शिकवण कोरोनाची - 11 (उद्योग)

विवेक मराठी    20-May-2020
Total Views |
चीनमधून ही उत्पादने सुरू झाली आणि निम्म्या भावात बाजारात उपलब्ध झाली. पुढे काही वर्षांनी आपल्या काही तरुण उद्योजकांनी तेथून दोन मशीन्स आणायचे ठरवले. एक उत्पादन करण्यासाठी आणि दुसरे उघडून पुन्हा जोडण्यासाठी. मशीन्स आली. एकावर उत्पादन सुरू झाले, दुसऱ्याला पूर्ण वेगळे करून पुन्हा जोडले आणि मग भारतात त्या मशीनरीचे उत्पादन निम्म्या किमतीत झाले. मशीन्स भारतात बनल्या. लोकांनी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि चीनच्या मालापेक्षा कमी किमतीत विकायला सुरुवात केली. पानिपतची कारखानदारी आणि बाजारपेठ पुन्हा सावरली. रिव्हर्स इंजीनिअरिंगचा अत्यंत यशस्वी प्रयोग म्हणून याकडे बघता येईल.

 Handloom Industry _1&nbs

मागील लेखात अन्न आणि निवारा याचा तपशिलात विचार झाला. आता वस्त्र ही माणसाच्या तिसरी मूलभूत आवश्यक गरज कशी विकसित पावली, ते बघू! मागे उल्लेख केल्याप्रमाणे, लज्जारक्षणासाठी वस्त्र आवश्यक झाले. पण हळूहळू माणसाचे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यामध्ये वस्त्रे महत्त्वाची भूमिका बजावतात, हे लक्षात आल्यावर माणसाने त्यात अनेक संशोधने केली. त्यातून फॅशन सुरू झाल्या आणि कापड उद्योग विकसित होत गेला. त्याचबरोबर हवामान वैविध्य जसे होते, तसे वस्त्र परिधान करण्याची पद्धत बदलत गेली. परिणामस्वरूप कपडा उद्योग हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला. आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळात ढाक्का येथील मलमल वस्त्र काडेपेटीच्या आकाराच्या पॅकिंगमध्ये मावले जायचे, असे म्हणतात. इतकी ती वस्त्रे तलम असायची. आजही आपल्या देशभरात अनेक भागांत वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रनिर्मिती होते.
पारतंत्र्याच्या काळात येथील कारखाने बंद करून इथला कापूस इंग्लंडला नेऊन तेथील तयार माल भारताच्या बाजारपेठेत पुन्हा विकला जाऊ लागला होता. आजही ग्रामीण भागात हा हस्तकलेतून तयार होणारा कापड उद्योग जिवंत आहे, पण त्याला संजीवनी देण्याची गरज आहे. जन्मजात हस्तकौशल्य असणारे ग्रामीण भागातील कुशल कामगार अत्यंत कमी मोबदला घेऊन आपल्या कलाकुसरीचा उपयोग करू देतात, हे थांबवले पाहिजे. त्यांच्या कलेला पुरेसा वाव देऊन त्यांना योग्य मोबदला देणे ही काळाची गरज आहे.

अशा या महत्त्वाच्या उद्योगाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय उपयोग करून घेता येईल याचा विचार करावा लागणार आहे. देशभरात अनेक यंत्रमाग (पॉवर लूम्स) बंद आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर भिवंडी, इचलकरंजी, नगर, सोलापूर ही एकेकाळी कापड उद्योगाची केंद्रे होती. (इचलकरंजीला तर 'भारताचे मँचेस्टर' म्हटले जायचे.) ज्याप्रमाणे येवल्याच्या पैठणी कलेचे पुनरुज्जीवन झाले आणि तेथे भरभराट सुरू झाली, त्याप्रमाणे अशा सर्व ठिकाणी सरकारने धोरणात्मक योजना आखली, जर अशा उद्योगाला आवश्यक ते कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रे उभी केली आणि कच्च्या मालाची कमीत कमी वाहतूक करण्यासाठी अशा परिसरात कापसाची शेती शास्त्रीयदृष्ट्या विकसित केली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारी खूप शक्ती या व्यवसायात आहे. कापसाची प्राथमिक प्रक्रिया केंद्रे ग्रामीण भागात करणे ही काळाची गरज आहे. जिनिंग किंवा कॉटन मिल या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. रेशीम उद्योग हासुद्धा एक असाच शेतीपूरक व्यवसाय आहे. हे दोन्ही व्यवसाय एकाच वेळेस शेती आणि उद्योग यांना चांगले दिवस आणू शकतात.

इटलीतील ज्या शहरात कोरोनाचा स्फोट झाला, ते जगातील आधुनिक फॅशन केंद्र आहे. आता जीवनशैलीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर स्वभाविकच भारतीय पद्धतीचा आचार-विचार जसा प्रभावी ठरणार आहे, तसा भारतीय पोशाखही महत्त्वाचा ठरणार आहे. शरीरप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांपेक्षा संसर्गापासून सुरक्षा देणारे कपडे हा भारतीय सिद्धान्त वस्त्राच्या दुनियेत निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीने कापड उद्योगाची वाटचाल होऊ शकते.


