कोरोनाविरुद्धचा लढा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक19-May-2020
|
- मिलिंद पदकी

कोरोना विषाणू (वैज्ञानिक नाव 'सार्स - कोव्ह-२', त्याने होणाऱ्या रोगाचे नाव 'कोविड-१९') या नव्या साथीने सध्या जगात थैमान घातले असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतात ८ मेपर्यंत ५६,३४२ रुग्ण चाचणी करून रोगनिदान नक्की केले गेले आहेत, १८८६ मृत्यू झाले आहेत आणि १६५४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सरकारने साथीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक स्वागतार्ह पावले उचलली आहेत, ज्यात 'लॉकडाउन' आणि शारीरिक अंतर राखण्यावर भर ही महत्त्वाची मानता येतील. यामुळे वैद्यकीय व्यवस्था अति-ताणामुळे कोलमडून पडण्याचा धोका बराचसा कमी झाला आहे, असे मानायला जागा आहे. या साथीचा एक आढावा घेण्याचा, संरक्षक उपाय संग्रहित करण्याचा, तसेच त्याविरुद्धच्या लसीकरणाची आणि औषधांची ओळख करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.

india fights coronavirus_

प्रथम व्हायरस (विषाणू) म्हणजे काय ते पाहू या. विषाणू ही निर्जीव आणि सजीव यांच्या सीमेवरची एक संरचना आहे. आतमध्ये नियंत्रक असे 'डी.एन.ए' किंवा 'आर.एन.ए.' हे सर्वच जीवनाचे मूलभूत असे संयुग आणि त्यावरचे प्रथिनांनी आणि स्निग्ध पदार्थांनी बनलेले आवरण असे तिचे स्वरूप असते. विषाणू हा दुसऱ्या कोणत्या तरी पेशीमध्येच (जिवाणू (बॅक्टेरिया), अमीबा, प्राणी, मानव, वनस्पती इत्यादींच्या पेशींमध्ये) 'जिवंत' मानता येतो, जिथे तो त्या पेशींची यंत्रणा ताब्यात घेऊन स्वतःचे पुनरुत्पादन करतो. बाहेर, मोकळ्या हवेत, पाण्यात, अगदी अंतराळातसुद्धा विषांणू ही केवळ एक 'निर्जीव' संरचना असते. उदा. तिला चयापचय (मेटॅबॉलिझम), स्वतःची ऊर्जानिर्मिती, पुनरुत्पादन वगैरे सजीवांचे गुणधर्म नसतात.
आकृती क्र . १: सार्स - कोव्ह-२ची संरचना : या काटेरी चेंडूसारख्या गोलाचा व्यास सुमारे ८० ते १६० नॅनोमीटर इतका असतो. (१००० नॅनोमीटर म्हणजे एक मायक्रोमीटर, आणि १००० मायक्रोमीटर म्हणजे एक मिलीमीटर. एका केसाचा व्यास सुमारे ७०,००० नॅनोमीटर असतो, यावरून विषाणू किती सूक्ष्म असतो, याची कल्पना येईल.)


india fights coronavirus_
मानवी पेशीवरच्या ACE2 या 'रिसेप्टर'बरोबर (स्वीकारक जागा, 'खोबण') विषाणूच्या बाह्य आवरणावरचे 'S' नावाचे प्रथिन संयुक्त होते, जी त्याची पेशीत शिरण्याची पहिली पायरी असते. संयोग पावलेला विषाणू हा त्यानंतर मानवी पेशींच्या आवरणाचा एक लहानसा बुडबुडा तयार होऊन त्याच्यातून पेशीच्या अंतर्भागात खेचला जातो. या बुडबुड्याच्या ऍसिडीकरणाच्या प्रक्रियेतून विषाणूचे आर.एन.ए. त्या बुडबुड्यातून बाहेर पडून मानवी पेशीच्या निर्मिती यंत्रणांवर कब्जा मिळविते आणि नवे विषाणू तयार करते, जे पेशीचे आवरण फोडून बाहेर येतात, यामुळे पहिल्या पेशीचा मृत्यू होतो. बाहेर पडलेले विषाणू पुढची पेशी आक्रमित करतात.
 

