जयंती बाबासाहेबांची

स्रोत: विवेक मराठी    दिनांक06-Apr-2020
|

१४एप्रिल रोजी महामानव,भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा.विवेकने केलेला हा प्रयत्न.

ambedkar_1  H x 

14 एप्रिलपर्यंत दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग, एक गीत आणि प्रश्न मंजुषा.

तर, रहा तयार या आगळ्यावेगळ्या अभिवादनासाठी.

आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी कोणते आंदोलन केले? या आंदोलनात सहभागी झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांची नावे काय?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा.

बीजे आत्मभानाची

बाबासाहेब अमेरिकेत शिकत असताना त्यांच्या विचाराच्या कक्षा अधिक विस्तीर्ण झाल्या होत्या. आपल्या समाजाचे उत्थान कसे करता येईल याचा विचार सदैव त्यांच्या मनात जागृत होता. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला समाजाची चिंता अशा दोन्ही पातळीवर बाबासाहेब स्वतःला पणाला लावून उभे होते . पाश्चात्य साहित्य, लोक चळवळ यांचाही अभ्यास त्यांनी चालवला होता. अमेरिकेतील नागरिकांना भारतीय पद्धतीचा व्यायामही शिकवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. अमेरिकेतून लिहिलेल्या एक पत्रात त्यांनी शेक्सपियरच्या ओळी उद्धृत केल्या होत्या. बाबासाहेबांनी लिहिले होते . " माणसाच्या जीवनात स्पर्धांची लाट येते. त्या संधीचा योग्य उपयोग केला तर त्या माणसाला वैभव प्राप्त होते." या पार्श्वभूमीवर आपल्या सामाजिक रोगाचे विश्लेषण करताना ते म्हणतात की, “आई - वडील मुलांना निव्वळ जन्म देतात आणि कर्म देत नाहीत हा दैववादी सिद्धांत आपण झटकला पाहिजे. मुलांचे भवितव्य आई-वडिलांच्या हातात असते हे तत्त्व मनात बिंबवले पाहिजे. मुलांबरोबरच मुलींचेही शिक्षण करण्यात आले तर आपला विकास गतीने झाल्याशिवाय राहणार नाही." बाबासाहेबांनी हीन - दीन वंचितांचे जगणे पाहिले होते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा शिक्षणातूनच निर्माण होणार आहे, याची त्यांना खात्री होती. स्वाभिमान , स्वावलंबन आणि शिक्षण ही आत्मोद्धाराची त्रिसूत्री आहे. हे बाबासाहेबांच्या लक्षात आले होते आणि या आत्मभावाची बीजे ऐन तरूण वयातच बाबासाहेबांच्या मनात रूजली होती.