समरस साहित्याचा निर्माता हरपला

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Apr-2020
|

वृद्धापकाळाने आणि व्याधींनी ग्रासलेल्या उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने समरसता साहित्य चळवळीची हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.

uttam bandhu tupe_1 


आज
२६//२०२० रोजी सकाळी सुनील भडंगेंनी समरसता समूहात उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाची बातमी टाकली आणि धक्का बसला. गेली दोन-तीन वर्षे त्यांची तब्येत बरी नव्हती. दीड-दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विपन्नावस्थेबाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. २०१५ सालापासून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अर्थात एवढ्यापुरताच त्यांचा माझा संबंध होता असे नाही. कार्यकर्ता मानसिकता असलेल्या या साहित्यिकाने साहित्य क्षेत्राबरोबर सामाजिक जीवनात आपले वेगळेपण जपले होते.

साहित्यिक म्हणून उत्तम बंडू तुपे यांचे कर्तृत्व खूप मोठे होते. त्यांचे साहित्य पुढीलप्रमाणे आहे - आंदण (लघुकथासंग्रह)

इजाळ (कादंबरी)

काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)

कोबारा (लघुकथासंग्रह)

खाई (कादंबरी)

खुळी (कादंबरी)

चिपाड (कादंबरी)

झावळ (कादंबरी)

झुलवा (कादंबरी)

पिंड (लघुकथासंग्रह)

भस्म (कादंबरी)

माती आणि माणसं (लघुकथासंग्रह)

लांबलेल्या सावल्या (कादंबरी)

शेवंती (कादंबरी)

संतू (कादंबरी).

उत्तम बंडू तुपे हे विविध पुरस्कारांचे आणि मानसन्मानांचे मानकरी होते.

काट्यावरची पोटंहे तुपे यांचे आत्मचरित्र महाराष्ट्र राज्य पुरस्कारास पात्र ठरले होते.


uttam bandhu tupe_1 

उत्तम बंडू तुपे हे समरसता साहित्य परिषदेच्या पहिल्या संमेलनापासून कार्यकर्ता साहित्यिक म्हणून कामात होते.१९९८ साली जळगाव येथे झालेल्या पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते निमंत्रक होते. संमेलनाचा विषय सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राभर प्रवास केला होता. सामाजिक समरसता मंचाच्या वतीने दिला जाणारा संत सेवायोगी गाडगेबाबा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

साधारणपणे २००२पासून मी समरसता साहित्य परिषदेच्या कामात आलो. समरसता साहित्य पत्रिका या विषयात लक्ष घालावे असे मला सुचवले गेले होते. या पत्रिकेला मान्यवरांचे लेख मिळावे यासाठी मी प्रवास आणि संपर्क करत असे. एकदा पुण्यात असताना सचिन साठ्येने मला मुळा रोडवरच्या तुपेंच्या घरी नेले होते. साधारण दहा बाय दहाच्या खोलीत उत्तम बंडू तुपे यांनी आपला संसार मांडला होता. ते आणि पत्नी या घरात राहत असत. सोबत दहा-बारा मांजरे, मोजकीच भांडी आणि धुरकट दिव्याच्या प्रकाशात जपलेली माणुसकी यांचे दर्शन झाले. साहित्य क्षेत्रात नामवंत लेखक अशा फाटक्या अवस्थेत जगतो आहे, हे पाहून गलबलून गेलो होतो. त्या क्षणापासून अप्पा आणि जिजी माझे झाले. पुन्हा जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो, तेव्हा तेव्हा मुळा नदी ओलांडून जाताना माझ्याही नकळत नजर त्या झोपडपट्टीकडे वळत राहिली. उत्तम बंडू तुपे यांचा स्वभाव आणि एकूणच जगण्याची वृत्ती पाहता त्यांचा संसार चालवण्याचे काम जिजींनी कसोशीने केले. संसाराबरोबरच त्यांनी अप्पांना जपले.


