#गोकोरोना : दररोज ५० हजार चाचणी किट्स बनवून गावोगाव पोहोचवणार

विवेक मराठी    27-Mar-2020
Total Views |
****‘मायलॅब’चे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे यांचा निर्धार***
 
 कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मिळालेलं मोठं यश म्हणजे ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रा. लि.’ या पुण्यातील कंपनीने कोरोनाची चाचणी केवळ अडीच तासांत करू शकणारं, संपूर्ण स्वदेशी बनावटीचं डायग्नोस्टिक किट विकसित केलं आहे. हे किट केवळ सहा आठवड्यांच्या विक्रमी वेळेत बनवण्यात आलं आहे. याविषयी या कंपनीचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे यांची सा. ‘विवेक’ने विशेष मुलाखत घेतली. हे किट कशा प्रकारे बनवण्यात आलं, ते कशा प्रकारे काम करतं, भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात या किटचा प्रभावी वापर कशा पद्धतीने करण्यात येईल, याबाबत शैलेंद्र कवाडे यांनी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती दिली. 

kavade_1  H x W 
सर्वप्रथम आपलं अभिनंदन! इतक्या विक्रमी वेळात आपल्या टीमने इतकी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. त्याबद्दल बोलण्याआधी मुळात आम्हाला आपल्या कंपनीविषयी, तिचं कार्यक्षेत्र व विस्तार याविषयी जाणून घ्यायला आवडेल..
 
मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स ही कंपनी 2016 मध्ये स्थापन करण्यात आली. मॉलेक्युलर डायग्नोस्टिक किट्स बनवण्याच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. बाहेरच्या देशातील अनेक कंपन्या ‘हाय–एंड मॉलेक्युलर डायग्नोस्टिक्स’चा वापर करतात आणि भारतातही त्यांच्या विक्रीसाठी प्रयत्न करतात. परंतु, भारतात अनेकांना त्यांच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे हे डायग्नोस्टिक्स खूप मर्यादित क्षेत्रातच पोहोचतात. त्यामुळे भारतात परवडेल अशा किंमतीत किट्स बनवून विक्री करण्याच्या हेतूने आम्ही काम सुरू केलं. या दृष्टीने आम्ही सर्वप्रथम रक्तातील विषाणूंच्या न्युक्लीइक ऍसिड टेस्टिंगचा टप्पा विकसित केला, जो ‘ब्लड बोर्न डिसीज’च्या - सोप्या भाषेत एचआयव्ही एड्स, हेपाटायटिस बी आणि हेपाटायटिस सी या रोगांच्या चाचणीसाठी वापरला जातो. आज भारतात अनेक रक्तपेढ्या ही यंत्रणा वापरत आहेत आणि आमच्या कंपनीच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. याशिवाय आम्ही टीबी आणि इतर अनेक आजारांवर किट्स विकसित केली आहेत. पुण्याजवळील लोणावळा येथे आमचा कारखाना आहे.

kavade_1  H x W 
कोरोनाच्या चाचणीसाठी आपण तयार केलेलं किट इतक्या विक्रमी वेळेत – केवळ सहा आठवड्यांत तयार करणं कसं काय शक्य झालं? भारतात मुळात कोरोना हा विषय गांभीर्याने घ्यायला सुरुवात झाली, त्यालाच जेमतेम तीन आठवडे झाले आहेत..
मुळात मॉलेक्युलर डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रातच आम्ही कार्यरत असल्यामुळे आमच्याकडे अर्थातच यासाठीची यंत्रणा तयार होती. कोरोना हा नवीन विषाणू असला, तरी व्हायरॉलॉजी हा विषय काही नवीन नाही आणि एखाद्या विषाणूचं निदान करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, ती सारखीच असते. शिवाय, आमच्याकडे या विषयातील वैज्ञानिकांची टीम तयार होतीच. जेव्हा चीनमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रारंभ झाला, तेव्हा आम्हाला हे भारतात येणार नाही असंच वाटलं होतं. कारण, ज्या क्षेत्रात हा प्रादुर्भाव होत होता, तिथून भारतात येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. परंतु हा अंदाज चुकला. जेव्हा युरोपात आणि अमेरिकेतही कोरोनाचा प्रसार होऊ लागला, तेव्हा याचा भारतातही फटका बसणार, याची आम्हाला कल्पना आली. त्यामुळे त्या दृष्टीने काम करायला आम्ही सुरुवात केली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीस. यातील प्रमुख समस्या ही होती की आमच्यासमोर याचे रुग्ण त्या वेळी उपलब्ध नव्हते. कोणतंही किट तयार केल्यानंतर अर्थातच त्याची चाचणी घ्यावी लागते आणि त्यासाठी त्यासाठी आधी त्याचं ‘पॉझिटिव्ह सॅम्पल’ समोर असावं लागतं. ते आमच्याकडे नव्हतं. त्यामुळे आम्ही आधी ‘सिंथेटिक डीएनए’ तयार केले आणि त्या डीएनएची चाचणी घेऊन आम्ही हे किट तयार केलं. त्यानंतर आम्ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे – आयसीएमआरकडे मूल्यमापनासाठी हे कीट पाठवून दिलं. आयसीएमआरने आम्ही बनवलेलं किट सर्वाधिक अचूक आणि कमीत कमी वेळात निदान करणारं असल्याचा निर्वाळा दिला.
 
