शिकवण कोरोनाची - 8

विवेक मराठी    06-May-2020
Total Views |

gurukul_1  H x

***शिक्षण***
'ब्युटीफुल ट्री' नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्याचे लेखक आहेत धर्मपाल. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना एकदा खड्सावत असताना भारतीय शिक्षण व्यवस्थेचे वर्णन‌ 'ब्युटीफुल ट्री' असे केले होते आणि "You Destroyed it" असा त्यांच्यावर आरोप केला होता. या घटनेचा संदर्भ घेऊन धर्मपाल यांनी ब्रिटिश गॅझेटचा आधार घेत हे पुस्तक लिहले. ते वाचल्यावर कळते की खरेच, आक्रमक‌ येण्यापूर्वी आणि पारतंत्र्यपूर्व काळात भारतीय शिक्षण किती प्रगत होते.

 
त्याचे काही संदर्भ घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करायचे म्हटले की स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणवणारेच भगवेकरणाची बांग देतात. अर्थात याला कारणही आहे - स्वतःला कितीही गांधीवादी म्हणत असले, तरी ही मंडळी मेकॉलेचे बळी आहेत, हे येथे लक्षात घ्यावे लागेल. कोरोना पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विचार करताना मेकॉले पॅटर्न - जो अजूनही आमच्या शिक्षण पद्धतीत घुसलेला आहे, तो काढून टाकावा लागेल. आज कोरोनानंतर पुढील २५ वर्षे कुठल्या प्रकारची आवाहने आणि आव्हाने आपल्यासमोर उभी राहणार आहेत, याचा विचार करावा लागणार आहे. त्याप्रमाणे दोन प्रकारे विचार करावा लागेल - दीर्घकालीन आणि लगेच असा!

शिक्षणाचा हेतू काय असावा? या मूलभूत प्रश्नापासून आम्हाला सुरुवात करण्याची गरज आहे. पूर्वी प्राचीन काळात गुरुकुल परंपरेत शास्त्र आणि शस्त्र असे दुहेरी शिक्षण दिले जायचे. यात शास्त्र म्हणजे विज्ञान होतेच, त्याबरोबर नीती, समाज, अर्थ असे सर्व पैलू या शास्त्रप्रकारात अंतर्भूत होते. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास हा शिक्षणाचा हेतू होता. कालांतराने पारतंत्र्याच्या काळात इंग्रंजासाठी बाबू निर्माण करण्याचा कारखाना म्हणून शिक्षण विकसित पावले.

पण आता बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये आम्हाला उद्याच्या जगात सर्व क्षेत्रांत नेतृत्व करण्यासाठी दुर्दम्य आकांक्षा धारण करणारी पिढी घडवायची आहे. शिक्षणाचा हेतू एकदा पक्का झाला तर मग पुढच्या गोष्टी आखणे आणि नियोजन करणे सुकर होणार आहे.


Coronavirus and education

कोविड-१९नंतर जगाची आमच्याकडून नेमकी काय अपेक्षा असणार आहे? योग आणि योगशास्त्र ही पहिली मागणी भविष्यात जगाकडून असू शकते. कारण येणाऱ्या काळात कोविड-१९सारखे नवीन नवीन विषाणू जन्म घेणार आहेत. कारण मनुष्याच्या साम्राज्यवादी वृत्तीला 'जैविक अस्त्र' नावाचे विनाशकारक अस्त्र हाताशी लागले आहे, जे आण्विक शस्त्रापेक्षा घातक आहे. त्याला प्रत्येक वेळेस औषध आणि लस शोधेपर्यंत माणसाची अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती निर्णायक ठरणार आहे. अशा वेळेस योग शिक्षक आणि त्या अनुषंगाने जीवनशास्त्र शिकवणारी विद्यापीठे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण सगळ्या जगाला कळून चुकले आहे की भारतीय कोरोनाविरोधात लढा देत असताना, योग आणि योगाभ्यास याचा भारतीयांना खूप उपयोग झाला आहे.‌ अंतर्गत‌ रोग‌प्रतिकारशक्ती कोरोनाविरोधी लढ्यात निर्णायक ठरत‌ आहे. त्यामुळे आमच्या शिक्षण धोरणात योगशास्त्र विषयाचा विचार करावाच लागणार आहे.

