शिकवण कोरोनाची - 4

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Apr-2020
|


business old_1  

आहार आणि विहार यानंतर 'विचार' म्हणून आपल्याला कोरोना खूप काही शिकवत आहे. आजच्या तात्कालिक परिस्थितीवर उपाय शोधताना थोडे मागे जाउन बघणेही गरजेचे आहे. माणसाच्या विचाराचा तो राहत असलेल्या समुदायावर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व बाजूंनी परिणाम होत असतो. माणूस समूहाने राहायला लागला आणि मग ते राहणे सुसह्य होण्यासाठी काही नियम बनवावे लागले. तो समूह जितका मोठा, जितका प्रभावी, त्याप्रमाणे त्या समूहाचे आणि समूहाच्या नियमाचे - म्हणजेच विचाराचे एक प्रभावक्षेत्र निर्माण होत गेले आणि यातून राज्ये आणि राष्ट्र निर्माण झाली. या नियमांना, विचारांना आणि त्याप्रमाणे व्यवहार करण्याच्या पद्धतीला 'संस्कृती' असे नाव दिले गेले. अशा संस्कृतीचा समान दुवा जितका दूरवर, तेवढी त्या संस्कृतीची राज्ये निर्माण झाली आणि काही ठिकाणी अशा राज्यांची राष्ट्रे झाली. काही राष्ट्रे एका राज्यापुरतीसुद्धा मर्यादित राहिली.

हळूहळू अशा वेगवेगळ्या देशांची ओळख करून घेण्यासाठी माणसाला समुद्रमार्ग सापडला आणि व्यापार हा त्याचा सरळ साधा उद्देश होता. वैश्विक व्यापाराची ही सुरुवात होती. कोलंबस अमेरिकेला गेला, वास्को द गामा भारतात आला असे म्हटले जाते. पण भारतीयांनी किती देश त्या काळात पादाक्रांत केले, याबद्दल कुठे बोलले जात नाही. वास्तविक भारतीय माणूस अनेक देशांत जाऊन आल्याची सांस्कृतिक पदचिन्हे त्या देशांत आजही अस्तित्वात आहेत. पण त्यावर जेवढे पाहिजे तेवढे संशोधन झालेले नाही. कारण भारतीय माणूस हा व्यापारासाठी गेला, तर तोच उद्देश ठेवून जात होता. आपल्या संस्कृतीचा आणि धार्मिक विचारांचा किंवा उपासना पद्धतीचा आग्रह धरून अनुयायी वाढवणे हा भारतीयांचा विचार नव्हता.


business old_1  

१७६५ साल हे जगाच्या दृष्टीने खूप मूलभूत बदल करणारे ठरले
. त्या वर्षी जेम्स वॅट याने इंग्लंडमध्ये वाफेचे इंजीन शोधून काढले. त्यामुळे औद्योगिक क्रांतीचा स्फोट झाला. त्याचे केंद्र अर्थात इंग्लंड होते. यामुळे कारखानदारी सुरू झाली. त्यामुळे तीन गोष्टींची गरज निर्माण झाली - कच्चा माल, मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि मुख्य म्हणजे भांडवल. याचे परिणाम जगात वेगवेगळे झाले. राजकीय परिणाम झाले. संशोधनावर परिणाम झाले. आर्थिक परिणाम झाले. जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा राष्ट्रसमूहात निर्माण झाली. ह्या घडामोडी घडत असताना जगात काही सेमेटिक पंथांची सुरुवात झाली होती. या दोन्हीची एकमेकांना (सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि आग्रही धार्मिक, राजकीय विचार) कुठे जोड मिळत होती, कुठे त्यात संघर्षही होत होता. परिणामी अनेक देश आपली मूळ संस्कृती विसरून गेले. ज्यांची पाळेमुळे खोल होती, ती यात टिकून राहिली, पण बहुतांश या सेमेटिक विचारात आपले अस्तित्व हरवून गेले. जे टिकून राहिले, त्यात आपण आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.

कच्च्या मालासाठी सुरुवातीला व्यापार आणि नंतर अधिराज्य या सूत्राने इंग्लंडने अनेक देशांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले आणि या सगळ्या देशांचा उपयोग कच्च्या मालासाठी आणि स्वस्त मजुरी म्हणून करून घेत, पुन्हा निर्माण झालेली उत्पादने विकण्यासाठी बाजारपेठ म्हणून करून घेतले. यातून ते देश गरीबच राहतील असे बघितले गेले.

शिक्षणावर प्रभाव टाकत बाबू निर्माण केले आणि किंचित हुशार लोकांस अधिकारी केले. (आम्ही काही काळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यात का मागे राहिलो, त्याची ही कारणे आहेत.) औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून भांडवलदार आणि कामगार असा वर्ग निर्माण होऊ लागला. या संघर्षातून मार्क्स आणि ऐंजल्स यांचे एक तत्त्वज्ञान दास कॅपिटल या ग्रंथातून बाहेर आले आणि औद्योगिक क्रांतीनंतर आता कामगारांच्या क्रांतीसाठी तयार राहा असा संदेश मार्क्सने दिला. त्याला ही क्रांती अर्थातच इंग्लंडमध्ये अपेक्षित होती, पण ती झाली रशियात. हे कसे घडले? जागतिक इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आजच्या चीनच्या वागण्यातील पाळेमुळे येथे आहेत असे वाटते. (चिनी प्रगतीने भारून गेलेल्या आणि तेथील स्वस्ताईने खूश होणाऱ्या मंडळीनी कुठल्या शक्तीला आपण प्रोत्साहन देत आहोत याचे भान ठेवण्याची गरज आहे.) रशियात जी क्रांती झाली, ती राजाविरुद्धच्या असंतोषातून झाली होती. ती राजकीय क्रांती होती. पण रशियातील त्या वेळेस असणाऱ्या कामगार नेतृत्वाने आंदोलनाचे नेतृत्व करत (प्रचलित भाषेत हायजॅक करत) झारची सत्ता उलथवून टाकली आणि लोकांना असे भासवण्याचा प्रयत्न केला की ही कामगार क्रांती आहे. अर्थात हे जगाला समजायला त्या देशाचे नेतृत्व गॉर्बाचेव याच्याकडे जाण्यापर्यंत वाट पाहावी लागली. पण तोपर्यंत अनेक देशांत हे तत्त्वज्ञान स्वप्नाळू लोकांना मोहात टाकत प्रस्थापित होत होते.