india fights coronavirus_ 
आकृती क्र. २ : एक नवी क्षमता : 'उत्क्रांत' झालेल्या सध्याच्या कोरोनाने (SARS-Cov-2ने) एक नवी क्षमता प्राप्त केली - मानवी पेशीवरच्या ACE2 या रिसेप्टरबरोबर विषाणूच्या बाह्य आवरणावरचे 'S' नावाचे प्रथिन संयुक्त होते, जी त्याची पेशीत शिरण्याची पहिली पायरी असते. आता हे प्रथिन याआधीच्या विषाणूवरही (SARS-2002, MERS-2012) होतेच. पण सध्याच्या विषाणूमध्ये त्यात एक अशी जागा आहे, ज्यावर मानवी पेशीवरच्याच एका एन्झाइमची क्रिया होऊन त्याचे दोन भाग होतात. त्यामुळे त्याचे रिसेप्टरबरोबर संलग्न होणे अधिक सोपे होते, आणि त्याची पेशीत शिरायची क्षमता बरीच वाढते. TMPRSS2 (transmembrane serine protease 2) असे त्या मानवी एन्झाइमचे नाव आहे (आकृती दिली आहे). एखाद्या जागी घरफोडी होत असताना, घरफोड्यांना 'आतल्याच' एखाद्या माणसाची मदत असावी असा काहीसा हा प्रकार आहे.
बऱ्याचशा केसेसमध्ये या रोगाची सुरुवातीची लक्षणे पुढीलप्रमाणे - थकलेपणा, डोकेदुखी, घशात खवखवणे, सौम्य ताप, वास येणे कमी होणे. अनेक लोकांमध्ये ही लक्षणे पुढचे पाच-सात दिवस अधिक तीव्र होत जातात. खोकला आणि धाप लागणे ही लक्षणे रुग्णाची न्यूमोनियाकडे वाटचाल सुरू आहे असे दर्शवितात. या सर्वात व्यक्ती-व्यक्तीमध्ये मोठा फरक असू शकतो.

संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात, जेव्हा विषाणू शरीरात वाढत असतो, तेव्हा प्रत्यक्ष विषाणू मारण्यासाठीच्या औषधांचा उत्तम उपयोग होतो. दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याच इम्यून सिस्टिमने विषाणूला दिलेला नको तितका तीव्र प्रतिसाद हा खरा प्रॉब्लेम असतो. यात शरीराच्या इम्यून पेशी 'सायटोकाइन्स' नावाची लहान लहान प्रथिने स्रवतात, ज्यांच्या अनिष्ट परिणामांचे 'वादळ' निर्माण होते, जे शमविण्यास अपयश आल्यास मृत्यू घडू शकतो. सायटोकाइन्सच्या वादळाने फुप्फुसाच्या पेशी मोठ्या प्रमाणावर नाश पावतात. फुप्फुसाच्या सूक्ष्म पिशव्यांमध्ये, जिथे हवेतला प्राणवायू रक्तात शोषला जातो, त्या जागी पाणी साठू लागते, ज्यामुळे प्राणवायू रक्तात घेतला जाण्याची प्रक्रिया बंद होते ('न्यूमोनिया') आणि मृत्यू ओढवितो. कोरोनाचे सुमारे पन्नास टक्के मृत्यू असे होत असावेत असा अंदाज आहे. रक्ताच्या गुठळ्या होऊन, त्यामुळे हृदय बंद पडूनही अनेक मृत्यू होतात. मात्र आत्तापर्यंत सर्वच देशांत कोरोना विषाणूच्या मानवाच्या शरीरातील उपस्थितीची चाचणी फारच कमी प्रमाणात झाली असल्यामुळे, किती संसर्गित माणसात किती मृत्यू होतात याची टक्केवारी सांगणे अवघड आहे. अर्ध्या टक्क्यापासून दोन टक्क्यापर्यंत सर्व अंदाज वर्तविले जात आहेत. याचाच अर्थ किमान ९८% लोक बरे होत आहेत, हे लक्षात घेणे.

