ज्येष्ठ संघस्वयंसेवक गोविंद पाटील यांची शतकपूर्ती

स्रोत: विवेक मराठी    दिनांक25-Jun-2020
|
***अविनाश धाट****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व समाजातील आदरणीय मान्यवर चिंचोटीचे गोविंद गणू पाटील यांना येत्या गुरुवारी २५ जून २०२० रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हा लेख.


patil_1  H x W:

आदरणीय ज्येष्ठ संघस्वयंसेवक गोविंद गणू पाटील यांची वयाची शंभरी पार

आपल्याकडे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना "शतायुषी भव" असे म्हणण्याची पद्धत आहे. असे भाग्य लाभलेले चिंचोटीचे शतायुषी गोविंद गणू पाटील यांचा सहवास मला लाभला, हे माझे भाग्य!

मी १९८३ साली नोकरीनिमित्त अलिबागला आलो, त्या वेळी अलिबाग तालुक्यात कांही गावांमध्ये संघाचे काम अतिशय चांगले होते. त्यात किहीम-कामथ, आवास-सासवणे, काचळी, चेऊल-रेवदंडा आणि चिंचोटी हे तर जणू बालेकिल्लेच. भरपूर संख्या असलेल्या बाल-तरुणांनी फुललेल्या शाखा हे त्या वेळचे वैशिष्ट्य!

किहीमला परशुरामपंत भावे, आवासला डाॅ. ए.सी. गोरे आणि लक्ष्मण नाना (दादा) वार्डे, चेऊल रेवदंडा येथे श्रीधर पाटील, तर काचळीला जनार्दन नागू पाटील (जना मास्तर), अलिबागला विष्णुपंत उर्फ अण्णा तुळपुळे अशी कार्यकर्त्यांची फौज होती. याच प्रभावळीत आजही खणखणीत आवाज, अत्यंत सुस्पष्ट विचार असलेले चिंचोटीचे आदरणीय गोविंद गणू पाटील हेही एक व्यक्तिमत्त्व होते आणि आजही आहे.

संघात येण्यापूर्वीच ते एक हरहुन्नरी नट, उत्तम भजनी बुवा, फर्डे वक्ते, प्रभावी कीर्तनकार, अत्यंत निर्भीड लोकनेते होते. हे सर्व असून कायम खरेपणा, अन्यायाची चीड, समाजाचे भले व्हावे ही एकमेव कामना, पक्षीय राजकारणापासून दूर पण प्रखर देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळावे ही तळमळ.

तो काळ होता स्थानिक कलाकारांनी केलेल्या नाटकांचा! विशेषतः हनुमान जयंती आणि अन्य सणांच्या निमित्ताने गावागावातून नाटके सादर होत असत. कारण नाटक हे प्रबोधनाचे प्रभावी साधन होते. चिंचोटीमध्ये त्यांनी 'नवतरुण नाट्यमंडळ' स्थापन केले. मालवणचे शाहीर जगताप वऱ्हाडकर यांना ते गुरू मानत. 'दीप जळे वादळात', 'चमके शिवबाची तलवार', 'हिरवा चुडा' आणि 'मोरूची मावशी' अशा किमान १५ तरी नाटके बसवून त्यांनी नाटकाद्वारे समाजप्रबोधन व जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांतून हनुमान जयंतीला दशावतारी 'लळित' चिंचोटीत सुरू झाले.

नाट्यचळवळीबरोबर भजन मंडळी हे अलिबाग तालुक्याचे एक वैशिष्टय! गावात भजनी मंडळ स्थापन करून नियमित भजने सुरू झाली. तीन-चार वर्षापूर्वी मलाही त्यांचे भजन ऐकायची संधी मिळाली. 'रायगड प्रबोधिनी' या अलिबागच्या संघकार्यालयात वार्षिक पूजेच्या दिवशी भजन झालेच पाहिजे, म्हणून आग्रहाने ते चिंचोटीचे भजन मंडळ घेऊन आले.

लहानपणापसूनच वाचनाची गोडी, प्रवासामुळे पुरेसे समाजभान आले होते, त्यांनी भाषण आणि कीर्तनातून त्याचा उपयोग करून पंचक्रोशीत समाजप्रबोधन केले. ते एक उत्तम शाहीरही आहेत. शाहीर म्हणून योग्य तो आवाज त्यांना लाभला आहे. छ. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, गुरू गोविंदसिंग, वीर चिमाजीअप्पा आदींवर ते पोवाडे सादर करीत. वेगवेगळ्या ठिकाणी शाहीर सम्मेलनास ते हजेरी लावीत. तिथे त्यांना अत्यंत सन्मानाचे असे स्थान होते.

