पंढरीचे वाटे अनंत घडती याग

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Jun-2020
|
@देविदास पोटे

पंढरीचे वाटे अनंत घडती याग।
वैकुंठीचा मार्ग तेणे संगे।।

जप तप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म।
हे जाणताती वर्म संतजन।।

भक्तिमार्ग फुकटा आनंदाची पव्हे।
लागलीसे सवे पुंडलिका।।

दिंडी टाळ घोळ गरुड टकियाचे भार।
वैष्णवांचे गजर जये नगरी।।

तिन्ही लोकी दुर्लभ अमर नेणती।
होऊनि पुढती सेविती।।

सनकादिक मुनी ध्यानस्थ पै सदा।
ब्रह्मादिका कदा न्‌ कळे महिमा।।

ज्ञानदेव निवृत्ती पुसतसे कोठे।
पुंडलिके केवढे भाग्य केले।।
- संत ज्ञानेश्वर


 Facebook Sant Dnyaneshwa

पंढरपूरची वारीची वाटचाल म्हणजे वारकर्‍यांचे आनंदाचे भक्तिनिधान. महासुखाची पर्वणी. टाळमृदुंगाच्या नादाबरोबर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ वा ‘विठोबा-रखुमाई’ हा नामगजर झाला की वारकरी भक्ताचे भान हरपते. नामाच्या लयीत त्याच्या चित्तवृत्ती तल्लीन होऊन जातात. अंतरीच्या ओढीने त्यांची पावले वारीच्या वाटेवर चालत राहतात.

या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘पंढरपूरच्या वाटेवर अनेक प्रकारचे याग, तपे घडत असतात. पावले वाटेवरून चालत असतात, म्हणून कायिक तप, मुखाने हरिनामाचा गजर सुरू असतो म्हणून वाचिक तप आणि अंतरंगात हरिनामाचे स्मरण केल्यामुळे मानसिक तप. पंढरपूरची वाट ही वैकुंठाचीच वाट आहे. जप, तप, अनुष्ठान यांचे नेमके वर्म संतांना ठाऊक असते. वारीत चालताना या क्रिया आपोआप घडत असतात.

भक्तीचा हा राजमार्ग सहज लाभणारा आणि फुकट मिळणारा आहे. त्याकरिता काही द्रव्य खर्च करावे लागत नाही. हे भक्तीचे वेड आनंददायक आहे. पुंडलिकासह सर्वांना हे भक्तीचे वेड लागले आहे. टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका यांची एकच गर्दी सगळीकडे उसळली आहे. हरिनामाचा गजर करणार्‍या हरिभक्तांचे थवे पंढरपूरच्या नगरीत दाटले आहे. हा भक्तीचा अनुपम सोहळा तिन्ही लोकांमध्ये दुर्मीळ आहे. म्हणूनच संतजन पुढे येऊन या भक्तिरसाचे आकंठ सेवन करतात. सनकादिक मुनी नेहमी ध्यानधारणेत मग्न असत. ब्रह्मालाही भक्तीचा हा महिमा उमगला नाही. निवृत्तीरायांना मी या कोड्याबाबत विचारले आहे. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा देत सांगितले की ऋषिमुनी आणि ब्रह्मा यापेक्षाही पुंडलिक भाग्यवान आहे. कारण त्याने भक्तीचे वर्म जाणले आहे.’

भक्तिरंगाच्या या भाग्याचा अनुभव वारकरी दर वर्षी वारीच्या वाटेवर घेत असतात. त्यांना वेगळे याग, तप करण्याची गरजच नाही. हे सर्व आपोआप, सहजपणे घडत असते. भक्तीचा हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, हे वास्तव संत ज्ञानेश्वरांनी या अभंगात प्रतिपादन केले आहे.