नववर्ष स्वागत यात्रा - परंपरा दृढ करण्यासाठी नव्या दृष्टीकोनांची गरज

विवेक मराठी    24-Mar-2020
Total Views |

***सुधीर जोगळेकर***

५१०१
व्या युगाब्दाच्या प्रारंभी सुरू झालेली आणि आता तब्बल 22व्या वर्षात पदार्पण करीत असलेली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा, कोरोनामुळे यंदा सुदैवाने वा दुर्दैवाने रद्द करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे यात्रेच्या विद्यमान स्वरूपाविषयी, काळाच्या ओघात पक्क्या होत गेलेल्या तिच्या ढाच्याविषयी, यात्रेच्या उद्दिष्टांविषयी व स्वरूपाविषयी पुन्हा नव्याने करायला पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे.

nav varsh marathi_1 

 

कुठलीही गोष्ट वा सार्वजनिक झालेले सण-उत्सव, बरीच वर्षं त्याच-त्याच पद्धतीने करीत राहिलो, की त्यात साचलेपणा येतो. म्हणूनच एका टप्प्यावर थोडी वेगळी वाट चोखाळून, थोडा वेगळा विचार करून त्या गोष्टीला, त्या उत्सवी सादरीकरणाला नवं रंगरूप देण्याचा विचार त्या सोहळ्यांच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणार्या प्रत्येकालाच अपरिहार्यपणे करावा लागतो. आयोजनाच्या पद्धतीतच नव्हे, तर आयोजनामागच्या विचारातही कालानुरूप बदल करण्याची गरज अशा क्षणी जाणवायला लागते. नवं काही स्वीकारण्यासाठी, जुना साचलेपणा टाकून देण्यासाठी मनाचा मोकळेपणा दाखवण्याची तयारी ठेवावी लागते. अनेक प्रसंगांमध्ये अशी वेळ केव्हा येते ते आयोजकांच्या ध्यानी येत नाही, पण जिथे जिथे, जेव्हा ती वेळ आल्याचं कुणाच्या तरी ध्यानात येतं, तेव्हा तेव्हा तिथे तिथे त्यासाठीचा मनाचा मोकळेपणा दाखवण्याचं धारिष्ट्य सगळ्यांनाच दाखवता येतं, असंही सहसा घडत नाही.

भारतीय नववर्ष स्वागत यात्रेबाबत असा काही नवा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असं मात्र अनेकांना वाटू लागलं आहे. स्वागत यात्रेचं विचारबीज रोवलं गेलं ते 1998च्या वर्षअखेरीला. ग्रेगोरियन (इंग्लिश) कालगणनेचं दुसरं सहस्रक संपायला अवघं एक वर्ष राहिलं होतं, असा तो काळ होता. नवं वर्ष सुरू होण्याला थोडेच महिने शिल्लक राहिले असल्यामुळे त्याच्या स्वागताची तरुणाईची योजना सुरू झाली होती. आख्खी रात्र धमाल करत रस्त्यावर काढायची, गप्पा मारत चौकाचौकात जमायचं, जे मद्यपान घरी करता येणार नाही ते सोयीच्या जागा पकडून रस्त्यावर करायचं, अशा कल्पना पुढे येत होत्या. बहुतांशी तसंच घडलं. 31 डिसेंबरच्या त्या रात्री सारं जग जसं जागलं, तशीच महाराष्ट्राची आणि महानगरांची तरुणाईही जागली. काही अतिउत्साही तरुणांबरोबरच तरुणीदेखील रात्रभर रस्त्यांवर धुडगूस घालत राहिल्या आणि भारतीय सांस्कृतिक वातावरणाविषयी अभिमान वाटणारे अनेक जण अस्वस्थ झाले.