लोकनेते म्हणून त्यांनी आगरी समाजाचे संघटन केले. नंतर १९६२ ते ६५मध्ये ते चिंचोटी ग्रूप ग्रामपंचायतीचे सरपंच होते. लोकल बोर्डात निवडून जाऊन त्यांनी अठरा गावांचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या प्रयत्नांतूनच अलिबाग-नागाव-चेऊल रस्ता सिमेंटचा झाला. फणसापूर ते भोनंग रस्त्यांना मान्यता मिळाली. भिलजी बोरघर हायस्कूल व्हावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. फुंडेवाडीला वीज आणली.

सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असणारे असे प्रभावी व्यक्तिमत्त्व संघात आले हे संघाचे भाग्यच. पण हे सहजासहजी झाले असे मुळीच नाही, बरे का! चिंचोटीत संघाचा संपर्क होता. साप्ताहिक बैठक चाले. पण कोणीतरी कार्यकर्त्यांना सांगितले की यांना संघात आणले, तर तुमचा संघ चांगला वाढेल. सुरुवातीला तेही संघविरोधकच होते. पण विष्णुपंत (अण्णा) तुळपुळे, अलिबाग यांनी चंग बांधला, त्यांच्याकडे सतत जाणे-येणे ठेवले आणि हळूहळू ते संघात सहभागी होऊ लागले. १९४४ साली अरण्येश्वर, पुणे येथील संघशिबिरात ते गेले. तेथील वातावरण व हजारो कार्यकर्ते पाहून संघाच्या प्रयत्नातून भारताला सहज स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना वाटले.

त्यानंतर गावात बाल शाखा सुरू झाली. हे जवळच शेतीची कामे करत असत. शाखेजवळ गावातलेच कांही तरुण बसून शाखा बंद करण्याचे मनसुबे आखत. असेच एकदा ते टारगट तरुण शाखेचा भगवा ध्वज पाडणार असे त्यांना समजले. मग ते रागाने घरातून बंदूक आणि काडतुसे घेऊन आले व त्यांना म्हणाले, "आज तुम्ही जे कोणी ध्वजाजवळ याल तर गाठ माझ्याशी आहे. त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल." केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले, "आत्तापर्यंत मी संघाचा नव्हतो, पण आता मी नांगराच्या साक्षीने प्रतिज्ञा करतो की आजपासून मी कट्टर संघस्वयंसेवक झालो आहे आणि आयुष्यभर राहीन" आणि ती प्रतिज्ञा ते आजही निष्ठापूर्वक पाळतात. संघात ध्वजासमोर, मा. संघचालकांकडून प्रतिज्ञा घेण्याची पद्धत आहे. पण नांगरावर उभे राहून घेतलेली ही प्रतिज्ञा खरोखरच अनोखी आणि हृदयस्पर्शी आहे.

एकदा संघाची अशी प्रतिज्ञा घेतल्यानंतर मात्र त्यांनी संघासाठी जिवाचे रान केले. ते घरी कमी आणि बाहेरच जास्त राहू लागले. पुढे अलिबाग तालुक्याचे आणि कुलाबा जिल्ह्याचे मा. संघचालकही झाले व तालुक्यात जिल्ह्यात अनेकांना प्रतिज्ञा दिल्या आहेत, त्यामुळे असा वेगळ्या पद्धतीने आणि संघाची प्रतिज्ञा घेणारा संघचालक विरळाच!

प.पू. श्रीगुरुजींची पहिली भेट ते सांगतात - पुण्यात एका शिबिरासाठी ते गेले. पुण्यात पोहोचल्यावर गारांचा पाऊस पडला. ते पूर्ण भिजले. कुडकुडत होते. शिबिरस्थानी पोहोचले, तेव्हा भोजन चालू होते. पू. श्रीगुरुजी पंक्तीत जेवत होते. मूकभोजन असल्याने कुणी कुणाशी बोलत नव्हते. श्रीगुरुजींनी त्यांना पाहिले, खुणेनेच जवळ बोलावून घेतले आणि शेजारी स्वतःच्या जवळ जेवायला बसवून घेतले! त्यांची थंडी कुठल्या कुठे पळून गेली असेल, नाही? पू. श्रीगुरुजी यांच्याजवळ बसून भोजन - किती ते भाग्य!

पू. श्रीगुरुजींचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम! ठाण्यात एक बैठक होती. गोविंदरावांना तिथे पोहोचायला उशीर झाला, तर पू. श्रीगुरुजी म्हणाले, "अरे! ते चिंचोटीचे गोविंद गणू पाटील दिसत नाहीत?" मग हसत हसत म्हणाले, "बहुधा त्यांचं पान खाऊन झालं नाही वाटतं!" पान खाणे हा त्यांचा आवडता छंद. त्यासाठी लागणारे साहित्य आणि चंची कायम बाळगण्याची त्या काळी पद्धत असे. आजही ती कायम त्यांच्याजवळ असते. खरेच, श्रीगुरुजींचे एवढे प्रेम लाभलेला मनुष्य किती नशीबवान म्हणायला हवा!

