गंगा आरती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Mar-2020
|

एक मायक्रो भारत, एक मायक्रो जग गंगेकाठी अवतरले होते. शेवटी गंगारती सुरू झाली. देशी, परदेशी सगळे एका सुरात गात होते. ‘चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता.. पुत्र सगर के तारे सब जग को ज्ञाता... यम कि त्रास मिटाकर परमगति पाता.... ओम गंगे माता...’ नंतर शेकडो ओंजळीतले दिवे तिच्या प्रवाहाबरोबर हसत हसत जाऊ लागले. दीपकळ्यांनी गंगेचे वस्त्र तेजोमय झाले.

 
ganga arti_1  H

प्रिय जयराज,

पहाटेचे तीन वाजलेत. बाहेर होळी पौर्णिमेचा चंद्र हृषीकेशच्या पर्वतांवर बसून खळाळत्या गंगेत आपले प्रतिबिंब पाहायचा प्रयत्न करत आहे. पण आपल्या बेफाम पाण्याला कुणी आरसा समजू नये, असा इशारा दिल्यागत ती धाडधाड वाहत आहे. तिचा अखंड जीवनदायक आवाज पहाटेचा हा शांत प्रहर जागृत ठेवतो आहे. वसंत ॠतूतील आल्हाददायक हवा थकव्याला जवळ फिरकू देत नाही. उद्या दिवस उजाडताच इथे रंग खेळणे सुरू होईल. मला त्याहीआधी पुढच्या प्रवासाला निघायचे आहे. त्याआधी तुला हे पत्र.

 आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

 
 संध्याकाळपासूनच घाटावर लगबग चालली होती. सगळा गाव हळूहळू तिथे जमू लागला. गंगेच्या शेजारीच होमकुंड पेटले होते. उंच उंच आरत्या लावल्या होत्या. पन्नासेक बटू गायत्री मंत्र उच्चरवात गात होते. जटाधारी बाबांचे वेगवेगळ्या गटात हर हर गंगे, भागीरथी चालू होते. गोर्या परदेशी पाहुण्यांनी तटाचा एक भाग गजबजून गेला होता. त्यातच काही काळ प्रवासात माझ्यासोबत राहत असलेली स्पॅनिश सोफीही मिसळून गेली.


ते गोरे मंडळ, डोळे ताणताणून उत्सुकतेने हे सगळे बघत होते. त्यातले काही भारतीय तत्त्वज्ञान, धर्म, परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी आलेले. विशेषत: योगाभ्यास करणारे एकदम ताठ बसून, जमेल त्या उच्चारात ओम् नम: शिवाय म्हणत होते. घसा कोरडा पडला की बिस्लरी तोंडास लावत. मला ते बघून जरा मौज वाटली. आपण सहसा अशा वेळी पाण्याची बाटली तोंडास लावत नाही. पण एकूण भारतीय धर्म, सण जाणून घेण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद! बाकी देशाच्या कानाकोपर्यातून आलेले अठरापगड यच्चयावत भारतीय मात्र हातात दिवे घेऊन आरतीची वाट पाहत होते. काही जण जरा दूरवर हॅलोजनच्या प्रकाशात गीतापठण करत होते. मी मात्र यातले काहीच करत नव्हते. हा माहोल बघत राहणे, हीच या भटक्या जिवाची पौर्णिमा.

एक मायक्रो भारत, एक मायक्रो जग गंगेकाठी अवतरले होते. शेवटी गंगारती सुरू झाली. नदीची आरती ओवाळणारे आपण निसर्गात कसकसा हैदोस घालतो, हे सगळे सगळे विसरून मी तो मेळा बघत होते. देशी, परदेशी सगळे एका सुरात गात होते. ‘चंद्र सी ज्योत तुम्हारी जल निर्मल आता.. पुत्र सगर के तारे सब जग को ज्ञाता... यम कि त्रास मिटाकर परमगति पाता.... ओम गंगे माता...’ नंतर शेकडो ओंजळीतले दिवे तिच्या प्रवाहाबरोबर हसत हसत जाऊ लागले. दीपकळ्यांनी गंगेचे वस्त्र तेजोमय झाले. तारकांनी दिवे होऊन या जीवनदात्रीची आरती केली जणू!