सध्या वापरात असलेली विषाणूनाशक औषधे

१. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (आणि त्याच्या जोडीला अझिथ्रोमायसिन) - ही दोन्ही जुनी आणि सहज उपलब्ध अशी औषधे आहेत. अनेक डॉक्टरांच्या हाती या औषधांना कोरोनामध्ये उत्तम यश आले आहे. पण 'यांनी काही फरक पडला नाही' असे नकारात्मक रिपोर्ट्सही आले आहेत.

२. रेमडेसीव्हीर - अमेरिकेतील गिलियाड या कंपनीच्या या औषधाची मोठी मानवी चाचणी यशस्वी झाली आहे.
बाकी डझनावारी औषधांवर मानवी चाचण्या सुरू आहेत.

लसीकरण
लसीकरण म्हणजे विषाणूच्या एखाद्या महत्त्वाच्या भागाविरुद्ध मानवी शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडी नावाची प्रथिने) निर्माण करण्यासाठी शरीराच्या इम्यून सिस्टिमला उद्युक्त करणे. डझनावारी कंपन्या आणि संशोधन संस्था अशी लस (व्हॅक्सिन) निर्माण करण्याचे संशोधन करीत आहे. यात चीनमधली तीन, इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीचे एक आणि अमेरिकेतल्या दोन कंपन्यांच्या लशी संशोधनात आघाडीवर आहेत. ऑक्स्फर्डची लस मानवी पेशींनाच व्हायरस अँटीजेन निर्माण करायला शिकविते, ज्याला 'आर.एन.ए. व्हॅक्सिन' म्हणतात. ही लशीची सर्वात अद्ययावत पद्धत आहे. ही लस मानवात निर्धोक आहे ना, हे बघण्याच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि आत्तापर्यंतचे निकाल आशादायक आहेत. दुसऱ्या टप्प्यात, या लसीने रोगापासून प्रत्यक्ष संरक्षण मिळते, हे दोन-तीनशे लोकांत दाखवावे लागणार आहे. यासाठी दोन ते सहा महिने लागतील. हे यशस्वी झाल्यास अगदी या सप्टेंबरमध्येही, अतिशय गरजेच्या जागी ते वापरले जाऊ शकेल. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट या लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी कटिबद्ध आहे.
कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या निकटवर्तीयांनी करायच्या गोष्टी -
कोरोना विषाणू मानवी त्वचेतून आत शिरू शकत नाही. तो केवळ तोंड, नाक आणि डोळे यांच्या म्यूकस मेम्ब्रेनमधूनच शरीरात शिरू शकतो. यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या त्याच्या दोन मुख्य पद्धती असतात - 

अ. या तिन्ही जागी लागणारा तुमचा तळहात.

ब. संसर्गित माणसांनी शिंक, खोकला, बोलणे आणि श्वसनावाटे हवेत सोडलेले सूक्ष्म थेंब तुम्ही श्वासावाटे आत घेणे.
संसर्ग टाळण्याची सर्व काळजी ही मुख्यतः या दोन गोष्टींवर आधारित असते.

१. आपले हात दिवसातून निदान चार-पाच वेळा साबणाने एक पूर्ण मिनिट धुणे. विषाणूच्या बाह्य आवरणात जे स्निग्ध पदार्थ असतात, ते साध्या साबणाने एकमेकांपासून विलग होतात, ज्यामुळे विषाणूचे विघटन होते.

