कोरोनापासून बचाव गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक18-May-2020
|
***डॉ. रेखा कुवर***

कोरोनाची भिती सगळ्यांनाच आहे, पण गरदोर आणि स्तनदा माता मात्र अधिक चिंतीत असल्याचे दिसते. कारणच तसे आहे, त्यांना स्वत:च्या जीवाबरोबरच लहान जीवाची काळजी जास्त सतावते. या लेखात आपण गरोदर महिला स्तनदा यांना या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या शंकांचे निरसन आणि काळजी घेऊन आपण या विषाणूपासून कसा बचाव करु शकतो, हे पाहणार आहोत.

Coronavirus infection and

आजच्या २१व्या शतकात संपूर्ण विश्व एका अज्ञात अशा शत्रूसारख्या विषाणूमुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. तो विषाणू म्हणजे कोरोना (Cov-२), ज्यामुळे जग एका महामारीच्या संकटातून जात आहे. या विषाणूमुळे जगातील महासत्ता असणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून ते आपल्या कोळीवाड्यापर्यंतच्या सर्वसामान्य नागरिकांना जेरीस आणले आहे. या कोरोना विषाणूमुळे कोविड-१९ ही व्याधी होते. चीनमधील बुहान या शहरामध्ये डिसेंबर २०१९मध्ये याचा उगम झाला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) ११ मार्च २०२० रोजी ही कोविड-१९ व्याधी महामारी (pandemic) म्हणून घोषणा केली. १९०पेक्षा जास्त देशांमध्ये या कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे.

सर्वप्रथम चीनमध्ये या कोरोना विषाणूने थैमान माजवले होते. टीव्हीवर याबद्दल रोज बातम्या येत होत्या. सगळीकडे याची चर्चा चालू असताना एके दिवशी एक गर्भवती स्त्री आमच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणीकरिता आली असता तिच्या मनात असंख्य प्रश्नांची घालमेल चालू होती. तिने घाबरतच मला विचारले, "डॉक्टर, मी कोविड-१९पासून माझे संरक्षण कसे करू शकते? मी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? त्यासाठी मी काय केले पाहिजे?"

मी तिला सविस्तर माहिती देऊन तिच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. हा कोरोना विषाणू संपर्काच्या माध्यमातून पसरत असल्याने जितक्या व्यक्तींशी जास्त संपर्क येतो, तितका त्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. या विषाणूचा धोका विशेषत: प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो, त्यामुळे गर्भवती स्त्रीने प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या सात्त्विक आहाराचे सेवन करावे.

मूलत: कोविड-१९ ही श्वसनमार्गातील एक व्याधी आहे. या व्याधीच्या लक्षण स्वरूपात सर्वप्रथम घशाच्या ठिकाणी स्राव निर्माण होऊन रूक्षता निर्माण होते. घसा खवखवणे हे लक्षण निर्माण होऊन अत्यधिक प्रमाणात स्राव उत्पन्न होतो. हा स्राव दोन्ही फुप्फुसांत जाऊन अडथळा निर्माण करतो. या कारणामुळे श्वास घेण्यास त्रास होतो व न्यूमोनियासारखी लक्षणे उत्पन्न होतात. हा कोरोना विषाणू तीव्र स्वरूपात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची मात्र (SPO२) कमी करतो. त्यामुळे अशा रुग्णास अतिदक्षता विभागाची आवश्यकता निर्माण होते.

मातेवर संपूर्ण गर्भाचे आरोग्य अवलंबून असते. माता जो आहार घेते, त्या आहारामुळेच गर्भाचे पोषण होते व गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे मातेने सकस आहाराचे नित्य सेवन करावे. उत्तम संतती निर्माण होण्यासाठी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.


Coronavirus infection and
जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) दिलेल्या नियमांनुसार खालील बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

१) गर्भवती स्त्रियांनी घरीच सुरक्षित राहावे. आरोग्यासंबंधी काही आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे, अन्यथा बाहेर येऊ नये.

२) मातेने डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी फोनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून माहिती घ्यावी.

३) या कालावधीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचा संपर्क टाळावा.

४) वेळावेळी साबण लावून हात मनगटापर्यंत २० सेकंदापर्यंत स्वच्छ पाण्याने धुवावे. तसेच निर्जंतुकीकरणासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा.

५) गर्भवती स्त्रीने सामाजिक भान ठेवून व्यक्तिपरत्वे अंतर ठेवून कामे करावीत. प्रत्येक व्यक्तीत किमान १ मीटरचे अंतर असावे.

६) वारंवार डोळ्यावर, तोंडावर व नाकावर हात लावू नये. फेस मास्कचा वापर करावा.

७) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

८) सार्वजनिक मार्गांनी प्रवास करणे टाळावे, तसेच दूरचा प्रवास शक्यतो टाळावा.

कोविड-१९ व्यक्तींची लक्षणे -

१) अल्प लक्षणे - कोरडा खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी, ताप.

