म्युच्युअल फंडाची तोंडओळख

विवेक मराठी    20-Jun-2020
Total Views |
 म्युच्युअल फंडातून काढलेल्या रकमेवर टीडीएस नाही, तसेच त्यावर भांडवली कर लागत असला तरी इंडेक्सेशनची सोय उपलब्ध असल्याने करपात्र उत्पन्नात अल्पशीच वाढ होते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) उघडून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ तसे थोडी थोडी करत सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी मोठी रक्कम शिल्लक राहू शकते. बचतीचा व अधिक परतावा देणारा हा गुंतवणुकीचा पर्याय निवडणे योग्य होईल.

mutual funds india_1 

काही वर्षांपूर्वी एलआयसी म्युच्युअल फंडाचा मुख्याधिकारी व संचालक असताना मी अनेक ठिकाणी ‘गुंतवणूकदार जागरूकता’ कार्यक्रमात व्याख्यान द्यायला जात असे. असाच मी कोल्हापूरला गेलो असताना सुरुवातीसच मी उपस्थितांना प्रश्न केला, "भारतात सुरू झालेला पहिला म्युच्युअल फंड कोणता? त्याची सुरुवात कधी झाली?" जेमतेम पाच-सहा हात वर गेलेले आठवतात. ही गोष्ट काही खूप जुनी नाही बरं, असेल २०१४-१५मधील. एवढे कशाला, काहीच दिवसांपूर्वी माझा एक मित्र एका म्युच्युअल फंडाचे स्टेटमेंट घेऊन आला होता, म्हणाला, "अरे निलेश, माझ्या वडिलांच्या नावे म्युच्युअल फंडात काही ठेव (?) आहे, ती मला परत मिळेल का?" मी बघितले तर त्या स्टेटमेंटमध्ये नॉमिनी म्हणून त्याचेच नाव होते व त्याच्या वडलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचे माझ्या स्मरणात होते. ती रक्कम मिळवण्यासाठी या पठ्ठ्याने आजवर काहीच केले नव्हते. मी त्याचा फोलिओ उघडून घेतला आणि आठेक दिवसात सर्व रक्कम त्याच्या फोलिओवर जमा झालीही.

म्युच्युअल फंडाबाबत ग्रामीण भागातील तर सोडा, शहरी भागात राहणार्‍या व्यक्तीही खूपच अनभिज्ञ आहेत. बँक डिपॉझिट, आयुर्विमा पॉलिसी, सार्वजनिक निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत पत्रे ही जशी बचतीची किंवा गुंतवणुकीची साधने आहेत, तद्वतच म्युच्युअल फंड हेसुद्धा गुंतवणुकीचे एक प्रभावी साधन आहे. त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ या.

१. म्युच्युअल फंड म्हणजे काय?
विविध गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम योजनेच्या उद्दिष्टांनुसार शेअर्स, डिबेंचर्स, सरकारी कर्जरोखे, बॉंड्‌स यात गुंतवून त्यावर मिळणार्‍या परताव्यातून फंड व्यवस्थापन खर्च वजा करून बाकी सारी रक्कम गुंतवणूकदारांत वाटून देणारी योजना म्हणजे म्युच्युअल फंड. आजमितीस भारतात सेबीने (सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने) परवाना दिलेल्या ४४ म्युच्युअल फंड कंपन्या अस्तित्वात असून त्यांच्या विविध योजनांद्वारे ९ कोटी गुंतवणूकदारांनी २४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्यात केली आहे.

२. म्युच्युअल फंडाच्या योजनांचे प्रकार : म्युच्युअल फंड योजना प्रामुख्याने दोन प्रकारात मोडतात.

