कोरोना संमोहन समाजचित्र आणि वास्तव

विवेक मराठी    09-May-2020
Total Views |
@मनीषा अतुल
यापुढे काळाबद्दल उल्लेख होईल तो 'कोरोनापूर्व' व 'कोरोनोत्तर' असा. कोरोना किंवा 'कोविड-१९' या एका छोट्या शब्दाने आपले संपूर्ण जग बदलून टाकले आहे. जगात विचित्र उलथापालथ घडवली आहे. पृथ्वी व त्यावरील जीवसृष्टी, निसर्ग व त्यातील माणसाचे स्थान या सगळ्याकडे बघण्याचा एक नवाच दृष्टीकोन या घटनेने दिला आहे.

corona viruas_1 &nbs

या काळाची व्याख्या करायची झाल्यास त्याला 'कोरोना संमोहनाचा काळ' असे मी म्हणेन. संपूर्ण जग, विशेषतः भारत या संमोहनात पुरता गुंग झालेला दिसतो आहे. हे संमोहन भयाचे आहे, जिवाच्या भीतीचे आहे, सगळीच व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या आशंकेचे आहे. सध्या जो-तो फक्त आणि फक्त कोरोनासंदर्भात बोलतो आहे, लिहितो आहे आणि वागतोही आहे. हे संमोहन बरेचसे लादलले आहे आणि बरेचसे आपण आपल्या मर्जीने स्वतःवर लादून घेतलेले आहे. याला मी संमोहन यासाठी म्हणते आहे की, सुरुवातीच्या अनपेक्षित, अपरिचित परिस्थितीचा परिणाम ओसरल्यावरदेखील आपण तटस्थपणे सगळ्या परिस्थितीकडे बघू शकत नाही आहोत. आपण अजूनही स्वतःला व इतरांना आहे त्या परिस्थितीच्या जबाबदारीबद्दल प्रश्न विचारत नाही आहोत. या विषयावर बरेच विचारवंत लिहीत असले, तरी त्यात सत्य परिस्थितीचे आकलन किती व माध्यमांद्वारे पसरवलेले कृतकवास्तव व त्याचे पडसाद किती, हा संशोधनाचा विषय व्हावा.

सध्या एकच लिखाण समाजाला स्वीकारार्ह आहे आणि ते म्हणजे, कोरोनाचा सामना करण्याकरिता जी आणि जशी व्यवस्था सरकारने केलेली आहे ती तशीच्या तशी स्वीकारणे. जमल्यास आपल्या परीने अधिक कट्टर होऊन त्यात भर घालणे, दडणे, दडपणे (स्वतःला व इतरांना), दुरावा, एकांत, गरजांचे अनावश्यक दमन व त्यातच भूषण मानणे, परिस्थितीला भयानक म्हणत अतिरंजित करून मांडणे इत्यादी.

यापूर्वीही साथीचे रोग आले., पुढेही येत राहतील. त्यांचे स्वरूप, व्याप्ती अर्थातच निराळी राहील. कधी ते परिचित असतील. त्यांच्याशी सामना करण्याची आपल्याकडे पूर्वतयारी असेल, तर कधी ते अपरिचित असतील. मानवी वंशाच्या अस्तित्वासाठी आव्हानात्मक असतील. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण काय करणार आहोत, याची दीर्घकालीन योजना तयार करावी लागणार आहे.

मान्य की, एवढ्या मोठ्या प्रमाणात साथीचा रोग येण्याची व इतक्या विशाल प्रमाणात देशोदेशी तो रोग पसरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने भीती, गोंधळ साहजिक आहे. त्यात भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात अशी परिस्थिती हाताळणे फार कौशल्याचे काम आहे. आपल्या सरकारने, प्रशासनाने सुरुवातीला ते कौशल्यपूर्वक हाताळलेही आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. सुरुवातीला विषाणू नवा, हल्ला करण्याची त्याची पद्धत अपरिचित, त्याच्या लक्षणांबद्दल, परिणामांबद्दल आपण अनभिज्ञ. जवळ औषध नाही, लशी नाहीत, तपासण्याची यंत्रे नाहीत.. अशा परिस्थितीत संसर्ग टाळणे हा एकमेव उपाय हाती होता. विलगीकरण, टाळेबंदी आपण तातडीने केली. सगळ्या देशाने उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. त्यामुळे सावरायला, विचार करायला, उपाययोजना करायला भरपूर वेळ मिळाला. आपण आपले आयुष्य सरकारवर सोपवून दिले आणि सरकारनेही आपल्या परीने शर्थ केली. मात्र हा काळ योग्य कारणांसाठी वापरला गेला का, याचाही गांभीर्याने व तटस्थपणे विचार व्हायला हवा.

