ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पर्याय की अडथळा?

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Jun-2020
|
@विनया पिंपळे

कोरोना महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक एकमेव उपाय म्हणजे 'सोशल डिस्टन्सिंग' जून महिन्यात मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरू होते, परंतु या नियमामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता 'ऑनलाईन शिक्षण' घ्यावे हा पर्याय पुढे आला. हा पर्याय श्रेयस्कर असला तरी ग्रामीण भागात हा पर्याय हाताळताना अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.

online education in india

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संपूर्ण संचारबंदी लागू झाली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्याआधीच घरोघरी लहान मुलांना 'कोरोना'च्या सुट्ट्या मिळाल्या. कित्येक शाळांची तर वार्षिक परीक्षाही अर्धवटच राहिली. सुरुवातीला एक दिवस, मग २१ दिवस, नंतर १९ दिवस असे करता करता तीन महिने निघूनही गेले आणि उन्हाळ्याऐवजी मिळालेल्या कोरोनाच्या सुट्ट्या घरातल्या घरात घालवत आपण जून महिन्याच्या मध्यात येऊन पोहोचलोसुद्धा!

एरवी महाराष्ट्रात विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १५ जूनपासून शाळा उघडत असल्या, तरी १० जूनपासूनच चिल्ल्यापिल्ल्यांना शाळेत पाठवण्याची पालकांची जय्यत तयारी सुरू होते. नवीन गणवेश, नवी पुस्तके, दप्तरे, डबे, वॉटर बॅग्ज इत्यादी शालोपयोगी वस्तूंनी बाजारपेठा फुलून जातात, गर्दीने गजबजून जातात. ज्यांचे मूल पहिल्यांदा शाळेत जाणार आहे, अशा पालकांची काळजीयुक्त देखणी लगबग तर या दिवसांत हमखास पाहायला मिळते. जून महिन्यातील शाळा सुरू होण्याच्या दिवसांचे हे हौशी चित्र आपण दर वर्षी अनुभवतो. पण यंदा मात्र हे चित्र बदललेले आहे. ते तसे का बदललेले आहे, हा प्रश्न कोणाच्या मनातही येणार नाही इतके आपण 'कोरोना' नावाच्या ह्या जागतिक संकटाला जाणून आहोत.

तीन महिन्यांच्या कालावधीनंतर देशात अनेक ठिकाणी जनजीवन पूर्ववत सुरू करण्यात आले असले, तरीही सोशल डिस्टन्सिंगचे मात्र पालन करावेच लागणार असल्याने 'यंदा मुलांची शाळा कशी सुरू करावी?' हा मोठ्ठा प्रश्न अनेक शाळांनी 'ऑनलाइन शिक्षणाच्या' माध्यमातून सोडवला आहे. त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या खरेदीशिवाय, कुठल्याही जय्यत तयारीशिवाय, कसलीही लगबग न करता कित्येक शहरांमधील कित्येक मुलांच्या शाळा ऑनलाइन सुरू झाल्यासुद्धा! अनेक शाळांनी आपापल्या पद्धतीने तोडगा काढत, वेगवेगळ्या ऍप्सचा वापर करत ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे आणि मुलांना आणखी काही दिवस हे असेच शिक्षण घ्यावे लागणार आहे.


online education in india
असे म्हणतात की मूल जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे 'शिकणे' सुरू होते. ते श्वास घ्यायला शिकते, हसायला शिकते, भाषा शिकते, नातेवाइकांना ओळखायला शिकते. त्याच्या शिकण्याच्या क्रियेला हळूहळू घराची, कुटुंबाची चौकट अपुरी पडू लागते. मग मूल परिसरातून शिकू लागते. तिथूनच त्याचा समाजातील वावर सुरू होतो. समाजाचा एक भाग म्हणून जगण्याचे भान येण्याच्या ह्या प्रक्रियेत 'शाळेची' भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. समाजात राहायचे काही नियम असतात, काही जबाबदाऱ्या असतात आणि काही कर्तव्येसुद्धा असतात. बालवयात शाळेच्या माध्यमातून मुलांच्या ह्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला विधायक वळण देण्याचे कार्य घडत असते, ह्याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण ऑनलाइन शिक्षण ह्या नवीन संकल्पनेने 'मुलांचे सामाजिकीकरण होण्याच्या क्रियेला आणि एकूणच त्यांच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसेल का?' हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणि तसे असूनही नाइलाज म्हणून का होईना, पण सध्यातरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षण हा उपाय योग्य आहे असे वाटते.

