बाहुबली

स्रोत: विवेक मराठी    दिनांक09-Apr-2020
|

शिवकन्या शशी

प्रिय जयराज

श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या विशालकाय मूर्तीच्या पायथ्याशी मुंगी होऊन हे पत्र लिहीत आहे.

 
bahubali_1  H x
 

चंद्रगिरी आणि विंध्यगिरी असे दोन पर्वत. यांच्या दरम्यान पसरलेल्या नारळाच्या हिरव्याकंच बागाच बागा. त्यांच्या अध्येमध्ये ऊद लावल्यासारखे मोठमोठे धुरकट पाषाण - एकावर एक असे कुणीतरी मुद्दाम रचून ठेवलेले. त्यांचा आकार अव्याढव्य असला, तरी त्यांच्या रचनेमुळे त्यात खेळकरपणा जाणवतो. ते कधीही एकमेकांच्या अंगाखांद्यावरून उतरून खाली बागांमध्ये खेळू लागतील, असे वाटते. यांच्या मधोमध उन्हाने चमकणारे निळेभोर सरोवर आहे. पाऱ्यासारख्या चमकत्या उन्हात हे सारे विलोभनीय दिसते आहे.

 

मी विंध्यगिरीच्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार, इतक्यात एकाने बूट घालून वर जायची परवानगी नाही, असे सांगितले. बूट सॅकमध्ये टाकून, अनवाणी पायांनी उन्हात दगडी पायऱ्या चढू लागले. चटके बसू लागले, तशी पटापट पाय उचलू लागले. शंभरेक पायऱ्या झाल्या असतील-नसतील, शरीरातला सारा जीवनरस या उन्हात कापरासारखा उडून गेलाय आणि वर जात आहे तो आपला चर्मवेष्टित सांगाडा, असे जाणवू लागले! आणखी वर गेले आणि 'मोदलिन बागिलु' (प्रथम द्वार) लागले. एकदम थंडगार! चटके खाऊन लालबुंद झालेले तळपाय थंड सावलीत जराच विसावले. कारण, एकदा पर्वत चढायला सुरुवात केली की शिखराची ओढ लागते - मग पर्वत विरक्ताचा असो, नाहीतर आसक्तीचा!

जाता जाता अनेक छोटीछोटी मंदिरे लागली. सगळीकडे पाषाणाचा उभा-आडवा खेळ. शेवटी बाहुबली गोमटेश्वराचे मंदिर. मंदिर नावाला. गोमटेश्वराचे मस्तक दुरूनच दिसू लागते. जसा कोणताही योगिराज मंदिराच्या आत मावत नाहीत, तसा हाही मावत नाही. मंदिर त्याच्या पायाशी सामावून जाते, तो उन्नत उन्नत आकाशापर्यंत. याने संसाराचा उपभोग घेतला आणि मग निघून गेला. मला हे पटते. जो भोगी, तोच योगी! नाहीतर सौख्य काय आहे, हे न माहीत होताच, जे विरक्तीची भाषा बोलतात, ती पोकळ असते. तर, त्याच्या पायाशी जे मंदिर आहे, ते उपभोगाने नटलेले आहे. सगळे पाषाणफुलांनी सजलेले. नर्तकीच्या घुंगरांचा आवाज दगडांचा. सिंहाच्या जबडयातील हिंस्रपणा दगडांचा. द्राक्षांतून ठिबकणारा मादकपणा दगडांचा. यक्षाने यक्षिणीला अलगद मारलेल्या मिठीतली आसक्ती दगडांची. झुळझुळणारी वस्त्रे दगडांची. दागिन्यांतील हिरेमोती दगडांचे. सौभाग्यअलंकारातील ताजेपण दगडांचे... आणि लौकिकापार जाऊन निरभ्र आसमंतात स्थिरावलेली स्थितप्रज्ञताही दगडाचीच!! गोमटेश्वर नावाप्रमाणेच गोमटा आहे, परंतु त्याच्या मिटल्या डोळयांपाशी वैराग्याचा संसार आहे. त्यातली सूक्ष्म थरथर आपल्यातल्या इच्छांना स्पर्श करते आणि आपण निरिच्छ होतो. समोरचा चंद्रगिरी उतरून या विंध्यगिरीच्या सहाशेप्लस पायऱ्या एकटीने चढून येतायेता माझ्यातली मी खालीच कुठेतरी राहून गेले, आणि जे वरती आले, ते इथली स्थिरप्रज्ञता शोषून घेत आहे.