२) तीव्र लक्षणे - गर्भवती स्त्रीमध्ये श्वसनगती ७४०/min, रक्तातील ऑक्सिजनची मात्रा ९३%, ऑक्सिजनचा दाब 
३) अतितीव्र लक्षणे - श्वसनसंस्थेतील बिघाड हे लक्षण तीव्रतेने जाणवते. अशा वेळी तत्काळ रुग्णालयात दाखल करावे.
कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध अजून निर्माण झाले नाही. जागतिक पातळीवर विविध प्रयोगशाळांमध्ये त्यावर युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. लस (व्हॅक्सिन) किंवा औषध तयार होईपर्यंत वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्यावी.
रक्तवाढीची, कॅल्शियम व प्रोटीन पावडर ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
 
\सोनोग्राफी (USG), रक्ताच्या तपासण्या आवश्यक त्या वेळी करून घ्याव्यात.
स्तनपान ही नवजात बालकाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे. स्तनपानामुळे बालकाची प्रतिकारशक्ती वाढते व यामुळे बालक व माता दोघांमध्ये एक नैसर्गिक नाते निर्माण होते. स्तनपान बाळाचे आरोग्य सुदृढ बनवते आणि ते बाळाच्या परिपूर्ण वाढीसाठी हितकारक आहे. स्तनपान जसे बालकास आवश्यक आहे, तसेच ते मातेसाठीसुद्धा लाभदायक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) माता कोरोनाबाधित असेल, तरी जन्मजात बालकास स्तनपान आवश्यक आहे. कांगारू पद्धतीने तसेच त्वचा संपर्क ठेवून नवजात बालकास स्तनपान करावे.

माता कोरोनाबाधित जरी असली, तरी मातेच्या दुधातून कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही. त्यामुळे मातेने बाळाला नियमित स्तनपान करावे. त्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी -

१) बालकास स्तनपान करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे किंवा अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करावे.
२) मातेने बाळाशी संपर्क असताना, तसेच स्तनपान करताना मास्कचा वापर करावा व एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नये.

३) शिंकतांना व खोकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.

४) बाळाला स्तनपान करण्यापूर्वी आसपासच्या परिसर स्वच्छ निर्जंतुक ठेवावा.


Coronavirus infection and

तसेच माता कोरोनाबाधित असल्यास व स्तनपान करण्यास असमर्थ असल्यास तिने स्वत:चे दूध स्वछ भांड्यात काढून ते चमच्याने बालकास द्यावे किंवा बाहेरच्या पावडर दुधाचा वापर करावा. वरील पद्धतीने काही अडचण निर्माण झाल्यास धात्री म्हणजे (Wet Nurse) Donor human milkचा प्रयोग करावा. परंतु बालकाचे स्तनपान थांबवू नये.


गर्भवती स्त्रीने व स्तनदा मातेने आहारामध्ये काही पथ्यपालन करावे -

मातेने स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व कोरोना विषाणूचा बालकास होणारा धोका टाळण्यासाठी खालील आहारीय पदार्थांचा वापर करावा.

१) मातेने नियमित पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.


२) आहारात दूध, तूप व लाक भरपूर प्रमाणात वापरावे.


३) हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य यांचा आहारात नियमित वापर करावा.४) काळ्या मनुका, खजूर, खारीक या सुक्या मेव्याचा वापर करावा.५) पनीर, सोयाबीन, बीट, गाजर, कारली, काकडी, भोपळा यांच्या सेवनाने रक्तवृद्धी होते.६) आहारात ताजी फळे वापरावीत. संत्री, मोसंबी, लिंबू यासारख्या फळांमधून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.७) जेवन बनवताना लसूण, पुदीना, आले, हळद, जिरे, धणे पूड, हिंग यांचा वापर करावा.


८) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (Immunity booster) च्यवनप्राश रोज सकाळी २ चमचे घ्यावे.९) कोरडा खोकला असल्यास हळदीच्या किंवा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.१०) तुळस, दालचिनी, काळेमिरे, शुंठी, मनुका व गूळ यांचा काढा (Decoction) दिवसातून दोन वेळा घ्यावा.वरील गोष्टी या Ayurvedic immunity promoting measures म्हणून भारत सरकारच्या आयुष विभागाकडून प्रमाणित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच रोज ३० मिनिटे ओमकार नाम व प्राणायाम करावा. नियमित ८-१० तास झोप घ्यावी. वास्तव्य असलेल्या खोलीचे धूपन करावे. धूपनासाठी निंब, वचा, ओवा, गुग्गुळ, कापूर यासारख्या द्रव्यांचा वापर करावा.


या सर्व गोष्टींचा काटेकोरपणे वापर केल्यास गर्भवती माता, स्तनदा माता व बालक यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल व या वैश्विक महामारीच्या काळात मातेचे व बालकाचे आरोग्य उत्तम राहण्यास अधिक मदत होईल.

डॉ. रेखा कुवर (एम.डी.)

सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतितंत्र,

रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, वरळी, मुंबई.

[email protected]

९४०५०१०७६९