ऑनलाइन शिक्षण पद्धती अंगीकारताना अनेक शाळांनी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली. पालकांचे व्हॉट्स ऍप ग्रूप तयार केले गेले. कुणी यू ट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले, तर कुणी व्हॉट्स ऍप ग्रूपवर टाकले. कुणी स्काइपचा वापर करताहेत, तर कुणी झूमसारख्या ऍपचा वापर करत आहेत. येनकेनप्रकारे आहे त्या परिस्थितीत येत्या नवीन वर्षाचा पाठ्यक्रम शिकवण्यास सुरुवात केली आहे. थांबलेल्या जगाने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे, असे आपण म्हणू या हवे तर.

ऑनलाइन शिक्षण घेताना मोबाइल/लॅपटॉप/कॉम्प्युटर इत्यादी पडद्यावर सतत पाहिल्याने मुलांच्या डोळ्यांवर होणारा परिणाम, किंवा इंटरनेट हाताळायला मिळाल्यावर मुलांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता हे दोन्हीही स्वतंत्र अभ्यासाचे विषय ठरावेत इतके खोल आहेत. म्हणजेच ऑनलाइन शिक्षणाचे फायदे/तोटे हा संपूर्ण वेगळा विषय आहे. सध्यातरी अत्यंत वेगळ्या, अपरिचित, अस्थिर अशा सामाजिक परिस्थितीत अपरिहार्यता म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आपण अवलंबिलेला आहे. अत्यंत प्रतिकूलतेतही शालेय मुलांचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे हा उद्देश काही प्रमाणात का होईना, या माध्यमातून आपण साध्य करत आहोत, हेच तूर्तास महत्त्वाचे!

परंतु हे सगळे घडते आहे ते शहरी भागातील शाळांमध्ये, शहरी वातावरणात वाढणाऱ्या मुलांसाठी. अशा वेळी पुरेशा साधनांची अनुपलब्धता असणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांचे काय? संपूर्ण जगासमोर जीवन-मरणाचा प्रश्न म्हणून उभ्या राहिलेल्या 'कोरोना'सारख्या महामारीच्या ह्या काळात सध्यातरी 'सोशल डिस्टन्सिंग' हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय असताना ऑनलाइन शिक्षण हा पर्याय आपल्या अडचणींवर तोडगा म्हणून निवडलेला असला, तरी ग्रामीण, अतिदुर्गम अशा भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या बाबतीत मात्र ऑनलाइन शिक्षण कितपत उपयोगी ठरेल याबाबतही शंका वाटते.

शिक्षण क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग होत असतात. जग बदलते, तसतशी शिक्षणाची साधने बदलतात. संकल्पना, संबोध तेच असले तरीही त्यांच्या स्पष्टीकरणाच्या पद्धती बदलतात. सतत नवनवीन तंत्रे येत असतात आणि त्यांचा शिक्षणातही सातत्याने वापर केला जातो. ग्रामीण भागातील मुलेसुद्धा या बदलत्या जीवनातील नवीन पद्धतींशी जोडली जावीत, नवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावे आणि एकूणच ह्या प्रवाहात त्यांनाही सामील होता यावे म्हणून नेहमीच शासन स्तरावरून प्रयत्न होत असतात. कधी शासनाच्या माध्यमातून, तर कधी लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेतच. पण शाळेत दूरदर्शन संच उपलब्ध असणे, संगणक उपलब्ध असणे, प्रोजेक्टर उपलब्ध असणे म्हणजे शाळा डिजिटल होणे असे म्हणता येईल का? तर निश्चितच नाही. अनियमित असणारा विजेचा पुरवठा, नेट कनेक्टिव्हिटी नसणे आणि इतरही अनेक अडचणी ह्या दुर्गम भागात येत असतात. अशा परिस्थितीत हे ऑनलाइन शिक्षण ह्या ग्रामीण भागातील मुलांसाठी कसे काम करू शकेल हाही एक मोठाच प्रश्न आहे. आता समस्या अशी आहे की, सोशल डिस्टन्सिंग तर पाळायचेच आहे, पण मुलांचे शिक्षणही थांबायला नको; शिवाय ऑनलाइन शिक्षण हाही पर्याय ग्रामीण भागात उपलब्ध नाही.. मग अशा वेळी काय करता येईल?

