सत्य-असत्याच्या सीमेवर रेंगाळणारी थरारिका - 'गॅसलाइट'

स्रोत: विवेक मराठी    दिनांक14-Apr-2020   
|

**प्रिया प्रभुदेसाई***

१९४४मध्ये प्रदर्शित झालेला जॉर्ज ककर दिग्दर्शित 'गॅसलाइट'. दुसऱ्यावर सत्ता गाजवणे ही काही लोकांची गरज असते. त्याची कारणे अनेक असतात. दुसऱ्यांना खाली पाडणे, त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणे हे अनेक वेळा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी केले जाते. स्वप्रेमात बुडालेली माणसे हे नकळत करतात, तर काही वेळा त्यांचा अंत:स्थ हेतू फार धोकादायक असू शकतो.


gaslight movie _1 &n

तू नं मूर्ख आहेस, काहीच कसे जमत नाही गं तुला, कसे काही कळत नाहीही आणि अशा प्रकारची दूषणे घरच्या स्त्रीला सतत देणे काही नवीन नाही. आपण काही चुकीचे करत आहोत हे अनेक वेळा लक्षातही येत नाही. अनेक ठिकाणी तर त्या घरच्या बाईच्याही हे अंगवळणी पडलेले दिसते.

बायका तशाही संवेदनशील असतात, भावनाशील असतात, दुःख कुरवाळत असतात असाही शिक्का मारून झालेला असतोच. त्यामुळे संवादाचे वादात रूपांतर होऊ नये, किंवा प्रश्नाला उत्तरच द्यायला लागू नये म्हणून हेटाळणी करून तिला गप्प बसवणे पथ्यावरही पडते. आपल्या सहचारीचा, सहकाऱ्याचासुद्धा आवाज दाबून टाकणे, व्यक्तीच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावणे, विचारशक्ती निकामी करणे आणि त्यायोगे तिचा

ताबा घेणे, तिला कह्यात घेणे याला मानसशास्त्रात 'गॅस-लायटिंग' अशी संज्ञा आहे.

ह्या संज्ञेचा जन्म एका चित्रपटावरून झाला. तो चित्रपट होता १९४४मध्ये प्रदर्शित झालेला जॉर्ज ककर दिग्दर्शित 'गॅसलाइट'. दुसऱ्यावर सत्ता गाजवणे ही काही लोकांची गरज असते. त्याची कारणे अनेक असतात. दुसऱ्यांना खाली पाडणे, त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणे हे अनेक वेळा स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी केले जाते. स्वप्रेमात बुडालेली माणसे हे नकळत करतात, तर काही वेळा त्यांचा अंत:स्थ हेतू फार धोकादायक असू शकतो.

आपल्या पत्नीच्या मनात संशयाचे वादळ उत्पन्न करून तिला वेडेपणाच्या काठावर उभे करणे ह्या गाभ्यावर ह्या चित्रपटाची कथा बेतली आहे. लुकलुकणाऱ्या गॅसलाइटच्या अंधुक प्रकाशात चित्रपटाचे नाव झळकते... 'गॅसलाइट'..कडाक्याच्या हिवाळ्यात सारे लंडन शहर धुक्याची चादर ओढून निवांत पहुडले असतानाच एक अभद्र बातमी येते. प्रसिद्ध ऑपेरा गायिका, एलिस ऑलक्विस्ट हिचा तिच्या राहत्या घरात - थॉर्टन स्केअर पार्क या आलिशान हवेलीत खून होतो. खुनी बेपत्ता असतो. या प्रसंगाची साक्षीदार असते एलिसची भाची, पॉला. अतिशय भेदरलेल्या या पोरक्या मुलीला या दुःखद प्रसंगाचा विसर पडावा म्हणून इटलीला पाठवले जाते. काही वर्षे उलटतात. संगीताचे शिक्षण घेणारी पॉला प्रेमात पडते. ग्रेगरी हा सभ्य, संवादकुशल, प्रेमळ, कुणाचेही मन जिंकून घेईल असा देखणा तरुण असतो, जो स्वतःही चांगला पियानो वादक असतो. जेमतेम दोन आठवड्यांची ओळख असूनही तो जेव्हा पॉलाला लग्नाची मागणी घालतो, तेव्हा पॉलाला नाही म्हणणे शक्यच नसते.

