वैष्णवा घरी सर्वकाळ

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Jun-2020
|

वैष्णवा घरी सर्वकाळ। सदा झणझणिती टाळ।।
कण्या भाकरीचे खाणे। गाठी रामनाम गाणे।।
बैसावयासी कांबळा। द्वारी तुलसी रंगमाळा।।
घरी दुभे कामधेनु। तुपावरी तुळशी पानु।।
फराळासी पीठ लाह्या। वेळोवेळी पडती पाया।।
नामा म्हणे नलगे काही। चित्त रंगले हरिचे पायी।।
- संत नामदेव

pandharpur ashadhi ekadasया अभंगात संत नामदेव वैष्णव भक्ताची वैशिष्ट्ये सांगत आहेत. ते म्हणतात, ‘वैष्णवांच्या घरी सदोदित टाळांच्या झणझणण्याचा ध्वनी येतो. वैष्णवांचे खाणे म्हणजे कण्या-भाकरी. मात्र त्यांच्याजवळ रामनामाचे गाणे असते. बसायला साधा कांबळा असतो, पण दारात तुळशीची माळ असते. त्यांच्या घरी साक्षात कामधेनूचे दुभते असते, ते तुपावर तुळशीचे पान ठेवतात. फराळाकरता पीठ, लाह्या असे त्यांचे साधेच खाणे असते. मात्र ते घरी येणार्‍या भक्ताला वेळोवेळी वंदन करतात. त्यांचे मन सतत विठ्ठलचरणी लीन झालेले असते. अशा भक्तांना विठ्ठलाशिवाय अन्य काहीही नको असते.’

वैष्णव म्हणजे विष्णूचा उपासक, विष्णुभक्त. वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णुभक्तीचा संप्रदाय. वैष्णव कोणास म्हणावे? वैष्णवांबाबत एक भजन अतिशय प्रसिद्ध आहे -

वैष्णव जन तो तेणे कहिए।
जो पीड पराई जाने रे।।
(जो दुसर्‍याचे दु:ख वा पीडा जाणतो, तोच खरा वैष्णव.) महात्मा गांधी आपल्या प्रार्थनासभेत हे भजन म्हणत असत.

घर कसे असावे? तर वैष्णवांसारखे. या अभंगात वैष्णवाचे घर कसे असते यांचे वर्णन केले आहे. वैष्णवाच्या घरी काय काय आढळते?

१. वैष्णवांच्या घरी सदोदित टाळांचा झणझण असा आवाज कानावर येतो.
२. वैष्णवांच्या घरी भोजन अगदी साध्या प्रकारचे असते. बहुधा ते कण्या-भाकरी असेच असते.
३. वैष्णवांच्या घरी बसायला साधी घोंगडी असते, आणि दारात देवाला प्रिय असणारी तुळस असते.
४. त्यांच्या घरी कामधेनूचे दुधदुभते असते. दूध असते. तूप असते. तुपावर तुळशीचे पान ठेवलेले असते.
५. वैष्णवांच्या घरी फराळासाठी लाह्यांचे पीठ असते. ते घरी येणार्‍या भक्तजनांच्या पायावर डोके ठेवून वारंवार त्यांना दंडवत घालतात. त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात.
६. वैष्णव हरिभजनाशिवाय अन्य कुठल्याही बाबीकडे लक्ष देत नाहीत. ते जाणतात फक्त श्रीविठ्ठलाला. त्यांचे तनमन अखंडपणे विठ्ठलचरणी तल्लीन झालेले असते.

या अभंगातून संत नामदेवांनी वैष्णवांची जी ठळक वैशिष्ट्ये सांगितली, ती अशी -
१. टाळ वाजवून सतत ईश्वराचे भजन
२. रामनामाचा गजर
४. अत्यंत साधी रहाणी
४. खाण्यास कण्याभाकरी नि फराळास लाह्या
५. दारात तुळशीवृंदावन
६. सात्त्विकतेमुळे घरात कामधेनूचे वास्तव्य
७. नम्रपणा
८. संतसज्जनांविषयी परम आदरभाव
९. निरपेक्षता
१०. एकच ध्यास, हरिनामात रंगून जाणे

संत नामदेव वैष्णवांची वैशिष्ट्ये, त्यांचे गुणविशेष सांगत आहेत. आपल्या डोळ्यासमोर वैष्णवांचे मूर्तिमंत चित्र त्यानी उभे केले आहे. आपल्या अंगी वैष्णवपणाचा थोडा तरी अंश परिवर्तित व्हावा, असा प्रयत्न प्रत्येकाने आपापल्या परीने करायला काय हरकत आहे?