coronavirus medical seva

आता लॉकडाउनचा बराच काळ गेल्यानंतर लक्षात येऊ लागले आहे की अद्यापही परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. लोकांना घरात डांबून ठेवणे हा कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. या परिस्थितीचा कुणी फायदा करून घेते आहे का? याचे राजकारण केले जात आहे का? याचाही विचार करायला हवा. एक वास्तव असते आणि एक काल्पनिकरीत्या उभे झालेले वास्तव, ज्यात समाजमाध्यमांचा प्रभाव महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्याला या दोन्ही वास्तवांची तपासणी करून बघावी लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे ठरावीक गोष्टींचा अपरिपक्वपणे मारा करीत आहेत. लोकांना जिवाची इतकी प्रचंड भीती घालून दिली गेली आहे की ते त्या धक्क्यात, स्वतःला गुरफटून, कान, डोळे, मन मिटून बसले आहेत. विचारवंतांच्या नजरा, लेखण्या यातले काहीच टिपायला तयार नाहीत की त्यांना प्रश्नच पडत नाहीयेत, ठाऊक नाही. हे एक प्रकारचे संमोहनच नाही का?

'राज्य सरकार बघा कसे परिस्थिती छान हाताळते आहे. कोरोनाशी युद्ध सुरू आहे' इत्यादी कौतुकातच आपण गुंग आहोत. हे युद्ध नेमके चालले तरी कशा प्रकारे आहे? या युद्धात ज्या व्यूहरचना केल्या गेल्या, त्यांची खरेच आवश्यकता होती का? त्याचे परिणाम काय निघाले? त्या बेसावध परिस्थितीचा कोणी आणखी काही उपयोग चालवलेला आहे का, हे कोण बघणार व कोण लिहिणार?

या संसर्गासंदर्भात आपण काय ॲक्शन घेतल्या व कोणत्या योजना अमलात आणतो आहोत, याकडे एकदा सुरुवातीपासून दृष्टिक्षेप टाकला तर बऱ्याच गोष्टी लक्षात यायला वेळ लागणार नाही. मुख्य गोष्ट ही की सरकारने या सगळ्या ट्रीटमेंटची सूत्रे सरकारी आरोग्य विभागाकडे ठेवली. यात खाजगी डॉक्टरांना सहभागी करून घेतले गेले नाही. सगळे सेंट्रलाइज करून घेताना आपल्याकडल्या आरोग्य विभागाची परिस्थिती इतकी सक्षम आहे का, हा साधा प्रश्न होता. सरकारी आरोग्य व्यवस्थेवर आपण कधीतरी अवलंबून होतो का? खात्रीशीर इलाज म्हणून लोक खाजगी डॉक्टरकडे जातात, त्यासाठी लाखो रूपये मोजतात हे दुर्दैवी सत्य आपण अचानक विसरलो? रुग्णाकडून फीसाठी व तपासण्यांसाठी लाखो रुपये काढणारे खाजगी डॉक्टर अचानक बाजूला कसे झाले? की केले गेले? त्यांच्यावर दवाखाने / रुग्णालये खुली ठेवण्याची सक्ती का केली गेली नाही? त्यांच्यावर भरवसा का दाखवला गेला नाही? एक सामायिक 'लाइन ऑफ ट्रीटमेंट' आखून देऊन त्यांना मदतीला घेता आले नसते का? त्यामुळे इतर परवड निश्चितच थांबवता आली असती. मुळात या रोगासाठी लाइन ऑफ ॲक्शन दिलीच गेली नाही. अजूनही त्याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे. आरोग्य विभाग म्हटला की अपुरा कर्मचारिवर्ग, कामात नसलेली अपुरी आयुधे, वेळेवर मागवलेली नवीन यंत्रे नीट हाताळता न येणारा अप्रशिक्षित कर्मचारिवर्ग, दवाखान्याची दुरवस्था हेच नजरेपुढे येतं व तेच वास्तव आहेही. आजच बातमी आहे की आरोग्य विभागाने २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती नुकतीच करून घेतली. म्हणजेच त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारिवर्ग नव्हता. मग एवढ्या मोठ्या रोगाचा सामना करताना प्रस्थापित डॉक्टराची मदत घेतली असती तर? हे काम मिळून केले असते तर? चांगल्या आरोग्य सुविधा हा लोकांचा अधिकार आहे, त्याकरता लोक पैसा खर्च करायलाही तयार असतात. ज्यांच्यासाठी हे खर्च आवाक्याबाहेरचे असतात, त्यांची जबाबदारी सरकार घेतेच की. असे असताना त्यांना केवळ कुणाच्या तरी गलथान कारभारामुळे पीडित व्हावे लागावे, हे समर्थनीय आहे का?

