मध्यममार्गी कपूर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक30-Apr-2020   
|

आरकेचा हा मधला मुलगा. मोठा आणि धाकटा फ्लॉप झाले. मोठा मद्दड होता, धाकटा काकाची कॉपी करायला गेला आणि संपला. याने मात्र स्वतःचं नाव केलं. अंगात ठेका घेऊन आलेला माणूस हा. गरम तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसा तो विनासायास नाचायचा. किशनलालचा अमर गेला, आता अकबरही गेला. हळूहळू एक पिढी संपत जाते, ती बघणं क्लेशदायक असतं. आपल्याला ज्यांनी आनंद दिला त्यांचे ऋण आपण कसे फेडणार? मिळालेला वारसा त्याने स्वकर्तृत्वाने जपला, वाढवला.


rishi kapoor old family_1

यशस्वी
, प्रथितयश बापाचा मुलगा होणं शाप असतो. इथे तर याचं संपूर्ण खानदान - अगदी आजोबा, चुलत आजोबा, काका, काकू, वडील, भाऊ, वहिनी, मामा... सगळेच्या सगळे भक्कम पाय रोवून होते. संपत्ती वारसा हक्काने मिळू शकते, कला नाही मिळत. त्याचा मोठा भाऊ नुसताच गोरागोमटा होता. कपूर कितीही गोरेगोमटे असले तरी गोलमटोल होते. शशीच काय तो शिस्तीत राहिलेला. शम्मीची हनुवटी हरवली होती. हा थोडा मामा प्रेमनाथच्या तोंडवळ्यावर गेला होता. प्रेमकिशन बघाल तर लक्षात येईल. फाटक्या तोंडाचा होता तो. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, "मला लाँच करायला 'बॉबी' नव्हता काढला, 'जोकर'चं कर्ज फेडायला काढला होता, कारण राजेश खन्नाला त्यात घ्यायला आरकेकडे पैसे नव्हते." आरकेचा आत्मविश्वास एवढा डळमळीत झाला होता की सपाटून सिरीज हरल्यावर आपल्याकडे जसे संघात अनेक बदल करतात, तसं त्याने संगीतकार, गीतकार, गायक, हिरो, हिरॉईन, सगळा ऐवज नवीन घेतला आणि दुर्गा खोटे सोडल्यास प्रत्येकाला पदर पाडायला किंवा कमीत कमी कपडे घालायला लावले. नाही झाला चित्रपट कुठल्याच अंगाने चांगला, तर लोक निदान अंग बघायला तरी येतील असं वाटलं असेल त्याला.

त्याला 'जोकर'मध्ये बघाल. सिम्मीसमोरचं त्याचं बुजलेपण, शैशव आणि तारुण्याचा उंबरठा यावरचं त्याचं घुटमळणं, 'मैं अब बच्चा नही हूँ' म्हणताना चेहरा बघाल, नक्कीच तो अभिनेता होता उपजत. 'जोकर' तयार होऊन मातीत जाईपर्यंत तो मोठा झाला होता. प्रदीपकुमार, भारत भूषण, नवीन निश्चल, मनोजकुमार या ठोकळे कंपनीला जेवढी सुंदर गाणी मिळाली, तेवढीच या माणसालासुद्धा मिळाली आणि त्याने त्याच्या अंगभूत लयीने त्याचं सोनं केलं. एकट्याच्या जिवावर बहुमत आणणं त्याच्या वकूबात नव्हतं फार, पण जिथे आघाडी करता येईल तिथे त्याने ती केली आणि राज्य केलं. 'लैला मजनू', 'सरगम', 'कर्ज', 'प्रेमरोग', 'बॉबी', 'चांदनी' हे म्हटले तर सोलो हिट आहेत. पण सगळ्यातली गाणी बघाल तर त्यांचा मोठा वाटा आहे त्यात. गोविंदाच्या अंगात जशी उपजत लय आहे, तशीच याच्या अंगात होती. व्यायामप्रकार म्हणजे नाचणं नव्हे. त्याच्या साध्या साध्या स्टेप्स बघाल, तर हवेच्या झुळकीसारखी त्यात लय सापडेल तुम्हाला. वाद्यं वाजवताना बरेच हिरो जी अफाट करमणूक करतात पडद्यावर, त्याला तोड नाही. तारिक गिटारिस्ट होता, पण 'हम किसीसे....'मधला ऋषीचा गिटार वाजवायचा अभिनय (?) बघा. अकॉर्डियन, गिटार, पियानो, सॅक्सो कुठलंही वाद्य असो, तो ते त्याला येत असल्यासारखं वाजवायचा पडद्यावर.


rishi kapoor old family_1

मारामारी हा कुठल्याच कपूरचा स्ट्रॉंग पॉइंट नव्हता. छान दिसणं, हिरॉईनच्या मागे गोंडा घोळणं, गाणी गाणं, शेवटी चवीपुरती मारामारी करणं या बाहेर ते फारसे गेले नाहीत. याला विनोदाचा सेन्स जबरदस्त होता पण. इतक्या वेळा बघूनसुद्धा 'अमर अकबर'च्या शेवटी तो जीवनला इरिटेट करतो, ते बघून अजूनही हसायला येतं. त्या चित्रपटात गाणी, कव्वाली म्हणणं यापलीकडे त्याला फारसं काम नाहीये. पण तो लक्षात राहील याची काळजी त्याने नक्की घेतली आहे. गाणी हा त्याचा स्ट्रॉंग पॉइंट होता. आरडीची गाणी त्याने सजवली. बरेच हिरो गाणी वाचतात पडद्यावर ओठाने, हा गातो. 'ओ हंसीनी' मात्र टुकार आहे बघायला. मेळ जुळत नाही त्यात गाणं आणि चित्रित झालंय त्याचा. त्याउलट 'कर्ज'ची गाणी बघा. 'एक हसीना थी' असेल नाहीतर 'ओम शांती'च्या स्टेप्स असतील, तो अजोड होता. कदाचित त्याच्यावर नाचरा, प्रेमळ हिरो हा शिक्का बसला त्यामुळे. काही काही माणसांचं नशीब असतं आणि तेच त्यांचं दुर्दैवही. त्याच्या अभिनयावर कुणी पोवाडे लिहिले नाहीत किंवा टीकाही झाली नाही. त्याच्याकडून ते अपेक्षित नव्हतं? पण आम्ही त्याला देखणा, छान छान स्वेटर घालणारा, रोमँटिक हिरो यापलीकडे बघायचे कष्ट घेतले नाहीत.


