मदतीची बेटं - समता सैनिक दलाचे मदतकार्य

01 Apr 2020 19:38:46

‪#‎काहीचांगलेहीघडतेआहेआसपास


Samata Sainik Nagpur _1&n 

गेल्या तीन दिवसांपासून नागपूर मध्ये समता सैनिक दलाचे कार्यकर्ते करोना साथीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या गोर-गरीब नागरिकांना मदत करत आहेत. नागपूर मधील राजाबक्षा, मेडिकल चौक, रामबाग, इमामवाडा, इंदिरानगर आदि परिसरात हे कार्य सुरु आहे. मेडिकल चौकापासूनच्या सुमारे तीन किलोमीटर परिसरात कामगार, मजूर वर्गाच्या वस्त्या आहेत. रिक्षाचालक, चहा विक्रेते, मोलमजुरी-घरकाम करणाऱ्या महिला वगैरे श्रमाची कामे करणारे लोक ह्या वस्त्यांत राहतात. सरकारी मदत न पोहोचल्यामुळे व रोजगार बुडाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. गहू, तांदूळ, डाळी अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून अशा वस्त्यात घरोघरी पोहोचवण्यात आले. तसेच तयार भोजनाची पाकिटे करून त्याचेही वाटप करण्यात आले. अन्य ठिकाणहून मजुरीसाठी आलेल्या व आता शहरात अडकून पडलेल्या मजूरवर्गाला त्याचा लाभ मिळत आहे.

मेडिकल कॉलेज रुग्णालयात असणारे रुग्ण, बाहेरगावाहून आलेले त्यांचे नातेवाईक ह्यांच्या भोजनाची सोय देखील करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची देखील भोजनाची, नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते आहे. ह्या कामात निधी व अन्याधान्य मिळविण्यासाठी स्थानिक लोकांना आवाहन करण्यात येत असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सुरु केलेल्या ह्या कार्याबद्दल समता सैनिक दल, भिखू संघ व अन्य सामाजिक संस्थांचे कौतुक होत आहे.

- शरदमणी मराठे  

(संदर्भ - दैनिक देशोन्नत्ती, लोक माध्यमातील पोस्ट)

Powered By Sangraha 9.0