येरे बा विट्ठला

18 Jun 2020 16:41:55
आज आपण जाते पाहणार आहोत. जुन्या काळी जात्यावर दळण करण्याचे काम घरोघर चालत असे. बायकांसाठी ते नेहमीचेच होते. हे काम कष्टाचे, कंटाळवाणे आणि वेळ खाणारे होते. हा वेळ कारणी लागावा, कंटाळा आणि कष्ट जाणवू नये या हेतूने दळण करताना बायका मग ओव्या अथवा गाणी म्हणत. लहान मुलांनाही या जात्याच्या घरघरीबरोबर सुमधुर आवाजातील गायनानेच जाग येत असे. त्यामुळे जाते ही त्यांच्याही परिचयाची वस्तू होती. अलीकडच्या काळात तर जाते आपल्याला चित्रातूनच दाखवावे लागेल. चक्कीवरून आणलेल्या पीठाच्या पोळ्या आता केल्या जातात.

pandurang hari_1 &nb

संत जनाबाईने देखील जाते ही अभंगरचना केली. या अभंगातील रूपकात मोठा गहन अर्थ भरला आहे, असे मानले जाते.

सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेकें

ओव्या गाऊ कवतुके तू येरे बा विट्ठला

जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे

लावुनी पाची बोटें गे तू येरे बा विट्ठला

ही जाती मोठमोठी असत आणि जोर लावून ती फिरविण्याचा खुंटा ओढावा लागत असे. यासाठी दोघी जणी असल्या तर जात्याला दोन खुंटी असत. तरीही आपल्या अंगात तो जोर यावा यासाठी विट्ठलाचा धावा केला आहे. या जात्याला नाव ठेवता येत नाही. ते सुंदरच म्हणावे लागते आणि ते फिरविताना कौतुकाने ओव्या गायच्या असतात. जात्याच्या दोन खुंटांना जीव आणि शिवाची उपमा दिली आहे ही अगदी नेट लावून ओढावी लागते.

हा प्रपंचही तसाच हाताची पाची बोटे एकत्र आणून अगदी नेटाने ओढावा लागतो.

सासू आणि सासरा दीर तो तिसरा

ओव्या गाऊ भरतारा, तू येरे बा विट्ठला

सासू, सासरा, दीर आणि पती अशा संयुक्त कुटुंबाचा उल्लेख ओव्या गाताना केला आहे. दळण करताना चारचौघी मैत्रिणी एकत्र जमत असत, त्यांचाच उल्लेख बारा-सोळा जणी असा केला आहे. याचा अर्थ फार मोठा कुटुंबकबिला आहे हे ध्यानात येते. जनाबाईचे लग्नच झाले नव्हते त्यामुळे सासूपुढे दळलेले पीठ मापात भरून नेऊन ठेवण्याची काही गरज नव्हती. सासुरवाशिण बाईचे जीवन कसे असते हे सांगण्यासाठीच हा भाग या अभंगात आलेला आहे.

प्रपंच दळण दळिले, पीठ मी भरीले

सासू पुढे ठेविले तू येरे बा विट्ठला

सत्वाचे आधण ठेविले पुण्य मी वैरिले

पाप ते उतू गेले, तू येरे बा विट्ठला

जनी जाते गाईल, जगी कीर्त राहिल

थोडासा लाभ होईल, तू येरे बा विट्ठला

मग ही सासुरवाशीण चुलीवर सत्वगुणाचे आधण ठेवून त्यात पुण्य वैरते. जे काही चुलीवरून उतू गेले ते पाप होते अशी तिची भावना आहे. जाते गायल्याची फलश्रुती सांगताना जनाबाई म्हणतात की, जगात आपली कीर्ती मागे उरेल, एवढा तरी लाभ यातून होईल हे निश्चित समजावे.

Powered By Sangraha 9.0