शिकवण कोरोनाची - १

स्रोत: विवेक मराठी    दिनांक19-Apr-2020
|


कोरोना नावाच्या अकल्पित, अनपेक्षित अशा चिनी महामारीने पाहता पाहता संपूर्ण जगाला कवेत घेतले. सध्या भारतासह अनेक देशातले नागरिक या महामारीपासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या घरात स्थानबद्ध झाले आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, प्रशासन आणि अन्य अत्यावश्यक सेवा रात्रीचा दिवस करून आपले कर्तव्य बजावत आहेत. अभूतपूर्व म्हणावी अशी जागतिक कोंडी या महामारीने केली आहे. 
आणखी काही महिन्यातच माणूस या संकटावर नक्की तोडगा काढेल. लस तयार होईल, औषधं बाजारात येतील आणि पुढच्या काळात जगण्याच्या विविध स्तरावर जाणीवपूर्वक बदल केले जातील.
कोरोना नावाची ही महामारी माणसाला खूप काही शिकवून जाईल हे नक्की. त्याचा वेध घेणारी ही लेखमाला....शिकवण कोरोनाची

coronavirus_1  

गेल्या ३५
-४० वर्षांत जगातील तमाम मानवजातीच्या वैश्विक संचाराला, डोळ्याला न दिसणाऱ्या एका विषाणूने स्वतःच्या घरामध्ये बंदिस्त होण्यास भाग पाडले आहे. विज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या अहंकारात निसर्गाला तुडवत भौतिक सुखासाठी मनुष्याला केवळ देहस्वरूप मानून प्रगती म्हणवणारी जी काही व्यवस्था माणसाने निर्माण केली, त्याच प्रगती नावाच्या संकल्पनेने माणसाला असाहाय्य करून टाकले आहे. ज्या देशांनी सगळ्या जागतिक परिमाणानुसार वैद्यकीय क्षेत्रात पाहिले काही क्रमांक मिळवले आहेत, ज्यांची तथाकथित प्रगती अतर्क्य वाटत होती, अशा सर्व देशांत दुर्दैवाने हा कोरोना नावाचा राक्षस धुमाकूळ घालत आहे. जे एखाद्या महायुद्धात होणार नाही असे मानवी जीविताचे आणि संपत्तीचे नुकसान या एका विषाणूने केले आहे. कुणी म्हणते, हे एक मानवनिर्मित जैविक अस्त्र (बायोव्हेपन) आहे, कुणी म्हणते आहे हा एक प्रयोगशाळेतील फसलेल्या प्रयोगाचा परिणाम आहे. चीनने आणि अमेरिकेने एकमेकांना दोष देऊन झाले आहेत. तीन शक्ती किंवा तीन विचार - भांडवलवाद, चीनमध्ये नवीन जन्माला आलेला कम्युनिस्ट प्रयोग आणि या सगळ्यातून पुढे जाऊ पाहणारा आपला धार्मिक राजकीय कट्टरतावाद आणि तालिबानी विचार सगळे आपल्या अजेंडाप्रमाणे क्रियाशील आहे. यात होणारी मनुष्यहानी आणि जीवसृष्टीची हानी या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत.

अशा वेळेस....

