जयंती बाबासाहेबांची

स्रोत: विवेक मराठी    दिनांक12-Apr-2020
|
 
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

ambedkar_1  H x


कालच्या प्रश्नाचे उत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता' इत्यादी नियतकालिके सुरू केली होती.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर माणगाव येथे कोणी शिक्कामोर्तब केले?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा

सन्मान मातृशक्तीचा

डॉ. बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा संगर केला. मनुस्मृतीचे दहन हा सत्याग्रह दलित समाजाला आत्मभाव देणारा होता. याच काळात बाबासाहेबांनी दलित समाजातील माता-भगिनींना मार्गदर्शन केले. महिलांनी आपला पोषाख, भाषा, राहणीमान बदलून स्पृश्य समाजातील महिलांसारखे वर्तन करावे, असा उपदेश दिला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे पडसाद सर्वत्र उमटले. याच काळात शाहीर पठ्ठे बापूराव यांचे पथक मुंबईत होते. लालबाग परिसरात त्यांच्या पथकांचे खेळ होत. एक दिवस पठ्ठे बापूराव बाबासाहेबांना येऊन भेटले आणि म्हणाले, "बाबासाहेब, मला आपल्या कामाबद्दल आदर आहे, म्हणून आपल्याला काही मदत करण्याची इच्छा आहे." बाबासाहेब पठ्ठे बापूरावांना म्हणाले, “आपण काय मदत कराल?" “मी आपल्या चळवळीला आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी माझ्या तमाशा फडाचे चार खेळ करीन आणि त्यातून मिळणारे उत्पन्न आपल्या स्वाधीन करीन.” पठ्ठे बापूराव म्हणाले. “आपण असे अजिबात करू नका." बाबासाहेब म्हणाले. पठ्ठे बापूरावांनी प्रश्न केला, “का?" यावर बाबासाहेबांनी बाणेदारपणे उत्तर दिले. ते म्हणाले, “माझ्या आया-बहिणींना नाचवून मी चळवळ चालवावी इतका हीनपणा अजून माझ्यात आला नाही.” पठ्ठे बापूरावांच्या प्रस्तावाला बाबासाहेबांनी नकार दिला. त्या काळी तमाशा या कलाप्रकारात महार आणि मांग समाजातील महिला अधिक प्रमाणात असत. बाबासाहेब नेहमीच स्त्रियांच्या उन्नतीचा विचार करत. त्यांनी सन्मानाने जीवन जगावे असे सांगत. मग ते पठ्ठे बापूरावांचा प्रस्ताव कशाला स्वीकारतील?