बंधुतेचे तत्त्व जगण्याची वेळ

विवेक मराठी    13-Apr-2020   
Total Views |

पूज्य डॉ. बाबासाहेब स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांवर थांबत नाहीत. ते 'बंधुता' हे तिसरे तत्त्व आपल्या घटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट करतात. बंधुता याचा अर्थ बंधुभाव आणि भगिनीभाव असा होतो. भारतातील नागरिकांनी परस्परांशी सख्ख्या भावाहून अधिक प्रेमभावनेने राहिले पाहिजे. बाबासाहेब याला 'फेलोफीलिंग' असे म्हणतात. ही मानसिक अवस्था आहे. ती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. स्वातंत्र्य आणि समतेचे अधिकार संविधानाच्या कायद्याने देता येतात. बंधुता अशी कायद्याने देता येत नाही. ती निर्माण करावी लागते.


Babasaheb Bhimrao Ramji A

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सारा देश पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. जगातील सर्वात वेगळ्या प्रकारची राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांना देण्यात येते. आपल्या राज्यघटनेचे वेगळेपण तिच्या सामाजिक आशयात आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांच्या राज्यघटना राजकीय तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. तिथे स्वातंत्र्य आणि समता यांचा अर्थ राजकीय स्वातंत्र्य आणि राजकीय समता असा होतो. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्य आणि समता हे शब्द आहेत. राजकीय समता आणि स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे, मात्र बाबासाहेब इथेच थांबत नाहीत. राजकीय स्वातंत्र्य आणि समतेबरोबरच सामाजिक स्वातंत्र्य आणि समता याची ग्वाही आपली राज्यघटना देते. घटना समितीसमोरच्या अखेरच्या भाषणात डॉ. बाबासाहेब इशारा देतात की, केवळ राजकीय लोकशाहीवर आपण संतुष्ट राहता काम नये. राजकीय लोकशाहीबरोबरच आपण सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही निर्माण केली पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दीर्घकाळ चालणार नाही. ती तशीच राहिली, तर मोठ्या कष्टाने उभा केलेला लोकशाहीचा डोलारा विषमतेत जगणारे उदध्वस्त करून टाकतील. तसे होऊ नये, म्हणून पूज्य डॉ. बाबासाहेबांनी अत्यंय दूरदृष्टीने राज्यघटनेच्या कलम १४, १५, १६मध्ये समतेसाठी राज्य शासनाने - म्हणजे स्टेटने काय करायला पाहिजे, हे सांगितले आहे.

राज्य धोरणाच्या निदेशक तत्त्वांत राज्य शासनाने सामाजिक समता आणि आर्थिक समता निर्माण करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे सांगितले आहे. यालाच काही तज्ज्ञ 'राज्यसमाजवाद' असे म्हणतात. जगात फक्त आयरिश संविधानात अशा प्रकारची कलमे आहेत. थोर घटनातज्ज्ञ ग्रॅनव्हिले ऑस्टिन यामुळेच 'समाजिक क्रांतीचा दस्ताऐवज' या शब्दात आपल्या राज्यघटनेचे वर्णन करतात.

पूज्य डॉ. बाबासाहेब स्वातंत्र्य आणि समता या दोन मूल्यांवर थांबत नाहीत. ते 'बंधुता' हे तिसरे तत्त्व आपल्या घटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट करतात. बंधुता याचा अर्थ बंधुभाव आणि भगिनीभाव असा होतो. भारतातील नागरिकांनी परस्परांशी सख्ख्या भावाहून अधिक प्रेमभावनेने राहिले पाहिजे. बाबासाहेब याला 'फेलोफीलिंग' असे म्हणतात. ही मानसिक अवस्था आहे. ती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. स्वातंत्र्य आणि समतेचे अधिकार संविधानाच्या कायद्याने देता येतात. बंधुता अशी कायद्याने देता येत नाही. ती निर्माण करावी लागते.

आज आपला देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. देशभर लॉकडाउन आहे, लोकांना घरीच राहायला सांगितले आहे, ज्यांचे पोट हातावर आहे, रोज परिश्रम केल्याशिवाय ज्यांना जेवण मिळणे कठीण आहे, अशांची परिस्थिती नाजूक आहे. ही वेळ राज्यघटनेतील बंधुता हे तत्त्व जगण्याची आहे. अडचणीत असलेल्या आपल्या देशबांधवांना प्रत्येकाने कर्तव्यभावनेने मदत करण्याची गरज आहे. जे गरीब आहेत, बेघर आहेत, ज्यांना कोणताही निश्चित व्यवसाय नाही, घरकाम करून ज्या महिला संसार चालवितात, त्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे.

आनंदाची गोष्ट अशी की या संकटसमयी रतन टाटांपासून ते बाटाच्या दुकानात काम करणाऱ्या सामान्य माणसानेही बंधुत्वाची ही भावना दाखविली आहे. ज्यांच्याजवळ भरपूर धन आहे, त्यांनी मोठ्या देणग्या दिल्या आहेत आणि ज्यांच्याकडे धनाची कमतरता आहे, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची सेवा देऊ केली आहे. संघस्वयंसेवक, विविध धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते, विविध सेवा संस्था या वेळी धैर्याने पुढे येऊन काम करीत आहेत. पोलीस, नर्सेस, डॉक्टर, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. डॉ. आंबेडकरांनी ज्या बंधुभावनेची अपेक्षा केली, तिचे दर्शन या संकटकाळी होताना दिसते .

