शिकवण कोरोनाची 6

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Apr-2020
|

 

दीनदयाळजींनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व अशामुळे सद्य:स्थितीत महत्त्वाचे ठरते. माणूस हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे केंद्र असले पाहिजे, अस विचार हे दर्शन मांडते. भौतिक उपकरणे मानवी जीवनाच्या सुखाची साधने होती, साध्य नव्हते, नसले पाहिजे असे हे दर्शन मांडते. सरसकट सर्व व्यक्तींसाठी एक पद्धत एक विचार करणे अन्याय करण्यासारखे आहे, असे हे दर्शन मांडते. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याने मनुष्य बनलेला आहे. यातील केवळ एक गोष्ट विचारात घेऊन मांडलेले तत्त्वज्ञान, व्यवस्था अपयशी ठरते, असे दीनदयाळजी मांडतात.

मागील लेखात
'विचार' या दृष्टीने आपण सद्य:स्थितीकडे बघत होतो. आहार, विहार आणि विचार यातून विकाराची निर्मिती होत असते. आज 'विकारा'बद्दल थोडी चर्चा करू.

आमच्या तत्त्वज्ञानात हा 'विकार' धर्म आणि मोक्ष या दोन तटबंदीतून वाहत असतो. अर्थ आणि काम हे विकाराचे मूळ आहे. अर्थ आणि काम हे पुरुषार्थ माणसाला भौतिक सुख प्रदान करतात. जेव्हा हे दोन पुरुषार्थ अनियंत्रित होतात, तेव्हा हे पुरुषार्थ न राहता विकार बनतात. मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर भौतिक सुखाच्या हव्यासापोटी या सृष्टीचा समूळ उच्चाटनच नको करायला, यासाठीच आपल्या शास्त्रकारांनी या पुरुषार्थावर धर्म आणि मोक्ष याचे बंधन टाकले होते! किती अर्थ होता त्यांच्या मांडणीत! त्या शास्त्रकारांनी व्यक्त केलेली भीती किती यथार्थ होती, हे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने जाणवत आहे. (येथे धर्म याचा अर्थ पुन्हा 'नियम' या अर्थाने आहे.)


pandit_1  H x W

अर्थ म्हणजे येथे उदरनिर्वाहाचे नियोजन! आपल्याकडे कौटिल्याचे अर्थशास्त्र हा एक मूलभूत ग्रंथ आहे, ज्यात अर्थ या संकल्पनेचा सर्वांगीण विचार मांडला गेला आहे. जगात साम्यवाद किंवा समाजवाद विरुद्ध भांडवलवाद यात भारतीय मातीत एक अर्थविचार चिरकाल होता. याच विचाराची आधुनिक मांडणी म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले 'एकात्म मानव दर्शन'! यात अंतिम पंक्तीत असणाऱ्या माणसाचा विकास (अंत्योदय) मांडला आहे.

दीनदयाळजींनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनाचे महत्त्व अशामुळे सद्य:स्थितीत महत्त्वाचे ठरते. माणूस हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे केंद्र असले पाहिजे, अस विचार हे दर्शन मांडते. भौतिक उपकरणे मानवी जीवनाच्या सुखाची साधने होती, साध्य नव्हते, नसले पाहिजे असे हे दर्शन मांडते. सरसकट सर्व व्यक्तींसाठी एक पद्धत एक विचार करणे अन्याय करण्यासारखे आहे, असे हे दर्शन मांडते. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याने मनुष्य बनलेला आहे. यातील केवळ एक गोष्ट विचारात घेऊन मांडलेले तत्त्वज्ञान, व्यवस्था अपयशी ठरते, असे दीनदयाळजी मांडतात. जसा मनुष्याचा आत्मा असतो, तसा समाजाचे किंवा राष्ट्राचेसुद्धा एक 'कॅरेक्टर' असते. त्याला दीनदयाळजी 'चिती' म्हणतात. व्यक्ती आणि समाजसमूह यांचा विषम विकास आणि यातून दोन्हीपैकी एक अधिक बलवान होणे हे प्राकृत समाजव्यवस्था निर्माण करू शकत नाही आणि मग विकृतीला सुरुवात होते. आज जगभर कोरोनाचे जे परिणाम दिसत आहेत, ते याच कारणामुळे. आणि म्हणून एकात्म मानव दर्शन हे उद्याच्या भारताचीच नव्हे, तर उद्याच्या जगाची उभारणी करण्याचा पाया असू शकते आणि या आधारावरील आर्थिक आणि औद्योगिक धोरण मानवाचे कल्याण करणारे असेल. ते खरे प्रगतीचे आणि विकासाचे मॉडेल ठरेल. या विचारात आणि या तत्त्वज्ञानात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करून अर्थार्जन करण्यास मुभा आहे, पण त्यातील समाजाच्या विकासासाठी काही प्रमाण (आजच्या भाषेत 'सीएसआर') राखून ठेवावे, असे म्हटले आहे. साम्यवाद आणि भांडवलवादी विचार या दोन्हीला छेद देणारा हा विचार जगाने स्वीकारण्याची वेळ आली आहे, कारण यात माणसाच्या विकारावर
नियंत्रणाची कल्पना आहे. आज या विचारानेच उद्या जगातील अनेक प्रश्नांची सोडवणूक होणार आहे.

