‘महिला सक्षमीकरण’ ध्यास घेतलेल्या श्रीमती उषा श्रॉफ

विवेक मराठी    02-May-2020
Total Views |
 **प्रथम वार्षिक पुण्यतिथी निमित्ताने उषाभाभींना विनम्र श्रद्धांजली!**

चंद्रहास देशपांडे

‘एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड’चे अध्यक्ष अश्विनभाई श्रॉफ यांच्या सुविद्य पत्नी आणि ‘एक्सेल इंडस्ट्रीज लि.’च्या व्हाईस चेअरपर्सन उषा अश्विन श्रॉफ यांना प्रथम वार्षिक पुण्यतिथी  निमित्ताने विनम्र श्रद्धांजली!


shrop_1  H x W:
‘एक्सेल इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून श्रॉफ परिवार गेली 75 वर्षे मुंंबई, कच्छ, गुजरात, रोहा, लोटे-परशुराम इ. ठिकाणी कार्यरत आहे. ‘एक्सेल इंडस्ट्रीज’च्या प्रगतीमध्ये उषाभाभींचा मोलाचा वाटा होता. मुंबई व कोकणच्या कामगारांप्रति त्यांचे अतूट नाते होते. कंपनीच्या कामांमध्ये त्यांची दूरदृष्टी अनेक वेळा अनुभवयास मिळाली आहे. उषाभाभी हे एक नीडर व्यक्तिमत्त्व. त्यांची धाडसी व साहसी वृत्ती अनेकांनी अनुभवली आहे. कंपनीच्या दैनंदिन कामामध्ये शिस्त व अनुशासनावर त्यांचा भर होता. वेळेच्या बाबतीत त्या अतिशय दक्ष होत्या. चिकाटी, योग्य व तत्काळ निर्णयक्षमता, विलक्षण बुद्धिमत्ता, सतत हसतमुख राहणे, कंपनीच्या कामगारांच्या परिवारास अडीअडचणींच्या प्रसंगी हजर राहून मदत करणे, कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देणे, योग्य व्यक्तीस पारखून त्यास जबाबदारी देणे, योग्य व्यक्तीस चांगल्या कामाचे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणे, या त्यांच्या विशेषतेमुळे अनेकांना उषाभाभी आपल्याशा वाटत. सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे हा त्यांचा सहज स्वभाव होता. कोणत्याही पत्रव्यवहारामध्ये चूक न होण्यासाठी त्या स्वतः पत्र वाचून त्यात सुधारणा करणे हेही त्यांचे वैशिष्ट्य होते.
कंपनीमध्ये कर्मचार्‍यांचा सत्कार-समारंभ असो, दीपावली-लक्ष्मीपूजन असो, नवीन वास्तू बांधकाम व पूजन असो, कर्मचार्‍यांना आर्थिक मदत असो, कंपनीतर्फे सामाजिक कार्य असो, कर्मचार्‍यांचा लग्नसोहळा असो इ. सर्व कामांमध्ये त्यांची वैयक्तिक उपस्थिती व मार्गदर्शन व्यवस्थापनास नेहमी मिळत असे. ‘एक्सेल’च्या बरोबरच रोहा येथे ‘अन्शुल केमिकल्स’, ‘वामन इंडस्ट्रीज’ इ. अनेक लहान कंपन्या त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या. त्यामध्ये अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाले. अनेक लघुउद्योजक त्यांनी तयार केले. अनेक कर्मचार्‍यांना त्यामध्ये त्यांनी भागीदारीही दिली.


