सार्वत्रिक लसीकरण - कोरोनाविरुद्धचा एक महत्त्वाचा उपाय

स्रोत: विवेक मराठी    दिनांक23-May-2020
|
***मिलिंद पदकी***

मोठी साथ चालू असताना, सध्या चालणारे लशींच्या जोखमींचे चुकीचे आणि अतिरेकी निदान आणि त्यामुळे त्यांची निर्मिती 'रखडविणे' हे अजिबात मान्य होण्यासारखे नाही. लशीच्या वापरातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर 'जोखमीं'मुळे कंपन्याही वेगाने पुढे जायला कचरतात. अशा जोखमींवर त्या कंपन्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे. विधिमंडळांनी सरकारला, खाजगी कंपन्यांवर, जरूर त्या लशींचे उत्पादन करण्याची सक्ती करण्याची कायदेशीर सत्ता द्यावी.

Coronavirus, Vaccine, Cov
१७९६च्या आसपास इंग्लंडमध्ये एडवर्ड जेन्नर या डॉक्टरच्या लक्षात आले की गाईंचे दूध काढणाऱ्या मुलींना देवीचा रोग होत नाही. गाईंच्या आचळावरचे फोड त्या मुलींच्याही हातावर दिसत. त्याला 'काऊ-पॉक्स' असे नाव होते. १४ मे १७९६ या दिवशी त्याने बारा वर्षाच्या एका मुलाला ते मटेरियल टोचले. बारा दिवसांनी त्याने आजच्या दिवसात केवळ अनैतिक मानली जाईल अशी गोष्ट केली - देवीचा जिवंत विषाणू त्या मुलाला टोचला. त्या मुलाला देवी आल्या नाहीत. हे होते पहिले 'लसीकरण', ज्याचा वेगाने सर्वत्र प्रसार झाला. जेन्नरच्या कामावरून धडा घेत वैज्ञानिकांनी गेल्या दोन शतकांत अनेक घातक रोगांविरुद्ध यशस्वी लसीकरण केले - पोलिओ, कांजिण्या, कावीळ इ. 
आता सध्याच्या कोरोना विषाणूकडे येऊ या. सरकारच्या 'प्रतिबंधात्मक' उपायांमुळे विषाणूच्या प्रसाराचा वेग पुष्कळच कमी होऊ शकतो, पण तो शून्यावर कधीच येऊ शकत नाही. तसेच एकदा निर्बंध उठविले की काही प्रमाणात लागण सुरू होतेच. याउलट अगदी 'मध्यम' क्षमतेची लससुद्धा हॉस्पिटल्सवरचा ताण खूपच कमी करू शकते. भारतीयांना सध्याच्या कोरोना विषाणूविरुद्ध संरक्षण देण्यासाठी आणि कोरोनाने विस्कळीत झालेली भारताची अर्थव्यवस्था वेगाने सुरू करण्यासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.

लसीकरण म्हणजे विषाणूच्या एखाद्या महत्त्वाच्या भागाविरुद्ध मानवी शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) नावाची प्रथिने निर्माण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकार संस्थेला (इम्यून सिस्टिमला) उद्युक्त करणे. लशी या रोगप्रतिबंधक म्हणून काम करतात, झालेल्या रोगावर उपचार म्हणून नव्हे! आधुनिक लशी (व्हॅक्सिन्स) अत्यंत निर्धोक असतात. त्यांची निर्मिती सरळसोट पद्धतीने करता येते आणि जवळपास सर्व विषाणूंविरुद्ध त्या खात्रीशीर काम करतात. (डी.एन.ए., आर.एन.ए., प्रथिन, अँटीजेन, अँटीबॉडी या वैज्ञानिक शब्दांचे अर्थ लेखाच्या शेवटी दिले आहेत.)

पहिला टप्पा - 'न्यूक्लिओटाइड व्हॅक्सिन' - विषाणूच्या आवरणावरच्या एखाद्या संबंध प्रथिनाची (अँटीजेन'ची) निर्मिती मानवी पेशींकडूनच करून घेणासाठी ते प्रथिन निर्माण करणारा विषाणूच्या आर.एन.ए.चा तुकडा एखाद्या वाहकाबरोबर मानवी पेशीत पाठविणारी लस. ही वेगाने निर्माण करता येते, दुर्बल प्रतिकारशक्तीवाल्या लोकांसाठीही ती निर्धोक असते. मात्र तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घडवून आणणे महाग असते.

