इरफान खान अभिनेत्यात दडलेला सुधारणावादी मुस्लीम

30 Apr 2020 19:38:42

 

मूळ लेख - देवेंद्र पै
भावानुवाद - देविदास देशपांडे

irfan_1  H x W:

अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपट क्षेत्रातील मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांच्या अभिनयकौशल्याबरोबरच ते त्यांच्या अन्य स्वभाववैशिष्ट्यामुळेही कायम स्मरणात राहतील.

रमझानच्या महिन्यात जेव्हा अनेक कट्टरपंथी मंडळी लॉकडाउनची अवहेलना करून सामूहिक नमाज पठण करण्यासाठी इरेला पेटले आहेत, या पार्श्वभूमीवर तर इरफान यांनी दिलेला आत्मपरीक्षणाचा सल्ला अत्यंत कालोचित ठरतो.

इरफान खान या आपल्या देशातील एका सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत असतानाच आपण हे विसरता कामा नये, की इस्लाममधील कट्टरवादाविरोधात, अंध रूढींविरोधात उभे ठाकण्यास न कचरणाऱ्या मोजक्या सुधारणावादी मुस्लीम व्यक्तींपैकी ते एक होते. जुलै २०१६मध्ये इरफान खान यांनी रमझानच्या काळात प्रत्येक मुस्लिमासाठी रोजा ठेवणे जवळपास बंधनकारक असलेल्या परंपरेवर आणि बकरी ईदला होणाऱ्या बोकडाच्या कुर्बानीवर भाष्य करून वाद ओढवून घेतला होता. या पशुबळीसंदर्भात इरफान यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले, "कुर्बानी म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या जवळ असलेल्या एखाद्या गोष्टीचा त्याग करणे आणि इतरांबरोबर ते वाटून घेणे. तसा त्याग करण्याऐवजी आज आपण कुर्बानीसाठी बाजारातून बकरा विकत घेतो. अशा प्रकारे दुसऱ्या कोण्या जिवाचा बळी देऊन आपल्याला कोणते पुण्य मिळेल, हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा."

या टिप्पणीमुळे मुस्लीम धर्मगुरूंकडून त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. त्यांच्यामागे टीकेचा ससेमिरा लागला. मौलवींनी लक्ष्य केलेले असतानाही इरफान आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, सोशल मीडियावरून या विषयावर आवाज उठवीत राहिले आणि अगदी त्याच सुमारास प्रदर्शित होणार असलेल्या त्यांच्या मदारीया चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांनी या संदर्भात केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीलाही त्यांनी निर्भीडपणे तोंड दिले. रमझानच्या काळात रोझे ठेवण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, असे इरफान आग्रहपूर्वक मांडत असत.

त्याच सुमारास, टाइम्स नाऊच्या (त्या वेळी अर्णब गोस्वामी सूत्रसंचालन करत असलेल्या) 'न्यूज अवर' या चर्चेत इरफान यांनी आपल्या विचारांचे समर्थन केले आणि बालपणातील एक कथा सांगून त्याचे स्पष्टीकरणही दिले. त्या वेळी त्यांनी आपल्या वडिलांकडून पहिल्यांदाच 'खयालोंका रोजा'बद्दल ऐकले होते. त्यांच्या मते याचा अर्थ ध्यान करणे आणि आत्मपरीक्षण करणे, असा होता. इरफान यांच्या दृष्टीने रोजा म्हणजे एक प्रकारची शुद्धी प्रक्रिया आणि ती फक्त शरीराची नव्हे, तर मनाचीही करायला हवी, असे ते मांडत.


irfan khan_1  H 

याविषयी बोलताना त्यांनी पुढे ठासून सांगितले की, "या धार्मिक रूढी मुळात का उद्भवल्या, त्यांच्यामागची विचार प्रक्रिया आणि त्यांचा हेतू काय आहे हे समजून न घेता त्या जशाच्या तशा आजही पाळल्या जात आहेत." केवळ रूढी पाळण्याच्या नादात पद्धतीमध्ये अभिप्रेत असलेला संदेश हरवता कामा नये, असे ते सांगत असत.

स्पष्ट आणि निर्भीड मांडणी हे इरफान खान यांचे वैशिष्ट्यच होते. त्यांनी पुराणमतवादी इस्लामी रूढींच्या स्वरूपाबाबत उघडपणे आणि सातत्याने प्रश्न विचारणे चालू ठेवले होते. मोहरमबाबत त्यांची मते विचारल्यावर ते म्हणाले होते, "आम्ही मुस्लीम ज्या प्रकारे मोहरम साजरा करतो, त्यातून त्या दिवसाची टिंगल होते. शोक व्यक्त करणे हा मोहरमचा उद्देश आहे आणि आम्ही काय करतो? तर मोठमोठ्या मिरवणुका (ताजिया) काढतो."