कोणत्या निकषांवर अनेक ठिकाणी लोकांना साधे सर्दी-तापाचे लक्षण दिसल्यावर उचलून नेत आहेत? सरकारी इमारती, संस्था इत्यादी ठिकाणी अपुऱ्या व ढिसाळ व्यवस्था असताना का क्वारंटाइन केले जात आहे? एवढ्या मोठ्या संख्येने लोकांची व्यवस्था करायला आपण सक्षम नाही, हे ठाऊक असतानाही प्रत्येकाला उचलून न्यायची घाई का? त्यांना कोरोना आहे की नाही हे खूप नंतर कळते, पण तोवर त्यांना झालेला मनस्ताप, वाया गेलेला वेळ, त्या काळातील कुटुंबाची परवड याला कोण जबाबदार आहे? संकटकाळात हे सारे समजून घ्यायचे असते हे मान्य, मात्र हा अत्याचार अनावश्यक व टाळता येणारा निश्चितच आहे.

coronavirus medical seva  
 
काहीतरी चुकते आहे हे नक्की. मुळात एखाद्याला कोविड-१९चा संसर्ग झाला हे ठरवण्याच्या निकषांपासूनच या चुका सुरु होताहेत. हे ठरवणार कोण? महानगरपालिकांकडे व नगर परिषदांकडे सगळे अधिकार दिले गेले आहेत. त्यांनी ते सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले. त्यांनी गेटवरच्या गार्डकडे. असे ते डीसेंट्रलाइज होत-होत अधिकाधिक अल्पशिक्षित, अप्रशिक्षित लोकांकडे ढकलले गेले, जे या कशाचसाठी कायद्याने उत्तरदायी नाहीत. त्यामुळे ते कधीही हात झटकून मोकळे होऊ शकतात!

पुण्या-मुंबईत सोसायटीचे गार्ड, गेटमधून जाणाऱ्या-येणाऱ्यांचे शरीराचे तापमान घेतो. ३७℃ सेल्सियस असल्यास समोरच्या व्यक्तीला त्याच्याच घरात जाण्यास मनाई करतो आणि महापालिकेला कळवतो. ते त्याला लगेच घेऊन जातात. मग त्याच्या चाचण्या व त्याची परवड सुरू. कोरोनाच्या भीतीपायी आपण साधे लॉजिक गहाण ठेवतो आहोत. जणू कुणाला या काळात इतर काही होता कामा नये! एखाद्या अप्रशिक्षित माणसाला आलेला संशयही भल्याभल्यांचे आयुष्य नरक बनवायला पुरेसा आहे. एखाद्याच्या आयुष्याचे निर्णय असे कुणीही का घ्यायचे?

काही ठिकाणी क्वारंटाइन केलेल्या लोकांची अवस्था भयंकर आहे. तुरुंगामधल्या कैद्यांसारखे त्यांना एका पलंगावर बसून राहावे लागते. मनोरंजनाची साधने नाहीत की फोन नाही. त्याहीपेक्षा भयंकर अवस्था आहे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांची.
वास्तविक, खरेच कोरोना संसर्ग आहे का इथपासून शंकेला जागा असते. खराब किट्स, आधुनिक यंत्रे हाताळता न येणारे कर्मचारी, चुकीचे रिपोर्टस् इथपासून सुरुवात होते. एकदा जर तो पॉझिटिव्ह घोषित झाला की बहुतेक रुग्ण जणू अज्ञातवासात ठेवले जातात. जवळ फोन नाही. ते कोणाच्या सहवासात आहेत याची माहिती नाही. त्यांना कुठली ट्रीटमेंट दिली जाते आहे, त्यांची मेडिकल हिस्ट्री काय, त्यांना कुठला औषधांची ॲलर्जी आहे का? हे सगळे जाणून घ्यायला रुग्णाच्या घरची मंडळी आवश्यक असतात. त्याच्या ट्रीटमेंटबद्दल, प्रतिसादाबद्दल जाणून घेणे हा त्यांचा हक्क आहे. या साऱ्यात अनेक भयंकर व दुर्दैवी घटना दुर्लक्षिल्या जात आहेत. त्याबद्दल कोणीही फारसे बोलताना दिसत नाही. आपण जणू त्या घटनाही गृहीत धरल्या आहेत. उदाहरण म्हणून वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली घटना सांगते.
नागपुरातील एक गृहस्थ मुंबईत शिकायला ठेवलेल्या त्यांच्या एकट्या मुलाला आणायला गेले होते. मुंबईत त्याकरता लागणारी कागदपत्रे, पासेस यांची जमवाजमव करताना रस्त्यातच भोवळ येऊन पडले. त्यांना उचलून दवाखान्यात नेले गेले आणि कोरोनाचा बळी म्हणून नोंदही केली गेली. घरच्यांना हे कळल्यावर धक्का बसला. घरच्यांनी आग्रह धरला की कोरोनाने गेले याचे सर्टिफिकेट द्या आणि पार्थिव ताब्यात द्या, तेव्हा सारवासारव करून सांगण्यात आले की त्या गृहस्थाला हार्ट ॲटॅक आला होता. म्हणजे ते कोरोनाचे रुग्णच नव्हते! शिवाय दवाखान्यात नेले, तेव्हा ते जिवंत असण्याचीही शक्यता होती. मात्र इतर शक्यता लक्षात न घेता कोरोनाच्या तपासण्या करण्यातच वेळ गेला की काय?