मानवाला जर 'आर.एन.ए.'ची उघडी, कव्हर नसलेली माळ टोचली, तर रक्तातली विकरे (एन्झाइम्स) तिचे ताबडतोब तुकडे तुकडे करतात आणि ती पेशींच्या अंतर्भागात पोहोचून आपले काम करू शकत नाही. त्यासाठी ते अडिनोव्हायरस नावाच्या विषाणूला जोडून (ऑक्स्फर्ड व्हॅक्सिन) किंवा स्निग्ध पदार्थांच्या अत्यंत लहान बुडबुड्यात घालूनच (मॉडर्ना व्हॅक्सिन) मानवाला टोचले जाते.
 
'S' प्रथिन हेच अँटीजेन घेऊन किमान ८ कंपन्या लस विकसित करत आहेत. पेशी आणि प्राण्यांवरील प्रयोगाचे रिझल्ट्स बघून फेज १ला परवानगी दिली जाते, तशी ती तीन वेगवेगळ्या कंपन्यांना, पाच-सहा वेगवेगळ्या देशांनी दिली आहे (चीन, अमेरिका, भारत, कॅनडा, इंग्लंड.)

२. मृत व्हायरस किंवा त्याचे भाग यांच्या लशी : (हे जुने तंत्रज्ञान आहे. अनेक दशके हे आपल्याला माहीत आहे : मिलिंद) : यांचे उत्पादन सोपे असते आणि दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठीही हे निर्धोक असते.

३. जिवंत विषाणू लस - यात रसायने, उष्णता किंवा किरणोत्सर्ग वापरून विषाणू 'अर्धमेला' केला जातो. त्यामुळे तो धोकादायक राहत नाही! यांचे उत्पादन सोपे असते आणि त्यातून भक्कम प्रतिकारशक्ती निर्माण होते.

वर दिलेल्या लशीच्या निर्मिती-प्रणालीसाठी, एफ.डी.ए.तर्फे उगाचच आणल्या जाणाऱ्या 'कायदेशीर' अडचणी काढून टाकाव्या लागतील. लशी या अत्यंत निर्धोक असतात, त्यांची निर्मिती सरळसोट पद्धतीने करता येते आणि जवळपास सर्व विषाणूंविरुद्ध त्या खात्रीशीर काम करतात. युद्धपातळीवर लशींचे उत्पादन करणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. काही आठवड्यांत किंवा थोड्या महिन्यांत ती निर्माण करणे आज शक्य आहे. त्यांचा समाजातला पहिला उपयोग हीच 'चाचणी' मानली जावी. त्यांचा फायदा आणि जोखीम, दोन्ही पाहिले जावे आणि ती गरिबांचे आयुष्य आणि पैसा किती वाचवितात हेही पाहिले जावे.
मोठी साथ चालू असताना, सध्या चालणारे लशींच्या जोखमींचे चुकीचे आणि अतिरेकी निदान आणि त्यामुळे त्यांची निर्मिती 'रखडविणे' हे अजिबात मान्य होण्यासारखे नाही. लशीच्या वापरातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर 'जोखमीं'मुळे कंपन्याही वेगाने पुढे जायला कचरतात. अशा जोखमींवर त्या कंपन्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे. विधिमंडळांनी सरकारला, खाजगी कंपन्यांवर, जरूर त्या लशींचे उत्पादन करण्याची सक्ती करण्याची कायदेशीर सत्ता द्यावी.
लशींच्या धोक्यांचे अतिशयोक्त निदान आणि त्यांविरुद्ध उचलली गेलेली अतिरेकी पावले

वायेथ या कंपनीच्या 'रोटाशील्ड' नावाच्या लशीमुळे ५ लोकांमध्ये 'आतडी एकमेकांवर चढण्याचा' प्रॉब्लेम झाला आहे असे मानून ती बाजारातून मागे घेतली गेली. आतड्यांचा हा विकार सहज बरा करता येतो. समजा, लशीमुळे तो झाला असे मानले, तरीही त्या लशीला पर्याय निर्माण होईपर्यंत ती बाजारातून हटविणे चुकीचे होते. त्या काळात (२००० साली) दर वर्षाला सुमारे ५ लाख मुले रोटाव्हायरसने मरत होती. नवीन लस यायच्या आधीच्या काळात ४० लाख मुलांचे लस-छत्र हरपले. यात अमेरिकेतली ३२० आणि युरोपातली १८०० मुलेही होती.
२०१४च्या इबोलाच्या साथीत अनेक लशींच्या विकासावर काम चालू होते. पण ती वापरात आणण्याच्या दिरंगाईमुळे आफ्रिकेत सुमारे २८,८५२ लोक मरण पावले. आफ्रिकन देशांची जबरदस्त आर्थिक वाताहत झाली. सहा महिन्यांत लायबेरियाची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. २०१८च्या इबोला साथीतही लशीच्या दिरंगाईमुळे किमान ३००० लोक मरण पावले. अखेर क्वारंटाइनमुळे ती साथ आटोक्यात आली.
 