 Handloom Industry _1&nbs
येवल्याची पैठणी, गुजराथची आणि राजस्थानची बांधणी, वाराणसीची बनारस सिल्क, बंगालचे कॉटन हे जगभरातले ब्रँड होऊ शकतात. कापड उद्योगात चादर, ब्लँकेट हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. पानिपत हे आपल्याला युद्धासाठी माहीत आहे, पण चादर आणि ब्लँकेट बनवणाऱ्या कारखान्यांचे हे माहेरघर. सगळ्या देशभरात आणि जगभरात येथून माल जात होता. पण मध्यंतरी या व्यवसायाला ग्रहण लागले. चीनमधून ही उत्पादने सुरू झाली आणि निम्म्या भावात बाजारात उपलब्ध झाली. पुढे काही वर्षांनी आपल्या काही तरुण उद्योजकांनी तेथून दोन मशीन्स आणायचे ठरवले. एक उत्पादन करण्यासाठी आणि दुसरे उघडून पुन्हा जोडण्यासाठी. मशीन्स आली. एकावर उत्पादन सुरू झाले, दुसऱ्याला पूर्ण वेगळे करून पुन्हा जोडले आणि मग भारतात त्या मशीनरीचे उत्पादन निम्म्या किमतीत झाले. मशीन्स भारतात बनल्या. लोकांनी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि चीनच्या मालापेक्षा कमी किमतीत विकायला सुरुवात केली. पानिपतची कारखानदारी आणि बाजारपेठ पुन्हा सावरली. रिव्हर्स इंजीनिअरिंगचा अत्यंत यशस्वी प्रयोग म्हणून याकडे बघता येईल.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास प्राप्त परिस्थितीत खूप काही करता येईल. आता भविष्यात PPE अनेक ठिकाणी लागू शकते. जसे रेनकोट किंवा स्वेटर, तसे हे एक वस्त्र म्हणून गरजेचे होणार आहे, कारण संसर्ग - मग तो नैसर्गिकरीत्या पसरणारा किंवा जैविक अस्त्र म्हणून पसरवला जाणारा, कशाही स्वरूपाचा असू शकतो, त्यासाठी लागणारे संरक्षण कवच ही काळाची गरज आणि जगाची मागणी असणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कापड आणि त्यापासून असे संरक्षक वस्त्र बनवणे हा मोठा उद्योग असेल. मास्क हे असेच मागणी असणारे दुसरे उत्पादन असेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योग्य विचार केला, तर काय घडू शकते याचे उदाहरण नगरसारख्या छोट्या एमआयडीसीमध्ये घडले. लॉकडाउनमध्ये पुढे काय? हा यक्षप्रश्न घेऊन सगळे काळजीत असताना नगरमधल्या एका उद्योजकाने (सुनीलजी कानवडे यांनी) मास्क बनवण्याची मशीनरी मागवली आणि मास्कच्या ऑर्डर्स मिळवल्या बाहेर देशांमधल्या! आणि उद्योग व्यवसायाला परवानगी मिळाल्यानंतर उत्पादन सुरू केले. केवळ एका देशाकडून त्यांना ५० लाख मास्क्सची ऑर्डर मिळाली. काल चीनमधील काही दृश्ये दाखवत होते, त्यात शाळा सुरू झाल्या आहेत, पण सॅनिटायझेशन आणि मास्क तेथे आहेतच. ही दृष्टी ठेवून आम्ही वाटचाल केली, तर निश्चितच या विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढू शकतो. गरज आहे अशा सुनील कानवडे यांच्यासारख्या उद्योजकांना सरकारी पातळीवर आणि सामाजिक पातळीवर प्रोत्साहन देण्याची.
तीच परिस्थिती ग्लोव्ह्जची असणार आहे. त्याचे उत्पादन खूप लागणार आहे. त्यासाठीसुद्धा उद्योजकांनी विचार केला पाहिजे. उत्पादित मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरल्यानंतर निर्माण होणारा कचरा कशा प्रकारे पुनर्चक्रित करता येईल आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, हासुद्धा विचार आवश्यक आहे.
भारत हा असा देश आहे, येथे सर्व प्रकारचे ऋतू आहेत. चेरापुंजी आहे, तसे राजस्थानचे आणि कच्छचे रखरखीत वाळवंटसुद्धा आहे. अत्यंत थंडी आहे आणि आत्यंतिक उन्हाळासुद्धा आहे. त्यामुळे जगातील सर्व हवामानात सोयीचे अशा सर्व प्रकारची कापड निर्मिती आणि रजई, ब्लँकेट, चादर यांना जगभरातून मागणी येऊ शकते. सोलापूर येथील चादर जगभरात पोहोचली पाहिजे. राजस्थानची उबदार रजाई थंड प्रदेशात पोहोचू शकते. काश्मिरी शाल जगभरात पोहोचली आहे. पण या सगळ्याचे ब्रॅंडिंग होणे गरजेचे आहे. वस्त्रोद्योगामध्ये आवश्यक असणारा तांत्रिक कुशल वर्ग आपल्याकडे खूप कमी प्रमाणात निर्माण होतो, तो कसा अधिक निर्माण होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

हे सगळे या पद्धतीने झाले, तर वस्त्र ही माणसाची तिसरी मूलभूत गरजसुद्धा आपल्याला उद्योग व्यवसाय म्हणून विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात आणता येईल.

नीरक्षीरविवेक.