 

तेवढ्यात ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा झाली. थोड्याच वेळात रासलीला सुरू होणार होती. त्यांनंतर दूर गावात होलिकादहन होते. बघता बघता घाटावरच्या मोकळ्या जागेवर रासलीला सुरू झाली. सगळेच सरसावून बसलो. आधी गणपतीस आवाहन झाले. ‘सिद्धी को दाता विघन विनाशन, होली खेलें गिरिजापति नन्दन.’ मग ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, लक्ष्मण, सीता, शंकर, पार्वती, बद्रीनाथ, केदारनाथ, पशुपतिनाथ, इष्टदेव, पंचदेव इत्यादी सर्वांना आवाहन करत करत आधीची आरती संपली. देवदेवतांची वेशभूषा केलेल्या मुलोमुली येत, नाचनाच नाचत, आनंद उधळीत आणि निघून जात. मग राधा-कृष्णाचे आगमन झाले. वाद्ये वाजू लागली. ‘गोरी प्यारो लागो तेरो झनकारो, झनकारो, झनकारो! तुम हो ब्रज कि सुन्दर नारी, मैं मथुरा को मतवारो!!’ राधा-कृष्ण, गोपिका देहभान हरपून नाचत होते. लोकांनी ताल धरला. गाणार्याचा सूर टिपेस पोहोचला. राधा-कृष्ण सगळीकडे व्यापून राहिले. तितक्यात, गोरे मंडळ सोडून सोफी माझ्यापाशी गर्दीत येऊन पोहोचली.

 
ganga arti_1  H

रासलीला संपता संपता तिने मला विचारले, “हे राधा-कृष्णा भारतातले बेस्ट कपल होते का?”

मी चमकून तिच्याकडे पाहिले. हिने आजपर्यंत मला प्रश्नच प्रश्न विचारले होते. तिला उत्तरे देता देता मी आपल्याच एकूण इतिहास, परंपरा या सगळ्याकडे अलिप्त होऊन पाहू लागले. जिला आपले काही माहीत नाही, तिला समजतील अशी उत्तरे देत राहणे म्हणजे दमछाक करणारे पण प्रचंड आनंददायक काम होते. तर या सोफीच्या प्रश्नाला उत्तर देताना पुन्हा मनात वळले, विचार आला, ना धड ते एकमेकांसोबत राहिले, ना त्यांचे लग्न झाले, तसा कृष्ण तिच्यापेक्षा बराच धाकटा, आजन्म विरहात गेला.. तरी ते बेस्ट कपल, की म्हणूनच बेस्ट कपल? सोफीला सांगताना जरा विचार करून मी म्हणाले, “त्यांचे कधीच लग्न झाले नव्हते, पण ते मनाने नेहमी एकमेकांजवळ होते, म्हणून ते बेस्ट कपल झाले.”

 
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/ 
 

ग्रेट!” असे तिच्या उपजत उत्साही स्वभावाने ती उद्गारली.

 

मग मीरा कोण होती? कारण इथल्या योगा क्लासमध्ये मी तिची मूर्ती पाहिली! आणि तिचेही कृष्णावर खूप प्रेम होते असे ऐकलेय.” तिची पुढची जिज्ञासा.

होय, ती त्याची भक्त होती.” मी.

ओह, भक्त होती, राधेसारखी प्रेयसी नव्हती!”

भक्त-प्रेयसी म्हणू शकतेस!”

पण मला शंका आहे. कृष्ण पुरातन काळातला, मीरा अलीकडची. तरी ती प्रेयसी कशी? की मीरेच्या काळात कृष्णाचाही काही अवतार वगैरे होता?” तिने स्वत:शीच विचार करत करत विचारले.

 

भारत फिरता फिरता तिला अवतार, पुनर्जन्म या दोन गोष्टी समजू लागल्या होत्या.

 

कृष्ण मानवी रूपात कधीच मीरेच्या समोर नव्हता.”

मग तिने त्याच्यावर इतके प्रेम कसे काय केले?” शरीर हे प्रेम व्यक्त करण्याचे मुख्य माध्यम आहे, या पक्क्या पाश्चात्त्य विचारांच्या सोफीने हे विचारणे साहजिक होते म्हणा.

इट वॉज प्लॅटॉनिक लव्ह. अशारीर प्रेम. ते गूढरम्य आहे सगळे!” त्यातल्या त्यात तिला समजेल असे मी सांगितले.

असेल..” ती विचारपूर्वक म्हणाली.

, जीजसवर असे कुणी प्रेम केलेय?” मी हसून विचारले.

बिलकुल नाही. असा विचार करणेही पाप आहे!” ती डोळे मोठे करून हसत हसत म्हणाली.

तेवढ्यात गुजियाचा प्रसाद आला. करंजीसारखा तो गोड पदार्थ सोफीने काळजीपूर्वक फोडला. आतले गूळखोबर्याचे सारण बोटाने खाल्ले. नंतर वरचे मैद्याचे तळलेले कव्हर कुरूकुरू खाऊ लागली.

 

सहज विचार आला, हजारो शतकांपासून जगाच्या कानाकोपर्यातून कुठून कुठून लोक हिच्या काठी येत राहिले, येत राहतील. (त्यांच्याविषयी मी आणखी नंतर लिहीन.) तिच्यात आपले सगळे व्यापताप निवून जातात. मन काही काळासाठी का होईना, हलके होते. आपल्याच भूमीतून वाहणारी ही शुभ्रशीतल पुण्यदायिनी नदी... कधीतरी इथे नक्की येऊन जा.

 

तुझी,

शिवकन्या.