डझनावारी कंपन्या आणि संशोधन संस्था अशी लस (व्हॅक्सिन) निर्माण करण्याचे संशोधन करीत आहेत. यात चीनमधल्या तीन, इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीची एक आणि अमेरिकेतल्या दोन कंपन्याच्या लशी संशोधनात आघाडीवर आहेत.
ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या 'ChAdOx1 nCoV-19' नावाच्या ज्या लशीचे पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन करायचे ठरविले असून, तिच्या निर्धोकतेच्या (पहिल्या टप्प्याच्या ) चाचण्या भारतात सुरू होत आहेत, ती वर दिलेल्या 'न्यूक्लिओटाइड व्हॅक्सिन' या प्रकारची आहे. ही लशीची सर्वात अद्ययावत पद्धत आहे. ही लस मानवात निर्धोक आहे ना, हे बघण्याच्या 'पहिल्या टप्प्याच्या' चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि आतापर्यंतचे निकाल आशादायक आहेत.


Coronavirus, Vaccine, Cov
लशीच्या संशोधनात एक मोठी अडचण अशी आहे की तुम्ही लसीकरण केलेल्या माणसात अँटीबॉडीज तयार झाल्याचे दाखवू शकता. पण या अँटीबॉडीज विषाणूविरुद्ध संरक्षण देत आहेत, हे थेट सिद्ध करू शकत नाही. त्यासाठी जेन्नरप्रमाणेच, लसीकरण केलेल्या काही माणसांना जिवंत विषाणू टोचून रोग होत नाही हे दाखवावे लागेल, जे आजच्या काळात अशक्य आहे (प्राण्यांमध्ये ते दाखविलेले असते!). तसे करता यावे, यासाठी एका अमेरिकन खासदाराने कंपन्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला आहे, त्याविरुद्ध प्रचंड बोंबाबोंब चालू आहे. लसीकरण केलेल्या एका मोठ्या मानवी संख्येला कोविड-१९ होत नाही, हे संख्याशास्त्रीय पातळीवर दाखविणे एवढेच संशोधनकर्त्यांच्या हातात आहे.
 
दुसऱ्या टप्प्यात, या लशीने रोगापासून प्रत्यक्ष संरक्षण मिळते हे दाखविण्यासाठी पाच हजार लोकांना ती दिली जाणार आहे. यासाठी दोन ते सहा महिने लागतील. हे यशस्वी झाल्यास अगदी या सप्टेंबरमध्येही, अतिशय गरजेच्या जागी ती वापरली जाऊ शकेल. 
 
ऑक्स्फर्ड विद्यापीठाशी याबाबत तीव्र स्पर्धा करणाऱ्या 'मॉडर्ना फार्मा'चा लशीच्या विकासाचा जबरदस्त वेग -
 
११ जानेवारी २०२० - चीनने विषाणूचा जनुकीय क्रम (जेनेटिक सिक्वेन्स) प्रकाशित केला.
 
१३ जानेवारी २०२० - मॉडर्ना फार्माने अमेरिकेच्या सरकारच्या मदतीने लशीसाठी त्याचा कोणता भाग किंवा 'जनुक' (जीन) वापरायचा ते नक्की केले (२ दिवसात!!!) आणि ताबडतोब चाचणीसाठी लसनिर्मितीचे काम सुरू केले. हे जनुक (जीन) विषाणूच्या आवरणावरचे 'S' हे प्रथिन बनविते. ते वापरून हे प्रथिन बनवायला मानवी पेशींनाच ही लस शिकविते. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकार संस्थेला (इम्यून सिस्टिमला) 'S' प्रथिन या अँटीजेनचा पुरवठा उत्तम प्रमाणात, बराच काळ चालू राहतो.

७ फेब्रुवारी २०२० - लशीची पहिली क्लिनिकल बॅच तयार झाली.

२४ फेब्रुवारी २०२० - प्रयोगशालेय दर्जा-चाचण्या पूर्ण होऊन अमेरिकन सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकडे ही बॅच क्लिनिकल चाचणीसाठी रवाना झाली.