याला काही पर्याय दिला पाहिजे असा विचार स्वाभाविकपणेच कालांतराने पुढे आला. एखाद्या समाजसंमत नसलेल्या गोष्टीवर टीका करणं सोपं असतं, परंतु टीका करण्याऐवजी त्याला तितकाच समर्थ, सक्षम सोहळारूपी पर्याय देणं गरजेचं असतं. एखादी रेषा लहान करायची तर ती पुसणं हे त्यावरचं उत्तर नसतं, त्या रेषेशेजारी दुसरी मोठी रेष मारणं हा त्यावरचा उपाय असतो. डोंबिवलीकरांनी 31च्या मध्य(मद्य)रात्रीच्या पर्यायावर गुढीपाडव्याच्या शुभसकाळच्या उत्सवी सोहळ्याचा पर्याय काढला आणि तो डोंबिवलीकरांनीच नव्हे, समस्त भारतीयांनी मनापासून स्वीकारला.

5101व्या युगाब्दाच्या प्रारंभी सुरू झालेली आणि आता तब्बल 22व्या वर्षात पदार्पण करीत असलेली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा, कोरोनामुळे यंदा सुदैवाने वा दुर्दैवाने रद्द करण्यात आली आहे. एका अर्थाने हे वरदानच ठरणार आहे. यात्रेच्या विद्यमान स्वरूपाविषयी, काळाच्या ओघात पक्क्या होत गेलेल्या तिच्या ढाच्याविषयी, यात्रेच्या उद्दिष्टांविषयी व स्वरूपाविषयी पुन्हा नव्याने करायला पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे आणि तसा विचार सुरू झाल्याच्या बातम्याही वृत्तपत्रात येऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे रस्त्यारस्त्यांवर स्वागत यात्रा दिसणार नसल्या तरी, स्वागत यात्रेच्या निमित्ताने आठवडाभर आधीपासून आयोजित केले जाणारे बहुतांश उपक्रम यंदा प्रथमच हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. घरबसल्या मोबाइल आणि इंटरनेटद्वारे विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठीचे पर्याय खुले करण्यात आले आहेत. व्याख्याने आणि प्रत्यक्षात पाडव्याच्या दिवशीचे गणेशपूजन, पंचांगवाचन, पालखीपूजन लाइव्ह अनुभवण्याचा हाय-टेक पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. वास्तविक कोरोनाचं संकट उद्भवलं नसतं, तरीही अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती, आहे आणि भविष्यात तर ती अधिक जाणवणार आहे.

कोरोनामुळे मुळातच माणसांच्या एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. परस्परांच्या संपर्कातून विषाणू पसरू शकतात अशी स्थिती आणि भीती असल्यामुळे ‘जनता कर्फ्यू’सारखी टोकाची आणि कठोर उपाययोजना घोषित करण्याची वेळ जगभरच्या पंतप्रधानांवर आली आहे. हे संकट चीनमधून सुरू झालं असलं, तरी ते एकट्या चीनपुरतं उरलेलं नाही. त्यावर मात करायला कुठलीही प्रतिबंधात्मक उपाययोजना कुणालाही शोधून काढता आलेली नाही. त्यामुळे घराघरात कोंडून घेणं, परस्पर्श टाळणं आणि अज्ञात स्पर्शातून हस्ते-परहस्ते फैलावू शकणारा विषाणू रोखणं हाच यावरचा उत्तम आणि आजच्या घडीला एकमेव ज्ञात मार्ग आहे. त्यामुळे नववर्ष स्वागत यात्रेसारखे मेळावे-मिरवणुका-यात्रा-संमेलने टाळण्याची नितांत गरज होती व तसंच होतं आहे. 2020च्या गुढीपाडव्याची तीच मागणी आहे, नव्या युगाब्दाने सांगितलेलं तेच वर्षफल आहे.

