भटके विमुक्तांना घडलेले समरस भारताचे विश्वरूप दर्शन (भाग २)

स्रोत: विवेक मराठी    दिनांक24-Jun-2020
|
@डॉ. सुवर्णा रावळ

लाॅकडाउनच्या काळात महाराष्ट्रातील भटके-विमुक्त समाजबांधव अन्य राज्यांत अडकले. याप्रसंगी भ. वि. वि. प. आणि अन्य संघटनांतर्फे या बांधवांना शक्य तेवढे साहाय्य केलेच. हे कार्य करीत असतानाच मेवाड,भीलवाडा येथील 'गाडिया लोहार' आणि हरियाणा बहादुरगड येथील 'बावरिया' या भटके-विमुक्त बांधवांनी मदत न घेता मदतीचा हात पुढे केला. मागत्याकडून दातृत्वाकडे झालेला या बांधवांचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.

samrasta_1  H x

लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील भटके राज्याच्या बाहेर अडकले होते. त्या त्या राज्यातील (गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राज्यस्थान, उत्तराखंड) समाजाने व स्वयंसेवकांनी त्याच समरस भावनेतून त्यांची व्यवस्था केली, जेवढी आपल्या सख्ख्या बंधुभगिनींसाठी केली असती. खाण्याच्या सामानामध्ये मीठ-मिरची, हळद, जिरे, तेल, भाजी या सर्वांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त कुणाकडे चपला नव्हत्या, तर कुणाकडे कपडे.. या बाबींचीही पूर्तता न मागता कार्यकर्ते करीत होते.

याच दरम्यान बीपीए कार्डधारकांना व पिवळ्या-नारिंगी रेशन कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाईल, अशी घोषणा केंद्र शासनाकडून केली गेली. स्थिर समाजासाठी ती उपयुक्तही ठरली असेल, परंतु भटके तर त्यांच्या मूळ ठिकाणाहून बाहेर होते, त्यांचे काय? भ.वि.वि.प.मार्फत व अन्य संघटनेमार्फतही पुन्हा केंद्र शासनाकडे पत्रे-निवेदने दिली गेली असावीत. त्यातूनच पुढे असे कार्डधारक जिथे असतील तिथे त्यांना धान्य देण्यात यावे, असे पत्रक केंद्र शासनामार्फत काढण्यात आले. त्या-त्या विभागात नोडल अधिकारी नेमला गेला. ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्यामार्फत नोडल अधिकाऱ्यांकडे सर्व नोंदी नोंदणी करण्याची मोहीम या काळात आपण करीत होतो. या काळात सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव खूप चांगला आला. सर्वांनी भटके-विमुक्तांच्या संदर्भात खूप संवेदनशीलपणे सहकार्य केले. काही ठिकाणी वाईट अनुभव आला तो रेशनिंग दुकानदारांचा. धान्य काळ्या बाजारात विकताना अनेक ठिकाणी ते पकडले गेले, त्यांचे लायसन्स रद्द झाले. हा अनुभव महाराष्ट्रातच आला. एका रेशन दुकानदाराने तर कहरच केला. धान्याची गाडी समोर उभी, आपले भटके धान्यासाठी रांग लावून उभे, रेशनिंग दुकानदार ठप्प बसून. का? तर म्हणे धान्याची पोती उतरून घ्यायला कोणी हमाल मिळेनात, त्यामुळे धान्य देता येणार नाही अशी या रेशन दुकानदाराची अनाकलीय भूमिका. परत मला फोन, "ताई, तुम्ही तर म्हणले रेशन मिळतेय सर्वांना, पण हा दुकानदार असा म्हणतो." मी त्यांना असे म्हटले, "तुम्ही असे करा - आपल्या वस्तीवरची ५-६ तरुण पोरे घेऊन जा. घ्या उतरून धान्याच्या गोण्या आणि वाटप करायला सांगा त्या दुकानदाराला." त्यांनी तसेच केले. दुकानदाराचा नाइलाज झाला. गुपचूप सर्वांना धान्य दिल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही. भ्रष्टाचारी वृत्ती माणसाला किती असंवेदनशील बनवते, याचे हे उदाहरण.
भ्रष्टाचार ही जशी समाजाला (शासकीय क्षेत्रातील) लागलेली कीड आहे, तसेच दारूचे व्यसन हा भटके समाजाला लागलेला शाप आहे. (अन्य समाजाचे आपण पाहिलेच आहे दारूची दुकाने उघडण्याची सूट मिळाल्यानंतर काय झाले ते.) एका वस्तीच्या प्रमुखाचा फोन आला. काय, तर म्हणे - "ताई, ती तुमचे कार्यकर्ते आम्हाला जेवण, धान्य देताहेत ना, त्यांना सांगा आता पुढले २-३ दिवस काहीच देऊ नका." मी म्हटले, "का? तुमच्याकडे २-३ दिवस पुरेल असे अन्न-धान्य असेल तर तुम्हीच सांगा ना त्यांना देऊ नका म्हणून.." तर तो प्रमुख म्हणे, "तसे नव्हे, आमच्यातली एक-दोघ जण लई माजल्यासारखी वागायला लागलीत. वस्ती उपाशी राहिली की येतील ताळ्यावर." मी म्हटले, "आता काय झाले?" तर असे झाले होते - दोन बेवड्यांनी या मिळालेल्या धान्यातून काही धान्य बाहेर विकले व त्याची दारू पिऊन आले. तो प्रमुख म्हणत होता, "तुम्ही इतक्या मुलखावर राहून आमची काळजी करताय, दिवसातून दोन दोन वेळा इथले कार्यकर्ते येऊन आम्हाला काय कमी-जास्त याची विचारपूस करताहेत आणि आमच्यातल्याच काही जणांमुळे आम्हाला तोंड दाखवायला लाज वाटायला लागली." मी म्हटले, "तुमच्याबरोबर पंच किती आहेत?" तो म्हणे, "मी पंचच आहे आणि दोन जण आहेत." "मग बसा सगळे, सगळ्या वस्तीतल्या सर्वांना एकत्रित करा अन् सांगा तुमच्या भाषेत." झाले... त्यांनी निवाडा केला. दारुडे सरळ अन् वस्तीसुद्धा उपाशी राहण्यापासून वाचली. दारू सोडवणुकीसाठी किंवा दारू प्यायची नाही अशा प्रतिबंधासाठी बसलेली पंचायत ही माझ्या अनुभवातली पहिली पंचायत म्हणावी लागेल!

