ही भुई धोपटणं बंद करा!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक22-May-2020
|
विरोधी पक्षनेता हा शत्रू नसतो, राज्यावरच्या संकटाच्या वेळी सगळे मतभेद मनाआड करत त्याची मदत घ्यायची असते, हा राजकारणातला प्राथमिक धडाही मुख्यमंत्री विसरले आहेत. आणि आज जेव्हा राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करायला भाजपा मैदानात उतरला, तेव्हा त्यांनाच 'राजकारण करू नका' असा मानभावी सल्ला द्यायला, त्यांच्याविरोधात गरळ ओकायला मुख्यमंत्र्यांसह तिघाडीतले आजवर निद्रिस्त असलेले तथाकथित महारथी सरसावले आहेत.

cm_1  H x W: 0  

महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची, कोरोना या महामारीने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ जितकी दैना उडवली आहे, त्याहूनही अधिक वाताहत निर्णयशून्य शासन आणि हतबल प्रशासनामुळे झाली आहे. 'तीन तिघाडा नि काम बिघाडा' ही म्हण कृतीतून सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर असल्यासारखा, फक्त नावातच विकास असलेल्या या आघाडीचा कारभार चालू आहे. त्याची फळं भोगावी लागताहेत आणि दीर्घकाळ भोगावी लागतील ती, त्यांना सत्तेवर न बसवणाऱ्या जनतेला. आतापर्यंत एकमेकांची उणीदुणी चारचौघांत काढणारे, भिन्न भिन्न - खरं तर परस्परविरोधी अशा राजकीय विचारसरणीवर ज्यांची उभारणी झाली आहे, असे तीन पक्ष निव्वळ सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र येतात आणि निर्विवाद बहुमत ज्याच्या बाजूने आहे, अशा पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यातून आसुरी आनंद मिळवतात, अशांकडून फार नैतिक कारभाराची अपेक्षाही नव्हती. मुळात ही अभद्र आघाडी जनहित डोळ्यासमोर ठेवून कारभार करेल का, हीच शंका त्यांनी सत्ता हाती घेतल्यापासून भेडसावत होती.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

सत्तेच्या राजकारणाचा शून्य अनुभव असतानाही मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात येनकेन प्रयत्नाने मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि त्याच क्षणापासून दोन बायकांचा दादला होण्याचं दुर्भाग्य त्यांच्या वाट्याला आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांची सोयरीक जुनी असली, तरी त्यांच्यात तेव्हापासूनच असलेला बेबनाव कधीच झाकून राहिला नव्हता. या दोघांच्या तावडीत अननुभवी मुख्यमंत्री सापडले आणि हे कमी म्हणून की काय, कोरोनासारखं महासंकट या अभद्र आघाडीची आणि मुख्यमंत्र्यांची परीक्षा पाहायला येऊन उभं ठाकलं. अजून नव्याचे नऊ दिवस संपलेही नव्हते, सत्तेचं सुख नुकतंच कुठे भिनू लागलं होतं, तोवर कोरोना दैत्य मानगुटीवर येऊन बसला आणि मुख्यमंत्र्यांची मजा पाहत दोन्ही साथीदारांनी उपरण्याला मारलेली गाठ हळूहळू सोडवायला सुरुवात केली. सौजन्याचा परिपाक असलेला मुख्यमंत्री महोदयांचा चेहरा, भाबडेपणापेक्षाही राज्यकारभारातल्या अपरिपक्वतेची साक्ष असलेलं त्यांचं बोलणं यामुळे काही काळ जनता भुललीही, पण जेव्हा जनतेच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तेव्हा त्यांच्या भाबडेपणावर विश्वास ठेवणं जनतेला कठीण जाऊ लागलं. गेल्या दोन महिन्यांत या अभूतपूर्व संकटात सर्व मंत्रीमंडळ आणि तिन्ही पक्ष यांच्यात एकवाक्यता आहे असं कुठेच निदर्शनाला आलं नाही. मान्य आहे की राज्यालाच नव्हे, तर देशाला, जगालाच या संकटाने घेरलं आहे. पण नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारातलं सातत्य फक्त महाराष्ट्रानेच राखलं आहे. कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या आकडेवारीत देशात अव्वल स्थान महाराष्ट्राचं आहे. त्यातही मुंबई आणि तिच्या आसपासचा परिसर हा सर्वाधिक बाधित आहे. लॉकडाउनच्या चौथ्या कालखंडातही या स्थितीत बदल झालेला नाही. लोकांना एकमेकांपासून दूर ठेवून आणि घरात डांबल्यानेच कोरोनाचं संकट निघून जाणार नाहीये. तो संसर्ग रोखण्याचा एक प्रभावी उपाय असला, तरी एकमेव नाही. त्याचबरोबर अनेक प्रभावी उपाययोजना समांतरपणे होण्याची गरज होती, आहे. त्याऐवजी झालं ते भोंगळ आणि गोंधळलेल्या कारभाराचं दर्शन.

आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/

या दोन महिन्यांत सौजन्यशील बोलण्यापलीकडे नावाजली जावी अशी एकही ठळक कृती आजवर मुख्यमंत्र्यांकडून झाली नाही. पूर्ण पाच वर्षं यशस्वी राज्यकारभार करणाऱ्या आणि आज विरोधी पक्षनेतेपदी असतानाही राजधर्माचं पालन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला घ्यावासा वाटला नाही की घेऊ दिला गेला नाही? केंद्र लष्करी मदत द्यायला तयार असतानाही, एरव्ही कुठे दिसत नसलेला इगो कुरवाळत ती मदत नाकारण्याचा बाणेदारपणा मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या सल्ल्याने (की आदेशाने?) दाखवला? देशाची आर्थिक राजधानी हे राज्याच्या राजधानीला मिळालेलं बिरुद एका रात्रीत मिळालेलं नाही. वर्षानुवर्षं झालेल्या हजारोंच्या कष्टांचं सिंचन त्याला कारणीभूत आहे. आज हे बिरुद मुंबईच्या गळ्यातून निघालं, तर त्याला जबाबदार कोण असेल? त्याचे किती गंभीर आणि दूरगामी परिणाम या राज्यावर होतील, याची कल्पना या तिघाडीतल्या एकाला तरी आहे का?
विरोधी पक्षनेता हा शत्रू नसतो, राज्यावरच्या संकटाच्या वेळी सगळे मतभेद मनाआड करत त्याची मदत घ्यायची असते, हा राजकारणातला प्राथमिक धडाही मुख्यमंत्री विसरले आहेत. आणि आज जेव्हा राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करायला भाजपा मैदानात उतरला, तेव्हा त्यांनाच 'राजकारण करू नका' असा मानभावी सल्ला द्यायला, त्यांच्याविरोधात गरळ ओकायला मुख्यमंत्र्यांसह तिघाडीतले आजवर निद्रिस्त असलेले तथाकथित महारथी सरसावले आहेत. सत्तेच्या राजकारणाचे पाठ शिकण्याआधीच उभ्या ठाकलेल्या संकटाने गोंधळलेल्या मुख्यमंत्र्यांना दिग्भ्रमित करण्याचा कुटिल डाव खेळण्यात तिघाडीतले दोघे मग्न आहेत.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या अस्तनीत एकाच वेळी दोनदोन सापांची वस्ती आहे. आणि साप, साप म्हणत तिसऱ्यालाच धोपटण्याचा हास्यास्पद प्रकार सुरू आहे. अजिबात आश्वस्त न करणारं तुमचं गुळमुळीत, कोमट बोलणं थांबवून ठोस कृती करायला मैदानात या. वाघ वगैरे वल्गना राहू द्यात बाजूला, त्याचं कागदीपण कधीच उघड झालं आहे. मात्र राज्याचा प्रमुख म्हणून तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते धडाडीने करा... त्याचे योग्य परिणाम दिसू लागले तर तुमच्या शब्दांवर जनतेचा विश्वास बसेल.
वडिलांना दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतलात, त्या गादीचा लौकिक सांभाळा. ही फुकाची भुई धोपटणं बंद करा.