एकटे आहोत, एकाकी नाही!

स्रोत: विवेक मराठी    दिनांक02-Jun-2020
|
@ऍड. भाग्यश्री चौथाई
 लाॅकडाउनमुळे सगळेच जण घरात बंदिस्त आहेत. यानिमित्त कुटुंबातील व्यक्तींसोबत बराच वेळ घालविण्याची संधी सगळ्यांनाच मिळाली आहे. परंतु काही ज्येष्ठ नागरिक मात्र एकटेच आहेत. या काळात खरी परीक्षा या ज्येष्ठ नागरिकांचीच आहे. शारिरीक कमजोरपणा, काही व्याधी, आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाची चिंता, भरीस भर म्हणजे अशा वेळी मदतनीसही सोबत नाही. काही ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक विचारच या कठीण समयी त्यांना जगण्याची उमेद देत आहे.

We are alone, not alone!_

आपल्या आयुष्याच्या प्रवासात अनेकदा कित्येक चढउतार, खाचखळगे, तर कधी नागमोडी वळणे येतात. आयुष्य असे सरळ सोप्पे कधीच नसते. आज कोरोना नामक साथीमुळे आपल्या लहानशा जगात सगळीकडे अशीच उलथापालथ झाली आहे. आज सगळे जग ठप्प झाले आहे. गेले जवळपास दोन महिने कोरोनाशी लढा देत आपण घरात लॉकडाउनमुळे बंदिस्त आहोत. सगळी मंडळी घरात सुरक्षित आहेत, एकमेकांच्या साथीने आणि सोबत. कित्येक दिवस मनी बाळगून असलेली - एकत्र वेळ घालवायचा, गप्पागोष्टी करत जेवण करायचे ही वरवर साधी वाटणारी स्वप्ने प्रत्यक्षात आली आहेत. कुटुंबात एकमेकांची साथ लाभते, अडीअडचणींना सगळे मिळून तोंड देतां येते, मिळून मिसळून घरकामांची वाटणी होते. आपल्या जीवनात कुटुंबाचे काय स्थान असते ते आपण जाणतोच. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याला कायमच आपल्या आवतीभोवती माणसांचा गराडा आवडतो.

आजच्या कठीण काळात काही जण वेगवेगळ्या कारणाने एकटे राहणारे आहेत. कोणाची मुले परदेशात, तर कोणी गावाकडच्या घरी एकटे. आज लॉकडाउनच्या काळात त्याची खरी परीक्षा आहे. कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही की कोणी त्यांच्या घरी भेटायला येऊ शकत नाही. कोणी वयस्कर, आजारी, तर काही जण परावलंबी आणि मुख्य म्हणजे घरी कामाला, मदतनीस म्हणून येणारे कोणी नाही. त्यामुळे सगळी कामे स्वत:ची स्वत:ला करायची आहेत, याचा ताण आहेच. आजूबाजूची तणावग्रस्त परिस्थिती घरात एकटे राहणाऱ्यांच्या मनावर विपरीत परिणाम करते आहे. तरीही काही जण नेटाने या परिस्थितीचा मुकाबला करत आहेत.

दोन वर्षापूर्वी नोकरीतून निवृत्त झालेल्या कल्पनाताई एकट्या राहतात. मुलगा लंडनला स्थायिक, तर मुलगी अमेरिकेला. गेल्या वर्षी त्या दोघांकडे सहा महिने राहून आल्या, पण तिथे फारसे न करमल्यामुळे आता इथेच भारतात एकट्या राहतात. नियमितता हा कल्पनाताईंचा गुण. सगळी कामे वेळेवर - व्यायाम, खाणे, थोडेफार लिखाण, वाचन. त्यांचा वेळ छान जाई. आता कोरोनामुळे बाहेर फिरणे बंद. घरात एकट्या. कसा जातो दिवस? असे विचारल्यावर म्हणाल्या, “माझं सगळं रुटीन तेच आहे. उलट हाताशी वेळ आहे तर मस्तपैकी वाचन करते, आराम करते, व्यायाम करते. रात्री मुलांशी गप्पा होतात. शरीराने लांब असलो, तरी या काळात मनाने जास्त जवळ आलोय.” त्यासाठी हातात असलेल्या स्मार्ट फोनचे आभार मानायला विसरत नाहीत.

