जयंती बाबासाहेबांची

स्रोत: विवेक मराठी    दिनांक10-Apr-2020
|
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

ambedkar_1  H x


कालच्या प्रश्नाचे उत्तर

आपल्या देशाचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले. २६ जानेवारी १९५०पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोहेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यास २०१६पासून सुरुवात केली.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तथागत बुद्ध यांच्यासंबंधी पुस्तकाचे नाव काय आहे?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा


ते दिवस लवकर येतील!

१९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्यागाह केला. तेव्हा 'भाला'कार भोपटकरांनी टीका केली होती. भालाकार भोपटकर हे हिंदुत्ववादी आणि वृत्तीने सनातनी होते. भालाकारांनी मांडलेली मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून खोडून काढली. असे असले, तरी दोघांना एकमेकांबाबत आदर वाटत असे. बाबासाहेब पुण्यात असताना भोपटकरांनी त्यांना घरी चहासाठी बोलावले. बाबासाहेबांनी ते आमंत्रण स्वीकारले. बाबासाहेब आंबेडकर सहकाऱ्यांना घेऊन भोपटकरांच्या वाड्यात पोहोचले. भोपटकरांच्या घरी त्यांचे उत्तम स्वागत झाले. बाबासाहेबांना बसण्यासाठी बाहेर ओट्यावर खुर्ची ठेवली होती. बाबासाहेब तेथे बसले. भोपटकरांनी घरातून चहा आणून दिला. चहानंतर दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. बाबासाहेब जायला निघाले, तेव्हा त्यांचे हार्दिक आभार मानून भोपटकर म्हणाले, “माफ करा आंबेडकर." डॉ. आंबेडकर म्हणाले, "कशाबद्दल?" भोपटकर म्हणाले, “मला तुम्हाला उंबऱ्यांच्या आत स्वयंपाकघरात घेता आले नाही." बाबासाहेब खुर्चीतून उठता उठता हसून म्हणाले, "मिस्टर भोपटकर, आम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात घेण्याचे दिवस लवकरच येतील." यावर भोपटकर हसले आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. बाबासाहेब निखळ मनाचे होते. त्यांनी वैचारिक मतभेदांना वैयक्तिक जीवनात थारा दिला नाही. मैत्रीच्या जागी मैत्री आणि मतभेदाच्या जागी मतभेद या दोन्हीतील सीमारेषा बाबासाहेबांनी योग्य प्रकारे सांभाळली. href="#inbox/_blank"