आषाढस्य प्रथम दिवसे - महाकवी कालिदासदिनानिमित्त

विवेक मराठी    22-Jun-2020
Total Views |
@डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी


pandharpur ashadhi ekadas

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. या वर्षी हा दिवस २२ जून रोजी येत आहे. त्यानिमित्ताने कालिदासाच्या एकूणच साहित्यिक अवकाशाचे चिंतन व्हावे, असा मानस सर्वांच्या मनात असतो. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या 'मेघदूत' या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात 'आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्ट सानुम् वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श।।' असा उल्लेख येतो.

कालिदासाच्या जन्मतिथीबाबत विद्वानांमध्ये सहमती नाही. कालिदासाच्या जन्माचा काळ निश्चित नसल्यामुळे त्याने मेघदूतात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा केला जातो. एखाद्या साहित्यिकाच्या कृतीतील उल्लेखावरून त्याचा जन्मदिन साजरा करणे ही कल्पना खूपच छान आहे. मेघदूतामध्ये कालिदासाने निसर्गाचे खूपच सुंदर वर्णन केले आहे. भारतीय भाषांमधील अनेक कवींच्या साहित्यावर, तसेच गटे, मॅक्समुलर इत्यादी विश्वकवींच्या साहित्यावरदेखील मेघदूताचा प्रभाव पाहावयास मिळतो. प्रो. मॅक्समुलर लिहितात,

'Rarely has a man walked our earth who observed the phenomena of living nature as accurately as he, though his accuracy was off course that of a poet and not that of a scientist.'

कालिदासाने संस्कृत साहित्याची दालने एकाहून एक अशा मौल्यवान रत्नांनी भरवली आहेत!
अद्यापि यस्य गायन्ति कीर्ती: कविवरा अपि।
नमामि कालिदासम् तं भारतीयं महाकवीम्।।

भारतीय संस्कृतीला अखिल जगतात मूर्धन्य स्थानी प्रस्थापित करण्यात महाकवी कालिदासांचे श्रेष्ठत्व समावलेले आहे. 'कविकुलगुरू' या बिरुदाचा मानकरी असलेला कालिदास म्हणजे भारतीय कवींच्या शिरपेचातला मुकुटमणी म्हणता येईल. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. महाकवी कालिदासाने आपल्या जगद्विख्यात मेघदूत या काव्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांतसुंदर वर्णन केले आहे. मराठीतील ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी आपल्या 'जीवीचा जिवलग कालिदास' या लेखामध्ये असे म्हटले आहे की 'काही कवी प्रेमिकाच्या दृष्टीतून निसर्गाकडे पाहतात. काही त्याच्याकडून शिकवण मिळण्याची अपेक्षा करतात. 'Books in the running Brooks' अशी स्वतःची मनोभूमिका दर्शवतात. Teach me blithe spirit, bird thou never wert' असे सरळ सरळ आवाहन करतात. लव्हर्स फिलॉसॉफी - 'Lovers Philosophy'सारख्या कवितेत सृष्टीमध्ये भरून असलेली प्रणयक्रीडा ब्रिटिश कवी शेले चविष्टपणे सांगतो. पण कालिदासाची गोष्टच निराळी. आपल्या जीविताच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आणि वाकणावर त्याला निसर्गाचा नवा नवा प्रत्यय येत राहतो!"

मेघदूतात महाकवी कालिदासाने एक हृदयस्पर्शी कथा रेखाटली आहे. हेमामाली आणि विशालाक्षी या नूतनविवाहित यक्ष दांपत्याची ही कथा आहे. आपला स्वामी कुबेराच्या सेवेमध्ये प्रमाद घडल्यामुळे कुबेराने हेममालीला एक वर्षाच्या विजनवासाची शिक्षा दिली. नुकतेच लग्न झालेल्या आपल्या प्रिय पत्नीपासून दूर रामगिरी पर्वतावर यक्ष एक वर्षासाठी दूर आला. प्रियाविरहाचा हा काळ रामगिरी पर्वतावर कंठत असताना आठ महिने कसेबसे गेले व पावसाळ्याची सुरुवात झाली. हाच तो आषाढाचा पहिला दिवस. 'आषाढ का एक दिन' या नावाचे हिंदी साहित्यिक मोहन राकेश यांचे नाटकही प्रसिद्ध आहे. आकाशात दाटलेल्या मेघाकडे बघून यक्षाला आपल्या प्रिय पत्नीची खूप आठवण येते आणि तो त्या मेघाकडे उत्सुक होऊन पाहू लागतो. 'उपरि घनं घनरटितं, दूरे दयिता किमेतद आपतितम्।' अशी त्याची अवस्था होते.