या काळात दूरदर्शनवर 'रामायण' मालिका दाखविण्यात येत आहे. बंधुप्रेम काय असते, हे आपण या मालिकेत पाहतो. राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि ते प्रसंग पाहताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. बंधुतेचे मूल्य असे अतिप्राचीन आहे. सर्व भारतीयांनी त्याचा अंगीकार करणे म्हणजेच आपले राष्ट्रीयत्व बळकट करणे होय. जेव्हा एका भूमीत राहणारे लोक परस्परांच्या स्नेहाने बांधलेले असतात, तेव्हा असा मानवी समूह त्या भूमीचे राष्ट्र होतो. असा मानवी समूह भारतात उभा राहावा, भारत एक राष्ट्र बनावे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. जोपर्यंत आपण भारतीय भावनिकदृष्ट्या एकमेकांत बांधले जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण राष्ट्र होऊ शकत नाही.

या संकटाच्या कालखंडात आपण सर्वांनी घटनात्मक नीतीचे पालन करायला हवे. घटनात्मक नीती याचा अर्थ कायद्याचे राज्य आणि कायद्याचे काटेकोर पालन होय. कायद्याचे राज्य याचा अर्थ होतो, राज्य घटनात्मक कायद्याने चालेल, समाज घटनेच्या कायद्याने बांधलेला असेल, न्यायनिवाडा करण्यासाठी स्वतंत्र न्यायपालिका असेल. कायद्याचे पालन सर्वांनी करायचे असते. आपण जर कायद्याचे पालन केले नाही, तर अराजक निर्माण होईल.

कोरोनाचे संकट झेलत असताना आपण सर्वांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. यालाच घटनात्मक नीती असेही म्हणतात. ही घटनात्मक नीती लोकांमध्ये निर्माण करावी लागते. हीदेखील कायदा करून निर्माण करता येत नाही. यासाठी लोकांच्या मनात ही भावना कायम राहावी लागते की राज्यघटना ही आमची निर्मिती आहे, आमच्या सुखासाठी ती निर्माण केलेली आहे, म्हणून मी तिचे काटेकोर पालन करेन, जे सर्वांच्या कल्याणाचे, त्यात माझेही कल्याण आहे, अशी मनोभावना हवी.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी काही नियम केले आहेत, त्याचे आपण पालन केले पाहिजे. त्याचे राजकारण करता कामा नये. संकटाच्या समयी राजकारण करणे विकृती समजली पाहिजे. मी एकट्याने नियमांचे पालन केले नाही तर काय होणार, असा विचार करू नये. एका राजाने देवाचा गाभारा दुधाने भरण्यास जनतेला सांगितले. प्रत्येकाने तांब्याभर दूध टाकल्यास गाभारा भरणार होता. पण जेव्हा गाभारा भरला, तेव्हा त्यात दुधाऐवजी पाणीच निघाले. प्रत्येकाने विचार केला की माझ्या एकट्याच्या तांब्याभर पाण्याने काय होणार आहे? असा विचार करून प्रत्येकाने पाणीच टाकले. मी नियम मोडून काय होणार आहे, असा विचार करणाऱ्यांनी या कथेतून बोध घेतला पाहिजे.

जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकेचे राष्ट्रपिता म्हणतात. घटनात्मक नीतीचे पालन करण्याचा मापदंड त्यांनी घालून दिला. ते म्हणत असत की घटना माझी मार्गदर्शक आहे. मी तिचा अवमान कधीही करणार नाही. ही घटनात्मक नीती या काळात जगण्याचा सर्वांनी प्रयत्न केलाच पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे कल्याण आहे.

आपल्या भारतीयांचा स्वभाव राज्यांच्या कायद्याच्या अधीन राहण्याचा नाही. दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिल्याने, विदेशी सत्तांविरुद्ध संघर्ष करणे, त्यांचे कायदे मोडणे हा आपला स्वभाव झाला. अशा पारतंत्र्याच्या काळात राज्यापेक्षा आपण धर्माचे कायदे मोठे मानले. धर्माच्या कायद्यांचे पालन करणे हा आपला स्वभाव झाला. आता परिस्थिती बदललेली आहे. आपणच आपले कायदे करतो. आपणच केलेले कायदे आपणच पाळायचे असतात, धर्माचे काही कायदे राज्याच्या कायद्याशी मेळ खात नाहीत, अशा वेळी राज्याच्या कायद्याला प्राधान्य दिले पाहिजे. धर्माचे जे नीतीविषयक कायदे आहेत, परस्परांवर प्रेम करण्याचे जे कायदे आहेत, या सर्वांमध्ये कर्तव्याची भावना असते. पुत्रधर्म, मातृधर्म, पितृधर्म, पतिधर्म, पत्निधर्म या भाषेत आपल्याला धर्म समजतो. या शब्दांबरोबर राजधर्म आणि प्रजाधर्म असे आणखी दोन धर्म आहेत. या दोन्ही धर्मांचे पालन करणे म्हणजेच सांविधानिक नीतीचे पालन करणे होय. संकट जसे अनेक प्रश्न निर्माण करते, तशी ती आपली कसोटीही पाहत असते. संकटसमयी आपल्या उणिवांचा शोध घ्यायचा असतो आणि सबळ बनण्याचा प्रयत्न करायचा असतो. काळ आपल्याकडून हीच अपेक्षा करीत आहे.

रमेश पतंगे