संगीत की लग्न या दुविधेत असणाऱ्या पॉलाला तिचे शिक्षक समजावतात, "आयुष्यात घडलेल्या शोकांतिकेला विसरण्याची ही एक सुरेख संधी आहे. वेदनादायक भूतकाळाच्या पाशातून मुक्त करण्यासाठी जो राजकुमार तुझ्या आयुष्यात आलेला आहे, त्याचा निःशंकपणे स्वीकार कर. कलेपेक्षाही आयुष्यातील आनंद निदान आता महत्त्वाचा आहे."

gaslight movie _1 &n

लग्न झाल्यावर, इटलीत मधुचंद्र साजरा करत असताना ग्रेगरी लंडनमध्ये स्थायिक व्हायची इच्छा व्यक्त करतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या घरात जाण्याच्या कल्पनेनेच पॉला गर्भगळित होत असते, त्याच घरात पॉला परत जाते. ती ग्रेगरीला त्याचे स्वप्न पुरे करण्याचे आश्वासन देताना सांगते, “हे घर माझ्यासाठी एक दुःखद स्वप्न होते, एक अनामिक भीती या घराशी निगडित होती. पण आता तुझ्या येण्याने हे भय नाहीसे झाले आहे. तुझ्या प्रेमाने मन आश्वस्त झाले आहे. तू बरोबर असशील तर या घराचासुद्धा मी स्वर्ग करू शकेन, याची मला खात्री आहे.”

नवविवाहित जोडपे पॉलाच्या मावशीच्या घरात स्थायिक होते. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत पॉलाच्या मावशीचा खून झालेला असतो. तिच्या वास्तव्याच्या खुणा पॉलासाठी वेदनादायक ठरतील, म्हणून ग्रेगरी ते सर्व सामान तिसऱ्या मजल्यावरील माळ्यावर हलवतो. या स्मृती नष्ट होईपर्यंत पॉलाने कुणालाही भेटू नये याचीही व्यवस्था करतो. मावशीला लिहिलेले एक जुने पत्र पॉलाला या खोलीत सापडते. कुणातरी सर्जियस
बौर नावाच्या माणसाने तिच्या खुनाच्या दोन दिवस अगोदर ते पाठवलेले असते.

हे पत्र पाहताच ग्रेगरीचा चेहेरा पालटतो. तो काहीसे ओरडूनच पत्र खेचून घेतो. या प्रसंगानंतर ग्रेगरीचा नूर बदलतो. आपल्या पत्नीवर तो बंधने लादतो. तिचे घराबाहेर पडणे थांबवतो. कुणाशीही बोलायला बंदी करतो. घरात काम करण्याऱ्या दोन नोकराणींचा तिच्याबद्दल गैरसमज करून देण्यात यशस्वी होतो. घरात विचित्र घटना घडू लागतात. ग्रेगरीने त्याचा आईचा ब्रूच पॉलाला भेट म्हणून दिला असतो. तो तिच्याकडून हरवला असा आरोप ग्रेगरी करतो. घरातले एक चित्रच तिने नकळत गहाळ केले असेही तिला भासवतो. खरे तर हे सर्व त्यानेच तिच्या नकळत घडवलेले असते.

ग्रेगरी नसताना घरातील गॅसचे दिवे मंदावतात, पुन्हा चमकतात, माळ्यावर आवाज येतात, हे सर्व तुझ्या मनाचे भास आहेत, तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे हे सांगून ग्रेगरी पॉलाला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करतो.

आतापर्यंत यांच्या चौकस शेजारणीला थॉर्टन स्केअर पार्कमध्ये काही अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय येतो. “या घरातून कुणीही बाहेर पडत नाही, मालकिणीला भेटायला देत नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहेही शंका ती स्कॉटलंड यार्डचा डिटेक्टिव्ह ब्रायन कॅमेरॉनला बोलून दाखवते. तो पॉलाचा लहानपणीचा मित्र असतो. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्याने डिटेक्टिव्ह एलिस ऑलक्विस्टच्या खुनाची फाइल उघडतो. ह्या फाइलमध्ये केवळ खुनाची माहिती नसते. तिच्याकडे असलेले अतिशय किमती जडजवाहीरसुद्धा तिच्याच खुनाबरोबर गायब झाले असतात.

इथे ग्रेगरी नोकरांच्या समोर पॉलाचा अपमान करतो. तिला खोटे ठरवतो. ती विसराळू झाली आहे, मज्जातंतूच्या बिघाडामुळे ती स्वतःच्याच घरात चोऱ्या करत आहे असा आरोप करतो. तिची आई वेड्याच्या इस्पितळात मरण पावली होती असे सांगून तिच्या हळव्या मन:स्थितीवर तो आणखी आघात करतो. त्याला क्षीण विरोध करणारी, स्वतःचे निर्दोषत्व करायला धडपडणारी पॉला एकटी असताना घरात राहायला घाबरते. पण तिच्या विनवण्यांना न जुमानता ग्रेगरी घराच्या बाहेर पडून बाहेरील अंधारात मिसळून जातो.

