मेंढपाळांना 'कोरोना'ची झळ

विवेक मराठी    31-Mar-2020   
Total Views |


सध्या कोरोनासारख्या महामारीवर उपाय म्हणून संपूर्ण देशात 'लाँकडाउन' पाळण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही बाहेर पडत नाही. मात्र पोट भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मेंढपाळांना कोणी आसरा द्यायला तयार नाही. गावकुसाच्या बाहेर असे भेददर्शक वर्तुळ तयार होत आहे. या भयावह स्थितीत आमचे काय होणार? असा प्रश्न समूहासमोर उभा राहिला आहे.
 
dhangar community and cor


महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी भटक्या जाती आहेत, ज्या अजून पूर्णपणे स्थायिक झालेल्या नाहीत. त्यांचे भटकेपण अंशतः संपले असेल किंवा वर्षांतील काही महिने ते भटक्यांचे जीवन जगत असले, तरी त्यांनी आपले समूहवैशिष्ट्य कायम ठेवलेले आहे. अशा भटक्यांपैकी धनगर ही एक जात आहे. या समूहातील ६० टक्क्यांहून अधिक समाजाला शेळ्या-मेंढ्याचे कळप घेऊन हिंडावे लागते. दऱ्याखोऱ्यातून, ऊन-पावसाच्या अडचणींना तोंड देत खडतर जीवन जगत शेळी-मेंढीपालन हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन राहिले आहे.

दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, माण, खटाव आणि जत तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांची संख्या आहे. हे मेंढपाळ दिवाळी झाल्यावर संसाराचा गाडा घोड्यावर घेऊन मेंढ्यांसह ठिकठिकाणी वस्ती करीत जिकडे चारा-पाणी मिळेल तिकडे स्थलांतर करीत असतात. खान्देशात धुळे, साक्री भागांत शेकडो मेंढपाळ आहेत. तेही चराईसाठी वेगवेगळ्या भागात स्थलांतर करत असतात. शेकडो किलोमीटरची पायपीट करीत असताना मेंढपाळांसह त्यांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागते. कुटुंब आणि मेंढ्यासह सतत भटकंती करणारा समूह आज 'कोरोना'सारख्या महामारीत कुठल्याही सुरक्षेविना वणवण फिरत आहे. उपरे म्हणून यांना ना गावात प्रवेश दिला आहे, ना ते गावकुसाबाहेर स्थिर राहू शकत.
एकूणच 'कोरोना'मुळे मेंढपाळाची समस्या खूप व्यापक झाली आहे.

बाहेरील धोके

खरे तर नैसर्गिक आपत्ती कधी कोणाला सांगून येत नाही. 'कोरोना'च्या रूपाने संपूर्ण जगावर आपत्ती कोसळली आहे. या आपत्तीची तीव्रता वाढू नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. अशा काळात हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे आहे.

मेंढपाळ समूहातील आनंद कोकरे सांगतात, "धनगर हे पारंपरिक पद्धतीने शेळी-मेंढीपालन करतात. महाराष्ट्रात यांची संख्या तीन लाखांच्यावर आहे. मेंढ्या चारण्यासाठी हा समूह वर्षांतील आठ महिने आपल्या गावापासून दूर राहतो. माझ्या पुरंदर तालुक्यातील दिवे गावातील दीडशे कुटुंबे शेळ्या-मेंढ्यांना चारण्यासाठी महाराष्ट्रभर फिरताहेत. आजच्या स्थितीला या सर्वांशी संपर्क साधणे फारच कठीण आहे. गावबंदी असल्यामुळे ते ना मोबाइल चार्जिंग करू शकत, ना रिचार्ज. मग आम्ही यांच्याशी कसा संपर्क साधायचा? मेंढपाळ घायकुतीला आला आहे.

शेवटी जगणे महत्त्वाचे आहे. पण हे जगणे फार महाग झाले आहे. यातून मी एका गावाची कहाणी सांगत नाही, तर संपूर्ण तीन लाख मेंढपाळांचे दु:ख सांगतोय. मेंढपाळ एका गावात जास्त काळ राहू शकत नाही. चारा संपला की दुसऱ्या गावातील चाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. चारा नसेल तर मेंढ्या आजारी पडतात. त्यामुळे भटकंती केल्याशिवाय पर्याय नसतो. 'कोरोना'च्या धास्तीने मेंढपाळ आपल्या पालातून बाहेर पडू शकत नाहीत. गाव-शिवारापर्यंत हा रोग पसरला नसला, तरी आमच्यासाठी गावाची वेस बंद झाली आहे. शेत-शिवारातून बाहेर पडावे म्हटले, तर ठिकठिकाणीचे रस्ते बंद आहेत. मेंढपाळांचा मार्ग खडतरच आहे. यांच्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे की नाही? रोजच्या जगण्यासाठी लागणारा किराणाही ते घेऊ शकत नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये लहान मुले आहेत, त्याचे पालनपोषण कसे करावे? हा प्रश्न आहे."

