संयमाच्या आणि धैर्याच्या कसोटीचा काळ..

विवेक मराठी    28-Mar-2020
Total Views |


coroana_1  H x

 
दिवसातून तीस-चाळीस वेळा साबणाने, भरपूर पाणी वापरून हात धुणं आजही आपल्या देशातील अनेकांना परवडत नाही, हे वास्तव आहे. मग त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी कशी घ्यायची? दुसरीकडे, 'घराबाहेर पडू नका' हे सांगण्यासाठी आपल्या पोलिसांना काठ्या घेऊन रस्त्यावर उभं राहावं लागतं. तरीही लोक हुल्लडबाजी म्हणून, स्टंट म्हणून रस्त्यावर उतरतात, पोलिसांच्या अंगावर गाड्या घालतात, काही ठिकाणी नमाजासाठी लोक एकत्र येतात; जनता कर्फ्यूच्या दिवशी पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य पोलिसांपर्यंत सर्व जण अक्षरशः विनवण्या करून घराबाहेर पडू नकाअसं सांगत असतानाही लोक ढोल-ताशे-फटाके फोडत रस्त्यावर उतरतात.

संयमाची आणि धैर्याची पुरेपूर कसोटी पाहणारा काळ सध्या सुरू आहे. प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो, ‘मॅन इज अ सोशल अॅनिमल’. त्यात आपला भारतीय माणूस जरा जास्तच सोशल आहे. वर्षभर असंख्य सण-उत्सव, जत्रा, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, मोहिमा, काहीच नाही तर कौटुंबिक कार्यक्रम यातून आपण सातत्याने एकत्र येत असतो, या ना त्या मार्गाने सार्वजनिकरीत्या व्यक्त होत असतो. अगदी एककल्ली, ‘माणूसघाणावगैरे प्रकारातील एखादा माणूससुद्धा कधी ना कधी उर्वरित समाजात मिसळत असतोच. आणि सध्याच्या परिस्थितीत हे सगळंच बंद करून चक्क घरी बसून राहण्याचा प्रसंग ओढवलाय. याला आपण विरोधही करू शकत नाही, कारण हे घरी बसणं आपल्या हिताचंच आहे, हेही आपल्याला कळतंय. किराणा, फळभाजीपाला, दुग्धोत्पादनं, औषधं अशा अगदीच मोजक्या गोष्टी वगळता सर्व कडेकोट बंद आहे, रेल्वेबसगाड्याविमानं बंद आहेत, रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मुख्य म्हणजे या लॉकडाउनची आता कुठे सुरुवात झाली आहे, आणखी किमान दोन-तीन आठवडे आपल्याला असे काढायचे आहेत. हे सगळं कठीण आहे, त्रासदायक आहे यात काही शंकाच नाही; परंतु हे आपल्यासाठीच, आपल्या प्रिय कुटुंबीयांसाठीच आहे, हेही खरंय. म्हणूनच हा सारा काळ एक सोशल अॅनिमल म्हणून, एक माणूस म्हणून आपल्या संयमाची णि धैर्याची कसोटी पाहणारा काळ आहे.

तिकडे लांब कुठेतरी चीनमध्ये अवतरलेला कोरोना नामक विषाणू पाहता पाहता आपल्या दारी येऊन पोहोचला आणि अचानक आपलं सर्व जनजीवन ठप्प झालं. या न दिसणाऱ्या परंतु मोठा दगाफटका करू शकणाऱ्या शत्रूने आपल्याशी पुकारलेलं हे युद्ध आहे. हे युद्ध आपल्या देशाच्या सीमेवरील युद्ध नसून आपल्या सर्वांच्या आवतीभोवती सुरू असलेलं युद्ध आहे आणि म्हणून केवळ आपली सैन्यदलं वा पोलीस वा आरोग्य क्षेत्रातील लोक हेच याचे सैनिक नसून आपण सर्वच जण या युद्धातील सैनिक आहोत. हे असं युद्ध जिंकायचं असेल, तर आपल्याला वेगळी रणनीती अवलंबावीच लागणार आहे. कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांतून एक विनोदी वाक्य बरंच गाजतंय, ते म्हणजे आपली अनुपस्थिती हाच आमचा आहेर!’ यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला, तरी सद्य:स्थितीत हे वाक्य योग्यच आहे. आपल्यावर घातलेली बंधनं काटेकोरपणे पाळणं हे आपलं या लढाईतील सर्वांत मोठं योगदान असेल. आपलं सरकार, प्रशासन व्यवस्था, आरोग्य यंत्रणा या लढाईचं नेतृत्व करत आहेत आणि अत्यंत उत्तमरीत्या करत आहेत. हो, त्यात काही त्रुटी, चुका असूनदेखील. काही किरकोळ वक्तव्यं, टीकाटीप्पणी वगळता बहुतांश सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन या लढाईत उतरले आहेत आणि जनतेतूनही आपण या कठीण प्रसंगात सरकारला साथ दिली पाहिजे, मग ते आपल्या आवडत्या पक्षाचं असो वा नसोही भावनादेखील प्रबळ होते आहे. ‘राष्ट्र प्रथमहा विचार या अशा मार्गाने का होईना, रुजतो आहे ही आशादायक बाब म्हणावी लागेल. ही राष्ट्रभावना, ही एकजूट या संकटातून बाहेर पडण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. मात्र जेव्हा आपण यातून बाहेर पडू, जनजीवन पुन्हा सुरळीत होईल, तेव्हा मात्र या भावनेचा विसर पडू न देणं हीदेखील आपली जबाबदारी असेल.