कल्पनाताईंकडे पाहिल्यावर असे वाटते की आनंद आणि सुख या कल्पना आपल्या मानण्यावर असतात. त्या कोणत्याही बाह्य गोष्टींवर, एखाद्या व्यक्तीवर, परिस्थितीवर अवलंबून नसतात. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वत:चे मनोधैर्य ढळू न देता आलेल्या परिस्थितीला तोंड देणे कल्पनाताईंना शक्य झाले.

आमच्या सोसायटीमध्ये जोशीकाका असेच एकटे राहतात. मुलगा, सून परगावी, सगळे इतके अचानक घडले की काकांना तिकडे जाता आले नाही की त्या लोकांना इकडे येता आले नाही. आम्ही सगळे त्यांना मदत करतो, पण ते स्वत: स्वावलंबी आहेत हे विशेष. आणि मुख्य म्हणजे स्वत:चे मानसिक स्वास्थ्य त्यांनी या परिस्थितीत जपून ठेवलेय. काका कधी जुने फोटो काढून बसतात आणि पूर्वीच्या आठवणीत रमतात, तर कधी टीव्हीवर बातम्या बघणे, जुने चित्रपट बघणे यात त्यांचा छान वेळ जातो. काका सांगतात, "दूरदर्शनने माझी आवड लक्षात घेऊन महाभारत, रामायण सुरू केलंय." त्यामुळे ते दूरदर्शनला न विसरता आवर्जून धन्यवाद देतात.


We are alone, not alone!_

आपल्या विचारांचा दर्जा जितका सामर्थ्यवान, तितका मानसिक त्रास कमी असे जोशीकाकांकडे बघून वाटतेय. लॉकडाउनच्या या काळ्या बोगद्याचा प्रवास काही काळाने संपणार आहे हे निश्चित, पण तोवर आपले मानसिक आरोग्य जपून ठेवायचे आहे. सगळे ढग विरून गेले की आपण आपल्या आप्तेष्टांसह परत एकदा ताणतणावविरहित आयुष्य जगणार आहोत. परंतु या कालावधीतून जाताना रोजचा दिवस आनंदाने, उत्साहाने घालवणे महत्त्वाचे आहे. मला वाटते की जोशीकाका भविष्याकडे अशाच सकारात्मक दृष्टीने बघतात, हे नक्कीच वाखावण्यासारखे आहे.

कोरोनाच्या या काळात मालतीआजी (वय वर्षे ८४) घरात एकट्या राहतात. स्वत:चे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी छानशी कविता केली. आजींचा उजवा हात आधीपासून दुखतोय, त्यात आता कामवाली येत नाही, काम तर हाताला करायचे आहे. मग काय? आजींनी चक्क त्यांच्या हाताची छानपैकी समजूत काढली. आजींनी लिहिलेय -

समजलं मला की तू नाराज आहेस माझ्यावर, काय उपाय करू सांग तुझ्या दुखण्यावर?
विश्रांती सध्या तुला नाही मिळणार. सांग बरं मला, माझं तुझ्याशिवाय कसं चालणार?
मान्य आहे तुलाच करावी लागतात कामं सारी. पण अरे, तू करतो आहेस ती भारी.
सांग, डावा करतोय ना तुला मदत थोडीशी? माहीत आहे मला, ती नाही तुझ्यासाठी पुरेशी.
तुला असं वाटतंय की मी करतीय तुला शिक्षा? नाही रे बाबा, ही तर तुझी अन् माझी परीक्षा!
अभ्यास करून आपल्याला पास व्हायचंय. नुसतं पास नाही, तर बक्षीसही मिळवायचंय.
निराश नाही व्हायचं, धीर हवाय धरायला. हळूहळू कोरोनाचे ढग लागतील विरळ व्हायला.
वय आहे आपलं चौऱ्याऐंशी. सुटकेची वेळ आलीय जवळ. म्हणून कळ सोस ना थोडीशी..
कामवाली आली की भरपूर आराम आपल्याला, मग काय, शांतपणे बसू या दोघे ध्यानाला.

मालतीआजींनी या वयातदेखील किती सकारात्मकता जपली आहे! कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी केवळ अशीच भावनिक बुद्धिमत्ता उपयोगी पडू शकते. स्वत:शी असलेले आपले नाते या काळात अधिक बळकट करता येऊ शकते, हेच मालतीआजी आपल्या कवितेतून सांगता आहेत.