gaslight movie _1 &n

ग्रेगरी नक्की कोण असतो? त्याचा अंत:स्थ हेतू काय असतो? ग्रेगरीचे खरे नाव सर्जियस बौर असून रत्नांच्या आशेने त्यानेच पॉलाच्या मावशीचा खून केलेला असतो. त्या भयानक रात्री कुणीतरी पाहिले असणार या संशयाने तो पळ काढतो, पण रत्नांचा मोह त्याला सोडवत नाही. पॉलाशी
लग्न करण्याचा हेतू असतो त्या घरात परत प्रवेश करणे आणि रत्नांचा शोध घेणे. एकदा तिला वेडी ठरवून रुग्णालयात दाखल केले की कसलाही अडसर न येता, तिसऱ्या मजल्यावरील अडगळीत रत्नांचा शोध घेणे त्याला शक्य असते. त्याची ही योजना यशस्वी होत आलेली असतेच, पण कॅमेरॉनला संशय येतो. घरात काम करणारी वयस्क हाउसकीपरसुद्धा त्याला मदत करते आणि ग्रेगरीला रत्नांची चोरी करतानाच पकडले जाते.

ग्रेगरीची भूमिका चार्ल्स बॉये या अभिनेत्याने अप्रतिम रंगवली आहे. ”पॉला, तू वेडी आहेस, तुझी आई वेडी होती, ती वेड्याच्या इस्पितळात मरण
पावलीहे सांगतानाचे त्याचे खुनशी डोळे, विखारी भाव, त्याचा संताप अंगावर येतो. पण ग्रेगरी आणि पॉला यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीत बाजी मारली आहे ती इन्ग्रिड बर्गमनच्या पॉलाने. भयाच्या असंख्य छटा ती डोळ्यातून व्यक्त करते. स्वतःवरचा विश्वास उडाल्यामुळे, वेडेपणाकडे होत असलेला तिचा प्रवास पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो.

आपली फसवणूक झालेली आहे हे समजल्यावर मात्र ती स्वतःच्या हातात सूत्रे घेते. डिटेक्टिव्हने बांधून ठेवलेला ग्रेगरी, तिला ड्रॉवरमधली सुरी घेऊन स्वतःला सोडवायची विनंती करतो. सुरी फेकून देऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून छद्मी हसून ती सांगते, “ओह, मी वेडी आहे. मी तर नेहमीच वस्तू हरवते किंवा लपवते. आता हेच बघ, तू मला सुरी दिली खरी, पण मी तर हरवली. आता नक्की कुठे असेल ती? चित्राच्या पाठी का तूच जिथे ब्रूच लपवून ठेवलास त्याच्या पाठी? मी नक्कीच माझ्या आईसारखी वेडी आहे.”

"तू वेडी नाहीस" असे ग्रेगरी कळवळून सांगतो, पण खूप उशीर झालेला असतो. “मी वेडी नसते, तर तुला नक्कीच मदत केली असती. तुझी कीव करून का होईना, तुला निश्चित वाचवले असते. पण मी तर वेडी आहे, म्हणून तर तुझा तिरस्कार करते. आता या क्षणाला माझे हृदय आनंदाने नाचत आहे. मला ना तुझी दया येते आहे, ना माझ्या कृतीचा मला पश्चात्ताप आहे.”

संपूर्ण चित्रपटभर इन्ग्रिड एका दडपणात वावरते. सुरुवातीची अल्लड, प्रेमवेडी युवती, वेडेपणात खचत गेलेली पत्नी आणि संतापाने वेडी झालेली, आत्मभान आलेली स्त्री या तिन्ही वेगवेगळ्या टप्प्यांत इन्ग्रिड कमाल करून जाते. झुकलेले खांदे, निर्जीव होत गेलेले डोळे, विनवणी करणारा चेहरा, स्वतःची कीव आणि जाण आणि भ्रम यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारी पॉला शेवटच्या सीनमध्ये हळूहळू खुनशी होत जाते. चेहऱ्यावर असलेले वेडसरपणाचे भाव तेच, पण आधीचे नकळत आलेले आणि आताचे मुद्दाम आणलेले यातला फरक पाहताना इन्ग्रिड बर्गमन ही कुशल
अभिनेत्रींमध्ये का अव्वल मानली जाते, याची जाणीव होते.

स्वतःचे घर आणि स्वतःचे हक्काचे माणूस नेहमीच विश्वासाचे केंद्र मानले जाते. या चित्रपटात मात्र घर भक्षक होते, तर विश्वासघात होतो तो स्वतःच्याच नवऱ्याकडून. ही थीम हॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाली. रि'बेक्का', 'सस्पिशिअन' आणि 'जेन आयर' हे गाजलेले चित्रपट याच थीमवर आधारित होते. गॅसलाइटच्या यशाने 'गॅसलाइट' हे रूपक मानसशास्त्रात नात्यातील सत्तासंघर्ष अभ्यासण्यासाठी वापरण्यात येऊ लागले.

कल्पिताचे सत्यात रूपांतर घडवून आणणारा हा चित्रपट अभिजात चित्रपटांच्या यादीत फार वरच्या स्थानावर आहे.