ढाका येथील एका बेकरीत १ जुलै २०१६ रोजी सहा अतिरेक्यांनी गोळीबार केला आणि काही डझन जणांना ओलीस ठेवले. यानंतर ओलिसांमधले मुस्लीम आणि गैरमुस्लीम वेगळे करण्यात आले आणि त्यातल्या मुस्लीम ओलिसांना नंतर सोडण्यात आले. अखेर कमांडोंनी दहशतवाद्यांशी रक्तरंजित संघर्ष करून त्या जागेवर ताबा मिळविला. या संघर्षात एकूण ठार झालेल्यांमध्ये १८ परदेशी नागरिक होते. आयएसआयएल (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट) आणि जमात उल मुजाहिद्दीन यांनी या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

या घटनेमुळे इरफान खूप अस्वस्थ झाल्याचे दिसले. त्या अस्वस्थतेतून त्यांनी ट्विटरवर पोस्ट टाकली - 'एका ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि जगभरातील मुस्लिमांचे नाव बदनाम झाले.' ते पुढे म्हणाले, की इस्लामच्या नावाखाली ठार मारणाऱ्यांना मुस्लिमांनी प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणाले, "दया आणि करुणा हा इस्लामचा आधार आहे. मग अशा हल्ल्यांच्या वेळी शांत राहून मुस्लिमांनी इस्लामचा अपमान होऊ द्यावा का? की त्यांनी इस्लामबाबतचे हे चुकीचे विचार दुरुस्त करण्याचा सक्रिय प्रयत्न केला पाहिजे?"

इरफान यांनी याच काळात जयपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधतानाही दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलत नसल्याबद्दल मुस्लिमांवर टीका केली. “दहशतवादाच्या मुद्द्यावर मुस्लीम गप्प का आहेत? लोकांनी या विषयावर राजकारण्यांनाही प्रश्न विचारला पाहिजे,” असे ते म्हणाले.
त्याच वर्षी राजदीप सरदेसाई यांनी संचालित केलेल्या इंडिया टुडेवरील एका चर्चेदरम्यान, हा वाद निर्माण करण्यामागच्या त्यांच्या हेतूबद्दल विचारले असता इरफान यांनी स्पष्टीकरण दिले. "वाद निर्माण करण्याचा हेतू नव्हता. मित्रांशी आणि आमच्या घरी आम्ही नेहमी या गोष्टींवर चर्चा करतो. काही गोष्टी आपल्याबरोबर राहतात. काही चिंता आपल्याबरोबर राहतात. आपण असा निष्कर्ष काढतो, की कधीकधी अशा प्रथा असतात ज्या मोठ्या उद्दिष्टासाठी असतात, आपल्याला मुक्त करण्यासाठी असतात."

इरफान यांच्यावर अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे (एआयएमपीएलबीचे) सदस्य असलेल्या जफरयाब गिलाबी यांनी टीका केली. इरफान हे धार्मिक नेते नाहीत आणि त्यांचा सल्ला अनावश्यक आहे, असे सांगून त्यांनी या अभिनेत्याचा निषेध केला. जमात--उलेमा--हिंदचे सचिव मौलाना खत्री यांनीही इरफान यांच्या टिप्पणीला प्रतिसाद देताना म्हटले होते, की इरफान यांनी अभिनयच करावा, आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावे आणि (इस्लामबद्दल) भलतीसलती वक्तव्ये करू नयेत.

या टीकाकारांना इरफान यांनी स्वतःच्या शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट केले - 'मी मौलवींना घाबरत नाही. देवाच्या कृपेने मी धार्मिक कंत्राटदारांचे राज्य असलेल्या देशात राहत नाही.'

एक अष्टपैलू अभिनेता म्हणून देश अभिनेता इरफान खान यांना लक्षात ठेवेलच, त्या पलीकडेही मुल्ला-मौलवींना न घाबरता आपले विचार बोलून दाखविणारा आपल्या काळातील खरा सुधारणावादी मुस्लीम म्हणूनही त्यांची आठवण कायम राहील, अशी आशा करू या.

(लेखक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप (आयआयडीएल) येथे नेतृत्व, राजकारण आणि शासन या विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम संचालक आहेत.)

 

Powered By Sangraha 9.0