तंदुरुस्त आयुष्यासाठी

विवेक मराठी    18-May-2020
Total Views |
- शरद केळकर 
 

 आजकाल गल्लोगल्ली फिटनेस जिमचे पेव फुटलेले आपण पाहतो. अनेकजण शारिरीक क्षमता न ओळखता नको ते व्यायाम प्रकार करतात आणि त्यामुळे दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच व्यक्तीगणिक या क्षमतादेखील बदलतात. आपण 'आरोग्यम् धनसंपदा' या सदरातून प्रोढ/ ज्येष्ठ वयोगटासंदर्भात करता येणारे लाभदायक व्यायाम प्रकार यांची माहिती घेणार आहोत.

gym_1  H x W: 0

 कुठलीही शारीरिक हालचाल केली की कुठला तरी व्यायाम होतोच. त्या हालचालीने कुठल्यातरी स्नायूंवर थोडा तरी दाब किंवा ताण येतोच. खुर्चीत बसून नुसतेच पाय हलवणे, घरात एका खोलीतून दुसर्‍या खोलीत चालत जाणे हेसुद्धा व्यायाम ह्या व्याख्येखाली येतात. पण रूढार्थाने आपण ह्या 'केवळ शारीरिक हालचालींना' व्यायाम म्हणत नाही.

मग व्यायाम म्हणजे काय? तर काहीतरी 'उद्दिष्ट' बाळगून, आजच्यापेक्षा उद्या किंवा एखाद्या ठरवलेल्या पण मर्यादित कालखंडानंतर आपल्याला जी 'शारीरिक क्षमता' गाठायची आहे, जी 'सुदृढता आणि सशक्तता'¹ मिळवायची आहे, जी 'लवचीकता'² मिळवायची आहे, जो 'दमसास'³ वाढवायचा आहे, ते उद्दिष्ट गाठण्यासाठी केलेल्या, स्नायूंवर भार टाकणार्‍या अथवा स्नायूंवर ताण देणार्‍या, ठरावीक पद्धतीने ठरावीक वेळा केल्या जाणाऱ्या आणि ठरावीक काळाने बदल/वाढ केल्या जाणार्‍या 'शारीरिक हालचाली' म्हणजेच व्यायाम.

ज्या शारीरिक क्षमतेचा उल्लेख आपण करतोय, ती क्षमता प्रत्येक व्यक्तीनुसार आणि वयानुसार बदलते आणि साहजिकच व्यायामसुद्धा बदलतो.

 तान्ह्या मुलासाठी आंघोळीआधी करवलेल्या हातापायांच्या हालचाली, त्याला पालथे, उताणे झोपवून केलेला मसाज हा त्याच्यासाठी व्यायाम असतो. त्याने पाळण्यात झाडलेल्या लाथा, हवेत हलवलेले हात हा त्याच्यासाठी व्यायाम असतो.


 १ वर्षाच्या मुलाने घरात पडत धडपडत धावणे हा त्याच्यासाठी व्यायाम असतो. त्याने ठोकळे उचलायला शिकणे, मणी उचलून वाटीत ठेवणे ह्याद्वारे केलेले स्नायू समन्वयन (मसल्स कोऑर्डिनेशन) हा त्याच्यासाठी व्यायाम असतो.


 ४-५ वर्षांच्या मुलाने समवयस्क मित्रांबरोबर अंगणात धिंगाणा घालत खेळलेले खेळ आणि त्याद्वारे शिकलेल्या स्नायूंच्या हालचाली, त्यांचे समन्वयन (कोऑर्डिनेशन) आणि स्नायूंवर नियंत्रण (कंट्रोल) हा व्यायाम असतो.


 ८० वर्षांच्या माणसाने कोपर्‍यावर भाजी अथवा दूध अथवा औषधे आणायला जाणे, किंवा नुसतेच कोपर्‍यावर चालत जाऊन येणे हा त्याच्यासाठी व्यायाम असतो.


 ९० वर्षांच्या माणसाने घरात एका खोलीतून दुसर्‍या खोलीत फेर्‍या मारणे हा त्याच्यासाठी व्यायाम असतो...


 १०० वर्षांच्या माणसाने खुर्चीत बसल्याबसल्या केलेली हातापायांची हालचाल हा त्याच्यासाठी व्यायाम असतो...


वर उल्लेख केलेल्या सगळ्या वयोगटांतून राहिलेले ६-७ वर्षे ते ७०-८० वर्षे ह्या वयोगटातील व्यक्तींसाठीच मुख्यत्वे 'व्यायाम' ह्या संज्ञेचा स्वतंत्र विचार केला जातो, जो व्यायामशाळेत आणि / अथवा मैदानावर, कुठल्यातरी वजनांच्या, साधनांच्या आधारे आणि / अथवा स्वत:च्याच शारीरिक वजनाचा उपयोग करून, किंवा कुठल्यातरी खेळाच्या माध्यमातून केला जातो.

एखादी शारीरिक क्षमता गाठण्यासाठी, काही साधनांसह अथवा साधनांशिवाय केलेल्या, स्नायूंवर दाब किंवा ताण आणणार्‍या, नियमबद्ध आणि पूर्वनियोजित (प्री-प्लॅन्ड) हालचाली म्हणजे व्यायाम, हे एकदा लक्षात घेतले की आपल्याला लक्ष्य निश्चित करण्याची (गोल सेटिंगची) दिशा सापडायला सोपे जाते.


gym_1  H x W: 0

वर म्हटल्याप्रमाणे, शारीरिक क्षमता ह्या व्यक्तीगणिक बदलतात. त्यामुळे एखाद्या चित्रपटातल्या हीरोसारखा दिसण्यासाठी व्यायाम करणे किंवा व्यायामशाळेतल्या अथवा मैदानावरच्या आपल्या मित्रासारखा अथवा मैत्रिणीसारखा व्यायाम करणे हे टाळायलाच पाहिजे. आपल्या क्षमता ओळखायला आणि उद्दिष्ट निश्चित करायला, फिटनेस ट्रेनर / क्रीडा शिक्षक / जिम इन्स्ट्रक्टरच हवा.

ह्या लेखमालेत आपण मुख्यत्वे ह्याच व्यायामप्रकारांच्या संदर्भात आणि साधारण प्रौढ / ज्येष्ठ वयोगटासंदर्भात माहिती घेणार आहोत.

¹ ह्या प्रकारात स्नायू वाढीचे आणि बळकटीचे व्यायामप्रकार येतात.
² ह्या प्रकारात योगासनांसारखे व्यायामप्रकार येतात.
³ ह्यात हृदयाची, फुप्फुसाची क्षमता वाढवणारे व्यायामप्रकार येतात.

व्यायाम का करावेत? व्यायामाचे प्रकार कुठले? ह्याबाबत पुढच्या लेखात.

- शरद केळकर
९८२३०२०३०४