थप्पड - आत्मभानाची जाणीव!

विवेक मराठी    09-Mar-2020
Total Views |

***ज्योत्स्ना गाडगीळ***

'थप्पड' चित्रपटाच्या निमित्ताने एका मार्मिक विषयाची नाजूकपणे केलेली हाताळणी प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालणारी आहे. महिलांच्या आत्मसन्मानावर भाष्य करणारा हा चित्रपट 'जगण्याचा' नवा दृष्टीकोन देतो.


Thappad Movie Review_1&nb

आपण जिवंत आहोत, पण आपण जगतोय का? 'जिवंत राहणे' आणि 'जगणे' हे दोन्ही शब्द वरकरणी समानार्थी वाटत असले, तरीदेखील त्यात पुष्कळ फरक आहे. ज्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतात, ते 'जिवंत' असतात, तर आनंद आणि आत्मसन्मान या ज्यांच्या मूलभूत गरजा असतात, ते 'जगत' असतात. अजूनही तुमच्या मनातला गोंधळ दूर झाला नसेल, तर त्यासाठी तुम्हाला 'थप्पड' हा चित्रपट पाहिला पाहिजे. महिलांच्या आत्मसन्मानावर भाष्य करणारा हा चित्रपट 'जगण्याचा' नवा दृष्टीकोन देतो.

महिला दिन आल्यावर अनेक मेसेज व्हायरल होतात. 'ती' कोणाची तरी बहीण आहे, आई आहे, मावशी आहे, आजी आहे, मैत्रीण आहे, मुलगी आहे. परंतु, 'ती' स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, हे सत्य आपण स्वीकारत नाही. सतत काही ना काही विशेषणे तिला चिकटवत असतो. परंतु, 'ती'ला एक दिवसापुरता मान-सन्मान नको, तर कायमस्वरूपी आनंद आणि आत्मसन्मान हवा आहे, याची जाणीव 'थप्पड' करून देतो.

नायिकेच्या नवऱ्याचे त्याच्या वरिष्ठांशी भांडण होते. त्यात नायिका हस्तक्षेप करते. रागाच्या भरात नवरा बायकोला 'थप्पड' मारतो आणि अकारण पडलेल्या थपडेमुळे नायिकेचा आत्मसन्मान जागृत होतो हा आहे चित्रपटाचा विषय. एका 'थप्पड'साठी नायिकेने दिलेला लढा, उपकथानकांतील नायिकांनादेखील आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे बळ देतो.

मात्र, एक 'थप्पड' जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलाच्या घटस्फोटाचे कारण होते, ही बाब सहजासहजी आपल्या पचनी पडत नाही. नायिकेने अकारण विषय ताणून धरला, असे वाटून आपल्याला नायकाची कीवसुध्दा येते. पूर्वीच्या लोकांनी उठता बसता असे अपमान जिव्हारी लावून घेतले असते, तर लग्नव्यवस्था कधीच कोलमडली असती.. घर-संसार सांधून ठेवायचा, तर स्त्रीने थोडी पडती बाजू घ्यायला हवी.. असे प्रतिध्वनी चित्रपट पाहताना आपल्या मनातून उमटत राहतात. याच विचारांना छेद देण्यासाठी लेखकाने 'एक थप्पड'चा आधार घेतला आहे.

नायिकेला 'थप्पड' मारल्याची खंत नाही, तर आपल्याला अकारण 'थप्पड' मारण्याची नवऱ्याची हिंमत होते, याबद्दल नवऱ्याची आणि स्वत:ची चीड येते. रागाच्या भरात नवऱ्याने बॉसवर हात न उगारता आपल्यावर हात उगारून रागाचा निचरा केला. याचा अर्थ, आपणच त्याला गृहीत धरण्याची संधी दिली आणि स्वत:ची किंमत कमी करून घेतली, याची जाणीव नायिकेला त्या 'थप्पड'मुळे होते. नायिकेने राग समजूनही घेतला असता, परंतु त्या 'थप्पड'चे झालेले समर्थन तिच्या पचनी पडत नाही. 'आम्हीसुध्दा सगळं सहन केले, आता तूही कर' हे आईने आणि सासूने केलेले समर्थन व 'त्यात काय एवढे' म्हणत नवऱ्याने सदर घटनेकडे केलेले दुर्लक्ष नायिकेला सहन होत नाही. म्हणून ती वेगळे होत आत्मसन्मानाने जगण्याचा निर्णय घेते.