डेहराडूनच्या अनुराधा सिंग सांगत होत्या, "दीदी, अन्नधान्य के लिये तो सारे प्रयास कर रहे है और उसकी पूर्तता भी हो रही है। लेकिन महिलांओं की कुछ ऐसी समस्या होती है, जो वह खुलकर बोल भी नहीं सकती।" भटकंती करणाऱ्यांसाठी कधीही कुठेही मुबलक पाणी असत नाही, पाणी साठवून ठेवण्यासाठी तेवढी भांडीही बरोबर नसतात. अशा वेळी मासिक धर्माच्या वेळी महिलांचे खूप हाल होतात. याचबाबत अनुराधा दीदी सांगत होत्या. एका मुलीने घाबरत घाबरत अनुराधा दीदींना ही अडचण सांगितली, एक महिला कार्यकर्तीला पुढे काही सांगण्याची गरज नसते. अनुराधाजींनी परिसरातल्या घरोघरी जाऊन मदत मागितली आणि १५-२० महिलांना पुरतील एवढ्या सॅनिटरी पॅड्सची व्यवस्था केली. अनुराधाजी म्हणत होत्या, "जितना आनंद धान मिलने के बाद उनके मुख पे आता, उससे कई जादा आनंद उनके चेहरे पर मैं अनुभव कर रही थी।" सर्वार्थाने मदत म्हणजे काय, हे आपण समजू शकतो.