२. आपण ज्यांच्या संपर्कात येता, अशा सर्व पृष्ठभागांची ('सरफेसेस'ची) आपल्या मनात 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' अशी विभागणी करणे. सार्वजनिक पृष्ठभागांना हात लावताना प्लास्टिक हातमोजे नक्की घालणे. घरात किंवा ऑफिसात शिरताना ते हातमोजे बाहेरच काढून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे - उदा. प्लास्टिक बॅग. असा हातमोजा काढताना त्याच्या बाह्य भागाला उघडा हात लागू न देणे.

3. आपला मोबाइल फोन अल्कोहोल किंवा बाजारातले सॅनिटायझर्स वापरून वारंवार पुसत राहणे.

४. नाकातोंडाचा मास्क किंवा निदान चेहरा पूर्ण कव्हर करणारा स्कार्फ / रुमाल बांधूनच बाहेर जाणे.

५. डोळे वारंवार न चोळणे. बाहेर जाताना घट्ट गॉगल घालणे.

६. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोज निदान १५ मिनिटे जोरकस, दमविणारा व्यायाम.

७. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज पुढील व्हिटॅमिन्स घ्या - व्हिटॅमिन डी (१००० आय.यू.), व्हिटॅमिन सी (१००० मिलिग्रॅम, जमल्यास दोन हजार मिलिग्रॅम. यासाठी ५०० मिलिग्रॅमच्या गोळ्या दिवसभरात काही काही तासांनी. तुम्ही वैद्यकीय कर्मचारी असल्यास दिवसाला ६ ग्रॅम.) आणि एक मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट.

८. गर्दीशी संपर्क जमेल तितका टाळणे. शक्यतो घरी राहून काम करणे.

९. अनोळखी व्यक्तीशी बोलताना निदान सहा फूट दूर राहणे.

१०. मधुमेहावर आणि उच्च रक्तदाबावर उत्तम नियंत्रण.

११. दारू आणि मादक पदार्थ यांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. ते या काळात टाळणे.

१२. भाज्या किंवा फळे घेताना विक्रेत्याला ती थेट पिशवीत टाकायला सांगणे (किंवा स्वतः हातमोजे घालूनच हाताळणे). घरी आणल्यावर सॅनिटायझरने धुऊनच वापरणे.

१३. अधिक 'नाजूक' व्यक्तींना (७०+, कर्करुग्ण, फुप्फुसाचे आजार असणारे) अधिक संरक्षण आणि विलगीकरण देणे.

१४. सर्व मार्गांनी अनावश्यक 'ताण' कमी करणे - कामातला आणि कुटंबातला. आसपासच्या व्यक्तींच्या निदान ९० टक्के 'त्रासदायक' कृती सहज माफ करता येतात. अंगात क्षमाशीलता बाळगणे.

१५. सामाजिक पातळीवर सध्या आपण शरीराचे तापमान मोजून त्यातून वेगाने कोरोना शोधायच्या प्रयत्नात आहोत. ताप असल्यास कोरोनाचा संशय घेणे योग्यच आहे, पण 'ताप नाही म्हणजे कोरोना नाही!' हे समीकरण फारसे बरोबर नाही. त्याहून योग्य पर्याय म्हणजे बोटावर लावायच्या 'चापा'सारखे उपकरण (पल्स ऑक्सिमीटर) वापरून वेगाने रक्तातला ऑक्सिजन मोजणे. ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे ९२ टक्के किंवा त्याहून कमी झाले असल्यास ती कोरोनाची खूण असू शकते. त्याबरोबर श्वसनाला त्रास होत असणे (धाप लागणे), तसेच वास येण्याचे प्रमाण कमी होणे ही लक्षणे दिसत असल्यास हे निदान अधिक पक्के होते. हे काम शेकडो लोकांसाठी वेगाने करता येईल. हे दिसल्यास डॉक्टरने ताबडतोब तपासणे गरजेचे बनते.
या सर्व मार्गांनी आपण या आपत्तीवर मात करू शकू, असा विश्वास वाटतो. शुभेच्छा!