जर्मनीचा वंशवाद, इंग्लंड-अमेरिकेची भांडवलशाही वृत्ती आणि रशिया-चीनची कम्युनिस्ट विचाराच्या आडून जागतिक सत्ता मिळवण्याची आकांक्षा याने गेल्या शतकापासून सर्व अन्य देशांना व तेथील जनतेला वेठीस धरण्याचा जो काही प्रयत्न केला आहे, त्यातून पहिले आणि दुसरे महायुद्ध झाले. (यासाठी धार्मिक कट्टरता वाढेल ही पुरेशी काळजी या देशांनी घेत त्याचा खुबीने वापर केला आहे.) हिरोशिमा आणि नागासाकीच्या रूपाने त्याचे बीभत्स निर्दयी दर्शन जगाला झाले. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे आजचे जैविक शस्त्राच्या माध्यमातून सुरू झालेले तिसरे महायुद्ध!

या सगळ्या विचारातील ल.सा.वि. काय आहे? तर 'Survival of the Fittest!' थोडक्यात, जो शक्तिशाली असेल तो राज्य करेल आणि अर्थात शक्तिशाली होण्यासाठी कुठलेही नैतिक, अनैतिक मार्ग वापरण्यास त्याला मुभा आहे, हा तो घातक विचार आहे. बाकी सगळे खोटे आहे. या मूलभूत विचाराचा विषाणू कोरोनापेक्षा घातक आहे. ह्या विचाराने प्रत्येक संशोधन हे मनुष्याचे कल्याण आणि त्याची सर्वांगीण प्रगती यापेक्षा त्या संशोधनाचे रूपांतर शस्त्रात कसे होईल हे बघितले गेले. यातूनच अणुऊर्जा ही विद्युतनिर्मितीसाठी किंवा मानवी कल्याणाची न राहता बॉम्बरूपी विध्वंसक बनली आहे. असा विचार घेऊन जगणाऱ्या देशांना शस्त्र बनवायची आहेत, त्याचा व्यापार करायचा आहे आणि त्याची आवश्यकता वेगवेगळ्या राष्ट्रांना निर्माण झाली पाहिजे अशी परिस्थितीसुद्धा निर्माण करायची आहे. ह्यासाठी सोयीस्करपणे धार्मिक वेड आणि त्यातून निर्माण होणारा अतिरेकी वाद यालाही खतपाणी घालायचे आहे. मग माहिती तंत्रज्ञान नावाचे जे शास्त्र निर्माण झाले, संगणक प्रणाली तयार झाली किंवा अगदी अलीकडील कृत्रिम बुद्धिमत्ता असे कुठलेही नवविज्ञान हे मानवी कल्याण करण्यापेक्षा मानवाचा विध्वंस करण्यासाठी वापरले जाणार असेल, तर ते ज्ञान आणि विज्ञान आणि त्याबरोबरचे तंत्रज्ञान कुचकामी आहे, हेच आज कोरोना सिद्ध करत आहे आणि शिकवत आहे. मग या विचारातूनच हे देश ठरवतात की आम्ही अशा प्रकारचे विषाणू उत्पन्न करू. त्याच्यावर औषध आम्हीच शोधू! (किंवा अगोदरच तयार ठेवू, पण पुरेसे नुकसान झाल्यावर बाहेर काढू..) त्यासाठी आवश्यक इक्विपमेन्ट आम्ही बनवू आणि पाहिजे त्या किमतीला विकू आणि यासाठी WHOलासुद्धा हवे तसे वापरू. संयुक्त राष्ट्र संघटनेचा उपयोग आमची जगावर सत्ता टिकावी म्हणून करू! असा तो धोकादायक विचार आहे. यातून प्रथम आर्थिक आणि त्यानंतर राजकीय प्रभाव निर्माण करणे ही कल्पना आहे. त्या त्या देशातील नेतृत्वाचा कस तेथील जनता याच कसोटीवर पडताळून पाहत आहे. आमच्या नेत्याने आमच्या देशाला किती मजबूत केले? आणि मग आपली लोकप्रियता आणि आपले नेतृत्व टिकवण्यासाठी दुसऱ्या देशातील जनता नव्हे, संपूर्ण मानवताच वेठीस धरली जात आहे. पण वैश्विक उपभोगवादात धुंद झालेली मानवजात यातून बाहेर येण्यास अजून तयार नाही. भांडवलदारी आणि कम्युनिस्ट या विचारातून साम्राज्यवाद डोकावत आहे. कोरोना ही या अर्थाने असा विचार करण्यासाठी एक मोठी संधी आहे. ती संधी कशी? यात भारत कुठे होता आणि आता कुठे आहे? याचा विचार विस्ताराने उद्या करू.

(क्रमशः)
नीरक्षीरविवेक