संघप्रचारक दामूअण्णा दाते त्यांच्याकडे चिंचोटीला आले आहेत. आणखी एक संघप्रचारक नाना पालकर मूळचे आवासचे. ते आवासला आले की त्यांना भेटायला बोलावीत. नाना ढोबळेंचा एवढा स्नेह की त्यांनी आणीबाणीत तुरुंगामध्ये असताना मुद्दाम आपल्या ग्रूपमध्ये बोलावून घेतले, म्हणाले, "पाटील बरोबर असले की मजा येते."

१९४८च्या संघबंदीमध्ये त्यांनी अन्य ७ जणांबरोबर सत्याग्रह केला आणि एक महिना बंदिवास भोगला. ते १९७५ साली आणीबाणीतील संघबंदीचा अनुभव सांगतात - सत्याग्रहाचा दिवस ठरला, ९ जण येणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे आले दोघेच! ते आणि त्यांना लक्ष्मणासारखे साथ देणारे त्यांचे बंधू पांडुरंग तात्या. पण ते म्हणाले, आता आम्ही घरी परत जाणार नाही, सत्याग्रह करणारच. मग त्यांनी जवळपास ७५ मिनिटे तडफदार भाषण केले. शेवटची दहा मिनिटे पोलिसांनी भाषण ऐकून त्यांना अटक केली. ते निर्भयतेने म्हणाले, "तुम्ही माझे पूर्ण भाषण ऐकायला हवे होते!" दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात उभे केले. न्यायाधीश म्हणाले, "तुम्ही काय हे धंदे चालवलेत?" निर्भयपणे ते म्हणाले, "हे धंदे नाहीत, आम्ही नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत आहोत." मग न्यायाधीशांनी विचारले, "तुम्हाला काही खायला दिले की नाही?" ते म्हणाले "नाही." न्यायाधीश - "तुम्ही जर तसे लिहून दिले, तर मी पोलिसांवर कारवाई करीन." हे म्हणाले, "आमची काही तक्रार नाही. आम्हाला कोणाची नोकरी घालवायची नाही."

असे हे सहॄदय आणि दुसऱ्यांचा - किंबहुना समाजाचा कायम विचार करणारे गोविंदराव पाटील म्हणजे अजातशत्रू झाले नसतील तर नवल! एकदा ते म्हणाले, "ज्यांना मी शाखा भगवा ध्वज यासाठी बंदुकीचा प्रसाद द्यायला निघालो, त्यांनाच नंतर चोंढीच्या संघशिबिरात घेऊन आलो." असे हे गोविंदराव, त्यांनी नंतर कधीही कोणाशीही कुठलेही वैर ठेवले नाही.

संघाच्या अनेक स्तरांवरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. अलिबाग तालुका कार्यवाह, मा. तालुका संघचालक. १० वर्षे ते मा. जिल्हा संघचालक होते. जिल्हा संघचालक झाल्यावर कामाला वेळ मिळावा म्हणून त्यांनी स्वतःची बैलजोडी विकून टाकली. बैलगाडी शर्यत हे अलिबाग तालुक्याचे वैशिष्टय! पण आपला शर्यतीचा षौक त्यांनी संघासाठी बाजूला ठेवला. "संघाच्या बैठकांमुळे मला महाराष्ट्रातले १५ जिल्हे पाहता आले" असे ते गौरवाने सांगतात.

प.पू. श्रीगुरुजी गेल्याचे कळले, तेव्हा ते चक्कर येऊन पडले. त्यांना तो धक्का सहन झाला नाही, एवढा त्यांचा जीव होता पू. श्रीगुरुजींवर!

अलिबाग तालुका हा संघाच्या दृष्टीने खडकाळ प्रदेश, तरीही मेहनत घेऊन त्यांनी खूप विरोधी परिस्थितीत काम केले. आज संघकामाला चांगली अनुकूलता आहे म्हणून सर्वांनी खूप काम करून संघाचे ध्येय साध्य केले पाहिजे, असे त्यांना वाटते.

त्यांना तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा संपन्न परिवार आहे. मुलेही संघकामात आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या जीवनावर 'चिंचोटीचे चाणक्य' या शीर्षकाखाली दै. कृषिवलमध्ये पिंगळे सरांचा लेख आला आहे, त्यांना धन्यवाद. असा हा निष्ठावंत, निरलस, निर्भय, संघमय, अजातशत्रू, अत्यंत तळमळीचा आणि प्रेरणादायक संघकार्यकर्ता गुरुवार दिनांक २५ जूनला वयाची शंभरी पूर्ण करून १०१व्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचा सर्व संघस्वयंसेवकांना, नातेवाइकांना, गावकऱ्यांना व स्नेह्यांना निश्चितच अतिशय आनंद होत आहे. शतायुषी तर ते झालेच, आता त्यांना आणखी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो व त्यांच मार्गदर्शन सर्वांना लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

अविनाश धाट
९४२३८२२५२०

इंद्रप्रस्थ, मूकबधिर विद्यालयामागे,
विद्यानगर, अलिबाग.