जगणेहेच एक प्रयोजन असल्यामुळे आता कोणी तरी माणुसकी दाखवली पाहिजे. जिथे जिथे मेंढपाळ आहेत, तिथल्या मेंढपाळांना काय पाहिजे, काय नको याची विचारपूस केली पाहिजे असे कोकरे कळकळीने सांगतात.

आपली मान आपल्याच गुडघ्यात खुपसून आपण मुळुमुळु करीत बसणार नाही. जिथे जिथे मेंढपाळ आहे, तिथे तिथे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, असेही कोकरे यांनी सांगितले.

 

dhangar community and cor

अंतर्गत धोके

धनगर समाजातील हा मोठा घटक आजही अज्ञानी आहे. आज जगात काय चाललेय? त्याचे आता काय होणार? याची कल्पना या मेंढपाळांना आली नसावी. या समाजातील आरोग्याचा स्तर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपले बिऱ्हाड घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करत फिरत असतात. भटकंतीमुळे नागरी समाजाशी त्यांचा संवाद आणि संपर्क अत्यल्प असतो. त्यातही समाजाशी संवाद साधताना ते बुजतात.

आजच्या घडीला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेंढपाळांजवळ मास्क, सॅनिटायझरची बाटली आहे की नाही, हे कोणी सांगू शकत नाही. एकमेकांपासून किती अंतर राखायचे, याची माहिती या समूहापर्यंत पोहोचली आहे की नाही? हेही माहीत नाही. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कशी काळजी घेत असतील, हा एक मोठा प्रश्न आहे.

'कोरोना'मुळे मेंढपाळातील अशिक्षित पुरुषांची व स्त्रियांची धांदल उडाली असल्याचे कोकरे यांनी सांगितले. त्यांचा हा जगण्याचा प्रवास मात्र दु:खातून आणखी दु:खाकडे असाच चालू आहे, असे सध्यातरी म्हणता येईल.

बाहेरच्या आणि अंतर्गत धोक्यांशी संघर्ष करणाऱ्या या समूहाकडे माध्यमांनी अद्यापही लक्ष दिलेले नाही. अशा संकटसमयी मेंढपाळांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे योग्य होणार नाही.

समाजमाध्यमातून वेध

स्थलांतरित मेंढपाळांना सुरक्षितता मिळावी, यासाठी समाजमाध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून धनगर मेंढपाळ समाजावर पीएच.डी. करत असलेल्या, वर्धा जिल्ह्यातील आरती कडू यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेंढपाळांसह भटके विमुक्त जाती-जमातीतील लोकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

'कोरोना'ची झळ केवळ धनगर मेंढपाळांना बसलेली नाही, तर सुगी निमित्ताने स्थलांतरित झालेल्या डवरी, डोंबारी, दरवेशी, गारुडी, घिसाडी, शिकलदार, व्हलार, माकडवाले, गोसावी, भानामतीवाले, पारधी, नंदीवाले, तुरेवाले अशा फिरस्ते जीवन जगणार्या अनेक जमातींना फटका बसला असल्याचे आरती कडू यांनी सांगितले.


काय करावे?

आपत्तीकाळात समाजातील प्रत्येक व्यक्तीची, समूहाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य असते. समाजप्रवाहापासून दूर असलेल्या मेंढपाळांची सरकारने कोणत्याही परिस्थितीत काळजी घेतली पाहिजे.

) सरकारने प्रथम या मेंढपाळांचा शोध घेऊन, सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे. स्थलांतर करणे शक्य वाटत नसेल तर त्यांच्यापर्यंत अन्नाचे भांडार तत्काळ पोहोचवावे.

) वनविभागातून, गाव-शिवारातून गावात जाण्यासाठी प्रवेश मिळावा, पशूंना चारा, औषध, इंधन, तात्पुरती वीज (सौर उपकरणे) उपलब्ध करून द्यावी.

) सरकारच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मेंढपाळांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवावी.

) प्रत्येक मेंढपाळाला 'पशुपालक' म्हणून आधार कार्डसारखे ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून या समूहाच्या नोंदी राहतील.

शहर आणि गावापासून दूर असलेल्या या समूहाचा 'कोरोना'पासून बचाव होईल असे तूर्तास गृहीत धरून चालू या, पण... पण... या मेंढपाळ्यांचे वर्तमान संकटात सापडले आहे. प्रचंड गतीने येणाऱ्या नव्या समस्येला तोंड देण्याची ताकद यांच्यात निर्माण होण्यासाठी गावकऱ्यांच्या सहानुभूतीची नितांत गरज आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
आनंद कोकरे (मेंढपाळ) +९१-९९२२७३८८६७
आरती कडू (संशोधक) +९१-८६९८०६६७७८
दीपा पवार (कार्यकर्त्या) ९७७३३६६०००