अंतर्गत रोगप्रतिकारशक्तीचा दुसरा स्रोत म्हणजे भारतीय अन्न आणि खानपान. शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नधान्यापासून बनणाऱ्या आहार पद्धतींचा स्वीकार करण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. अशा वेळेस कृषी शास्त्रात येथील विविध प्रकारचे हवामान, पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा पोत याला अनुसरून उत्पादन शास्त्र विकसित करणे, या उत्पादनाला योग्य प्रकारे प्रक्रिया करून सुरक्षित करणे आणि या उत्पादनाचा प्रक्रिया उद्योग शास्त्र विकसित करणे हे कृषी महाविद्यालयांचे उद्दिष्ट असले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर, अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता जर बाहेर पडत असेल, तर कृषी महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने शेतकरी बाहेर पडला पाहिजे. पण असे घडते आहे का? स्वतःच्या शेतीमध्ये योग्य प्रकारचे उत्पादन घेण्यासाठी छोट्या भौगोलिक क्षेत्रात त्या भौगोलिक क्षेत्राला सुयोग्य असा अभ्यासक्रम विकसित करून कृषी क्षेत्राला न्याय दिला पाहिजे.

भारत कृषिप्रधान देश आहे, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीमुळे वाढू शकते, ह्या वाक्यांचे प्रतिबिंब शिक्षणात कुठेच दिसत नाही, ते दिसले पाहिजे, असे कृषी शिक्षण धोरण आखता येईल का? अशा शेती उत्पादनातून निर्माण होणारे शाकाहारी पदार्थ ही भविष्यातील जागतिक मागणी ठरणार आहे. हे आज दिवास्वप्न वाटत आहे, पण मांसाहाराच्या भीतीने धास्तावलेले शाकाहारी पदार्थ शोधणार आहेत. आमच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड क्राफ्ट शिक्षणात याचा अंतर्भाव होणे ही गरज आहे, नाही तर आमचेच पदार्थ आकर्षक पॅकिंगमध्ये बाहेरच्या देशातून विकत घेऊन पुन्हा आम्हाला खावे लागतील. पशुपालन, विशेषत: भारतीय गायी आणि गोविज्ञान हा विषय अभ्यासक्रमात घेऊन गोशाळा चालवण्यासाठी योग्य प्रकारचे तांत्रिक ज्ञान असणारे मनुष्यबळ निर्माण करणे हा महत्त्वाचा शैक्षणिक पैलू ठरू शकतो.

वैद्यकीय शिक्षण हासुद्धा महत्त्वाचा पैलू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे हे शिक्षण स्वस्त आणि अधिकाधिक बुद्धिमान मंडळींना समाविष्ट करून घेणारे अशा स्वरूपाचे होणे गरजेचे आहे. आज अगदी कमी संख्येच्या आधारावर आमच्या डॉक्टर मंडळीनी ही लढाई लढली आहे. आज जरी निभावून गेले, तरी भविष्यासाठी या क्षेत्रात अधिक मनुष्यशक्ती लागणारच आहे. यासाठी निश्चित धोरण आखावे लागेल. यासाठी खासगी क्षेत्रातील मंडळींचा सहभाग वाढावा लागेल. दुसरे म्हणजे आयुर्वेदशास्त्र. यातील शिक्षण महत्त्वाचे आहे. आज सगळीकडे या महाविद्यालयांना जी मरगळ आली आहे, ती घालवून त्यांना प्रतिष्ठा आणली पाहिजे, कारण कोविड-१९विरूद्ध लढ्यात आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आयुष मंत्रालय यात मोठी भूमिका बजावू शकते. औषध निर्माणशास्त्रात 'फार्म डी'सारखे शिक्षण लोकप्रिय करणे गरजेचे आहे. कारण औषधाचे साइड इफेक्ट ही जागतिक समस्या आहे. औषधनिर्मितीत आमचा जागतिक सहभाग वाढवण्यासाठी तसे व्यवसायिक शिक्षण गरजेचे आहे.