सृष्टीच्या निर्मात्याने माणसाच्या विकाराचे शमन व्हावे, पण तेही एका मर्यादेत, अशी रचना केली. पण फ्रॉइडच्या तत्त्वज्ञान ज्या वेळेस पश्चिम देशात प्रभावी ठरत होते, तेव्हा तेथे समाजाला सावरणारे कुणी राहिले नव्हते, त्यामुळे विकार बळावला. स्पर्धा सुरू झाली. माणसा-माणसात. समूहा-समूहात. देशादेशात! मग नीती-अनीती यातल्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या. परिणामस्वरूप अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांना नीती-अनीतीचे बंधन राहिले नाही. परिणामी विकार बळावला. हा विकार एक तत्त्वज्ञान म्हणून पुढे येऊ लागला. १९७०च्या दरम्यान 'हरे राम हरे कृष्ण' नावाचा एक चित्रपट आला होता. त्या वेळी फैलावणाऱ्या हिप्पी संस्कृतीचे चित्रीकरण त्यात होते
'दुनियाने हमको दिया क्या? दुनिया से हमने लिया क्या? हम उसकी पर्वा करे क्यू?' असा प्रश्न विचारणारे तरुण-तरुणी भान विसरून मादक द्रव्यांचे सेवन करताना त्यात दिसत होते. असे भोगवादी तत्त्वज्ञान लोकप्रिय होऊ लागले आणि जगात विकाराचे साम्राज्य साकारले.

जगभरात या मादक द्रव्याने जो धुमाकूळ घातला, त्याने गेली ५० वर्षे काही पिढ्या बरबाद झाल्या आणि यात पाश्चात्त्य जगाचा जास्त समावेश आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन येथे आज जास्त बळी जाण्याचे कारण हे अमली पदार्थ सेवन हा एक मोठा घटक आहे. ह्या सवयी विकारातून आलेल्या आहेत. उपभोगाची जी संकल्पना राबवली गेली, त्यातून विकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ना कुठे काही यंत्रणा, ना कुठे काही विचार अशी स्थिती आहे.

आपल्याकडे आंधळ्या पद्धतीने त्याचे अनुकरण सुरू झाले. वास्तविक ज्या शरीरातून विकार उत्पन्न होतात, त्या शरीराला 'देह देवाचे मंदिर!' असे संबोधन करणारे आम्ही आहोत, असे आमचे तत्त्वज्ञान सांगते. 'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शन!' म्हणजे तुमच्या हातावर लक्ष्मी, सरस्वती आणि देव यांचा वास आहे. त्यामुळे सकाळी दर्शन घेण्याने तुम्ही जणू सकाळीं त्या अशा एका शक्तीचे स्मरण करता, ज्यातून कुठेतरी शरण राहत व्यवहार करता आणि एकदा हे स्वीकारले की स्वाभाविकच आपल्या व्यवहारात त्याचे प्रतिबिंब उमटत असते. (आज जेव्हा कोरोना जगाला विळखा घालून बसला आहे, तेव्हा हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व जगात सांगितले जाते, ते एका छोट्या संस्कारात आमच्याकडे सांगितले होते.) शरीराला देवाचे निवासस्थान मानून विकारावर नियंत्रण आणण्याची आमच्या विचारात ताकत होती.