samrasta_1  H x

बहुतेक सर्वच भटके-विमुक्तांमधील महिला या कर्त्या व्यक्ती असतात. जड व्यवसायामध्ये - गाडी लोहार, ओतारी, दगड फोडणारा वडार, पाथरवट इ. - पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. आपल्या समाज-संस्कृतीमध्ये महिलांच्या शरीरधर्माच्या अनेक विषयांची खुलेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळेच की काय, महाराष्ट्राच्या बाहेर अडकलेले भटके आपापल्या गावी परत येण्यासाठी धडपडत होते. त्यामुळेच प्रत्येक ठिकाणाहून आमच्या परतीची व्यवस्था करा असा अग्रह करीत होते. पहिल्या दोन लॉकडाउनच्या कालावधीत खाण्याची-राहण्याची चिंता मिटल्यामुळे, आहे त्या ठिकाणी शांत राहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु तिसऱ्या लॉकडाउनची पुन्हा घोषणा झाली आणि त्यांचा धीर सुटत चालला. बहुतेक जणांनी अशीच बायकांच्या तब्येतीची कारणे सांगितली. काय करता येईल या विचारात कार्यकर्तेही होतेच. परंतु शासकीय वाहन व्यवस्था (रेल्वे, बस) संपूर्ण बंद होती. खासगी वाहनांनाही बंदीच होती आणि जरी चालू असती तरी यांच्याकडे पैसा कुठे होता? शासकीय स्तरावरच उपाय करण्यासाठी पुन्हा त्या त्या राज्याचे राज्य शासन, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा यांच्याकडे पत्रव्यवहार, बोलणी सुरू केली. त्या त्या राज्यांनी प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्यांकडेच हे काम सोपविले होते. सर्व वस्त्यांच्या प्रमुखांना सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क दूरध्वनी पाठविले. मूळ गावच्या अधिकाऱ्यांकडे नावे, स्त्री-पुरुष, मुले संख्या द्यायची, ती कलेक्टरांच्या माध्यमातून त्या-त्या राज्यातल्या, ज्या ठिकाणी भटक्यांची पाले पडली आहेत तिथल्या कलेक्टरकडून नोडल अधिकाऱ्यांकडे, नोडल अधिकाऱ्यांकडून वस्ती ठिकाणच्या पोलीस स्टेशनमार्फत या नावांच्या सूचीची देवाणघेवाण झाली. गाड्यांची व्यवस्था करण्यासाठी वस्तीतल्या लोकांसमवेत तिला स्थानिक कार्यकर्ते धावपळ करीत होते. आपल्या राज्यातील पाहुणा जसा रवाना करतो, तसा खाण्याच्या-पिण्याच्या पाणी बाटल्या, जोडे, पैसे असे दिले गेले आणि दिल्ली, उत्तराखंड, गुजरातचे ५ ठिकाणचे हरियाणा, जोधपूर हे भटके बांधव सुखरूप आपल्या गावी पोहोचले. त्यांच्या गावातल्या प्रमुखांनी (सरपंचांनी) त्यांना गावाबाहेरच मंदिर-शाळेच्या मैदानात ७-१९ दिवस क्वारंटाइन व्हायला सांगितले. आपल्या मूळ गावी परतल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वांचे - म्हणजे काशिनाथ शिंदे, नारायण शिंदे, शिवराम बाबर, विश्वनाथ शिंदे, तानाजी बाबर इत्यादी सर्वांचे सुखरूप पोहोचल्याचे फोन आले.

या सर्व उठाठेवीमध्ये एकाही ठिकाणाहून कुणी आजारी असल्याचे किंवा या भटक्यांवर या करोना नामक महामारीचा प्रभाव पडल्याचे, कुणाला साधे दुखणेही झाल्याचे ऐकिवात नाही. जे मिळेल ते, जेव्हा मिळेल ते खाऊन जगण्याची, ज्या ठिकाणी जागा (मोकळी) मिळेल तिथे पाले टाकून जगण्याची सवय असणाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणारच. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गोळ्या तुम्हा-आम्हाला घ्याव्या लागतात. उद्याची चिंता न करणाऱ्या, कुठलाही कसलाही संचय न करणाऱ्या, अतिरिक्त धनाच्या पाठीमागे न धावणाऱ्या भटके-विमुक्त समाजाचे जीवन महादेवाच्या भरवश्यावर. कालचा दिवस त्याची देणगी, उद्याचा दिवस तुझीच कृपा म्हणत उगवत्या दिवसाच्या सूर्यनारायणाला नमन करीत वाटचाल करणारा भटका समाज दरिद्री का असेना, नारायणच म्हणावा लागेल.