भाषाशास्त्रात संस्कृत भाषेकडे जे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले आहे, त्याची भरपाई होणे आवश्यक आहे. धार्मिक विधीसाठी चार श्लोक म्हणणे म्हणजे संस्कृत ही जी अवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे आमचे सर्वकालिक, सर्वसमावेशक ज्ञानभांडार खूप सर्वसामान्य लोकांपासून वंचित राहिले आहे. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा स्थानिक भाषेत अनुवाद करून सर्व प्रकारच्या शिक्षणात त्याचा जो उपयोग होऊ शकतो, तो करून घेतला पाहिजे. हे करण्यासाठी पूर्वग्रह सोडून संस्कृत भाषेकडे बघावे लागेल. भरतमुनी यांचे नाट्यशास्त्र हे जगातले नाट्यविषयातले पाहिले अभ्यासपूर्ण विवेचन. वराहमिहीर ग्रंथातील (बृहत् संहिता) मेघगर्भ लक्षणावरून सांगितले जाणारे हवामान अंदाज अचूक असायचे, हे वास्तव आहे. उद्या जीवन जगण्याचे नवीन जागतिक माप दंड आखायचे असतील, तर संस्कृत ग्रंथांचा अभ्यास अनिवार्य आहे, कारण तीच आमची अक्षुण्ण परंपरा आहे. जर जगात लोकांनी भारतीय नमस्कार स्वीकारला आहे, तर आपणही जीवन जगण्याच्या आपल्या पद्धती शिकून आत्मसात केल्या पाहिजेत. त्यासाठी आमच्या गौरवशाली परंपरा आणि पद्धती याचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता त्याची मांडणी केली पाहिजे. त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम विद्यापीठात ठेवले पाहिजे. वेद, उपनिषद, रामायण, भगवद्गीता, महाभारत, ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा हे धार्मिक ग्रंथ नव्हेत. हे माणसाला त्याचे जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन करणारे पाथेय आहे. हा चिरंतन ठेवा तत्त्वज्ञान म्हणून अभ्यासला पाहिजे, असे कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये अनेकांना जाणवू लागले आहे. त्यासाठी आमच्या विद्यापीठात अशा शिक्षणाचे मार्ग मोकळे केले पाहिजे. भारत आजच्या परिस्थितीमध्ये सावरला जातो आहे, तो हा आध्यात्मिक चिरंतन ठेवा आमच्याकडे असल्याकारणाने, हे जगाला कळले आहे. आम्हाला समजण्याची गरज आहे.

अभियांत्रिकी शिक्षणात बदलत्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची उत्पादने महत्त्वाची ठरू शकतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कालच एक बातमी वाचली - जयपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक रोबो डॉक्टर लोकांच्या मदतीसाठी निर्माण केला आहे, जो रुग्णाचे तापमान, ऑक्सिजन आवश्यक ते सगळे घेऊन रिपोर्ट मोबाईलवर डॉक्टर्सना पाठवू शकतो. शारीर अंतर (Physical distances) सांभाळण्यासाठी हा रोबो उपयोगी पडणार आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे आज नोकरी करणाऱ्या अभियंत्यांपेक्षा उद्योजक अभियंता निर्माण करणारे झाले पाहिजे. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना सारखे अभ्यासक्रम बनवण्यापेक्षा त्या त्या भौगोलिक क्षेत्रातील माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडणारे अभ्यासक्रम ही गरज आहे. सोनोग्राफी मशीन किंवा तत्सम संयंत्र बायोइंजीनिअरिंगच्या उपलब्धी‌ची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. बायोइंजीनिअरिंगचा विकास अशा भविष्यातील जैविक लढ्यासाठी आवश्यक आहे, तसेच वैद्यकीय सेवेसाठीसुद्धा उपयुक्त ठरणार आहे.

बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेट्रिक या शाखांकडे आपले तसे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाले आहे. पण आताचा कोरोना अनुभव लक्षात घेता आपल्याला उलट या दोन्हीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

कौशल्य विकासाबाबत खूप बोलले जाते. पण आयटीआयमधील अभ्यासक्रम हा जुन्याच पठडीतील आहे. त्यात बदल करून खासगी उद्योगांना बरोबर घेऊन त्यांना हवे तसे कौशल्य असणारा कामगार तयार केला पाहिजे. सरकारचा सध्याचा कौशल्य विकास कार्यक्रम हा कुठेतरी अडखळत आहे, तो नेमका कुठे? याचा आढावा घेण्याची गरज आहे.

