ऐसे सुख कोठे आहे

स्रोत: विवेक मराठी    दिनांक26-Jun-2020
|
 
pandharpur ashadhi ekadas

@ देविदास पोटे 
ऐसे सुख कोठे आहे।
मुक्ति मागोनि करिसी काय।।
सांडोनि पंढरीची वारी।
मोक्ष मागे तो भिकारी।।
सांडोनि वाळवंट।
का बा इच्छिसी वैकुंठ।।
मुखी कवळ काल्याचे।
ऐसे वैकुंठी बा कैचे।।
नामयाचा विठा खेळे।
बाप नामची माझे भोळे।।
- संत विठा

या अभंगात संत विठा म्हणतात, ‘पंढरीच्या सुखाएवढे सुख इतरत्र कुठे आहे? एवढे सुख समोर असताना मुक्ती प्राप्त करुन काय करायचे आहे? जो पंढरपूरची वारी वा भक्तिमय असलेले पंढरपूरचे वाळवंट बाजूला सारून मोक्षाची मागणी करतो, तो माणूस खरोखर भिकारी होय. हे माणसा, मुखात काल्याचा घास असताना वैकुंठाची इच्छा का बरे करतोस? वैकुंठात यापैकी कुठलेही सुख नाही. मी नामयाचा विठा असून विठ्ठल या बापाचे साधेभोळे नाम हे माझे सर्वस्व आहे.’

संत विठा हे संत नामदेव यांचे पुत्र. संत नामदेवांप्रमाणेच तेही परम विठ्ठलभक्त होते. विठ्ठलभक्तीचा वारसा त्यांना संत नामदेवांपासूनच लाभला होता. त्यांचे एकूण अभंग उपलब्ध असून उत्कट भक्तिभावनांनी त्यांची अभंगवाणी संपन्न आहे.

विठ्ठल हा देव साधाभोळा आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा आहे. त्यांच्या सुखदु:खांशी समरस होणारा आहे. म्हणूनच विठ्ठलाला 'माउली' असे म्हटले आहे. संत नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हटलेय,

न पाहे गे माय विठाईविण डोळा।
सर्वस्वे कंटाळा आणिकांचा।।

विठोबाविण काही नायके मी कानी।
जडली चरणी चित्तवृत्ती।।

संत जनाबाईने विठ्ठलाला ‘लेकुरवाळा’ असे म्हटले आहे. आपल्या एका अभंगात ती म्हणते,

विठु माझा लेकुरवाळा।
संगे गोपाळांचा मेळा।।

विठ्ठलाच्या या माउलीपणाचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. संत तुकाराम म्हणतात,

विठ्ठल माझी माय।
आम्हा सुखा उणे काय।।

संत निळोबाराय म्हणतात,

दोही डोळा घालुनी वाती।
वाट पाहे दिवसराती।।

निळा म्हणे माझी आई।
न धरी निष्ठुर वो विठाबाई।।

विठ्ठलाचा सहवास आणि त्याचे भक्तिप्रेम हे संतांच्या आयुष्यातील आनंदाचे आकाश होते. या भक्तिसुखाने ते सर्व परींनी समृद्ध झाले होते. म्हणून मुक्ती, मोक्ष वा वैकुंठ या बाबींचे त्यांना जराही आकर्षण नव्हते. योगी, साधुजन वा साधक कठोर तपश्चर्या करीत आणि जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळावी अशी इच्छा बाळगीत. संतांना मात्र देवाच्या भक्तिरंगाचा आनंद वा सुख अनुभवण्यातच सुख वाटत होते. म्हणूनच मोक्ष वा मुक्ती या बाबींविषयी ते उदासीन होते. याउलट भक्तिप्रेमाचे सुख पुन्हापुन्हा मिळावे, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची त्यांची तयारी होती.

संत विठा हे त्यांचे पिता संत नामदेवरायांप्रमाणेच विठ्ठलभक्तीत रंगून गेले होते. वैकुंठ, मुक्ती वा मोक्ष या बाबी त्यांना त्याज्य वाटत होत्या. मोक्ष मागणे म्हणजे वैयक्तिक स्वार्थाची बाब आहे, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच ‘मोक्ष मागेल तो भिकारी’ अशा कठोर शब्दात त्यांनी मोक्ष मागणार्‍या भक्तजनांना फटकारले आहे आणि आपल्या नितळ, नि:स्वार्थी भक्तीचा आविष्कार घडविला आहे.