या काळात मनाला प्रेरणा देणारे अनुभव वाचकांना सांगावेसे वाटतात. साधारणत: आपला समज असतो की हे मागासवर्गीय, वंचित, भटके-विमुक्त, गरीब हे केवळ मागणारे लोक आहेत. या काळात काही स्वाभिमानी, कर्तृत्व व दातृत्व असणारा भटका समाजही अनुभव आला. राजस्थानच्या मेवाडमधील भीलवाडा येथील आजादनगर वॉर्ड क्र. १७मध्ये काही स्वयंसेवक खाद्यसामानाचे किट देण्यासाठी गेले असता त्यांनी असे म्हणत मदत घेण्यास नकार दिला की, "हम तो मेहनत कर जीवन यापन कर लेंगे। अभी उन लोगों को अधिक जरूरत है, जो दिहाडी-मजदुरी करते है और लॉकडाउन में सबकुछ बंद है। जिनके घरों मे खाने को कुछ भी नहीं। अपने प्रधानमंत्री मोदीजीने अपील की है कि अपने आसपास के गरीब व जरूरतमंदो को मदत करे।" असे म्हणत त्यांनी मदत तर घेतली नाहीच, उलट ५१ हजार रुपये जमवून स्वयंसेवकांना दिले व त्यांच्याबरोबर या वाटपाच्या कामात सहभागीही झाले. हा समाज भटका आहे. नाव आहे ‘गाडिया लोहार.’ महाराष्ट्रात आपण गाडी लोहार म्हणतो. लोखंडाच्या पत्रे बनवून त्याच्या वस्तू (घागर-पाटी इ.) बनविण्याचे काम करतो. बैलगाडीच्या चाकाला लोखंडाची फ्रेम, चाकांचा मधला भाकडा-रिंग बनविणे, घोड्याची नाल बनविणे, लोखंडाच्या वस्तूंची डागडुजी करणे ही काम गावोगावी जाऊन करतात. महाराणा प्रताप यांना दिलेल्या वचनानुसार आजही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा रस्त्यावर राहून जीवन जगतात. त्यांचे म्हणणे असते की, "मेवाड महाराणा प्रताप को दिये हुअ‍े वचन की हम लाज रख रहे है। हमारे राजा को आखरी दिनों मे ऐसे ही जीना पडा था। जब तक हमारे राजा के गुनाहगारों को सजा नहीं देते, तब तक हम ऐसेही सडकपर रहेंगे, देशभर घुमते रहेंगे।"

दुसरी घटना आहे हरियाणामधील बहादुरगढची, जिथे बावरिया नावाचा भटका समाज मोठ्या प्रमाणात आहे. बावरिया समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे पशुपालन आणि पशुचिकित्सा. आपल्याकडे हिलारी (धनगर) जसे मेंढ्यांचे कळप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तशाच प्रकारची भटकंती हे करतात. पुढे या व्यवसायाबरोबरच चोर-दरोडेखोर यांच्या पाऊणखुणांचे विश्लेषण करण्याचा व्यवसाय अंगीकारलेला दिसतो. मूळ भटक्यांमध्ये येणाऱ्या समाजाला इंग्रजांनी १८७१च्या गुन्हेगार कायद्यामध्ये जन्मजात गुन्हेगार जमाती म्हणून समाविष्ट केले होते. आजही त्याच चक्रव्यूहात अडकलेले आहेत. बावरिया समाजाचे प्रमुख कार्यकर्ता डॉ. देवेंद्र कुमार बावरिया यांनी सांगितले की, या संकटसमयी समाजाने संघटित होऊन मानवतेसाठी व राष्ट्रहितासाठी हरियाणातील हजारो बावरिया परिवारांनी संघटित होऊन आर्थिक योगदान देण्याचे ठरविले आणि विमुक्त घुमंतू जाति विकास बोर्ड, हरियाणा सरकारचे अध्यक्ष डॉ. बलवान यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला व त्याचबरोबर पंतप्रधान राष्ट्रीय आपत्तिनिवारण निधीमध्येही ५१ हजार रुपये दिले. घेणारे हात देणारे ठरले, मागत्याकडून दातृत्वाकडे झालेला बावरिया समाजाचा मानस आणि परिवर्तन/प्रवास मनाला समाधान देऊन जातो, उभारी देऊन जातो.