31 डिसेंबरच्या मद्यपी रात्रीपासून तरुणाईला लांब नेणं हा स्वागत यात्रेमागचा एक उद्देश होता हे खरंच, त्याशिवाय ‘मी-माझी पत्नी-माझी मुलं’ एवढ्यापुरतं मर्यादित होत चाललेलं भारतीय कुटुंबजीवन व्यापक बनवावं, त्याला मी-माझं घर-माझे शेजारी-माझा परिसर-माझा गाव-माझा समाज या विस्तारित परिघात आणावं आणि या विस्तारित परिघाशी असलेल्या त्याच्या नात्याचं भान त्याला द्यावं, त्यासाठी करावयाच्या कर्तव्याची जाणीव त्याच्यात निर्माण करावी हाही होता, नव्हे खरं पाहता तोच होता. यात्रेनिमित्त शे-दीडशे संस्था एकत्र येतात, लहानमोठ्याचा वाद त्यांच्यात उपस्थित होत नाही, यात्रा सुखरूप पार पडते, तीस-तीस, चाळीस-चाळीस हजार लोक रस्त्यावर उतरूनही पोलिसांच्या दृष्टीने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याला ही गावकीची-विस्तारित कुटुंबाची भावनाच कारणीभूत आहे, हे नाकारता येणारे नाही.

यात्रेनिमित्ताने जपली जाणारी ही आपलेपणाची, समूहभावनेची जाणीव जशी डोंबिवलीकरांनी पुढे अनेक उपक्रमातून अभिव्यक्त केली, तशी ती गावोगावी होत राहणं ही काळाची मागणी आहे. जातीपातीच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर पडून समाजाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय समाजाला संघटित ठेवण्याच्या प्रयत्नातलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, आणि हेच यात्रेचं मोठं यश आहे.

2011 साली ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताला शंभर वर्षं पूर्ण झाली, तेव्हा हे दोन कडव्यांचं राष्ट्रगीत नव्हे, तर मूळचं पाच कडव्यांचं संपूर्ण गीत गायला डोंबिवली शहरातील चाळीसहून अधिक शाळा एकत्र आल्या, तेवढ्याच संस्था पुढे सरसावल्या आणि साडेतीन हजाराहून अधिक संख्येत विद्यार्थी एकत्र आले. 2014 सालापासून नागरी सत्कार समितीच्या नावाखाली सेहेचाळीस-सत्तेचाळीस सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्था एकत्र येत राहिल्या आणि डोंबिवली शहराच्या जडणघडणीसाठी ज्यांनी प्रसिद्धीपासून चार हात लांब राहून काम केलं, त्यांच्या नागरी सन्मानाना प्रारंभ झाला, हे विचारपूर्वक टाकलं गेलेलं पाऊल आहे. विविध प्रकारचे नृत्यप्रकार शिकवणारे डझनभर क्लासेस तरी डोंबिवलीत चालतात, आणि शेकड्यांच्या संख्येत मुलं-मुली त्याचा लाभ घेतात. यंदाच्या यात्रेत हे डझनभर क्लासेस आणि त्यांचे शेकडो विद्यार्थी समूहाने उतरणार होते आणि चौकाचौकात नृत्यप्रकार सादर करत मिरवणुकीला वेगळाच सांकृतिक आयाम प्राप्त करून देणार होते. कथ्थक श्रेष्ठ की भरतनाट्यम, मणिपुरी श्रेष्ठ की पंजाबी, हा वादच उपस्थित होऊ न देता या सर्व नृत्यप्रकारांना एकाच पातळीवर आणण्याचा हा प्रयत्न त्याच दिशेतला आहे. या उपक्रमात गावकीसाठी काही करण्याची जी वृत्ती दडलेली आहे, ती नववर्ष स्वागत यात्रेतून उत्पन्न झालेली आहे हे नाकारता येणारंच नाही. हे असे प्रयत्न गावोगावी होण्याची गरज आहे.