या संकटातून पुढे आणखी एक संकट उभं राहील - किंबहुना एव्हाना त्याची लक्षणं दिसूही लागली आहेत, ते म्हणजे आर्थिक संकट. कोरोना विषाणू आज आहे, उद्या नसेल, परंतु अर्थव्यवस्थेला या लॉकडाउनच्या फटक्यातून सावरायला पुढचा बराच काळ संघर्ष करावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्यालाही काही किंमत मोजावी लागू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऐन आर्थिक वर्ष आणि शैक्षणिक वर्ष संपण्याच्या काळात हा कोरोना विषाणू उगवला आहे. जीवनावश्यक गोष्टी वगळता बाकी कंपन्यांचं उत्पादन बंद आहे. कार्यालयं बंद आहेत, वाहतूक बंद आहे, शाळामहाविद्यालयं बंद आहेत आणि असं जवळपास सर्वच बंद आहे. गोष्ट जिवावर बेतणारी असल्यामुळे बंद ठेवण्यावाचून काही पर्यायदेखील नाही. रोजगाराचे गंभीर प्रश्न यातून उभे राहू शकतात. याची तयारी आपणही आपल्या स्तरावर सुरू केली पाहिजे आणि सरकारदेखील गांभीर्याने यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करतंय, ही आश्वासक बाब आहे. याखेरीज, दर वेळी पडणारे प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत - उदा., आपल्या आरोग्य व्यवस्था, आपल्याकडील कायदा आणि सुव्यवस्था, आपल्या स्वच्छतेच्या सवयी इत्यादींबाबतचे असंख्य प्रश्न. आपण एक देश म्हणून, समाज म्हणून आणि माणूस म्हणून किती दिवस याच प्रश्नांची उत्तरं शोधात राहणार - मग महापूर येवो, दुष्काळ येवो किंवा कोरोनासारखा रोग, आपण दर वेळी जखम झाल्यावरच मलमपट्टीसाठी धडपड करण्याची सवय कधी सोडणार? हाही प्रश्न आहे. दिवसातून तीस-चाळीस वेळा साबणाने, भरपूर पाणी वापरून हात धुणं आजही आपल्या देशातील अनेकांना परवडत नाही, हे वास्तव आहे. मग त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी कशी घ्यायची?

दुसरीकडे, 'घराबाहेर पडू नका' हे सांगण्यासाठी आपल्या पोलिसांना काठ्या घेऊन रस्त्यावर उभं राहावं लागतं. तरीही लोक हुल्लडबाजी म्हणून, स्टंट म्हणून रस्त्यावर उतरतात, पोलिसांच्या अंगावर गाड्या घालतात, काही ठिकाणी नमाजासाठी लोक एकत्र येतात; जनता कर्फ्यूच्या दिवशी पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य पोलिसांपर्यंत सर्व जण अक्षरशः विनवण्या करून घराबाहेर पडू नकाअसं सांगत असतानाही लोक ढोल-ताशे-फटाके फोडत रस्त्यावर उतरतात.. बरं, हे कुणी अशिक्षितअडाणी लोक करतात असंही नाही, स्वतःला सुशिक्षित, प्रतिष्ठित म्हणवून घेणारी मंडळीसुद्धा या वेडाचारात आघाडीवर असतात.

ही वृत्ती म्हणजे कोरोनापेक्षाही जास्त घातक असा आजार आहे आणि तो आपल्या समाजाच्या शरीरात वर्षानुवर्षं स्लो पॉयझनिंगने भिनत गेलाय. ही कोरोनाची ब्याद पळाली की 'या' रोगावरची जालीम लसदेखील आपल्याला एक ना एक दिवस टोचून घ्यावी लागणारच आहे. बाहेरून आलेल्या आणि न दिसणाऱ्या शत्रूविरोधातील ही संयमाची आणि धैर्याची लढाई संपली की आपल्यातल्याच आणि स्पष्टपणे दिसून येणाऱ्या शत्रूविरोधातही आपल्याला आक्रमकपणे आघाडी उघडावी लागेल, तरच भविष्यात आपण एक समाज म्हणून, एक देश म्हणून अशा बाह्य संकटांविरोधात समर्थपणे उभे राहू शकू.