याचा अर्थ, प्रत्येक स्त्रीने बंधनात, नात्यात न अडकता स्वतंत्र जगावे, असे लेखकाला सुचवायचे नाही, तर प्रत्येकीने स्वत:ची किंमत ओळखून आत्मसन्मानाने जगावे आणि इतरांनाही आपल्याला सन्मानाने वागवण्यास बाध्य करावे, अशी लेखकाची अपेक्षा आहे. चुकीला माफी देण्याइतके औदार्य प्रत्येक स्त्रीकडे असतेच, परंतु समोरच्याला चुकीची जाणीव करून देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये असावे आणि त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही एवढा कणखरपणा व धाक तिच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण करावा, हा विचार चित्रपटातून रुजवायचा आहे.

 

आजवरच्या स्त्रियांनी आपणहून अनेक गोष्टी ओढवून घेत स्वत:ला कमकुवत बनवून घेतले. त्याचे फलित म्हणून कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार, अन्याय, अत्याचार, अवहेलना इ. गोष्टींना ती बळी पडत गेली. असे म्हणतात की अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. परंतु आपल्यावर अन्याय होतोय, ही जाणीवच बोथट झाल्यामुळे स्त्रियांच्या वाटयाला दुय्यमपणा आला. ती भीत भीत राहू लागली. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार शोधू लागली. कारण ती परावलंबी होती. तरीदेखील वेळोवेळी अनेक स्त्रियांनी बंडखोरी करत बुरसटलेल्या विचारांविरुध्द लढा दिला. रूढी-परंपरांमध्ये कालानुरूप बदल केले, म्हणून आज आपण किमान ताठ मानेने जगत आहोत. आपले विचार व्यक्त करत आहोत.

 

मात्र, अजूनपर्यंत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. आजही स्त्रिया आपल्या कर्तव्यांच्या बरोबरीने आपल्या हक्कांबद्दल, संरक्षणाबद्दल, न्यायाबद्दल, आरोग्याबद्दल जागरूक नाहीत. स्त्रियांना रोजगार देणे म्हणजे 'स्त्री सबलीकरण' नाही, तर स्त्रियांना मुक्तपणे, निर्भयपणे जगता येणे म्हणजे स्त्री सबलीकरण!

यासाठी स्त्रियांना आत्मभान येणे आवश्यक आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कृती घडली, तरच योग्य परिणाम साधता येतो. त्यासाठी आपल्याबरोबर काय घडते, काय घडू शकते, आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात, आपण प्रतिकार कसा करू शकतो इ. गोष्टींचा विचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांगल्याबरोबर वाईट गोष्टींचाही विचार आवश्यक असतो. तो आपण करतच नाही. जणू आपल्या बाबतीत काहीच वाईट घडणार नाही, असे समजून आपण बेसावध राहतो या बेसावधपणाची मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणून 'थप्पड' पडण्याची वाट न पाहता, ती मारण्याची समोरच्याची हिंमत होणार नाही एवढी कणखरता अंगी बाणणे ही काळाची गरज आहे.

 

केवळ पेहरावात, संपत्तीत, शिक्षणात पुरुषांशी केलेली बरोबरी म्हणजे समानता नाही, तर वैचारिक प्रगती, स्वसंरक्षणाची जबाबदारी आणि आत्मभान यांसह आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार यात 'स्त्री-पुरुष समानतेचे' मर्म सामावले आहे.

 

'थप्पड' चित्रपटाच्या निमित्ताने एका मार्मिक विषयाची नाजूकपणे केलेली हाताळणी प्रेक्षकांच्या डोळयांत अंजन घालणारी आहे. अर्थात, याची जाणीव नुसत्या 'जिवंत' असणाऱ्या व्यक्तींना होणार नाही, तर 'जगणाऱ्या' व्यक्तींना होईल.

[email protected]