१६ मार्च २०२० - पहिल्या रुग्णाला या बॅचचे इंजेक्शन दिले गेले.

१८ मे २०२० - मानवांमध्ये अँटीबॉडीज करण्यात ही लस १०० टक्के यशस्वी ठरल्याची बातमी आली.
'नॉर्मल' वेळापत्रकानुसार याला चार ते पाच वर्षे लागली असती. मॉडर्नाने हे काम १२६ दिवसांत पूर्ण केले.
या वेगाने जगाला थक्क केले आहे. या स्पर्धेतून मानवजातीला लवकरच एक चांगली लस मिळेल, अशी आशा करू या!
xxx

काही वैज्ञानिक शब्दांचे अर्थ (आधुनिक जीवशास्त्र समजण्यासाठी हे शब्द समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. थोडेसे क्लिष्ट वाटले, तरी समजून घ्यायला हे फार अवघडही नाही.)

१. डी.एन.ए. : पेशींच्या केंद्रकात बसणारा पेशीचा संचालक. सहा अब्ज न्यूक्लीइक ऍसिड्सची ही लांबलचक माळ, प्रथिनांच्या निर्मितीची मूळ माहिती साठवून असते. हा संचालक पेशीला हव्या त्या प्रथिनाची निर्मिती करण्याच्या सूचना नेणारे 'संदेशवाहक' आर.एन.ए. बनवून केंद्रकाबाहेर, पेशीच्या (पेशीद्रव्यामध्ये) सायटोप्लाझ्ममध्ये पाठवितो, जिथे रायबोसोम नावाचे लहानसे 'इंद्रिय' त्या सूचना वाचून त्या प्रथिनाची निर्मिती करते.

२. आर.एन.ए. - प्रथिन-माळांची निर्मिती करण्यासाठी, त्यातील मण्यांचा क्रम काय असावा हे सांगणाऱ्या 'कोड'ची माळ. याची रासायनिक संरचना डी.एन.ए.च्या अगदी जवळची असते. तीन-तीन न्यूक्लीइक आम्ले या 'कोड'नुसार ठरलेल्या विशिष्ट अमिनो ऍसिडला पकडून, रायबोसोमवर निर्माण होत असलेल्या प्रथिनाच्या माळेत घालण्यासाठी योग्य स्थानी 'उभे' करतात.

३. प्रथिन - अमिनो ऍसिड नावाच्या लहान संयुगांची बनलेली लांबलचक माळ. वीस नैसर्गिक अमिनो ऍसिड्स आहेत. पाण्यात टाकले की काही मायक्रोसेकंदात, पाण्याबरोबर सौम्यशी प्रक्रिया होऊन, प्रथिने 'त्रिमित' आकार धारण करतात, ज्याशिवाय ती काम करू शकत नाहीत. शरीरातली सर्व 'कामे' मुख्यतः प्रथिने करतात.
 
४. अँटीजेन - थोडक्यात सांगायचे तर परके प्रथिन. शरीरात घुसलेले विषाणू, जीवाणू, अमिबा (अगदी दुसऱ्या मानवाची प्रत्यारोपण केलेले मूत्रपिंडसुद्धा) यांच्या बाह्य आवरणावरची प्रथिने पाहून आपल्या रोगप्रतिकार संस्थेला (इम्यून सिस्टिमला) 'आक्रमण' चालू असल्याचा संदेश मिळतो. (प्रथिनाबरोबर स्निग्ध पदार्थ किंवा आर.एन.ए. असेल, तर तेही अँटीजेन म्हणून काम करू शकते.)

५. अँटीबॉडी - अँटीजेनच्या विरोधात शरीराने निर्माण केलेली स्वतःची प्रथिने, जी जंतू नष्ट करण्याच्या कामात निरनिराळ्या प्रकारे मदत करतात. यातले IgG हे प्रथिन लसीकरणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे. हे शरीरात दीर्घ काळ निर्माण होत राहते. उदा., २००२च्या पहिल्या 'सार्स'च्या या अँटीबॉडीज बारा वर्षांपर्यंत रक्तात आढळतात. मर्स या २०१२च्या दुसऱ्या कोरोना विषाणूच्या सुमारे २ वर्षे. सध्याच्या (सार्स - कोव्ह-२) कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज किती दिवस टिकतील हे अजून ज्ञात नाही, पण वर्ष-दोन वर्षे तरी नक्कीच! त्यानंतर लशीचा 'बूस्टर' डोस देऊन त्यांची निर्मिती चालू ठेवता येईल.