संरचनेनुसार : १. खुला (ओपन एन्डेड), २. बंद (क्लोज एन्डेड), 3. विनिमित (एक्स्चेंज टेडेड)
गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार : १. इक्विटी फंड, २. डेट फंड, ३. हायब्रीड किंवा बॅलन्स्ड फंड, ४. सेक्टोरल फंड, ५. फंडाचा फंड आणि ६. कमोडिटी फंड.
ओपन एन्डेड फंडांमध्ये गुंतवणूकदार हवी तेव्हा गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीच्या दिवशी त्या योजनेतील युनिटचे जे मूल्य असेल, त्यानुसार त्याच्या खात्यावर युनिट जमा होतात. युनिटच्या मूल्यास 'नेट ऍसेट व्हॅल्यू' किंवा 'एन.ए.व्ही.' असे म्हणतात. गुंतवलेली रक्कम कधीही काढता येते.
क्लोज एन्डेड फंडांमध्ये केवळ विशिष्ट कालावधीतच गुंतवणूक करता येते, तसेच गुंतवलेली रक्कम योजनेचा कालावधी १३/२७/३७/५१ महिने असतो. अशा प्रकारचा कालावधी पूर्ण झाल्यावरच गुंतवलेली रक्कम अदा होते.

गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसारचे वर्गीकरण म्हणजे जो इक्विटी फंड असतो, त्यात जमा झालेली सर्व रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते, तसेच डेट फंडात जमा झालेली सर्व रक्कम डेट फंडात (ज्यात व्याज मिळते) गुंतवली जाते. हायब्रीड किंवा बॅलन्स्ड फंडातील काही टक्के रक्कम शेअर बाजारात तर उरलेली डेट फंडांत गुंतवली जाते.


mutual funds india_1 

३. म्युच्युअल फंडाचे खाते (फोलिओ) कसे उघडता येईल?

म्युच्युअल फंडाचे खाते उघडण्यासाठी 'नो युवर कस्टमर ( - केवायसी)' ही प्रक्रिया पार पाडावी लागते. बँकेत खाते उघडताना व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आणि निवासाचा पुरावा (प्रुफ ऑफ आयडेंटीटी आणि प्रुफ ऑफ रेसिडेंस) यासाठी जसे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, विजेचे बिल, घरभाड्याची पावती यापैकी किमान दोन दस्तऐवज लागतात, तद्वतच ते इथेही लागतात. इथे त्याशिवाय बँक खात्याचा तपशील, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, फोटो या गोष्टीही लागतात. फोलिओ उघडण्याचा छापील अर्ज भरून सह्या करून फोटो चिकटवून कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात तो जमा करता येतो. आजकाल हे सर्व अर्ज व दस्तऐवज स्कॅन करून ‘ऑनलाइन’ पद्धतीनेसुद्धा जमा करता येतात, त्यासाठी कुठल्याही कार्यालयात जायची गजर पडत नाही. वितरकांच्या किंवा दलालाच्या (ब्रोकरच्या) माध्यमातूनही असा अर्ज करता येतो. अर्ज करताना कुठलीही फी आकारली जात नाही, तसेच गुंतवणुकीची रक्कम देणे गरजेचे नाही. सेबीने मान्यता दिलेल्या डिपॉझिटरीमध्ये तुमचा फोलिओ उघडला जाऊन ईमेलद्वारे, एसएमएसने, तसेच पोस्टाद्वारे आठेक दिवसात त्याबद्दलची सूचना दिली जाते. केवायसी झाले की आपण हव्या त्या म्युच्युअल फंडात आणि त्यांच्या हव्या त्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.

४. गुंतवणुकीसाठी योजनेची व फंडाची निवड कशी करावी?

केवायसी झाले की पुढची पायरी म्हणजे गुंतवणुकीसाठी एक किंवा एकाहून जास्त म्युच्युअल फंडाची निवड करणे, तसेच त्यांच्या ३०-४० योजनांपैकी योग्य त्या योजनेची निवड करणे. या कामी वित्तीय सल्लागार, ब्रोकर किंवा म्युच्युअल फंड वितरक यापैकी कुणाचीही मदत घेता येईल. प्रथमच गुंतवणूक करणार्‍यांनी आपल्या निर्धारित उद्दिष्टांनुसार किंवा गरजेनुसार फंडाची निवड करावी. वेबसाइटच्या मदतीने किंवा गूगलवर शोध घेऊनसुद्धा योजनेची निवड करता येते. गुंतवणूकदार मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा भविष्यकालीन गरजांसाठी मोठ्या विश्वासाने फंडाच्या योजनांत गुंतवत असतो, त्यासाठी योग्य फंड, योग्य योजना आणि योग्य फंड व्यवस्थापक निवडणे गरजेचे असते. व्हॅल्यू रिसर्च यासारख्या संस्था याबाबत मार्गदर्शन करतात. फंड व्यवस्थापकांच्या कामगिरीवर वृत्तपत्रातूनही लेखन होत असते.

५. गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची आहे? म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक अगदी एक दिवसासाठीसुद्धा करता येते. गुंतवणुकीचे आपले उद्दिष्ट काय यावर गुंतवणुकीचा कालावधी ठरतो. उदा., दरमहा काही रक्कम गुंतवून, ती सेवानिवृत्तीनंतर एकदम मिळावी असा उद्देश असल्यास ६० वजा आजचे वय इतकी वर्षे गुंतवणूक करायची असल्यास, इक्विटी योजनांत गुंतवणूक करावी. आपला मूळ स्वभाव जोखीम घेण्याचा असल्यास इक्विटी योजनांत गुंतवणूक करावी, अन्यथा डेट योजनांत. मात्र थोडी जोखीम घ्यायला हरकत नाही अशी वृत्ती असेल, तर हायब्रीड किंवा बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करावी. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास इक्विटी फंडांनी डेट फंडांहून किमान 2% अधिक परतावा दिल्याचे दिसते.

६. म्युच्युअल फंडांची मालकी : सेबीने म्युच्युअल फंड व्यवसायात सरकारी, खासगी व विदेशी कंपन्यांना परवानगी दिली आहे. यूटीआय, एलआयसी, एसबीआय असे सरकारी फंड, महिंद्र मनुलाइफ, बिर्ला, टाटा, आयसीआयसीआय, एचडीएफसी हे खासगी, तर फ्रँकलिन टेंपलटन, बीएनपी परिवा, इन्व्हेस्को, मिराई म्युच्युअल फंड हे विदेशी आहेत. सर्व म्युच्युअल फंडांवर सेबीची नजर असते.

७. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे
अ. गुंतवणूक व्यवस्थापकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो, त्यामुळे त्यांची जोखीम कमी होते.
ब. गुंतवलेली रक्कम, अपवाद वगळता, कधीही काढून घेता येते. आज दुपारी १ वाजण्यापूर्वी ऑनलाइन विनंती केल्यास उद्या सकाळी १० वाजण्यापूर्वी लिक्विड फंडातली रक्कम बँक खात्यात जमा होते.
क. व्यवस्थापनाच्या खर्चावर सेबीने मर्यादा घातली असल्याने गुंतवलेली रक्कम कमी होत नाही.
ड. सेबीचे काटेकोर-नियंत्रण असल्याने म्युच्युअल फंड बुडून ग्राहकांचे पैसे बुडल्याची घटना नाही.

माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत, जे पगार झाल्यावर मासिक खर्चाला लागणारी रक्कम सोडून जास्तीची सारी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्विड स्कीममध्ये गुंतवतात. बँकांमार्फत दिले जाणारे व्याज करपात्र आहे, तसेच दर वर्षी फॉर्म १५ न दिल्यास व्याजातून प्राप्तिकर कापला (टीडीएस) जातो. म्युच्युअल फंडातून काढलेल्या रकमेवर टीडीएस नाही, तसेच त्यावर भांडवली कर लागत असला तरी इंडेक्सेशनची सोय उपलब्ध असल्याने करपात्र उत्पन्नात अल्पशीच वाढ होते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) उघडून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ तसे थोडी थोडी करत सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी मोठी रक्कम शिल्लक राहू शकते. बचतीचा व अधिक परतावा देणारा हा गुंतवणुकीचा पर्याय निवडणे योग्य होईल.