केशू रामसेचा 'खोज' बघाल, कात्रीत सापडलेला उद्विग्न रवी कपूर. 'सागर'मधला 'रवी', 'स्लीपिंग विथ द एनेमी' या एकाच चित्रपटावरून आलेल्या तीनपैकी दोन चित्रपटांत तो होता. 'दरार' आणि 'याराना'. राज बब्बर आणि अरबाज खान यात नाव सोडल्यास फारसा फरक नाही. त्यांनी याला टक्कर देण्याचा प्रश्न येतच नाही. माधुरी आणि जूही असूनही चित्रपटा पडले याचा दोष त्याच्यावर आला नाही. शेवटी नानामुळे ती स्टोरी हिट झाली. आपल्याकडे उतारवयात चांगले रोल का देत असावेत? आता हा माणूस ब-यापैकी अभिनय करायला लागलाय याची खात्री झाली म्हणून की आता थोडं हटके करायला हरकत नाही म्हणून? कोण टाळतं नेमकं? दिग्दर्शक की कलाकार? 'अग्निपथ'चा रौफ लाला बघा. गेटअपने माणूस वेगळा दिसतो, पण तो ठसायला अभिनय हवा. '१०२ नॉट आऊट'मध्येसुद्धा तो तसूभरही कमी नाहीये बिग बीपुढे. मला तरी त्याचे म्हणून पटकन आठवावेत असे वीस चित्रपट एका वेळी आठवणार नाहीत, पण तरीही तो टुकार, असहनीय नव्हता हे निश्चित.


rishi kapoor old family_1

कधी 'दामिनी' बघाल त्याचा. सगळ्यात कमकुवत, फारसं लक्ष न जाणारी भूमिका कुणाची असेल तर तिचा नवरा. त्या जागी दुसरं कुणीही असतं, तर ती भूमिका दुय्यम झाली असती, जी आहेच मुळात दुय्यम. बायकोच्या मागे फरफट नशिबी आलेला एक सज्जन, पैशाची मस्ती नसलेला, बायकोवर अतोनात प्रेम करणारा एक साधा माणूस. तो मला या असल्या क्रेडिट न मिळणाऱ्या भूमिकेसाठी कायम आवडत आला आहे. काही मोजकेच शॉट्स त्याला मिळालेत त्याचं अस्तित्व दाखवायला चित्रपटात. घरच्यांशी तो भांडतो, ज्या तुच्छतेने तो खरबंदाकडे बघतो, सनीच्या आरडाओरड्यापुढे कोर्टात तो संयमित, आपण कोर्टात उभे आहोत हे न विसरता जे बोलतो ते पाहण्यासारखं आहे. मीनाक्षीबद्दल सनी मुद्दाम वाईटसाईट बोलतो तेंव्हाचा त्याचा संताप बघाल. पटकथेत जाण न सुटलेलं ते सगळ्यात सुंदर पात्र आहे. कुठेही तो चड्ढा, परेश रावल वगैरे लोकांवर हिरो बनून हल्ला वगैरे करत नाही, जे हिंदी चित्रपटात गरजेचं असतं. एक संसारी, सरळमार्गी माणूस जसा वागेल तसाच तो शेवटपर्यंत जे जे होईल ते पाहत राहतो. शेवटी तो जे कन्फेशन देतो ते बघाल. संतोषीने त्याला हा अप्रतिम सीन दिलाय. पडलेल्या चेहऱ्याने, पाणावलेल्या डोळ्यांनी तो फक्त आणि फक्त जजकडे बघून सगळं बोलतो. हिरो म्हणून जमलेल्या पब्लिककडे बघून उगाच स्टाइल मारत नाही. बायकोला क्रेडिट देताना त्याचा तो अभिमान वाटणारा चेहरा बघाल.

आरकेचा हा मधला मुलगा. मोठा आणि धाकटा फ्लॉप झाले. मोठा मद्दड होता, धाकटा काकाची कॉपी करायला गेला आणि संपला. याने मात्र स्वतःचं नाव केलं. अंगात ठेका घेऊन आलेला माणूस हा. गरम तव्यावर पॉपकॉर्न उडावेत तसा तो विनासायास नाचायचा. किशनलालचा अमर गेला, आता अकबरही गेला. हळूहळू एक पिढी संपत जाते, ती बघणं क्लेशदायक असतं. आपल्याला ज्यांनी आनंद दिला त्यांचे ऋण आपण कसे फेडणार? मिळालेला वारसा त्याने स्वकर्तृत्वाने जपला, वाढवला.

एक गोंडस दिसणारा, सुंदर, मध्यममार्गी कपूर आज गेला. देव त्याच्या आत्म्याला सद्गती देवो.

जयंत विद्वांस