 
आपल्या कंपनीने बनवलेलं हे डायग्नोस्टिक किट नेमकं काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?
हे किट ‘रिअल टाइम पीसीआर’ नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये नमुना गोळा करताना ‘नेझल स्वॅब’ घेतला जातो. म्हणजे नाकातून कापसाचा बोळा फिरवण्यात येतो, कारण कोणताही विषाणू नाकामध्ये असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे तिथून विषाणू गोळा करून एका सोल्युशनमध्ये टाकण्यात येतो. त्यामध्ये आरएनए नावाचं न्युक्लीइक ऍसिड बाहेर काढण्यात येतं. त्या आरएनएवर त्या त्या विषाणूची ‘सिग्नेचर’ असते. प्रत्येक आरएनएमध्ये त्या त्या विषाणूची एक ‘युनिक सिग्नेचर’ असते. त्या आरएनएचा डीएनए करून त्याला वर्धित (amplify) केलं जातं, थोडक्यात त्यांची संख्या वाढवली जाते. त्यांच्या लक्षावधी ‘कॉपीज’ बनवण्यात येतात. त्या कॉपीज रिअल टाइम पीसीआर या मशीनमध्ये तपासल्या जातात. कापसाच्या बोळ्यातून विषाणूच्या अगदी पाच-दहा कॉपी जरी सापडल्या, तरी या पद्धतीने त्याचं लक्षावधींत रूपांतर केल्यामुळे तो स्पष्ट आढळून येतो, तपासता येतो. ही बरीच नाजूक आणि संवेदनशील चाचणी आहे. परंतु त्यात चांगली गोष्ट ही की रुग्णाला सध्या जरी सर्दी–खोकला–ताप वगैरे नसेल, शरीराचे स्नायू दुखत नसतील आणि तरीही हा विषाणू त्याच्या शरीरात गेला असेल, तर तो शोधता येतो आणि निदान करता येतं. या एका किटद्वारे आपल्याला सुमारे १०० रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करता येते.

kavade_1  H x W 
आपलं हे डायग्नोस्टिक किट संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. मग विदेशात सध्या कोरोनाच्या निदानासाठी वापरण्यात येत असलेली पद्धत आणि ही पद्धत यामध्ये फरक काय सांगता येईल?
 
त्यात तसा काहीही विशिष्ट फरक नाही. फक्त आपण या चाचणीचा जो प्रोटोकॉल विकसित केला, जी पद्धत – नियमावली विकसित केली, त्यामुळे या किटद्वारे केवळ अडीच तासांत ही चाचणी व निदान होऊ शकतं. विदेशात वापरल्या जात असलेल्या अनेक किट्सना सात–आठ तासांचा वेळ निदानासाठी लागत आहे. मोठ्या कंपन्यांकडे स्वतःची यंत्रणा असते आणि त्यानुसार त्यांनी स्वतःची पद्धत – नियमावली निश्चित केलेली असते. परंतु, आम्ही विकसित केलेलं किट हे ‘युनिव्हर्सल’ स्वरूपाचं – कोणत्याही मशीनवर चालेल असं आहे. त्यामुळे यातून वेगाने चाचणी करता येते आणि कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये ते वापरलं जाऊ शकतं.
 
देशातील व राज्यातील सध्याच्या गंभीर परिस्थितीत या चाचणी किटचा प्रभावीपणे वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो? आपल्या आरोग्य यंत्रणेकडे याचं अधिकाधिक वितरण कशा पद्धतीने करावं लागेल? आणि शासनाकडून याबाबत आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला आहे?
 
केंद्र आणि राज्य शासनाकडून आम्हाला संपूर्ण सहकार्य मिळालेलं आहे. आम्हाला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा, त्याची वाहतूक यासह अनेक गोष्टींसाठी या सध्याच्या लॉकडाउनच्या काळातही शासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे. शासनाच्या आणि खासगी अशा अनेक लॅबोरेटरीजनी मोठ्या प्रमाणावर किट्सची मागणी केलेली आहे आणि आम्ही त्यानुसार पुरवठा करायला सुरुवातही केलेली आहे. आम्ही आतापर्यंत दहा ते बारा हजार किट्स वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत दररोज सुमारे ५० हजार किट्सचं उत्पादन करण्याचं आमचं नियोजन आहे. हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल आणि आपल्या सर्वांच्या या लढाईमध्ये याचा नक्कीच मोठा हातभार लागेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.