मोफत गणवेश, मोफत पाठयपुस्तके, भौतिक सुविधायुक्त शालेय वातावरण इत्यादी बाबी आणि ऑनलाइन शिक्षण ह्या दोहोंमध्ये निश्चितच कमालीची तफावत आहे. ऑनलाइन शिक्षण देण्या-घेण्याला जिवंतपणाचा स्पर्श नाही असे म्हणता येईल खरे तर. एक शिक्षिका म्हणून मुलांना स्पष्ट करून द्यावयाची संकल्पना मला ह्या डिजिटल माध्यमातून कशी पोहोचवता येईल? हा विचार मनात येतोच. घरगुती वातावरणात मुले कितपत गांभीर्याने शालेय शिक्षण घेतील, अशीही शंका वाटतेच. आणि मनात येणाऱ्या ह्या सगळ्या शंका बाजूला ठेवून आजच्या जगण्यातील अपरिहार्यता म्हणून हे सगळे स्वीकारू म्हटले, तरी काही प्रश्न आ वासून समोर उभे राहतात हेही खरेच आहे.

मी ज्या शाळेत साहाय्यक अध्यापिका म्हणून काम करते, ती अत्यंत दुर्गम भागातील शाळा आहे. बहुतांश मुलांचे पालक रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. कित्येक मुलांच्या घरी टीव्हीसुद्धा नाही आणि कित्येक मुलांच्या आईबाबांकडे अँड्रॉइड मोबाइल किंवा स्मार्ट फोन नाही. ज्या मुलांच्या घरी असा फोन आहे, त्यांच्याकडे नेटपॅक नेहमी असेलच असे नाही, तेही आहे, त्यांचे मोबाइलचा विधायक वापर करण्याबद्दलचे अज्ञानच जास्त आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती ह्या अतिदुर्गम भागातील मुलांच्या बाबतीत कार्यक्षम ठरण्याची शक्यता फार कमी आहे असे वाटते. जिथे प्रत्यक्ष शाळेतसुद्धा मुले उपस्थित राहावीत म्हणून घरोघरी जाऊन बोलावून आणावे लागते, शाळेचे आणि शिक्षणाचे महत्त्व सतत पटवून द्यावे लागते, उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी सतत उपाययोजना करत राहावे लागते अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण प्रभावी ठरण्याची शक्यता कमीच आहे असे मला वाटते.

त्याऐवजी नेहमीसारखे सर्व वर्गांना एकाच वेळेत बोलावण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या वर्गांना शाळेत बोलावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत करत प्रत्यक्ष शिक्षण देता येईल, असे वाटते. किंवा आज दोन आणि उद्या दोन वर्गांना आलटूनपालटून शाळेत बोलवता येईल असेही वाटते. मुले शाळेत येतील, तेव्हा शाळेतील डिझिटल साधनांचाही वापर करता येईलच. शाळेत मुलांनी शिकणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच त्यांच्या शिक्षणाचे अनुधावन करणे हेही शिक्षकांसाठी महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष शिक्षण देता/घेताना हे अनुधावन करणे आणि लक्षात आलेल्या अडचणींवर वेळीच उपाय करणे फार सोपे होते.


online education in india
जगणे म्हटले की अडचणी, संकटे येतातच. संकट आले म्हणून काही जगणे थांबत नाही. अडचणीत सापडलो की काही काळ आपण भांबावतो हे खरे आहे; पण थोडे थांबून आपण त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडतो, हेही खरेच आहे. सध्या कोरोनाच्या रूपाने असेच एक संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. पण माणसाच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छेचे दमन करू शकेल इतके बळ कोणत्याही संकटात नाही, हे ह्या आपत्कालीन परिस्थितीतील 'ऑनलाइन शिक्षणाच्या' पर्यायावरून दिसून येते आहे. काही तडजोडी करून प्रत्यक्षसुद्धा शिक्षण देता येईलच, अशी आशा मला निश्चितच वाटते. आणि हे संकट कायमचे निघून जाऊन सगळे काही पूर्ववत होईलच हा विश्वासही वाटतोच. तोपर्यंत आपण सगळे जण आपापल्या स्तरावर ह्यातूनही आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत राहूच. नाही का?