आता कोरोनामध्ये विस्थापित मजूर ही एक मोठी समस्या लक्षात आली आहे. कौशल्य विकासाच्या शिक्षणातून कामगार विस्थापित न होता त्याच्या गावात राहून कुटिरोद्योग वाढवण्यास मदत करू शकतो, परिणामस्वरूप स्वतःच्या गावात राहूनच स्वतःला योग्य प्रकारचे उत्पन्न निर्माण करू शकतो.

ई-लर्निंगची मोठी चर्चा सुरू आहे. पण आज जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्या लोकांस हे ई-लर्निंग किती उपयुक्त ठरणार आहे? सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. या देशातील सामान्य माणसाला बाजूला ठेवून कुठलीही शिक्षण व्यवस्था परिपूर्ण होऊ शकणार नाही. एकात्मिक शिक्षण हे धोरण ठेवावे लागेल. व्यक्तीच्या नैसर्गिक कलाप्रमाणे त्याला शिक्षण घेण्याची मुभा द्यावी लागेल. सर्व गोष्टींना आरक्षण हा पर्याय ठरू शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. कारण ठरावीक लोक आरक्षण घेत राहतात आणि त्याच समाजातले काही लोक आरक्षणापासून वंचित राहतात. हे बदलावे लागेल.

आपल्याकडे बारावीपर्यंत वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात (स्टेट बोर्ड / सीबीएसई इ.) यात एकवाक्यता आणण्याची गरज आहे. कारण शिक्षण हे समाजात एकात्मता निर्माण करणारे माध्यम झाले पाहिजे. आज आर्थिक परिस्थितीनुसार आणि जातीच्या, धर्माच्या आधारावर शिक्षणसंस्था विभागल्या गेल्या आहेत. यातून भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होण्याऐवजी ती कमी होत आहे. पुढील जग हे भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणारे असणार आहे. जेव्हा आज भले भले आपल्या. देशाचे नेतृत्व करताना गोंधळून जात आहेत आणि भारताचे नेतृत्व मात्र मोठ्या धैर्याने १३० कोटी लोकांना आश्वस्त ठेवत आहे, याला हीच भावनिक बुद्धिमत्ता कारणीभूत आहे, हे येथे लक्षात ठेवले पाहिजे आणि स्टेशनवर चहा विक्रीपासून हिमालयातील आध्यात्मिक शिक्षणातून ही भावनिक बुद्धिमत्ता विकसित झाली आहे.

मदरसे ज्या समाजासाठी चालवले जातात, त्यातून होणाऱ्या निर्मितीचे मूल्यांकन त्याच समाजाला करावे लागेल आणि हे चालवायचे की नाही हे ठरवावे लागेल. इंग्लिश माध्यमातील शिक्षण म्हणजे येथील परंपरा, इतिहास, संस्कृती नाकारणे असा नाही, हे अशा शाळा चालवणाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण इतिहास आणि संस्कृती, परंपरा नष्ट करण्याच्या हेतूने जेव्हा इंग्रजांनी येथील शिक्षण पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ यांना शांतिनिकेतन काढावे लागले. राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आढलळल्याने टिळकांना पुण्यात शाळा-कॉलेज सुरू करणे भाग पडले.