स्वर्गीय उषाभाभी यांना कोकण खूप आवडायचे. कोकणातील महिलांच्या आरोग्याविषयी त्यांना खूप तळमळ होती. खासकरून येथील महिलांना कॅल्शियम, आयर्नची कमतरता असल्यामुळे उषाभाभींनी महिलांकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे करण्यास परवानगी देऊन, महिलांचे आरोग्य येथील उपलब्ध होणार्‍या भाजीपाला, अन्नधान्य याच्या साहाय्याने कशा प्रकारे संतुलित करता येईल, याचे प्रशिक्षण महिलांना दिले. त्याचा जवळजवळ हजारो महिलांना फायदा झाला.
उषाभाभी ‘सी. सी. श्रॉफ रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या चेअरपर्सन होत्या. कच्छ-मांडवीसारख्या वाळवंटी प्रदेशात या संस्थेतर्फे उषाभाभींच्याच प्रेरणेने अनेक शेतीविषयक प्रयोग करणे, पाण्याचे नियोजन करणे, मातीचे परीक्षण करून योग्य त्या पिकाची लागवड करणे, तसेच जनावर, जल, जमीन, जीवाणू व जनांचे आरोग्य सुधारणे यावर प्रयोगशाळेमध्ये संशोधन करण्याचे काम सातत्याने सुरू असते. कृषिपूरक उद्योगासंबंधी अनेक लोकोपयोगी कामे त्यांच्या प्रेरणेने सुरू आहेत. मांडवी येथे त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीत नवनवीन प्रयोग करून, त्या प्रयोगाचा फायदा शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे व शेतीमालाची उत्पादकता कशी वाढविता येईल, यासंबंधी उषाभाभींचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. त्यासाठी एक उत्तम प्रशिक्षण केंद्र असावे, ही त्यांची कल्पना होती. त्याप्रमाणे त्यांच्या सक्रीय सहकार्याने त्यांनी ते तेथे उभेही केले. त्यासाठी लागणारा निधी व साधनासाठीही त्यांनी मदत केली. आज अनेकांना त्याचा फायदा होत आहे. महाराष्ट्रातीलही अनेक शेतकर्‍यांनी मांडवी येथे जाऊन शेतीसंबंधी प्रशिक्षणही घेतले आहे.


कच्छ-मांडवी येथील ‘विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड टे्रनिंग इन्स्टिट्यूट’ व ‘विवेकानंद ग्रामोद्योग सोसायटी’ या संस्थेच्या त्या ट्रस्टी होत्या. कच्छच्या सामाजिक विकासामध्ये एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. सतत बदलते नैसर्गिक वातावरण, अनियमित पडणारा पाऊस इ. समस्यांमुळे कृषीव्यवसाय कसा यशस्वी करता येईल, यासंबंधी त्या सतत चिंतीत असत. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळत असे. या संस्थेच्या माध्यमातून रोहा व चिपळूण येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य त्यांनी सुरू केले व स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अनेक महिलांसाठी त्यांनी स्वयंरोजगार, आरोग्य, बचतगट, कृषिपूरक उद्योग यांची मुहूर्तमेढ रोवली.उषाभाभी या मताच्या होत्या की, कुठल्याही घराची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते. म्हणूनच त्यांनी ‘महिला सक्षमीकरण’ हा विषय घेऊन खेडोपाडी असणार्‍या महिलांना त्यांच्या अंगी असणारे गुणांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मदत करून स्वावलंबी बनविले.
उषाभाभींचे निधन होऊन आज एक वर्ष झाले. त्यांच्या निधनाने ‘एक्सेल इंडस्ट्रीज’चे मोठे नुकसान झाले आहे. ‘एक्सेल’च्या कामगार व कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाभीजी, आपण सर्वांना सोडून गेल्या. परंतु, आपल्या अनेक आठवणी या आम्हा सर्वांसाठी एक मोठा पथदर्शक ठेवा आहे. उषाभाभी शरीराने नसल्या तरी मनाने, त्यांच्या निर्णयक्षमतेने सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करीत राहणे इ. गोष्टींमुळे ‘एक्सेल’ परिवारातच आहेत, ही आमची सर्वांची भावना आहे. उषाभाभी त्यांच्या विचारांनी अजरामर आहेत. त्यांचे विचार सर्वांनी पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली! त्यासाठी परमेश्वर त्यांचे सुपुत्र रविभाई श्रॉफ, र्‍हीषितभाई श्रॉफ व ‘एक्सेल’ परिवाराला शक्ती देवो, ही प्रार्थना!
--------------------------------