लॉकडाउन सुरू झाला आणि पंधरा दिवसाच्या कालावधीत मावशीचा फोन आला. मावशी गावातल्या घरी एकटीच राहते. मावशी सांगत होती, "घरात एकटीला कंटाळा आलाय. बाहेर कुठे जाता येत नाही, संध्याकाळचा आमचा मैत्रिणींचा गप्पांचा कट्टा बंद झाला, सकाळचा हास्यक्लब बंद झाला, काय करू समजत नाहीये. किती काळ चालणार बाई हे?" ती फार वैतागली होती. मग रोजच्या गप्पा सुरू झाल्या. मावशीला फोनवर नवनवीन गोष्टी सांगणे, घरात आहेस हेच किती सुरक्षित आहे हे पटवून देणे सुरू झाले.

आज कोरोना लॉकडाउनच्या अवस्थेतून जाताना आपल्या सगळ्यांनाच भौतिक सुखांच्या मर्यादा लक्षात येत आहेत. आत्मकेंद्री वागणूक तर बदलायची आहे, त्याचबरोबर स्वत:ची काळजी तर आपली आपणच घ्यायची आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये 'माझ्यातल्या मी'शी नाते अधिक प्रगल्भ होणार आहे. हे नाते फुलवायला हाच काळ योग्य आहे, हे पटले की पुढचे काम सोप्पे होते. आमच्या रोजच्या गप्पांमधून मावशीला याची जाणीव झाली. टीव्हीवरच्या बातम्या बघून बाहेरच्या जगातल्या परिस्थितीची तिला कल्पना आली, त्या लोकांपेक्षा आपण कितीतरी सुखी आहोत याची तिला जाणीव झाली. मी घरी आहे म्हणजे सुरक्षित आहे, हे तिच्या लक्षात आले. दिवसभर आपली कामी हळूहळू करत आज मावशी आनंदाने घरात राहते आहे.

आमच्या सोसायटीमधल्या आजींनी घरात उपलब्ध असलेल्या लोकरीमधून देवासाठी छान छोटी छोटी बसकण केली. कोणी गव्हले केले, तर कोणी पापड. काही जण जुन्या आठवणीमध्ये रमले, तर काही जण स्मार्ट फोन वापरायला शिकले. काहींना दिवस पुरत नाही इतके काम अंगावर घेतलेय. परिस्थितीमुळे आलेले नैराश्य झटकून टाकायचे असेल, तर हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. हाताला आणि डोक्याला काम हेच ब्रीदवाक्य समजून जी मंडळी एकटी आहेत, त्यांनी दिवसभराचे नियोजन करायला हवे. एकटे आहोत, एकाकी नाही हे ज्यांना कळले, ते जिंकले.

एकटे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये जर स्वसंवाद असेल, तर हा काळ नक्कीच सुखावह ठरेल. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद जर दर्जेदार असेल, तर तो कायमच उभारी देतो. कठीण काळातून सावरण्यासाठी उपयोगी ठरतो.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा हा व्यक्तीच्या मनात असतो, हे लक्षात घ्यायला हवे. आपण बघतो की आजूबाजूला गर्दी असली तरी काही माणसे तिथे असून नसल्यासारखी वागतात, याउलट एकटी राहणारी माणसं मनाने खंबीर असतात, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ असतात. स्वत:च्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष द्यायला हवेच. वेळच्या वेळी सकस, पौष्टिक पुरेसा आहार घेणे, विश्रांती, व्यायाम हे सगळे गरजेचे असते. अशा परिस्थितीत मी एकटी पडले / एकटा पडलो असे नसून मी माझी / माझा आहे असा सकारामत्क दृष्टीकोन बाळगला, तर आपण या काळाचा आनंदाने उपभोग घेऊ शकतो. खरेच, आज जे एकटे आहेत, तरीदेखील आनंदाने, उत्साहाने लॉकडाउनच्या काळातही आपली सकारात्मकता टिकवून निर्माण झालेल्या परिस्थितीला आव्हान देऊन उदया उगविणाऱ्या सूर्याची वाट पाहत आहेत, त्यांना सलाम.


Adv.Bhagyashree Chouthai
9960099289