 


bahubali_1  H x
हात जोडले नाहीत
. पापणी मिटली नाही. पाऊल हलले नाही. हृदय धडधडले नाही. रक्त धमन्यांतून पुढे-मागे झाले नाही. मनात एकही तरंग उठला नाही. एवढे सरळ सरळ नग्न दर्शन कधी कशाचे घेतले नव्हते. वाऱ्याची एक शांत झुळूक आली आणि गेली. मग उमजले, ही जागा संन्याशाची नाही, त्यांच्याही पार गेलेल्या कलावंतांची आहे.

जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना भरत आणि बाहुबली ही दोन मुले होती. पित्याच्या निर्वाणानंतर थोरला भरत गादीवर बसला. चक्रवर्ती झाला. त्याच्या उर्वरित 98 भावंडांनी शरणागती पत्करली आणि श्रावक होऊन त्यांनी संन्यास स्वीकारला, पण बाहुबलीने एकटयाने शरणागतीस नकार दिला. मग भावांमध्ये द्वंद्वयुध्द सुरू झाले. बाहुबली भरतावर शेवटचा प्रहार करणार, त्याक्षणी त्याला या जयापराजयाचा फोलपणा उमजला आणि त्याने भरताला सोडून दिले, राज्यत्याग केला. घोर तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला. एके ठिकाणी उभा राहिला, आत वळला. आतले सगळे जितके सूक्ष्म, तितके चिवट. निवेना की सरेना. पण बाहुबली आत्मबली होत गेला. त्याचे चित्त इतके स्थिर झाले की शरीराची जाणीव सुटली. त्याला वेलींनी लपेटले, मुंग्यांनी अंगावर वारूळ बांधले, पण हा किंचितही विचलित झाला नाही. त्याचे आतील रिपूंचे वारूळ फोडणे अव्याहतपणे चालू होते. अशी बारा वर्षे उलटून गेली. ऊन-वारा-वादळ, दिवस-रात्र सरून गेले, तरी निर्वाण नाही. तेव्हा ऋषभनाथांनी 'मी तप करतो' हा अहंकार सोडायला सांगितला. तो त्याने ज्याक्षणी सोडला, त्याक्षणी तो निर्वाणास पोहोचला. लहानपणापासून ही गोष्ट मी ऐकत आले आहे. पण, आज त्याचे सगुण रूप पाहिले आणि मला अनेक बाहुबली दिसू लागले.


सगळी सुखे राजसपणे उपभोगणे आणि नंतर त्यांचा निर्लेपपणे त्याग करणे
, म्हणजे बाहुबली. बाहुंमध्ये प्रचंड ताकद असूनही शत्रूलाही क्षमा करणे, दुर्बळांचे रक्षण करणे म्हणजे बाहुबली. आपल्याकडे एकहाती सत्ता असताना, विनम्रतेने गोरगरिबांना घास पोहोचवणे म्हणजे बाहुबली. आपण सर्वोच्च स्थानी असताना, रस्त्याकडेच्या भिकाऱ्याला उचलून राजमार्गावर आणणे म्हणजे बाहुबली. आपल्या शब्दात कायदे बदलायची ताकद असेल, तर ते सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणारे असावेत अशी काळजी घेणे म्हणजे बाहुबली. आपण ज्ञानी असून, लहान मुलांकडूनही नवे शिकण्याची लवचीकता म्हणजे बाहुबली... असे अनेक बाहुबली माझ्या मनात येत आहेत.

आपल्या भूमीतील संन्यास व्यक्तिगत नाही, तर असा समूहालाही थोडी विरक्ती शिकवणारा आहे. ही क्षीण झालेली परंपरा पुन्हा नव्या रूपात सुदृढ होवो. अनावश्यक ते नको आणि आवश्यक ते वाटून घेऊ, अशी बाहुबली वृत्ती वर्धित होवो.

बाहुबलीचा गोमटेश्वर झाला, तसे तुझ्या माझ्यातील जे जे चांगले आहे ते ते गोमटे होऊ दे, या सुचिंतनापाशी हे पत्र थांबवते.

तुझी,

शिवकन्या.