एकात्म शिक्षणात कला आणि क्रीडा यांचा समावेश असतो. जेव्हा समाजावर मानवाच्या कल्पनेच्या बाहेरचे संकट येते, तेव्हा कला आणि क्रीडा यांच्या माध्यमातून समाजाचे मनोधैर्य टिकून राहते. आमच्याकडे लोककला हा कलेचा उगम झाला. पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले आणि आमचा कलेचा मूळ स्रोतच आम्ही गमावला. कलेची प्रेरणा ही मानवाच्या जीवनात सकारात्मक बद्दल घडवण्यासाठी असते. आज लॉकडाउनमध्ये घरी बसल्यावर अनेकांमधला कलाकार त्यांना सापडला.. तो कुठे हरवला होता? हरवला होता, कारण त्याच्या प्रदर्शनासाठी वेळ आणि जागा उपलब्ध नव्हती. अनेक चांगले खेळ हे चांगले खेळाडू घडवण्यासाठी वाट बघत आहेत, पण देशातील ६० टक्के लोक एकाच खेळाच्या प्रकारात स्वतःला गुंतवून घेत आहेत. भविष्यातील भारत हा जास्तीत जास्त ऑलिंपिक पदके मिळवणारा देश होण्यासाठी क्रीडा विद्यापीठे उभी करणे हे शिक्षणाच्या अंतर्गतच आहे. आमची शारीरिक तंदुरुस्ती कोरोनाचे आवाहन पेलताना सिद्ध झाली आहे. गरज आहे ती क्रीडा क्षेत्राला शिक्षणाचा प्रमुख भाग समजण्याची!

बहिस्थ किंवा दूर शिक्षण ह्याची खूप चर्चा चालू आहे. यातून फक्त सर्टिफिकेट मिळवण्याचा उद्देश निर्माण झाला, तर आम्ही त्यात पुन्हा अडकून बसू. एका सर्टिफिकेटच्या प्राप्तीसाठी आमची शिक्षण व्यवस्था जी केंद्रित झाली आहे, त्यात काही आमूलाग्र बदल घडवता येतील का? तक्षशीला आणि नालंदा विद्यापीठाचे आम्ही वारसदार आहोत. आज परदेशात जे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध होत आहे, त्यातून तिथले उद्योग आणि व्यवसाय चालण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमधून त्यांना हवी तशी मनुष्यशक्ती तयार केली जात आहे. शिक्षणासाठी पैसा खर्च आम्ही करून पुन्हा बाकी देशांना भरभराटीला नेत आहोत, याला जबाबदार फक्त ते विद्यार्थी किंवा पालक नाहीत, तर आमची फसलेली शैक्षणिक धोरणे याला जबाबदार आहेत. १९८५ ते २०२० या काळात बाहेर गेलेल्या आमच्या मनुष्यशक्तीचे मूल्यमापन करून कधीतरी यावर दीर्घकालीन धोरण ठरवले पाहिजे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी हे घडवून आणायचे आहे, ते आमचे आचार्यवृंद! शिक्षकी पेशाकडे पाहण्याचा समाजाचा, सरकारचा आणि स्वतः शिक्षकाचा दृष्टीकोन बदलावा लागेल. शिक्षक घडवणे हा शिक्षण पद्धतीचा एक भाग आहे. उच्च भारतीय मूल्यांवर श्रद्धा असणारा शिक्षक घडवणे हे आमच्या शिक्षण पद्धतीपुढचे मोठे आव्हान आहे आणि त्याची प्रतिष्ठा जपणे ही आमची जबाबदारी आहे.

प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाचा परिवार यात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांनी मिळून जर विचार केला, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा आमच्या विद्यापीठांमध्ये बाहेरचे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश मागू लागतील. पुन्हा मुद्दा तोच येतो - शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवावे लागेल. आपल्या देशातील शिक्षणाला त्याच्या मूलभूत मूल्यापासून उखडून टाकणाऱ्या डाव्यांची घुसखोरी, देशाला फुटीरतावादी वृत्ती वाढवू पाहणाऱ्या अलीगढ विद्यापीठ, जेएनयू यासारख्या कुठलाही सकारात्मक उद्देश हरवून बसलेल्या विद्यापीठांना शिक्षणाच्या मंदिरापासून लांब ठेवावेच लागेल. सरस्वती वंदना ही जर मानवी जीवनाला उच्च शैक्षणिक मूल्यांचा संस्कार देणारी असेल, तर ती केवळ भारतात नाही, तर जगात प्रस्थापित करावी लागेल. आम्ही आमची मौल्यवान शैक्षणिक मूल्ये विसरलो, त्याचा हा जागतिक परिणाम आहे. भौतिक विकासाला यशस्वी शिक्षणाच्या व्याख्येत बसवण्याची चूक महागात पडली आहे. आता आम्हाला पुढे येऊन हा समतोल साधणे हे ईश्वरदत्त कार्य करायचे आहे.

(क्रमशः)
नीरक्षीरविवेक.