जयंती बाबासाहेबांची

विवेक मराठी    09-Apr-2020
Total Views |
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

ambedar_1  H x

*
कालच्या प्रश्नाचे उत्तर*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला.

*आजचा प्रश्न*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली भारतीय राज्यघटना किती तारखेला स्वीकारली? त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन संविधान दिन कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केला?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा

*एकतेचा प्रत्यय आणू*

१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे ध्येय व उद्देश स्पष्ट करणारा ठराव मांडला गेला. या वेळी मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार घातला होता. जोपर्यंत मुस्लीम लीग आणि संस्थांने यांचे प्रतिनिधी येत नाहीत, तोपर्यंत ठराव संमत करू नये अशी सूचना डॉ. जयकरांनी मांडली. यावर वल्लभभाई पटेल, मसानी इत्यादी नेत्यांनी टीका केली. इतक्यात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आंबेडकरांना बोलण्याची विनंती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि धीरगंभीर आवाजात त्यांनी भाषणाला सुरुवात केली. बाबासाहेब म्हणाले, “आपण आज राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुभंगले गेलो असलो, तरी परिस्थितीने वेळ येताच आपल्या एकीस कोणीही अडथळा करू शकणार नाही. जरी मुस्लीम लीग हिंदुस्थानच्या फाळणीसाठी चळवळ करीत आहे, तरी एक दिवस असा उजाडेल, ज्या दिवशी अखंड हिंदुस्थान सर्वांसाठी हितकर आहे असे त्यांनाही वाटेल. सत्ता देणे सोपे असते, परंतु शहाणपणा देणे कठीण आहे. आपल्याबरोबर सर्वांना घेऊन जाण्याची व शेवटी एकी होईल असा मार्ग स्वीकारण्याची ताकद व शहाणपणा आपल्या अंगी आहे, हे आपल्या वागणुकीने प्रत्ययास आणून द्या." डॉ. आंबेडकरांच्या या भाषणामुळे सर्व भारतीय वृत्तपत्रांनी 'अखंड हिंदुस्थानची घोषणा' या शीर्षकाखाली आंबेडकरांवर स्तुतिसुमने उधळली. आचार्य अत्रेंनी त्या दिवसापासून आंबेडकरांच्या विरोधात न लिहिण्याची शपथ घेतली. वृत्तकारांनी लिहिले - 'आंबेडकर उभे राहिले, त्यांनी पाहिले आणि जिंकले.' बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रीय आंतरिक एकतेचा उद्घोष केला आणि ते घटनेचे शिल्पकार झाले.