नववर्ष स्वागत यात्रेचा पहिल्याच वर्षीचा उपक्रम वृत्तपत्रांनी गाजवला, तो महाराष्ट्रात नव्हे तर सार्‍या देशात गेला, त्याची छायाचित्रं पानापानांवर झळकली, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तो जगभर नेला आणि पुढल्या वर्ष-दोन वर्षांत यात्रा महाराष्ट्राच्या सार्‍या प्रमुख गावातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही जिथे मराठी माणूस आहे, जिथे हिंदुत्ववादी शक्ती संघटित आहे, जिथल्या तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना जागृत आहे अशा सर्व ठिकाणी पोहोचली आणि देशव्यापी बनली. गुढीपाडवा हा आजवर घराघरात साजरा होणारा सण होता, स्वागत यात्रेने त्याला समाजव्यापी रूप दिलं. पाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस, त्याचा आदला दिवस फाल्गुनी अमावस्येचा. हा दिवस महाराष्ट्रात ओळखला जातो तो संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून. पाडव्याची पूर्वसंध्या नुसतीच सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा फटाके उडवण्यात न घालवता सळसळत्या तरुणाईच्या अंगभूत आविष्काराने साजरी करावी अशी जोड तिला देण्यात आली आणि वीररस निर्माण करणारे कार्यक्रम त्यातून आयोजित होऊ लागले.

कुठलाच सण, कुठलाच उत्सव कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्याला सामाजिक स्वरूप देण्याची, सामाजिक आशय देण्याची एक परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. आपल्याकडे विजयादशमीला सोनं लुटण्याची पद्धती आहे, संक्रांतीला परस्परांना तिळगूळ देत सार्‍या समाजात स्नेहभाव पसरवण्याची पद्धती आहे, गणपती तर आता सार्वजनिकच झाले आहेत, दिवाळीसारखा सण केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता त्यानिमित्ताने समाजातील नाही रे वर्गाला त्यात सहभागी करून घेण्याची नवी रूढी आपल्याकडे सुरू झाली आहे. वनवासी भगिनीला साडी-चोळीची भाऊबीज भेट हा प्रकार त्यातूनच आला आहे. राख्या बहिणीने भावाला बांधाव्याच, तसंच बहिणीने त्या समाजाचं रक्षण करणार्‍या पोलीस-सैनिक यांच्यासारख्या घटकांनाही बांधाव्या, हा नवा विचार त्यातूनच आला आहे. अधिक मासात जावयाला वाण देऊन त्याचा मान करण्याऐवजी, तीच रक्कम गोदानासाठी वापरावी हा नवा दृष्टीकोन त्यातूनच दिला गेला आहे. गुढी उभारण्यालाही असाच नवा विचार देण्याची गरज आहे. पूर्वी गुढी उभारायची पद्धती पडली ती विजयाचं प्रतीक म्हणून, आता गुढी उभारायची ती नव्या विचारांकडे जाण्याचं प्रतीक म्हणून.

पाडवा येतो तो होळी पौर्णिमेनंतर. हीच वेळ असते ऋतुबदलाची. निसर्गातलं एक ऋतुचक्र संपलेलं असतं आणि नव्या ऋतुबदलाची वाट निसर्ग पाहत असतो. पण माणसाने गेल्या काही वर्षांत आपल्या कर्माने हे ऋतुचक्र असं काही पालटून टाकलं आहे की पर्यावरणबदलाचे घातक संकेत निसर्ग आपल्याला देऊ लागला आहे. दुष्काळ त्यातूनच उद्भवतो आहे, कमालीचा उन्हाळा हा त्याचाच परिणाम आहे, पावसाचं चक्र बदलतं आहे ते त्याच्याच परिणामापायी, विषाणूंची उत्पत्ती हीदेखील त्याचीच परिणती मानली जाते आहे. या समस्येशी समर्थपणे मुकाबला करायचा, तर मानवाने आपल्या कर्माने बिघडवून टाकलेलं निसर्गचक्र पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी मानवालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. अस्वच्छता उन्मूलन, प्लास्टिकला पूर्ण सुट्टी, पाण्याचा मर्यादित वापर, सेंद्रिय शेतीसाठी आग्रह, तंबाखू-मद्य-अमली पदार्थ यापासून मुक्ती अशा कितीतरी गोष्टी.

