आंधळा - पांगळा

स्रोत: विवेक मराठी    दिनांक17-Jun-2020   
|

संतांनी आंधळ्या पांगळ्याना धरून जनतेच्या प्रबोधनासाठी काही रचना केल्या आहेत. येथे आपला लोकगायक आंधळा झाला आहे. तो आधीपासून आंधळा होता का? तर नाही. त्याला आधी सर्व काही दिसत होते. पण नंतर डोळ्यावर आवरण आले आणि तो आंधळा झाला. त्यामुळे तो दीनवाणा झाला आहे. त्याला आता समोरचा मार्ग दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो कृपानिधी संत मंडळाला विनंती करीत आहे की, मला मार्ग दाखवा.

pandharpur ashadhi ekadas

आधी देखत होतो सकळ । मग ही दृष्टी गेली आले पडळ ।

चालता मार्ग न दिसे केवळ । आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१ ॥

दाते हो दान करा तुम्ही संत उदार । चालता मार्ग दाखवा मज निर्धार ।

गुंतलो लोभ आशा कांही न कळे विचार । दृष्टी ते फिरवूनि द्या मुखी नामाचा उच्चार ॥२ ॥

संत हे उदार आहेत. ते शरण आलेल्यांचा उद्धार करतात. याची या आंधळ्याला पूर्ण खात्री आहे. मात्र हा आंधळा कसा झाला? तर तो आशा नावाच्या पाशात गुंतला. एक संस्कृत सुभाषित सांगते की, आशा नावाची एक विचित्र बेडी आहे. जो या बेडीत अडकला तो सैराट धावत सुटतो. पण या बेडीतुन जो सुटला तो एका जागी स्थिर होतो. अगदी पांगळ्यागत. असे पांगळे होणे कुणाला आवडणार नाही.

कारण आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥

भगवंतांला आशाबद्ध मनुष्य जाणू शकत नाही.

त्रैलोक्यात तुमची थोरी पुराणे वर्णिती साचार । वेदही तुम्ही गाती तया न कळे निर्धार ।

किर्ती गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर । म्हणोनि धरिला मार्ग नका करु अव्हेर ।।३ ।।

मात्र या आंधळ्याला आता मार्ग सापडला आहे. तो तो कृपानिधी संत मंडळाला विनंती करीत आहे की, आता माझा अव्हेर करू नका. सनकादिक ज्याची कीर्ती वाखाणत आहेत तो श्रीधर मला दाखवा म्हणजे भगवंताचे दर्शन घडवा. हीच त्याची प्रार्थना आहे. या भगवंताची चार वेद आणि अठरा पुराणांनी कीर्ती गायन केली आहे. पण तेही त्याला जाणू शकले नाहीत.

'वेद सांगो गेला, पुढे मौनावला' अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळे केवळ संतच भगवंताचे दर्शन घडविण्यास समर्थ आहेत.

अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार । तेणे पंथे चालताना फिटला माया मोह अंधार ।

एका जनार्दनी देखिला परेपरता पर । श्रीगुरु जनार्दन कृपेने दाविले निजघर ॥४ ॥

श्री गुरूंचा आधार लाभल्यामुळे या लोकगायकाचे अंधपण गेले आहे. माया आणि मोहाचा अंधार फिटला आहे. परेच्याही पलीकडे ज्याची वस्ती आहे त्या परमेश्वराचे दर्शन घडले आहे. खरे म्हणजे आपले तेच निजघर आहे.

वो दुनिया मेरे बाबुल का घर, यह दुनिया ससुराल... नेमके हेच आपल्याला कळत नाही याकडे हा आंधळा इंगित करतो पाहा.