कुटजकुसुमांची - अर्थात त्याच्या कुटीमधील सुंदर फुलांची उधळण करून अतिशय प्रिय वाक्याने तो मेघाशी बोलू लागतो. विरहदुःखाने पीडित व असाहाय्य झालेला यक्ष पत्नीच्या आठवणीने उतावीळ होऊन मेघालाच आपला दूत बनवतो आणि हे मेघदूत नावाचे अतुल्य काव्य कालिदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेते.

रामगिरी पर्वतावर, अर्थात सध्याचे रामटेक येथे असलेला हा यक्ष मेघाला आपल्या पत्नीकडे संदेश पोहोचवण्यासाठी जाण्याची विनंती करतो. तसेच त्याच्या अलकानगरीचा मार्गदेखील सांगतो. यक्षाची राजधानी असलेल्या अलकानगरीत त्याचे घर आहे. वाटेत जाताना आलेल्या नयनरम्य निसर्गचित्रणाने दृष्टीचे पारणे फिटते. यक्ष विदिशा नगरी व तेथून उज्जैनी नगरीत जाण्याचे मेघाला सांगतो. उज्जैन नगरीत महाकाल मंदिराच्या दर्शनानंतर निरविंध्या या नदीचे पाणी पिऊन तू अवंती नगरीत जा, तुला वाटेत मयूर रस्ता दाखवतील असेही यक्ष मेघाला सांगतो. 'हे मेघा, तू आल्यामुळे ज्यांचे पती व्यापारासाठी गेले आहेत अशा स्त्रियांना त्यांच्या आगमनाची चाहूल लागेल. हंसाचासुद्धा प्रणयकाळ पावसाळ्यात तुझ्या आगमनामुळे झाल्यामुळे ते तुला त्यांच्या थव्याची माला करून घालतील.' असे कालिदास म्हणतो.

मेघाच्या घनश्याम अशा अंगावर मधूनच दिसणारा इंद्रधनुष्य शोभून दिसेल व मेघ मोरपीस धारण करणाऱ्या गोपाळकृष्णासारखा सुंदर दिसेल, असे यक्ष मेघास सांगतो. मेघदूतातील मार्ग हा महाराष्ट्रातील नागपूरजवळच्या रामटेकपासून ते उत्तरेकडील अलकानगरीपर्यंतचा आहे. या संपूर्ण मार्गाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की भारताच्या भूगोलाचा, तसेच साधनसंपत्ती, नदी, पर्वत, निसर्गाचे सौंदर्य यांचा कालिदासाचा खूप व्यासंग होता. या काव्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावही प्रकट होतो. सध्या झालेले उघडेबोडके पर्वत व पर्यावरणाचा ऱ्हास कालिदासाला अपेक्षित नाही. कालिदासाला वृक्षांनी सजलेले व फळाफुलांनी वेलीनी नटलेली सुजलाम सुफलाम अशी वनसृष्टी अपेक्षित आहे. कालिदासाच्या मेघदूतात उल्लेख झालेल्या फळांचा, फुलांचा, वेलींचा व निसर्गाच्या चित्रणाचा स्वतंत्र अभ्यास करता येईल.

यक्ष राहत असलेल्या अलकानगरीचे वर्णन तर डोळ्यांना थक्क करणारे आहे. 'जेथे डोळ्याला पाणी हे केवळ आनंदाश्रूमुळे येते, जेथे ताप हा केवळ प्रियेच्या संगमामुळे येतो, जेथे कलह हा केवळ प्रिय सखीच्या प्रणयाशिवाय होत नाही, आणि जिथे यौवनाशिवाय दुसरे कोणतेही वय नाही' अशा अलकानगरीचे वर्णन कालिदास करतो. मेघाला यक्षाच्या पत्नीला संदेश द्यावयाचा आहे व अलकानगरीतील यक्षाचे घर मेघ कसा ओळखेल, यावर कालिदास यक्षाच्या घराचे खूप सुंदर वर्णन करतात.
तत्रागारं धनपतिगृहादूत्तरेणास्मदीयं
दुरालक्ष्यम् सुरपतिधनुशचारुणा तोरणेन।
यस्योपांते कृतकतनय: कांतया वर्धितो मे
हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमंदारवृक्ष: ।
- 'कुबेराच्या घराच्या उत्तर दिशेला माझे घर तुला दुरूनच दिसेल. माझ्या घराला तोरण म्हणून इंद्रधनुष्याची योजना केली आहे. माझ्या घरासमोर माझ्या पत्नीच्या हातांनी पाणी पिऊन पुष्ट असा व आपल्या फुलांचा गुच्छामुळे वाकलेला बाल मंदार वृक्ष आहे.'