असे आणखी किती चुकीचे कोरोना रुग्ण आपण नोंदवले आहेत? किती चुकीचे संशयित आहेत? घेतल्या गेलेल्या आकड्यांवर भरवसा कसा ठेवायचा? मीडियाला यावर का बोलावेसे वाटत नाही? भरती झालेले रुग्ण, विलगीकरणात असलेले रुग्ण कुठल्या परिस्थितीत आहेत याच्या बातम्या दडवल्या का जातात?

रोग वा लक्षणे दडवण्यामागे, विलगीकरणाला घाबरण्यामागे अशी अनेक कारणे आहेत. लोकांच्या मनातून ही भीती निघाली तरच ते खात्रीने स्वतः सहकार्य करतील. कोरोना संसर्ग आणखी बराच काळ चालणार आहे. त्याकरिता दीर्घ उपाययोजना काय आहेत हे जाहीर व्हायला हवे. लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, उपायांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लोकांवर विश्वास ठेवणे, त्यांना सोबत घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी, त्यांना डांबून ठेवणे, लाठ्याकाठ्या मारणे, अपराध्यासारखे वागवणे हे सर्वथा अयोग्य आहे. कारण याने काहीच साध्य होत नाही, हे रोज वाढणारा संसर्गाचा आकडा सांगतोच आहे. स्वतः WHOचे म्हणणे आहे की युरोपीय देशांकरिताचे नॉर्म्स भारताला तंतोतंत लागू होऊ शकत नाहीत आणि ते बरोबरच आहे. आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. इथले तापमान उष्ण आहे. इथल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे कारण ते सातत्याने बऱ्याच सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येतात. इथले जीवघेणे रोग भिन्न आहेत. मलेरिया, डेंग्यू, बालमृत्यू दर, कुपोषितांचे मृत्यू, हगवणीने मृत्यू यांचे प्रमाण काढल्यास लक्षात येईल की कोरोना मृत्यू हा विषय खरेच लोकांचे जगणे हिरावून घेण्याइतका आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे.


coronavirus medical seva
इथे कोरोना संसर्गाला कमी लेखण्याचा वा दुर्लक्षित करण्याचा मुळीच हेतू नाही हे लक्षात घ्यावे, तर दुसरी बाजू दाखवून देणे हा उद्देश आहे. आपल्याला सामाजिक दूरत्व पाळले पाहिजे हे मान्य. हात धुणे, तोंडाला मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, एकत्रीकरण टाळणे हे सगळे करायचे आहेच. आणि ते दीर्घकाळ करत राहावे लागणार आहे. आपल्याला मुळातच आपल्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. मात्र ते करताना त्याच्या भीतीला वा दडपणाला आपल्यावर स्वार होऊ न देता सहजतेने त्याला आपल्या जगण्याचा, सवयीचा भाग बनवायचे आहे. आपला आनंद, आपले जगणे हिरावू न देता संयमाने व माणुसकी जपत हे करावे लागणार आहे.
सर्वसाधारण माणूस भीतीच्या सावटामुळे स्वतःला मिटून बसला आहे. स्वतःला कोंडून घेणे हे या काळातले सर्वात मोठे कर्तव्य समजून इमाने-इतबारे ते पार पाडतो आहे. घरातल्या वृद्धांवर, लहान मुलांवर व एकूणच परिवाराच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा किती गंभीर परिणाम होतो आहे हा वेगळ्या लेखाचा विषय ठरावा. त्या मुलांचे हरवलेले बालपण, या काळात कुणाकुणाचे झालेले अपरिमित नुकसान याची गणनाच नाही. कोणालाही याबद्दल लिहावेसे वाटत नाही की बोलावेसे वाटत नाही.

एकदा हे संमोहन उतरले की बऱ्याच बातम्या बाहेर येऊ लागतील. त्या वेळी निश्चितच आपण कोरोना प्रकरणावर वेगळे बोलणार आहोत. या भारावलेपणातून बाहेर आलो की महत्त्वाच्या इतर अनेक मुद्द्यांकडे आपले लक्ष जाईल, अशी आशा करू या. तो दिवस लवकर येवो.