स्वामी विवेकानंद शिकागो येथे गेले आणि नंतर जेथे जेथे त्यांनी पाश्चात्त्य समूहाला उद्बोधित केले, त्या वेळेस "आमच्याकडे अध्यात्म आहे, तुमच्याकडे विकसित तंत्रज्ञान! तुमचे तंत्रज्ञान आम्हाला द्या आणि आमचे अध्यात्म समजून घ्या. यात संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे" असे म्हटले होते. आपण तंत्रज्ञान पूर्ण घेऊ शकलो नाही, तर आम्ही आमच्या बळावर तंत्रज्ञानात काही प्रमाणात निश्चित प्रगती केली. पण ना आम्ही आमच्या अध्यात्माचा आणि जीवनशैलीचा प्रभाव पाडू शकलो, ना त्यांनी आमच्याकडून अध्यात्म घेतले. माणसाला भौतिक प्राणी समजण्याची जी चूक पाश्चात्त्य विचाराने केली, त्याचे आम्हीसुद्धा अनुकरण केले. दुसऱ्या महायुद्धातील चुकांपासून कुणी काही शिकले नाही (महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा!) फक्त देश बदलले. आधी अमेरिका आणि रशिया यांच्यात स्पर्धा होती. नंतर रशियाची जागा चीनने घेतली. या सगळ्यातून जग ही एक उद्ध्वस्त धर्मशाळा झाली आहे. याचा गुन्हेगार चीनला अजिबात पश्चात्ताप होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चकचकीत रस्ते, उंच इमारती, भव्य समुद्रकिनारे, वैभवाचे प्रदर्शन करणारे मॉल्स, ओस पडलेले विमानतळ समस्त मानवजातीला वाकुल्या दाखवत आहेत. हे किती दिवस चालणार? यावर उत्तर काय? कुणी सांगू शकत नाही!

अशा वेळेस सर्वांना वाटत होते - भारतात कोरोना पसरल्यावर त्याला नियंत्रित करणे हे लोकसंख्या आणि तुटपुंज्या वैद्यकीय व्यवस्था यामुळे अशक्य आहे! पण तबलिघी जमातीने जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही आम्ही आजच्या घडीला बऱ्यापैकी लढाई लढत आहोत आणि कदाचित यशस्वीसुद्धा होऊ शकतो. जेथे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेन, इटली यांनी लढणे सोडून दिले, तेथे आम्ही पुरुषार्थ सिद्ध करत लढत आहोत आणि जगात सर्वांना याचेच आश्चर्य वाटते आहे. (सर्व देशात पाणी पाजून आणि प्रार्थनेच्या आधारावर रोग बरा करण्याचा भ्रम फैलावणारे आणि त्या आधारावर धर्मप्रसार करणारे त्यांच्या इटलीमध्येच असाहाय्य आणि हतबल झालेले दिसत आहेत.)


corona_1  H x W
याची कारणे आम्हाला तरी कळली आहेत का? जर ती कळली, तर आपण यातून काही शिकलो असे होईल. एक तर आमचे आजचे देशाचे नेतृत्व, दुसरे आमच्या समाजपुरुषाची ताकद आणि तिसरे आमची जीवन जगण्याची पद्धती. नेतृत्व जर समाजाच्या शक्तीवर विश्वास ठेवणारे असेल, त्याच्याकडे भविष्यात येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेण्याची क्षमता असेल, तर अशा कठीण प्रसंगात देश सावरू शकतो हे सिद्ध झाले आहे. दुसरे समाजशक्ती. या कठीण प्रसंगात एकमेकांना सावरण्यासाठी, आपल्या बांधवांना अन्न पुरवण्यासाठी, धान्य देण्यासाठी अनेक संस्था, कार्यकर्ते जिवाची बाजी लावून आणि पैसे खर्च करून जे काम करत आहेत, ते अन्य देशांना विस्मयकारक वाटते आहे. बाकी देशात जे दिसते आहे, ते सर्व सरकारकेंद्रित आहे.

आणि हाच मूलभूत फरक आहे आणि हीच वेळ आहे आपल्याला आपली शक्ती ओळखण्याची. तिसरे महत्त्वाचे म्हणजे आपली जीवनपद्धती. आहार, विहार, विचार आणि विकार या सगळ्या पैलूंचा विचार या जीवनपद्धतीत आहे. आमची रोगप्रतिकारक शक्ती इतर देशांच्या लोकांच्या तुलनेत अधिक आहे, हे आता सिद्ध होत आहे आणि याला मुख्य कारण म्हणजे आमची खाण्याची पद्धती, हेसुद्धा आता सर्व मान्य करत आहेत.

(क्रमशः)
नीरक्षीरविवेक.