 

गुढीपाडवा हा हिंदू धर्मीयांचा सण हे खरंच. तो घराघरात साजरा केला जात असताना, रूढी-परंपरांचं पालन केलं जात होतं हेही खरं, परंतु ते वैयक्तिक पातळीवर जास्त होतं. तो उत्सव समाजाचा होऊ द्यायला तथाकथित पुरोगामी विचार करणार्‍यांची तयारी नव्हती. ती आजही नाही, परंतु पुरोगामित्वाचं वा प्रतिगामित्वाचं लेबल आपल्या नावामागे लावलं जाईल हे त्या नकारामागचं कारण नव्हतं, त्यातून उभी राहणारी हिंदुत्वाची संघटित शक्ती त्यांना खुपत होती. आश्चर्य म्हणजे ही हिंदुत्वाची शक्ती आता देशोदेशी प्रकटू लागली आहे. जगभर पसरलेला भारतीय बांधव याआधीही आपल्या बुद्धितेजाने तळपत होताच, त्या त्या देशाच्या अर्थकारणाला, प्रशासनाला तो हातभारही लावत होता, त्याची तिथली तिथली संघटीत शक्ती दसरा-दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने अभिव्यक्त होत होतीच, तिला पाडव्याची जोड मिळाली आणि अनेक देशांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. हिंदुत्वाची कालसंगत अभिव्यक्ती करणारं सरकार देशात आलं, देशोदेशीच्या सरकारांमध्ये त्याचा योग्य संदेश पोहोचला आणि देशोदेशी राहणारे भारतीय नागरिक आश्वस्त झाले.

नववर्ष स्वागत यात्रेच्या आयोजनाने आणि त्यातून तयार झालेल्या उत्साही वातावरणामुळे समाजाचे नवनवे पैलू हे नवतेजाचे नेत्रसुखद आविष्कार आहेत हे नाकारताच येणार नाही. हे नवतेज गावकी रूपात अभिव्यक्त होतं आहे, हे नवतेज संघटित समाजशक्तीच्या रुपात प्रकटतं आहे, हे नवतेज तरुणाईच्या सकारात्मक वृत्तीला आविष्कृत करतं आहे, हे नवतेज हिंदुत्वाभिमान वाढवतं आहे, हे नवतेज नवनव्या समाजहितैषी चळवळींना जन्म देतं आहे, समाजमाध्यमांतून ते प्रभावीपणे व्यक्त होतं आहे, लव्ह जिहादसारख्या प्रयत्नांच्या विरोधात, दहशतवादी ताकदींच्या विरोधात आवाज बुलंद करतं आहे, हे नवतेज जातीपातीच्या भिंती उन्मळून टाकत एकरस-एकसंध समाजनिर्मितीला चालना देतं आहे, हिंदूंच्या मनातल्या सुप्तावस्थेत गेलेल्या धर्माभिमानाला फुंकर घालून त्यातला वन्ही प्रज्वलित करतं आहे, चेतवतं आहे ही मोठी उपलब्धी आहे.

पण त्याचबरोबर ही यात्रा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नाही, ती असलीच तर ती सर्वसमावेशक आहे याची खूणगाठी पहिल्या वर्षापासूनच सर्वांच्या मनात आहे. यात्रा निघाली आणि यात्रेतल्या घोषणांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या, कुणी यात्रेवर हल्ला केला, कुठे यात्रेवर बंदी घालावी लागली असं चुकूनही घडलेलं नाही. शीख-जैन-बौद्ध बांधव तीत सहभागी होऊन यात्रेचा व्यापकतेचा, समावेशकतेचा आशय दृढ करत आहेत. यात्रा फक्त शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजापुरती मर्यादित राहिली वा ठेवली आहे असेही अनुभव कुठेच नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, महाराष्ट्राबाहेरच्या शहरा-शहरात या समरसतेचे परिणाम दृग्गोचर होऊ लागले आहेत. समाजाने आपणहोऊन पत्करलेला हा मोठ्या रेषेचा पर्याय अधिक प्रशस्त, अधिक मजबूत होण्याची गरज आहे.