शांता शेळके या ज्येष्ठ मराठी कवयित्री यशाच्या घराच्या वर्णनाच्या श्लोकांचे सुंदर मराठीत समश्लोकी भाषांतर केले आहे, ते असे -
'कुबेर सदना जवळी आहे उत्तरेस ते भवन आमुचे
दुरून भरते नयनी कारण तोरण दारी इंद्रधनुचे
प्रियपुत्रासम सखीने माझ्या वाढविलेला तरु अंगणी
मंदाराचा गुच्छ जयाचे सहज करा मधी येती झुकुनी'

अशा या घरात विरहामुळे व्याकूळ अशी माझी पत्नी आहे, असे यक्ष मेघाला सांगतो. कालिदासाने यक्षाच्या पत्नीचे केलेले वर्णन हे मिलनातुर अशा विरहिणी नायिकेचे वर्णन आहे. 'विरहामुळे मितभाषी झालेल्या, रडून डोळे सुजलेल्या, पतीची आठवण करत आणि दिवस मोजत असलेल्या माझ्या पत्नीला पाहून हे मेघा, तुला तिची ओळख पटेल. आपल्या पुढ्यात असलेल्या वीणेवर माझ्या नावाने युक्त अशा पदांचे गायन करणारी, अश्रू वीणेवर पडल्यामुळे ओल्या झालेल्या तारेला कसेतरी सावरत ती पुन्हा पुन्हा पद गुणगुणत बसली असेल.'

शांता शेळके यांनी मेघदूताचा भावानुवाद केला आहे शांताबाईंच्या अनुवादात उत्तर मेघामधले काही श्लोक मुळातून वाचण्यासारखे आहेत. मराठी भाषेमध्ये कालिदासाच्या संस्कृत श्लोकांची समश्लोकी त्यांनी लिहिलेली आहे. अलकानगरीतील यक्षाचे घर, घराभोवतालची सुंदर बाग, यक्षपत्नी यांचे वर्णन शांताबाई खूप छान करतात. त्यांनी केलेले विरही यक्षपत्नीचे वर्णन असे आहे -
'मलिनवसनी वा मांडीवरती वीणा घेऊन असेल बसली
नाव गुंफिले जयात माझे गीत गावया आतुर झाली
गाताना पण नयनी आसू ओघळती ते तारानवरती
स्वये योजिलेल्या तानांची ही सखीला होते, हाय! विस्मृती!'

उंबरठ्यावर फुले मांडुनी एक एक ती दिवस मोजिते
किती विरहाचे मास राहिले पुन्हा पुन्हा अजमावुनी बघते
रमते तेव्हा कल्पनेत मम सहवासाची चित्रे रेखून
विरहा मध्ये रमणी बहुधा असेच करिती मनोविनोदन।'

'हे मेघा, अशा माझ्या भेटीला आतुर असलेल्या पत्नीला माझा संदेश सांग की मी आणखी चार महिन्यांनी कार्तिक शुक्ल एकादशीला देवदीपोत्सवाच्या दिवशी परत येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा. पती खूप दिवस झाले परत येत नाही असे समजून कुठलाही वाईट विचार मनात येऊ देऊ नको' असा संदेश मेघाकडे यक्ष देतो.

मानवी संबंधांचे सत्य व नात्याची घट्ट वीण कालिदास आपल्या वाङ्मयात सुंदरपणे चित्रित करतो. दोन प्रेमी दूर राहिले, तरीही त्यांच्यातील प्रेम वाढत जाते, हा संदेश कालिदासाला यात द्यायचा आहे. भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रम सांगितला आहे. त्यात दांपत्यजीवनात एकमेकांवरील विश्वासाची - ज्याला आपण 'म्युच्युअल अंडरस्टँडिंग' असे म्हणतो, त्याची - वीण घट्ट करण्यासाठी मेघदूतासारख्या गीतीकाव्याची रचना झाली

अंत:पुरातील गुजगोष्टीपासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग, शृंगार व वैराग्य, काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉ. के.ना. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणं वाल्मिकीच्या नीतीला आणि व्यासांच्या बुद्धीला कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासांनी सत्य, वाल्मिकीने शिव, तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली. व्यास, वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचे सार साठवलेले आहे, असे महर्षी अरविंद म्हणतात ते याचमुळे.

सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या व विघटनवादी प्रवृत्तींच्या वाढीच्या या काळात भारताच्या संस्कृतिक एकात्मतेचे एक प्रतीक म्हणून कालिदास महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या बहुतांशी भागांची वर्णने त्याच्या साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीचे म्हणून जे आदर्श आहेत, ते कालिदासाने अभिव्यक्त केले आहेत व म्हणूनच केरळपासून काश्मीरपर्यंत सर्वांनाच कालिदास पूज्य वाटतो, 'आपला' वाटतो.

डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे