एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट - अनाहत

विवेक मराठी    21-Apr-2020
Total Views |



एका न संपणाऱ्या रात्रीची गोष्ट
- अनाहतव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राच्या हातून अग्निसंस्कार आणि पिंडदान झाले नाही, तर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्तीशिवाय इहलोकीचे आणि परलोकीचे कल्याण प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून भारतीय संस्कृतीत गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विवाह हे गृहस्थाश्रमाचे प्रवेशद्वार म्हणून विवाह हा अत्यावश्यक मानला गेला.

काही विशिष्ट उद्धिष्टांसाठी विवाह न करण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला होते, पण पुत्रनिर्मितीसाठी स्त्रीची गरज असल्याने स्त्रीसाठी विवाह हा बंधनकारक मानला गेला. मूल न होऊ शकणाऱ्या स्त्रीचा त्याग करण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला होते. पण जर एखादा पुरुष पुत्रनिर्मितीसाठी सक्षम नसेल तर काय! असाध्य रोग, क्लीबत्व, निर्बीजत्व या कारणांमुळे पुत्राला जन्म देण्यास एखादा पुरुष असमर्थ असेल, तर त्याच्या पत्नीला केवळ पुत्रप्राप्तीसाठी अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची धर्माने मुभा दिली होती. या प्रथेला 'नियोग' असे नाव आहे. नियोग या शब्दात आज्ञा, नियुक्ती व कर्तव्य हे तिन्ही अर्थ सामावले आहेत. पतीने पत्नीला आज्ञा देऊन योग्य पुरुषाची नियुक्ती करायची आणि नंतर त्या स्त्री-पुरुषांनी कर्तव्यभावनेने समागम करून पुत्र जन्माला घालायचा, ही प्रक्रिया म्हणजे नियोग. नियोग हा व्यभिचार नाही, कारण त्यात कामपूर्तीला स्थान नाही. नियोग म्हणजे पुनर्विवाह नव्हे. उलट, स्त्रीने पुनर्विवाह करून परक्या कुलात जाऊ नये यासाठी नियोगाचा पर्याय होता. एक प्रकारे स्त्रीचे मूल्य म्हणजे तिचे गर्भाशय हे अधोरेखित करणारी प्रक्रिया म्हणजे नियोग.


वैदिक काळातील समाज स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असे म्हटले जाते. पण कुंतीसारखी काही उदाहरणे सोडली, तर नियोग ही लादलेली प्रक्रिया होती. केवळ वंशवृद्धीसाठी वडीलधाऱ्यांनी किंवा पतीने ठरवलेल्या माणसाशी समागम, ज्यात तिच्या इच्छेला काहीही महत्त्व नव्हते.

अमोल पालेकर दिग्दर्शित 'अनाहत' ही दहाव्या शतकात मल्लकुळात घडवून आणलेल्या अशाच एका नियोगाची कथा. 'अनाहत' (भाषा - मराठी).

---------

खरे तर कथा साधीच. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पुरुषाची आणि स्त्रीची. त्यांना संगीताची आवड आहे, त्यांचे सोबती सारखे आहेत. एक गोष्ट मात्र वेगळी आहे. हे जोडपे एका राज्याचे राजा आणि राणी आहेत. या अधिकारामुळेच त्यांची कर्तव्ये त्यांच्या खाजगी आयुष्यापेक्षा महत्त्वाची आहेत. प्रजेप्रती असलेल्या कर्तव्यात राजाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे ते वंशसंवर्धन. गादीला वारस देणे. हेच कर्तव्य पूर्ण करायला राजा असमर्थ आहे.



चित्रपटाची सुरुवात होते ती मुख्य पुजारी, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान यांच्या प्रार्थनेने. महालात दासींची लगबग आहे. राणीच्या खोलीत फुलांची सजावट केली आहे. तलम वस्त्रे, उंची आभूषणे तयार केली जात आहेत. तरीही हलक्या आवाजात कुजबुज चालू आहे. राजा आपल्या महालात संगीताचा रियाज करत आहे, पण त्याचे मन मात्र दुसरीकडे आहे. सवयीने हात चालू असले, तरीही सुरांना आत्म्याची साथ लागते. त्याच्या गुरूंना हे समजल्याने ते राजाचा निरोप घेतात. सांगीतिक कक्षातून राजा आपल्या खाजगी महालात परत येतो, पण मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. “हे सगळे पूर्वनिर्धारित आहेअसे सांगून त्याची दासी, महत्तरिका त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. पण राजाचे दुःख सांत्वन करण्याच्या पलीकडे आहे. आज राणीच्या नियोगाची रात्र आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला असून आता केवळ राजाच्या संमतीची मोहोर लागायची बाकी आहे. राजाच्या मनाची, त्याच्या वेदनेची मंत्रीमंडळाला जाणीव आहे, पण हे कर्तव्य पार पाडणे तितकेच आवश्यक आहे.

नियोगाला सामोरे जाण्याच्या प्रक्रियेला आता एकच तास उरतो. पण राणी शिलावती उद्विग्न आहे. बाहेर घोषणा ऐकू येते. श्रावस्ती नगरातील नागरिकांसाठी ही घोषणा असते. “ज्या कुणा निरोगी पुरुषाला राणीशी समागम करणे मान्य आहे, त्याला राजमहालात येण्याचे आमंत्रण आहे.” राणीच्या भविष्याचा परस्पर निर्णय घेतला गेला आहे. तो सर्व नागरिकांनासुद्धा सांगितला आहे, जो त्यांनी एकमताने मान्य केला आहे. राणीचा होकार गृहीत धरला आहे.




अशा वेळी महत्तरिका राणीच्या कक्षात प्रवेश करते. मनाने खचलेली. या भलत्याच प्रसंगाला तोंड देण्यास असमर्थ असलेली शिलावती आता कोसळते. महत्तरिकेकडे ती राजाला भेटण्याचा आग्रह धरते. राजाने तर आपली असमर्थता, आपले नैराश्य लपवण्यासाठी संगीताचा आधार घेतला आहे. पण राणीच्या मनाचे काय! तिचा उपयोग फक्त तिच्या जननप्रक्रियेसाठीच आहे? या प्रश्नाचे उत्तर तिला राजाकडून नाही, तर तिच्या पतीकडून अपेक्षित आहे. मला जो नको, त्यालाही नाकारण्याचा अधिकार नाही का? राणीचा संताप आता उफाळून येतो. शेवटी ती काही कुणी सामान्य स्त्री नाही.. ती या मल्ल साम्राज्याची सम्राज्ञी आहे. बाहेर मंत्रिगण चिंतित आहेत. "राजकारणात भावनेला स्थान नाही. राणीच्या पदाला काही जबाबदाऱ्या चिकटलेल्या आहेत. जी गोष्ट तिला अन्यायकारक वाटत आहे, ती या भूमीची रीत आहे. काय योग्य आहे हे सापेक्ष आहे. काय न्याय्य हे अंगीकारले पाहिजे." इति पंतप्रधान. “ही धर्माची आज्ञा आहेमहत्तरिका तिला हे पटवून देण्याचा असफल प्रयत्न करते.

स्त्रीचा धर्म काय असावा? राष्ट्रधर्म का पातिव्रताधर्म? हा प्रश्न शिलावतीला छळतोय. राजाला आपल्या निर्बीजपणाची चिंता आहे. राज्यसभेचे म्हणणे जर शिलावतीला मान्य असेल, तर मी काय करू शकतो? हा प्रश्न विचारून तो स्वतःची सुटका करून घेतो. राणीला भेटणे टाळतो.

राजाच्या नकाराने शिलावती दुखावते, संतापते. तिने कधी कर्तव्यात कसूर केली? एक राणी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक स्त्री म्हणून नेहमीच तिने आपले कर्तव्य पार पाडले असताना असा एकांगी निर्णय राजा कसा घेऊ शकतो? तो फक्त राजा नाही, तर तो तिचा पतीही आहे. पत्नीपेक्षा राजमुकुट राजाला महत्त्वाचा का वाटावा? हे सारे प्रश्न बोचरे.


घटिका जवळ येत असते. आता भीती दाटून आली आहे. अनोळखी व्यक्ती, अनोळखी पलंग आणि नको वाटणारी जवळीक. “स्त्रीचे मुख्य कर्तव्य आहे ते वंशाला जन्म देणे. हीच धर्माची आज्ञा आहे. हीच जगाची रीत आहे.” सभेचा निर्णय झालेला असतो. “आणि जर मुलगी झाली तर! मला किती वेळ या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल?” राणीच्या या प्रश्नाला उत्तर नसते.

रात्र सुरू होते.

प्रत्येकासाठी ही रात्र वेगळे प्रश्न उभे करते.

स्वतःमधील कमतरता, जी राणीला समजली नसते, कदाचित शरीराच्या ज्या सुखाविषयी ती अनभिज्ञ असते, ते गूढ तिला समजेल का? ही भीती राजाला भेडसावते.

रात्र संथ पावलांनी पुढे सरकत असते. तास संपतात. नियोग हे कर्तव्य आहे. ती रतिक्रीडा नाही. मग राणी पूर्ण रात्र या अनोळखी माणसाबरोबर काय करत आहे? भीतीबरोबर आता संशयाचे भूत जागे होते. ह्या रात्रीचा अंत कसा असेल?

सूर्याच्या पहिल्या किरणांनी आकाश उजळून येते. आता हे वादळ संपेल. जग पुन्हा पूर्ववत होईल. एकीकडे महत्तरिकाला हायसे वाटत असतानाच एक आशंका तिच्या मनाला कुरतडते.. सगळे काही उलगडून सांगणारी ही रात्र खरेच संपणार आहे की नवीन रात्रीला जन्म देणार आहे?

भूपाळीचे सूर वातावरणात पसरत असताना राणी परतते. दरबारी, मंत्रीमंडळ, दास-दासी या सर्वांनाच तिच्याबद्दल सहानुभूती असते. राणीचा नूर मात्र वेगळा असतो. एक अतिशय अनोखा अनुभव या रात्रीने तिला दिलेला असतो. ”हे असे दुखरे सुख पुरुषाच्या सहवासात मिळते हे तू मला कधी सांगितले का नाहीस? कालची रात्र एक स्त्री म्हणून मला पूर्णत्व देऊन गेली.” ती महत्तरिकाला विचारते.

महत्तरिकाची भीती खरी ठरते. 'स्त्रीला सुख घेण्याचा, सुखाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नसतो. मूल जन्माला घालणे हे तिचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणून तितक्याच तटस्थतेने पार पाडायला हवे, नाहीतर तो व्यभिचार ठरेल' ही मंत्रीमंडळाची भूमिका असते.

राजा आणि प्रजा, राणीच्या या प्रश्नांना कसे सामोरे जाईल? का राणीच आपल्या प्रश्नांना मूठमाती देऊन रूढींना शरण जाईल? एक स्त्री म्हणून तिच्या गरजांचाही विचार करण्याएवढा राजा प्रगल्भ होईल? मंत्रीमंडळ राणीकडे कोणत्या नजरेने पाहील?

चित्रपटाच्या शेवटी, स्वतःच्या अपेक्षांची, गरजांची आणि सुखाची जाणीव आलेली राणी नियोगाच्या दोन रात्रींची मागणी करते, कारण रूढींनी तिला तो अधिकार दिलेला आहे. राणी शिलावतीची भूमिका सोनाली बेंद्रे हिने वठवली आहे. सुरुवातीची निराश, भेदरलेली राणी ते स्वतःला ओळखून, स्वतःच्या अपेक्षा स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलून दाखवणारी स्त्री हा फरक सोनालीने फार सुंदर दाखवला आहे. दुबळा आणि निर्बीज, न्यूनगंडाने खचलेला राजा अनंत नागने उभा केला आहे. राणीच्या सुखाचा त्याला राग येतो, कारण त्याला ती प्रतारणा वाटते. तिच्या आत्मविश्वासाची त्याला भीती वाटते, तरीही एका बाजूने त्याचे तिच्यावर प्रेम आहे. हे असे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व एवढे समर्थपणे साकार झाले आहे की प्रेक्षकांना त्याची दया येते. तिसरी महत्त्वाची भूमिका आहे ती राजा आणि राणी यांना समजून घेणाऱ्या दीप्ती नवल हिने साकार केलेल्या महत्तरिकाची. ती केवळ दासी नाही. राजाला तिने लहानपणापासून पाहिले आहे. राणीच्या विश्वासाला ती पात्र आहे. समंजस, शांत अशी ती, दोहोंना समजून घेण्याएवढी विचारी आहे.

समाजाने ठरवून दिलेली मूल्ये आणि व्यक्तिस्वातंत्र्य यामधला हा संघर्ष आहे. स्त्रीचे शरीर ही नक्की कुणाची मालमत्ता असावी? तिला तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याचा अधिकार असावा का? मूल जन्माला घालण्याच्या किंवा न घालण्याच्या निर्णयात तिची संमती असणे महत्त्वाचे असावे का? हा चित्रपट या प्रश्नांकडे वेगळ्या नजरेने पाहायला प्रवृत्त करतो, कारण काळ बदलला तरी प्रश्न तेच आहेत.