uttam bandhu tupe_1 

२०१० साली नाशिक येथे होणाऱ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उत्तम बंडू तुपे यांची निवड झाली, तेव्हा समरसता साहित्य परिषदेचा कार्यवाह म्हणून मी काम करत होतो. त्या संमेलनाच्या काळात अप्पांचा खूप जवळून सहवास लाभला. एकदा संमेलनाच्या तयारीसाठी बाजीराव रोडवरील हेमा लेलेंच्या वाड्यात आम्ही बसलो होतो. मी, विजयराव कापरे, श्यामाताई घोणसे, नाना नाशिककर, सचीन साठ्ये अशी आमची चर्चा चालू होती. अचानक घामाघूम झालेले अप्पा वाड्यात शिरले. खुर्चीत बसतात ना बसतात तोच त्यांचा फोन वाजला. काही क्षणांत अप्पा गरजले, "हो, हो, मी आहे संघाचा. माझ्या नादाला लागू नका. मी जातीचा मांग हाय, मांग. दिल्या शब्दास जागतो हे ध्यानात ठेवा. मला कोण आठवतो ते बघतो मी." आम्ही सारे जण सुन्न झालो होतो. नक्की काय झाले हे कळायला मार्ग नव्हता. अप्पा थोडे शांत झाले. मग विजयराव कापरेंनी विचारले, "काय झाले?" "मी संघाच्या संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून मला धमकी देत आहेत. पुन्हा फोन केला तर त्यांच्या घरी जाऊन तंगड्या तोडीन." उत्तम बंडू तुपे यांचे हे रूप मला नवे होते. दु:-वेदनांशी समरस होऊन साहित्य निर्माण करणारा हा लेखक इतका उग्र होऊ शकतो, हे मी पहिल्यांदा पाहिले होते. अप्पाची संघनिष्ठा प्रखर होती. सरकारी नोकरी करत असताना आणि साहित्य जगतात वावरताना त्यांनी संघकुळ कधीच लपवले नाही. नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचा विषय 'वंचितांचे साहित्य आणि समरसता' हा होता. या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी जे विचार मांडले, ते कालसुसंगत होते.

उत्तम बंडू तुपे यांच्या समग्र साहित्याचा विचार केला, तर आपल्या लक्षात येते की या माणसाने विपुल प्रमाणात लेखन केले आणि दु:, वेदना हा या सर्व लेखनाचा समान धागा होता. समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या जगण्याशी ते समरस होत असत. उदाहरण द्यायचे, तर झुलवा आणि भस्म या दोन कलाकृतींचे देता येईल. जोगत्याचे दु: आणि जीवन समजून घेण्यासाठी अप्पा जवळजवळ दोन वर्षे लुगडे नेसून वावरले होते. स्मशानजोगी समाजाचे जीवन समजून घेण्यासाठी ते गोसावी होऊन रानोमाळ भटकत राहिले, तेव्हा भस्म कादंबरी जन्माला आली. उपेक्षित वंचित समाजासाठी आपली लेखणी झिजवत अप्पांनी उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या. समाजातील प्रत्येक मनुष्याला सुख आणि समाधान लाभले पाहिजे आणि त्याला माणूस म्हणून जगता आले पाहिजे, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. समरसता साहित्य म्हणजे काय हे ज्याला समजून घ्यायचे असेल, त्यांनी उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्याचा अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. तुपेंचे सर्व साहित्य दु:-वेदनेवर भाष्य करताना समरस समाजाकडे जाण्याचे मार्ग दाखवणारे आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एनकुळ गावात उत्तम बंडू तुपे यांचा जन्म झाला. त्यांची निश्चित जन्मतारीख माहीत नाही. मात्र आपल्या साहित्यातून त्यांनी जे जग उभे केले, धगधगते वास्तव मांडले, त्यांने पांढरपेशा मध्यमवर्गीय समाजाला खडबडून जागे केले. गाववेशीबाहेरच्या समाजाच्या वेदना साहित्यातून व्यक्त करत उत्तम बंडू तुपे यांनी स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले.

वृद्धापकाळाने आणि व्याधींनी ग्रासलेल्या उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने समरसता साहित्य चळवळीची हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.

रवींद्र गोळे

९५९४९६१८६०