात आली. संकटग्रस्त लोक रोज त्या ठरलेल्या आपापल्या जागी येऊन थांबतात. मिळालेल्या मदतीतून त्यांना कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाऊ, स्वयंपाक, किराणा मालाचं किट अशा सर्व वस्तूंचा पुरवठा व वितरण त्यांच्या जागेवर होतं. कुणाचीही काही तक्रार येत नाही किंवा कोणताही गोंधळ-गडबड होतं नाही.

अशा सर्व प्रकारे वस्तीतल्या लोकांसाठी मदत तत्परतेने उभी केली, ती या भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'हुतात्मा राजगुरू' संघशाखेच्या स्वयंसेवकांनी. एकूण १०० संघस्वयंसेवक मदतकार्य करीत होते.

आपल्याला ऐकून माहीत आहे, अस्मानी किंवा कोणतंही संकट अचानक कोसळलं, की संघस्वयंसेवक सर्वप्रथम मदतीला धावतात. या ऐकलेल्या गोष्टीचा सर्वसामान्य जनतेला या घटनेमुळे प्रत्यक्ष अनुभव आला.
नेहमीप्रमाणे देवासारखे धावले ते या भागातले संघकार्यकर्ते आणि आजूबाजूचे रहिवासी नागरिक. एक माणूस, माणुसकीच्या नात्याने दुसऱ्या माणसाला आधार देत होता. त्यांना मार्गदर्शन करीत होते 'हुतात्मा राजगुरू' संघशाखेचे सन १९८०पासूनचे मुख्य शिक्षक श्री. बाळासाहेब दळवी. त्यांच्यासोबत कंबर कसून उभे राहिले, भाग सहकार्यवाह श्री. संजय एडके, नगर कार्यवाह श्री. गणेश दळवी; मुख्य मदतनीस होते मुकारी अलगुडे, श्याम मंजाळकर, सागर धोत्रे, सुभाष बरमनोर आणि दयाभाऊ इरकल.

मदतकार्याचा आढावा सतत घेत होते, नगर संघचालक श्री. सुभाष कदम आणि विद्यापीठ संघचालक श्री. दिलीपजी परब.

संघस्वयंसेकांचं हे निःस्पृह काम बघून, पक्षभेद विसरून त्यांच्यासोबत आपुलकीने उभे राहिले वंचित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या सगळ्याच राजकीय पक्षांचे पदाधिकारी.

संकटग्रस्तांची भेट घेऊन या मंडळींनी त्यांना हर तऱ्हेने मदत देऊ केली आहे, ती खूप मोलाची ठरते आहे. कारण आता आग तर विझली, पण घरं आणि सामान जळून खाक झालं असल्याने
खऱ्या संकटाचा सामना आत्ता करावा लागणार आहे.


हातावरचं पोट असलेले मुख्यत्वे बांधकाम मजूर या वस्तीत राहातात. त्यापैकी अनेक जण कर्नाटक सीमा प्रांतातले असून वर्षानुवर्ष इथेच कष्ट करून पोट भरत आहेत. या हतबल, हताश, निराश झालेल्या सर्वच दुःखी जळीतग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आता सरसावले आहेत या भागाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका नीलिमाताई खाडे, ज्योत्स्नाताई एकबोटे. विविध पक्षातले पदाधिकारी-कार्यकर्ते सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे.

या सर्वांनी देऊ केलेल्या मदतीचं सर्वोत्तम व्यवस्थापन व नियोजन संघाच्या शिस्तीनुसार पद्धतशीरपणे करण्यात आलं आहे. गटागटाने चहा, नाश्ता, जेवण, दुपारचा चहा, रात्रीचं जेवण अशी जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. वडगावशेरीहून २० गोण्या तांदूळ, श्री. पुरंदरे यांच्याकडून टाॅवेल वाटप, तर अनिरुद्ध बापू भक्तमंडळाकडून संकटग्रस्तांना कपडे वाटप करण्यात आलं आहे.


मिळालेली प्रत्येक मदत गरजूंना व्यवस्थित पोहोचत आहे. प्रत्येक वस्तूची नोंद ठेवण्यात येते.

आता जरी सगळीकडून अशी मदत मिळत असली, तरी ती अपुरी असून खरी मदत राज्य सरकार व पुणे महानगर पालिका यांच्या आपद्ग्रस्त साहाय्य निधीतून मिळाल्यास तिचा जास्त उपयोग होईल. त्या दृष्टीने सर्व घरांच्या नुकसानीचे पंचनामे कार्यवाही प्रथम पूर्ण करण्यात आली आहे. या पंचनाम्यांच्या आधारे आता सरकारी मदत नियमानुसार आपद्ग्रस्तांना निधी मिळून देण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ प्रयत्नशील आहेत.

सरकारची ही मदत त्वरित उपलब्ध होण्यासाठी जळीत झालेलं आधार कार्ड, रेशन कार्ड तातडीने एक विशेष कक्ष उभा करून सर्वांना लगेच नूतनीकरण करून मिळतील, असं नियोजन केलं आहे.


या तात्पुरत्या मदतीने संकटग्रस्तांना दिलासा मिळेल, पण मिळणाऱ्या या सरकारी मदतीपलीकडे रा.स्व. संघाने स्वतःच्या मदतनिधीतून पक्की घरं बांधून देण्याचा निर्धार केला असून आमदार महोदयांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक घराचं मोजमाप नोंदवून त्याप्रमाणे वीट बांधकाम आणि टी अँगलचं छत असा आराखडा तयार आहे.

निर्धारित कालावधीत घरं बांधून पूर्ण होतील व आजचे संकटग्रस्त पुन्हा आपल्या हक्काच्या घरट्यात राहायला जातील, हाती घेतलेलं काम पूर्ण करूनच संघस्वयंसेवक समाधानाने पुढच्या कार्याकडे वळतील.


संघाच्या या निःस्वार्थी मदतकार्यातून प्रेरणा घेऊन या जळीतकांडातील वस्ती निवासींना अनेक जण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. माणुसकीचा हा वसा असाच एका हातून दुसऱ्या हाती जात राहावा आणि समरसतेचा भाव प्रत्येक मनात जागता राहावा.

- अमृता खाकुर्डीकर, पुणे.