कला, क्रीडा हा मनुष्याचा जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा बिंदू. कला आणि क्रीडा हे मनोरंजनाचे साधन न राहता विकार भागवणारे माध्यम जेव्हा बनते, तेव्हा कला, क्रीडा संस्कृती न राहता विकृती बनते. यात एक उदाहरण म्हणजे सगळीकडे भरणाऱ्या साैंदर्यस्पर्धा. भारतात प्रथम मिस इंडिया ही स्पर्धा भरली, तेंव्हा पूजनीय गोळवलकर गुरुजींची प्रतिक्रिया खूप मार्मिक होती. ते म्हणाले होते, "We are missing India, By arranging मिस इंडिया." मनोरंजनाची माध्यमे बदलत गेली आणि जशीजशी सहज उपलब्ध होत गेली, तसा हा विकार अनियंत्रित होत गेला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ठेकेदार या सगळ्या गोष्टी प्रस्तुत करण्यात जगभर आघाडीवर होते.

भौतिक प्राणी म्हणून मनुष्याची वाटचाल या विकारातून विकृतीकडे जात राहिली. खेळ हे खेळ न राहता त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. त्यातून आपण सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी अमली पदार्थ खाणे सुरू झाले. मॅच फिक्सिंग नावाचा रोग काही खेळात आला आणि खेळ खेळ न राहता त्यात पैसा हा मुख्य उद्देश बनला.

कलेच्या क्षेत्रातही माणसांच्या भावना ह्या शब्दातून व्यक्त होऊ शकत असताना जास्तीत जास्त अंगप्रदर्शन, शारीरिक जवळीक आणि कथानकही विकृत अशी वाटचाल सुरू झाली, ती वाटचाल आता पॉर्नपर्यंत येऊन थांबली आहे. हा सगळा विकृतीतून निघालेला सामाजिक दोष माणसाला त्याचा विकार अनियंत्रित करत आहे.

सामाजिक गुन्हेगारीही यातून निर्माण होत आहे. वैयक्तिक विकाराच्या शमनासाठी ही गुन्हेगारी सामजिक संकट बनू पाहत आहे. विकार प्रभावी झाला की काय घडते, हे आपण महाभारतात द्यूत क्रीडा आणि द्रौपदी वस्त्रहरण या प्रसंगांत बघितले आणि त्या पार्श्वभूमीवर मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे वागणेही बघितले.

विकारावर नियंत्रण ठेवून राज्य करणारे राज्यकर्ते आदर्श असतील, तर समाजाची प्राकृत उभारणी कशी होते, याचे उत्तम उदाहरण अलीकडील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. आता वाचक म्हणतील, या सगळ्याचा कोरोनाशी काय संबंध? किंवा उद्याच्या भारताच्या वाटचालीत याचा काय सदर्भ? येथे हे लक्षात घ्यावे लागेल की जे काही प्रश्न आणि संकटे आहेत, यांचा विचार करताना त्यांचा तुकड्यातुकड्यात विचार करून चालणार नाही, किंबहुना त्याचा एकसंघ विचार नाही केला, तर आज कोरोना वर तात्कालिक विजय मिळेल, लसही सापडेल. मृत झालेल्या जिवांवर दोन अश्रू ढाळून पुन्हा जग आपल्या कामात व्यग्र होईल आणि पुन्हा काही दिवसांनी नवीन काहीतरी संकट उभे राहील.

मलमपट्टी करायची की रक्तशुद्धीकरण करायचे? हा आपल्यापुढील प्रश्न आहे. विश्वकल्याणाची भूमिका घेऊन जर काही नवीन उभारणी करायची असेल, तर त्यासाठी पर्यावरण, निसर्ग या सगळ्याचे संवर्धन करीत वाटचाल करावी लागेल. उपभोगाची मर्यादा ठरवावी लागेल. विज्ञान, तंत्रज्ञान याची कास धरताना जल, जंगल, जमीन आणि जन या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. निसर्गाचे अनियंत्रित शोषण करून विकासाचे जे मॉडेल उभे राहिले, त्यातून समस्त मानवजात देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. आता निसर्गाचे दोहन करत विकार नियंत्रित करत जगाला एक मॉडेल देऊ या! सगळे जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. जर हे ऐतिहासिक कार्य आपल्याला पार पाडायचे असेल, तर हा आढावा त्यासाठी आवश्यक होता. या आधारावर उद्यापासून आपण यात आपल्याला असणाऱ्या संधीचा विचार करणार आहोत.
(क्रमशः)
नीरक्षीरविवेक.